गुरुवार, १२ मे, २०१६

अल्लाउद्दिन खिलजी ते शिवछत्रपती .....

 

एक काळ होता जेंव्हा खरोखरच महाराष्ट्रावर वर्षांतील बाराही पौर्णिमा सुखाचे चांदणे शिंपीत होत्या. अन् शेकडो वर्षांपूर्वी मोठा घात झाला. चंद्राला अकस्मात खळे पडले. कसे पडले, केव्हा पडले ते कुणाला समजलेच नाही. विंध्याचलाच्या मागून धुळीचे लोट उठले. आठ हजार घोडय़ांच्या बत्तीस हजार टापा वाढत्या वेगाने आणि आवेशाने खडाडत महाराष्ट्रावर चालून आल्या. त्यांचा आवेश कत्तलबाजांचा होता..
त्यांचा म्होरक्या होता अल्लाउद्दीन खिलजी पठाण. त्याचा युद्धपुकार अस्मान फाडीत होता. ती पठाणी फौज नर्मदा ओलांडून सातपुडय़ाच्या माथ्यावर चढली. पठाणांची पहिली झडप पडली एलिचपुरावर. हंबरडे आणि किंकाळ्या फुटल्या. परचक्र आले. महाराष्ट्रावर परचक्र आले. थोडे दिवसच आधी महाराष्ट्रातील संतांची दिंडी उत्तर हिंदुस्थानात यात्रांना जाऊन आली होती. त्यांनी सुलतानांची सत्ता पाहिली, काही कठोर कडवट अनुभव घेतले. लोकांना सांगितले होते. तरीही राजा आणि राज्य गाफील होते..

अल्लाउद्दीनचे हे वादळी आक्रमण राजा रामदेवराव यादवाला उशिरा कळले. स्वराज्यात तो कमीतकमी शंभर कोस (म्हणजे सव्वाशे किलोमीटर) घुसला तरी त्याला कुणीच अडवले नाही? मग आमचे सैन्य होते कुठे? आमचा राजा बेसावध होता. पण सेनापती काय करत होता? सेनापती होता राजा रामदेवाचा युवराजच. त्याचे नाव शंकरदेव ऊर्फ सिंघणदेव. तो आपल्या सैन्यासह दूर कोठेतरी गेला होता. यात्रेला गेला होता म्हणे. अल्लाउद्दीनची फौज देवगिरीच्या रोखाने दौडत येत होती. रामदेवरावाला आपले भयंकर भविष्य दिसू लागले.

खिलजी आणि यादवसेना यांचे देवगिरीभोवती युद्ध झाले. अवघ्या पंधरा दिवसांत देवगिरीचे सार्वभौमत्व संपले. डिसेंबर १२९३ ला, ५०० मैलांवरुन आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने ८००० स्वारांनिशी देवगिरीवर हल्ला केला, त्यावेळी शंकरदेव यादव (राजपुत्र आणि सेनापती) खूप सारं सैन्य घेऊन दूर कुठेतरी गेला होता. देवगिरीवर असलेल्या ४००० स्वारांसोबत राजा रामदेवरायाने प्रतिकार केला पण तो तोकडा पडला. त्याने शेवटी तह केला.

ही बातमी कळताच शंकरदेव यादव परत आला तो मोठी फौज घेऊन देवगिरीच्या रक्षणासाठी आला. पण दरम्यान एका अफवा पसरली की, 'दिल्लीहून फार मोठी येणार आहे.' तरीही शंकरदेवाने खिलजीच्या सैन्याला चांगलेच झोडपून काढले, त्याच वेळी देवगिरी किल्ल्याच्या मागे असलेली १००० स्वारांची फौज खिलजीच्या मदतीला आली. त्यांच्या घोडांच्या टापांनी इतकी धूळ उडवली की फारसं काही दिसत नव्हतं. त्यामुळे यादवांच्या सैन्याला वाटलं की दिल्लीहून येणारी अफाट फौज म्हणजे तीच ही फौज. आणि यादव सेना घाबरून पळायला लागली. ६ फेब्रु. १२९४...
शेवटी तह होऊन खंडणी दिली गेली... किती ? ६०० मण सोनं, ७०० मण मोती, २ मण हिरे-माणकं आणि १००० मण चांदी, ..... आणि रामदेवरावाची मुलगी.... (इ. १३०९) यानंतर राजा रामदेवराव मरण पावला. शंकरदेव देवगिरीच्या सिंहासनावर राजा झाला आणि त्याने अल्लाउद्दीनाचे मांडलिकत्व झुगारून दिले. खंडणी बंद केली (इ. १३०९ पासून पुढे). हे कळताच अल्लाउद्दीनाने आपली फौज मलिक काफूरबरोबर देवगिरीवर पुन्हा पाठविली.
'तू देवगिरीच्या फौजेचा फडशा पाड आणि ते राज्यच जिंकून घे. तू तिथेच राहा. एक जुम्मा मशीद बांध आणि आपल्या धर्माचा प्रसार कर', असा हुकूम खिलजीने मलिकला दिला. युद्धाचा वणवा पेटला. शंकरदेव मराठय़ांच्या क्षात्रधर्माला शोभेसा लढत होता. अन् घात झाला. महाराष्ट्राच्या वर्मी घाव बसला. शंकरदेव ठार झाला. मलिक काफूरने त्याला मारले. कत्तल सुरू झाली. महाराष्ट्राच्या वैभवाचा, स्वातंत्र्याचा, सद्धर्माचा, सुसंस्कृतीचा, दराऱ्याचा तो गरुडध्वज कडाडून मोडून पडला. स्वातंत्र्याचा शेवटचा आक्रोश उठला. कणा मोडला आणि महाराष्ट्राची सोन्याची द्वारका बुडाली..

कारण महाराष्ट्राची दंडसत्ता आणि विवेकसत्ता ही गाफील राहिली. दंडसत्ता म्हणजे राज्यकर्ते आणि विवेकसत्ता म्हणजे शिकलेसवरलेले ज्ञानी लोक. उत्तर हिंदुस्थानात सुलतानी सत्तेचा केवढा प्रचंड धुमाकूळ चालू आहे आणि त्या हालअपेष्टात सत्ता, धर्म, संस्कृती आणि इतिहासही कसा चिरफाळून गेला आहे, हे आमच्या देवगिरीच्या यादवराजांना माहीत नसावे? उद्या किंवा परवा हा वरवंटा महाराष्ट्रावरही रोरावत येणार आहे हे यादव सत्ताधीश आणि पंडितांना माहितीच नसावे? तरीही इथले राज्यकर्ते आणि पंडित झोपेतच होते.

आपला देवगिरीचा पंतप्रधान हेमाद्री हा राज्यकारभारी होता. निदान त्याला तरी या भावी संकटाची जाणीव झाली होती का ? नव्हती. तसे पुसटसेही चिन्ह त्याच्या ग्रंथात आणि राज्यकारभारात दिसत नाही. त्याने याच काळात ‘व्रताचार शिरोमणी’ हा ग्रंथ लिहिला. म्हणजे व्रतवैकल्ये कशी करावीत, उपासतापास कसे करावेत, प्रसाद सव्वाशेराचा करावा की पावशेराचा पुरे याचा विचार करीत आमचे पंतप्रधान शिक्कामोर्तब उठवीत बसले होते. आळंदीच्या एका संन्याशाच्या तीन पोरांच्या मुंजी कराव्यात की न कराव्यात याचाच खल पैठणसारख्या विद्यानगरीत विद्वान करीत होते. संस्कृत धर्मग्रंथांच्या होळ्या पेटत होत्या. किनाऱ्यापासून पाच कोस कुणी समुद्र ओलांडला, तर ओलांडणाऱ्याला ते धर्मभ्रष्ट ठरवीत होते. सरहद्द ओलांडून दीडदीडशे कोस खिलजींच्या पठाणी सेना स्वराज्यात घुसल्या, तरी आमच्या राजाला आणि सेनापतीला त्याचा पत्ता लागत नव्हता. महाराष्ट्र गुलामगिरीत पडला त्यात आश्चर्य ते काय, राष्ट्रधर्म मृत्यूच्या दाढेत सापडला नसता तर आश्चर्य वाटले असते.

मात्र आजच्या घडीस देखील भारतीयांनी इतिहासातून धडा घेतलेला दिसत नाही कारण पहिले पाढे पंचावन्न सुरूच आहेत. देवगिरीच्या यादवांचा सर्वनाश करणारा खिलजी होता तरी कोण आणि कुठून आला होता याची माहिती जरी घेतली होती काळीज धस्स होते ! कारण हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या मुलुखात घुसलेले हे गनीम नुसते लढवय्ये नव्हते तर त्यांना युद्धनीती व राजनीती दोन्हीतले डावपेच अवगत होते. तर आपले राज्यकर्ते पोथ्या पुराणात अन कर्मकांडात गुरफटलेले होते.
गुलाम घराण्यानंतर भारतात खिलजी घराण्यातील सुलतानांनी १२९० ते १३२० पर्यंत दिल्ली येथे राज्य केले. जलालुद्दीन खिलजी हा खिलजी घराण्याचा संस्थापक. खिलजी हे कर्तबगार असले तरी क्रूर व जुलमी होते. अलाउद्दीन खिलजी याने १२९० ते १३०१ दरम्यान गुजरात, रणथंभोर, चितोड, माळवा, मारवाड, जालोर इ. ठिकाणी सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्याने दक्षिण हिंदुस्थानात देवगिरीचा रामचंद्रदेव, तेलंगणचे काकतीय राजे, कर्नाटकचे होयसळ राजे, आणि दक्षिणेकडील पांड्य घराणे यांविरुद्ध स्वाऱ्या केल्या. दक्षिण हिंदुस्थानात स्वारी करून इस्लामी धर्माचा प्रसार करणारा हा पहिला सुलतान. वायव्य सरहद्दीवरून आलेल्या मोगलांच्या स्वाऱ्यांना त्याने प्रतिकार केला. खिलजी घराण्याच्या काळात हिंदुस्थानात जितका सुलतानी सत्तेचा विस्तार झाला, तेवढा पूर्वी झाला नव्हता. खिलजी सुलतानांनी उत्तर हिंदुस्थानात सत्ता स्थापून दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत आपल्या सत्तेचा प्रभाव पाडला.

१२९३ मधे अल्लाऊद्दीन खिलजीने दक्षिणेवर स्वारी केली तेव्हाही त्याचा उद्देश फक्त संपत्तीची लुटमार एवढाच होता. या लुटालुटीच्या स्वा्रयांमधे त्या काळात हे राजे अजून एक महत्वाचे काम उरकत आणि ते म्हणजे त्या प्रदेशाची तपशिलवार माहिती गोळा करणे. अल्लाऊद्दीन खिलजीनेही तेच केले. त्या माहितीत त्याला दक्षिणेत किती महापराक्रमी राजे महाराजे आहेत हे कळाले आणि त्यांच्या संपत्तीची मोजदाद करता येणे अशक्य आहे हेही कळाले. पुढे सिंहासनावर बसल्यावर त्याने पठाणी टोळ्यांचा बंदोबस्त करून दक्षिणेचा विचार करायला सुरवात केली. अल्लाउद्दीन खिलजी अत्यंत हुशार व धोरणी व्यवस्थापक होता. त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. ती म्हणजे, 'दक्षिणेकडची राज्ये जिंकायची म्हणजे पदरात विस्तव बांधण्यासारखे आहे.' (त्या काळात). त्यापेक्षा त्या प्रदेशातील राजे एकामेकांशी भांडत राहिले, युद्ध करत राहिले तर ते कमकुवत राहतील व जेव्हा तो शेवटचे आक्रमण करेल तेव्हा प्रबळ अशी सत्ता त्या तेथे उरलेली नसेल. यासाठी त्याने दक्षिणेकडे फक्त खंडणी वसुलीचे ध्येय ठेवले. यासाठी त्याने मलिक काफूर याला दक्षिणेकडे पाठवून देवगिरी व वरंगळ ही दोन राज्य काबीज करून मांडलिक केली व तो त्यांच्याकडून नियमीत खंडणी वसूल करू लागला.

दक्षिणेकडे त्या काळात अजून दोन प्रबळ सत्ता होत्या त्यांची नावे होती – होयसळ व पांड्य. होयसळ राजांची राजधानी म्हणजे सध्याच्या म्हैसूरच्या आसपास तर पांड्य राजांची राजधानी होती मदूराई येथे. थोडक्यात पांड्यांवर हल्ला करण्यासाठी होयसळांचे राज्य पार करूनच जावे लागे. अल्लाऊद्दीनच्या फौजांनी होयसळांचा पराभव करून पांड्यांच्या मदूराई व रामेश्वरही लुटल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. पण या भागात अल्लाऊद्दीनचा पूर्ण अंमल (महसूल सोडून) कधीच बसला नाही असे मानायला जागा आहे.

लवकरच अल्लाऊद्दीन खिलजीचा मृत्यू झाल्यावर देवगिरीच्या यादवांनी राजा हरपाल देव याच्या अधिपत्याखाली खिलजींची सत्ता झुगारून दिली व स्वातंत्र्य पुकारले. अल्लाउद्दीनचा मुलगा मुबारक खान हा सिंहासनावर बसला. या चिरंजीवांना सुलतानी इतिहासकारही त्या सिंहासनाला लागलेला डाग असे समजत होते, यावरून त्याच्या लीलांचा अंदाज यावा. मालिक काफूरनेही या दिवटयाच्या खुनाचा प्रयत्न केला होता. हा सदोदित बायकांच्या गराड्यात व मद्याच्या धुंदीत असे. जनानखान्यातील एकापेक्षा एक सुंदर बायकांच्यात राहून राहूनही याचे खरे प्रेम त्याच्या एका खुस्रो खान नावाच्या गुलामावर होते. पण बहूदा हे एकतर्फी असावे. कारण याच गुलामाने पुढे जाऊन त्याचा खून केला. ( खुस्रोखानाबद्दल अशीही वदंता आहे की, हा खरे तर गुजरातमधला एक शूर हिंदू महार होता व तो धर्म बदलून मुबारकच्या पदरी लागला. याने मुबारकचा सूड उगवण्यासाठी हे सगळे केले व शेवटी त्याचा खून केला.) असो.. तर या मुबारक खिलजीने हरपालचे बंड शमवून त्याला पदच्यूत केले व त्याच्या जागी पहिल्यांदाच सुलतानी अंमलदार नेमला. हा सत्ताबदल झाल्यावर मात्र दक्षिण भारत खडबडून जागा झाला. आपल्या ताटात पुढे काय वाढून ठेवले आहे याची सगळ्या सत्ताधिशांना कल्पना आली. पण या दरम्यानच्या काळातच मुबारकखानाचा खून झाला, यानंतरचे खुस्रोचे राज्य फार कमी काळ टिकले व पुढे जाऊन तुघलकांनी दिल्लीची सत्ता काबीज केली. घियासुद्दीन तुघलक दिल्लीच्या तख्तावर बसला. अर्थात त्यामुळे दिल्लीश्वराचे दक्षिणेवरचे लक्ष काही कमी झाले नाही कारण दक्षिणेतील संपत्तीची मोजदाद अगोदरच झाली होती. नशिबाने घियासूद्दीन काही दक्षिणेत आला नाही. त्याची कारकिर्द त्याचे तख्त संभाळण्यातच गेली. दिल्लीवरून आक्रमण होत नाही असे पाहून वरंगळच्या राजांनी मुसलमान अंमलदारांना हटविण्याचा प्रयत्न केला पण घियासुद्दीनचा मुलगा महंमद तुघलकाने त्यांना रोखून त्यांचा पूर्ण पाडाव केला व अल्लाउद्दीनला जे जमले नव्हते किंवा त्याने जे केले नव्हते ते याने करून दाखविले. या विजयाने उन्मादीत होऊन त्याने एकामागून एक राज्ये घशात घालायचा सपाटा लावला. वरंगळ नंतर त्याने अजून दक्षिणेकडे जात पांड्य राजावर आक्रमण केले व त्याचाही पराभव करून मदूराईला सुलतानी अंमल बसवला. अल्लाउद्दीनने या राजांना जिंकले होते पण त्याने तेथे अंमल कधीच बसवला नाही. तो नुसती खंडणी गोळा करत असे. महंमद तुघलकाने (म्हणजेच उलुघ खान) ही चूक केली त्यामुळे त्या प्रदेशातील त्याच्या राज्याची देखभाल करणे त्याला कठीण जाऊ लागले. दक्षिणेकडे त्याचा एक आत्तेभाऊ त्याने ठेवला होता. त्याचे नाव होते बहाउद्दीन गुरशास्प. या बहाउद्दीननेच महंमदाविरुद्ध बंड केल्यामुळे त्याच्या कटकटी अजूनच वाढल्या. महंमद तुघलकाला 'वेडा महंमद' म्हणायला आपण आपल्या शाळेतील इतिहासात शिकलो पण हा एक अत्यंत धोरणी, शहाणा पण अत्यंत क्रूर असा सुलतान होता. उत्तरेकडे सगळे लुटून झाले होते, व दक्षिणेकडे अमाप संपत्ती होती अशा परिस्थितीत त्याने देवगिरीला राजधानी हलवायचा निर्णय घेतला. दक्षिण विषयक दृष्टीकोनातून त्याचा हा निर्णय योग्य होता असे म्हणावे लागेल.

उत्तरेत परकीय आक्रमणे झाल्यानंतर या आक्रमकांनी संबंध उत्तर भारत आपल्या वर्चस्वाखाली घेतला. आणि साहजिकच त्यांची नजर दक्षिणेकडे वळली . पुढे दिल्लीश्वरांनी दक्षिणेवर आपला डोळा ठेवला. या संभाव्य संकटाकडे एतद्देशियांनी दुर्लक्ष करणे ही मात्र भयंकर चूक होती .त्यावेळी देवगिरीपासून मलबार पर्यंत दक्षिणेत छोटी -छोटी राज्ये आपापल्या इलाख्यात राज्य करीत होती. दक्षिणेवरचे पहिले यवनी आक्रमण म्हणजे सुलतान अलाउद्दीन खिलजी याची १२९४ मधील देवगिरी वरील स्वारी होय. त्यानंतर १२९४ ते १३१८ या कालावधीत दक्षिणेवर इस्लामी आक्रमकांच्या तीन-चार स्वाऱ्या झाल्या. आणि अवघ्या २५ वर्षाच्या कालावधीत त्यांनी सारी दक्षिण पादाक्रांत केली. या ठिकाणी असलेली मोठमोठी राजघराणी लयास गेली. दक्षिणेतील राज्यांना कोणी वालीच उरला नाही.

आतापर्यंतच्या लढाया केवळ राज-घराण्यांच्या असत . सामान्यांना त्यामुळे फारसा फरक पडत नसे. पण हे आक्रमण मात्र सर्वंकष होते. शत्रूच्या स्रिया पळविणे ,तरुणींवर बलात्कार , लहान मुलांना निर्दयपणे मारणे आणि सामान्यांना बळजबरीने धर्मांतरित करणे असे या आक्रमणाचे भयावह स्वरूप असल्याने या कालावधीत दक्षिणेतील सर्व प्रजा हवालदिल होऊन गेली होती. इ.स. १३२७ मध्ये अशाच एका आक्रमणात अनागोंदीच्या राजाचा पराभव केल्यानंतर काही तरुणांना जबरीने धर्मांतरित करून दिल्लीला नेले. यातील दोन तेजस्वी बंधूनी दिल्लीला आपल्या कर्तृत्वाने सैन्यात अधिकाराची पदे प्राप्त केली. आणि सन १३३१ मध्ये दक्षिणेवर सुलतानाने आयोजित केलेल्या स्वारीचे नेतृत्व या दोन तरुणांकडे सोपविण्यात आले. दक्षिणेत आल्यावर या पूर्वाश्रमीच्या हिंदू राजघराण्यातील तरुणांनी संकेश्वर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यारण्य स्वामी यांची भेट घेतली . आणि स्वतः शंकराचार्यांच्या हस्ते या धर्मांतरित तरुणांना पुन्हा सन्मानाने हिंदू धर्मात घेण्यात आले. ते दोन तरुण म्हणजे हरिहर आणि बुक्क ही इतिहास प्रसिद्ध जोडी होय. या वीरांनी आपल्या नेतृत्वात नवी फौज उभी केली. आणि स्वतःच उत्तरेतून आणलेल्या दिल्लीच्या सेनेशी युद्ध केले. त्या सैन्याच्या पूर्णपणे पराभव केला. त्या नंतर विद्यारण्य स्वामी व त्यावेळच्या इतरही धुरंधरशासकांनी एकमताने तुन्गभद्रेच्या काठी दिल्लीच्या सुलतानाची सत्ता नसलेले संपूर्णपणे स्वतंत्र व सार्वभौम असे नवे राज्य स्थापण्याचे ठरविले. विजयाचे प्रतिक म्हणून तुन्गभद्रेच्या काठी वसवलेल्या या नगराला विजयनगर असे नाव देण्यात आले. याच शहराला नवीन राज्याची राजधानी घोषित करण्यात आले. तसेच सन १३३६ मध्ये या राज्याचा अधिपती म्हणून हरिहरास राज्याभिषेक करण्यात आला. एकूणच त्यावेळच्या परीस्थितीचा विचार करता अतिशय क्रांतिकारक रीतीने दक्षिणेतील या वैभवशाली राज्याची स्थापना झाली. केवळ राज्यक्रांतीच नव्हे तर धर्मक्रांती करून हे राज्य निर्मिले गेले हे नमूद करण्याजोगे आहे.

विजयनगर राजधानी निर्मितीचे विद्यारण्य प्रभूतींनी ठरविलेले तुंगभद्रेच्या काठचे स्थळ स्थापत्त्य शास्त्राच्या व सैनिकी दृष्टीनेही अतिशय बळकट परिसरात होते. तिन्ही बाजूनी उंच टेकड्या आणि चौथ्या बाजूला खोल नदी. त्यामुळे या नगराला एकप्रकारे निसर्गानेच प्रचंड तटबंदी उभारल्याप्र्माणे सुरक्षितता आली होती. या नगराभोवती एकावर एक असे सात बळकट तट बांधलेले होते. आणि अतिशय भव्य व शोभिवंत मंदिरे, भवने, प्रासाद, व जलाशय यांची व्यवस्थित रचना नगरात केली होती.

हरिहराने आपल्या साम्राज्याची घडी नेटकी बसवली. त्याच्यामागून बुक्कराय सिंहासनावर बसला. हा देखील अतिशय पराक्रमी आणि प्रत्याक्रमक होता. याने केवळ राज्य रक्षण न करता शत्रूंवर आक्रमणे केली.व त्यांना जिंकले देखील. विजयनगरचे हिंदुराज्य स्थापन होते न होते तोच दक्षिणेत दिल्लीच्या सार्वभौम सत्तेचेही तुकडे पडले. महमद तुघलकाने दक्षिणेत नेमलेला त्याचा प्रबल सुभेदार हसन गंगू याने सुल्तानाविरुद्ध बंड केले. आणि नर्मदेखालचा कृष्णे पर्यंतच्या प्रदेशाचा सुलतान म्हणून स्वतःच्या नावाची घोषणा केली. म्हणजेच १३३६ मध्ये दक्षिणेत विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन झाले. आणि अवघ्या १० वर्ष्यात १३४६ मध्ये दक्षिणेतच या राज्याचे प्रतिस्पर्धी असे बहामनी राज्य स्थापन झाले. बहामनी राज्याची सीमा विजयनगरच्या तुंगभद्रा नदीच्या सीमेशी भिडलेली होती. त्यामुळे या राज्यात सारखी युद्धे चालत. बुक्क रायाने १३७४ च्या लढाईत बहामनी सुलतान मजाहीदशह याचा मोठा पराभव केला.

बुक्क रायाने चीनच्या राजाकडे शिस्तमंडळ पाठविल्याचा उल्लेख सापडतो. बुक्क्नंतर त्याचा मुलगा दुसरा हरिहर याच्या राजवटीत बहामनीवर वारंवार विजय मिळवून विजयनगरच्या राज्याचा विस्तार केला. आणि मोठ्या समारंभाने हरिहराने महाराजाधिराज ही पदवी धारण केली.विद्यारण्य स्वामींचे बंधू सायनाचार्य (ज्यांनी ऋग्वेदावरलिहिलेली टीका आजही प्रमाण मानली जाते) ते यांचे मुख्य प्रधान होते. विजयनगरचा राज्यविस्तार या काळात गोमंतका पर्यंत पसरला होता.

महाराज कृष्णदेवरायाच्या राजवटीत विजयनगरच्या वैभवाचा, सामर्थ्याचा कळस झाला. विजयनगरच्या या राजाने आदिलशहाचा पराभव केला. तह करतांना लादलेल्या अटी या त्याच्या राजकारण निपुणतेचा प्रत्यय देतात. या काळात जणू स्वाभिमानाचे सुवर्णयुग विजय नगरात अवतरले असल्याचे आपल्याला जाणवते. विजयनगरच्या साम्राज्याची त्याच्या वैभवाची वर्णने अनेक परकीय प्रवाश्यांनी केलेली आहेत. जवळ-जवळ २०० वर्षाहून अधिक काळ अतिशय दिमाखात हे साम्राज्य या ठिकाणी नांदले. शेवटचा सम्राट रामराजा हा देखील अतिशय पराक्रमी होता. बहामनी सत्ता आपसात झुंजवत याने स्वतःच्या राज्याचा विस्तार मोठ्या कौशल्याने केला. पण ही सर्व बहामानींची शकले आपल्याविरुद्य एकत्र येऊन लढतील असे त्याला वाटलेच नाही. आणि हीच त्याची चूक झाली. दक्षिणेतील पाचही पातशाही राज्ये एकत्र येऊन त्याच्याविरुद्ध युद्धासाठी उभी ठाकली.

कृष्णदेवरायाच्या मृत्यूनंतर त्याचा सावत्र भाऊ अच्युतदेवराय गादीवर आला. तो विशेष कर्तबगार नव्हता. त्याचा मेहुणा तिरुमल हाच सर्व कारभार पाहात असे. अच्युतदेवरायाच्या कारकीर्दीत नायक राजे स्वतंत्र झाले आणि सुलतानांनी रायचूर व मुदगल हे प्रदेश बळकाविले. याशिवाय अंतर्गत कलहाला सुरुवात झाली. कृष्णदेवरायाच्या विधवा राणीने रामराजा (आरवीडु रामराय) या जावयाची बाजू घेऊन त्यास राजधानीवर सैन्य देऊन पाठविले; पण तिरुमलाने त्याचा पराभव केला. अच्युताच्या मृत्यूनंतर वेंकट हा त्याचा मुलगा गादीवर आला. तिरुमलाने गादीसाठी त्याचा खून केला; परंतु रामराजाने तिरुमलाचा पराभव करून कृष्णदेवरायाचा सावत्र भाऊ रंगराय याचा मुलगा सदाशिवराय (कार. १५४२-६५) यास सर्व पक्षांच्या संमतीने गादीवर बसविले. सदाशिवराय हा लहान असल्यामुळे रामराजा हा सेनापतीच खरा सत्ताधारी होता. त्याने आपला भाऊ तिरुमल याला मुख्य प्रधान केले आणि वेंकटाद्री या भावास सेनापती नेमले. यावेळी सुलतानी शाह्यांत आपसांत संघर्ष सुरू होता. आदिलशाह व कुतुबशाह यांचे काही प्रदेश रामराजाने घेतले, तेव्हा ते खवळले, तसेच निजामशाहचा मुलूख घेऊन त्याला शरण आणले. परिणामतः या सर्वांनी एकजूट करून रामराजावर स्वारीचा बेत आखला. तिचेच रूपांतर १५६५च्या तालिकोटच्या भीषण लढाईत झाले. राजकीय कारणांमुळे मुख्यतः ही लढाई झाली. आताच्या विजापूर जिल्ह्यात रक्कसगी व तंगडगी या गावांदरम्यान ही लढाई झाली. तीत विजयानगर विरुद्ध विजापूरचा आदिलशाह, अहमदनगरचा हुसेन निजामशाह, बीदरचा अली बरीदशाह आणि गोवळकोंड्याचा इब्राहिम कुतुबशाह यांनी भाग घेतला. या लढाईत विजयनगरच्या फौजेचा दारुण पराभव होऊन रामराजाला पकडून ठार मारण्यात आले. चारही शाह्यांमध्ये हुसेन निजामशाहचे वर्चस्व होते. रामराजाबरोबर त्याचा भाऊ वेंकटाद्रीही मारला गेला. त्याचा तिसरा भाऊ तिरुमलराय हा पळून गेला. त्याने नंतर पेनुकोंडे येथून राज्य करण्यास प्रारंभ केला. विजयानगरला कोणीच वाली उरला नसल्यामुळे कितीतरी महिने त्याची लूट चालूच होती. एकेकाळी अत्यंत वैभवसंपन्न असलेले हे नगर काही महिन्यांतच बेचिराख झाले.

तिरुमलरायानंतर त्याचे दोन पुत्र अनुक्रमे दुसरा श्रीरंग आणि दुसरा वेंकट हे गादीवर आले. वेंकट हा या वंशातील शेवटचा महत्त्वाचा राजा होय. त्याने दक्षिण भारतात आपल्या राज्याचा विस्तार केला. श्रीरंगाच्या कारकीर्दीत पेनुकोंड्याहून चंद्रगिरीला राजधानीचे स्थलांतर झाले. पुढे काही वर्षांनंतर वेल्लोर ही विजयानगरची राजधानी करण्यात आली. विजापूर आणि गोवळकोंडा यांच्या फौजांनी १६४६ मध्ये या वंशाचा अखेरचा राजा चौथा श्रीरंग याचा पूर्ण पराभव केला. परिणामतः विजयानगर साम्राज्य अस्तंगत पावले. त्याच वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. एतद्देशियांची सत्ता विजयानगरमध्ये लोप पावून जणू काही ती महाराष्ट्रात पुनरुज्जीवितच झाली होती.

८०० ते १६०० या ८०० वर्षाच्या काळात केवळ आणि केवळ आक्रमणे होत राहिली प्रतिकार म्हणावा असा झाला नाही. जो प्रतिकार झाला तो तोकडा पडला आणि आपसातील ऐक्याचा अभाव, धार्मिक ऐक्याचा अभाव, नवीन युद्धतंत्रे व साहित्य यांचा अभाव, अति सहिष्णुता आणि काहीअंशी भेकडपणा, आत्मविश्वासाचा अभाव या आपल्या दोषकारणांमुळे हे हल्ले अत्यंत विनाशक ठरले आणि सर्व एतद्देशिय राज्ये व तत्कालीन सर्व स्थानिक राजवटी अक्षरशः नेस्तनाबूत झाल्या. या सर्व प्रलयंकारी पाडावानंतर इस.१६३० पासून शिवाजी राजांनी मुघली सत्तेविरुद्ध अन चारी पातशाह्यांविरुद्ध दिलेली एकाकी टक्कर हीच खरया अर्थाने भारी ठरली. मात्र तिची जर तुलना करायची झाली तर त्यासाठी शब्द कमी पडतील अशी होती. हत्ती आणि मुंगी यांची लढाई मुंगीने जिंकली असं म्ह्टलं तर कोणी विश्वास ठेवेल का ? या ८०० वर्षातला सर्वात क्रूर, कपटी, धोरणी आणि आक्रमक बादशहा होता औरंगजेब आणि त्याच्या मुघल साम्राज्याची ताकद हत्तीइतकी होती तर स्वराज्याची ताकद त्यापुढे मुंगीइतकी होती असं म्हणणे अतिशयोक्तीचे वाटेल, पण आधीचा ८०० वर्षाचा इतिहास वाचला तर माझे म्हणणे तुम्हाला कदाचित पटेल !

अल्लाउद्दिन खिलजीने साम्राज्यविस्ताराचे जे कर्तृत्व दाखवले ते आपल्या देशातल्या कोणत्या योद्धयास जमले होते याचे नाव देखील लगेच नजरेस पडत नाही ! येऊन जाऊन ऑगस्ट १७५८ मधल्या अटकेपार झेंड्याचे आपल्याला अप्रूप वाटते. खिलजी घराण्याच्या गझनी शहरापासून पासून देवगिरीचे अंतर १६२५ किलोमीटर इतके आहे. तर पुणे ते अटक हे अंतर १५१० किलोमीटर इतके आहे. अटकेवर झेंडा फडकविल्यानंतर जेमतेम काही दिवस तिथे मराठी सैन्य थांबले. अटकेवर झेंडा फडकावून झाल्यावर पुढच्या तीनच वर्षात १७६१ मध्ये तर पानपतावर आपल्या अटकेपारच्या पराक्रमाचे तुणतुणे मोडून पडले. मात्र खिलजी घराण्याने काही मुलुखाचा अपवाद वगळता तब्बल ३० वर्षे भारतभर राज्य केले ! इसवीसन ७१२ ते १५२६ या ८०० वर्षांच्या काळात आपल्यावर तुर्की टोळ्या, गझनी, घोर, गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद, लोधी आणि शेवटी मुघल अशी परकीय आक्रमणे होत राहिली तर स्वातंत्र्यपूर्व काळात दोन शतके इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. हे त्यांनी कशाच्या जोरावर केले अन आपण ते का करू शकलो नाही या प्रश्नांववर अंतर्मुख होऊन विचार केला तरच उत्तरे मिळतात अन्यथा आजही आभासी प्रश्नाच्या भूलभुलैय्यात आपण गुंतून पडलेले आहोतच की !

छायाचित्र विश्लेषण - सोबतच्या चित्रात वरून प्रथम दिसतो तो आहे खिलजी साम्राज्याचा नकाशा, त्यानंतर विजयनगरच्या साम्राज्याचा नकाशा, त्यापुढे अल्लाउद्दिन खिलजीची तसबीर, वरून शेवटी आहे ते विजयनगरची बाजारपेठ.
चित्रात खालच्या रांगेत आधी विजयनगर कालीन नाणी त्याखाली खिलजीची नाणी, त्यापुढे आहेत देवगिरीतले अवशेष, त्याखाली हम्पीच्या प्रसिद्ध कृष्णमंदिराच्या दरवाजावरील शिल्प, त्यापुढे दिल्लीतले खिलजीच्या मजारचे श्वेतशाम छायाचित्र, त्यानंतर हम्पी मधले समृद्ध अवशेष, कृष्णदेवरायचे चित्र आणि सर्वात कोपरयात खाली विजयनगरचा ध्वज आहे.

- समीर गायकवाड.

सूचना सदर लेखावर धार्मिक. जातीय तेढ वाढवणारया टिप्पणी करू नयेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा