Tuesday, May 10, 2016

रौप्य, सुवर्ण नव्हे तर शतकमहोत्सवी यश मिळवलेल्या एका मराठी सिनेमाची गाथा ....

आजकाल 'सैराट'ने केलेल्या करोडो रुपयांच्या कमाईच्या रकाने भरून बातम्या येताहेत मात्र त्याहीपेक्षा जास्त लोकप्रियतेचे रेकॉर्ड केलेल्या एका विक्रमी मराठी सिनेमाच्या गाथेची हीा पोस्ट. १९५९ मध्ये रिलीज झालेल्या हा सिनेमा विजयानंद थियेटरमध्ये सलग १३१ आठवडे म्हणजे दोन वर्षे, सहा महिने व तीन दिवस इतका काळ चालू होता. हा विक्रम पुन्हा कधीही कोणी मोडू शकले नाही अन भविष्यातदेखील कोणी मोडेल की नाही हे नक्की सांगता येत नाही. हा सिनेमा होता 'सांगत्ये ऐका !'...मराठी चित्रपटसृष्टीत "सांगत्ये ऐका'नं विक्रमी यशाचा झेंडा रोवला. हे यश एकट्या-दुकट्याचं नसून, पडद्यावरील व पडद्यामागील एकूण कलावंतांचं होतं. तरी या यशात सिंहाचा वाटा होता तो निर्माते-दिग्दर्शक अनंत माने यांचा. "अशा या "सांगत्ये ऐका'चे कर्ते करविते अनंत माने यांचा काल स्मृतिदिन होता त्या निमित्ताने सांगत्ये ऐकाची वेधक चित्तरकथा... (पूरक माहिती ग्रंथकार श्री. नारायणराव फडके व लेखक मधु पोतदार यांच्या सौजन्याने)

"सांगत्ये ऐका'चं यश मानेंना अगदी सहजासहजी मिळालं होतं का? स्वच्छ होण्यासाठी जसं झिजावं लागतं, पवित्र होण्यासाठी जसं जळावं लागतं आणि अंकुरित होण्यासाठी जसं जमिनीत पुरून घ्यावं लागतं तसं प्रचंड यश मिळविण्यासाठी परिश्रमाबरोबरच अनेक खस्ता खाव्या लागतात. अनेक दिव्यातून जावं लागतं. "सांगत्ये ऐका' करताना मानेंना हे सारं करावं लागलं होतं. अनेक अडचणींना, अनेक पेचप्रसंगांना इतकंच काय; पण अनेक वादळांना माने यांनी तोंड दिलं होतं.

पहिल्या काही चित्रपटांच्या निर्मितीकाळात घडलेल्या घटना, गमती-जमती फारच मनोरंजक आहेत. "संत तुकाराम', "रामशास्त्री', "श्‍यामची आई', "सांगत्ये ऐका', "केला इशारा जाता-जाता' आणि "पिंजरा' असे काही वानगीदाखल चित्रपट सांगता येतील, ज्यांच्या निर्मितीच्या वेळी घडलेल्या अनेक घटनांवर एकेक सुंदर रोमांचक कादंबरी तयार होऊ शकेल! "सांगत्ये ऐका'ची कथा मिळवायला मानेंना अजिबात त्रास झाला नाही; किंबहुना अगदी सहज व स्वस्तात ही कथा मिळाली होती. ज्या "सांगत्ये ऐका'नं मानेंना प्रचंड यश आणि वितरक केळकरांना लाखो रुपये मिळवून दिले, त्या कथेचे लेखक पारखी यांना अवघे पाचशे रुपये मानधन मिळालं होतं. "सांगत्ये ऐका'च्या कथेची पार्श्वभूमी बघणेही अतिशय मनोरंजक आहे.

कथालेखक गो. गं (गोपाळ गंगाधर) पारखी हे पुण्याचे. त्यांनी लिहिलेल्या कथेची थोडी पार्श्वभूमी कथेइतकीच रंजक आहे. १९५० मध्ये य. गो. जोशींच्या "प्रसाद' मासिकानं एक कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. पारखींनी त्यासाठी "न्याय' ही कथा लिहिली. या कथेला स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळालं. (प्रत्यक्ष पारितोषिक मात्र मराठी ग्रंथ कोषाच्या १० खंडांच्या स्वरूपात मिळालं होतं.) याच सुमारास पारखींना कुलकर्णी नावाचे मराठी चित्रपटात बऱ्यापैकी नाव असलेले चित्रपट दिग्दर्शक भेटले. त्यांच्या वाचनात ही कथा आली होती. त्यांनी पारखींना या कथेवर आपण सिनेमा काढू, असं सांगितलं. पारखी तर नुसत्या कल्पनेनंच मोहरून गेले. मग कुलकर्णींनी पारखींकडूनच पटकथा लिहून घ्यायचं ठरवलं. आपल्या कथेवर चित्रपट होणार; या आशेपोटी पारखी बिचारे रोज रात्री कुलकर्णीच्या घरी जात. रोज थोडी थोडी पटकथा लिहीत. आता सिनेजगतात या कथेची चर्चा सुरू झाली. पण या चर्चेत पारखी या लेखकाचा उल्लेख न होता कुलकर्णींचेच नाव अधिक यायला लागलं. पारखींना ही गोष्ट खटकली. पण कुलकर्णींच्या निमित्तानं पटकथा लिहिण्याचा अनुभव मिळतोय याचाच त्यांना जास्त आनंद होता.

पुढे तर पारखींना असं ऐकायला मिळालं, ते म्हणजे सिनेक्षेत्रात कुलकर्णी यांनी एक जबरदस्त कथा लिहिली असून; पारखी नावाचा एक नवथर लेखक त्यांच्या मदतीनं पटकथेचं काम करतोय. या गोष्टी ऐकल्यावर मात्र पारखींना फार त्रास झाला. त्यांनी पटकथा लेखनाचं काम थांबवलं खरं; पण कुलकर्णींना जाब विचारण्याइतकी ताकद वा आत्मविश्‍वास पारखींमध्ये त्यावेळी नव्हता. पारखींना त्यावेळी फार मानसिक त्रास झाला. त्यांच्या मनाची विचित्र कोंडी झाली. ही सल त्यांच्या मनाला सतत बोचत राहिली. अशात एक वर्ष निघून गेलं. मनातली ही रुखरुख कोणाला तरी सांगावी म्हणजे मोकळं वाटेल म्हणून त्यांनी त्यांचे मित्र "रोहिणी' मासिकाचे व दैनिक "संध्या'चे संपादक वसंतराव काणे यांना आपली व्यथा बोलून दाखवली.

काणेंनी पारखींना दिलासा देऊन मानसिक त्रास कमी होण्यासाठी एक छान मार्ग सुचविला. ते म्हणाले, "हे बघा, आता मे महिना चालू आहे. ऑक्‍टोबरमध्ये "रोहिणी'चा दिवाळी अंक निघतो; तेव्हा तुम्ही लिहिलेल्या पटकथेचं कादंबरीत रूपांतर करा. आपण ही कादंबरी दिवाळी अंकात छापू. यामुळे दोन गोष्टी होतील, माझ्या मासिकाला भरभक्कम कादंबरी मिळेल; आणि दुसरी म्हणजे ही कथा तुमची आहे हे लोकांना कळेल!'
पारखींनी काण्यांचं बोलणं मनावर घेऊन धडाक्यात कादंबरी लिहून टकली. पण कादंबरीचं नाव काय ठेवावं? बालपणी जुन्नरला पाहिलेला तमाशा त्यांना आठवला. त्यात वगाला सुरुवात करण्यापूर्वी नायिका ढोलकीच्या कडाक्यात समेवर येत कानावर हात ठेवून म्हणायची, "सांगत्ये ऐका ।।.' कादंबरी तमाशाच्याच पार्श्वभूमीवर होती. त्यामुळे कादंबरीचं नाव ठरलं, "सांगत्ये ऐका!'

मात्र खरया अडथळ्यांचा प्रवास अजून सुरु व्हायचा होता. "न मिळालेला न्याय' या कथेतला सावकार कादंबरीत पाटील झाला. ऋणको, शेतकरी हा सखाराम झाला, त्याची पाटलाकडून बलात्कार झालेली बायको हौसा झाली; तर सावकाराला दहशत बसविणारा कादंबरीत सावळ्या झाला. "सांगत्ये ऐका' ही कादंबरी अनेकांनी वाचली. काही वाचकांना ती आवडलीही. पुण्यात जुनी पुस्तके व मासिके विकत घेऊन आवडीने वाचणारे हौशी वाचक त्या काळात खूप होते. ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर सुमारे पाच वर्षांनी असेच एक जुनी पुस्तके मासिके, वाचणारे हौशी वाचक व लेखक रामचंद्र हिंगणे यांच्या वाचनात "सांगत्ये ऐका' ही कादंबरी आली. त्यांना ही कादंबरी खूप आवडली. त्यांनी ही कादंबरी त्यांच्या शेजारी राहणारे मित्र सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने यांना वाचायला दिली. मानेंनाही ती कादंबरी प्रचंड आवडली; आणि त्यांच्या डोक्‍यात या कादंबरीवर चित्रपट काढण्याची चक्रे फिरू लागली. मग त्यांनी ती विनायक देऊळकर व त्यांचे मित्र भाईसाहेब दातार यांनी वाचायला दिली. त्या दोघांनाही ती मुळीच आवडली नाही; पण ती कादंबरी मान्यांच्या मनात ठसली होती. मग त्यांनी ती वितरक राम कर्वे, राम देवताळे यांना वाचण्याचा आग्रह केला; पण त्यांनाही ती पसंत पडली नाही. मानेंनी पिच्छाच पुरवायचं ठरवलं होतं. त्यांनी ही कादंबरी "मंगल पिक्‍चर्स'चे निर्माते वामनराव कुलकर्णी यांना तोंडी ऐकवली. त्यांना ती बरी वाटली. ते म्हणाले, "आपण ही कथा प्रभात स्टुडिओचे एस. एच. केळकर यांना ऐकवू या!'

मानेंना वाटलं, चित्रपटसृष्टीतल्या रथी-महारथी म्हणवणाऱ्या ढुढ्ढाचाऱ्यांना ही कथा आवडली नाही, तिथे ज्यांचा पिंड केवळ व्यापारी आहे, त्या केळकरांनाही कशी काय आवडणार? पण गंमत म्हणजे ही कथा अर्धी ऐकल्यावरच केळकर म्हणाले, "बस! छान कथा आहे. यावर चित्रपट काढायला हरकत नाही. मी "फायनान्स' करायला तयार आहे!'

आता कथालेखक गो. गं पारखी यांच्याकडून कथेचे हक्क विकत घ्यायला हवेत. म्हणून माने मग पारखींकडे गेले. पारखी त्यावेळी शनिवार पेठेत राहत व पुणे म्युनिसिपालिटीत "ओव्हरसीयर' म्हणून कामाला होते. माने पत्ता शोधत पारखींकडे गेले; तेव्हा ते कामावर गेले होते. मान्यांनी पारखींच्या पत्नीला कामाचं स्वरूप सांगितलं. "संध्याकाळी सहाला घ्यायला येतो. तयार राहायला सांगा !' असा निरोप सांगून ते निघून गेले. कामावरून घरी आल्यावर पारखींना निरोप समजला. भाड्याच्या सायकलनं कामावर जाणाऱ्या पारखींची परिस्थिती त्यावेळी यथातथाच होती. मान्यांचा निरोप ऐकून त्यांना आनंद झाला. इस्त्री करून ठेवलेला जादा कपड्यांचा एकच सेट होता. त्यामुळे कुठले कपडे घालू हा विचार करायला वावच नव्हता.

संध्याकाळी माने गाडीतून त्यांना बाहेर घेऊन गेले. तिथे बैठकीत मानेंनी सुरुवात केली- "तुमची "रोहिणी' मासिकातील कादंबरी मी वाचली. त्या कथेवर आम्हाला चित्रपट करायचय; त्या कथेचे हक्क आम्हाला हवेत. मानधन म्हणून तुम्हाला पाचशे रूपये देऊ!' ही "ऑफर' ऐकताच पारखींना अस्मान ठेंगणं झालं. नाही म्हणायचा प्रश्‍नच नव्हता. "ऍडव्हान्स' म्हणून मानेंनी दिलेले दोनशे रुपये आयुष्यातली सर्वात मोठी लेखनकमाई खिशात ठेवण्यासाठी म्हणून पारखींनी खिशात हात घातला तो खिसा उसवलेला. मग पैसे हातात घट्ट धरून बसले. मानेंनी गाडीतूनच घरी सोडले. तोवर दोनशे रुपये पारखींच्या घामेजलेल्या मुठीतच होते.

मानेंनी पारखींची कथा घेतली. पण त्यावेळी त्यांचं नाव नव्हतं व पटकथा लेखनाचा अनुभव नव्हता. त्यामुळे पटकथेसाठी माने आता व्यंकटेश माडगूळकरांना भेटणार होते. आतापर्यंत मानेंना ज्यांना कथा दाखवावी त्यांना ती नापसंत पडावी, अशा अगदी किरकोळ अडचणी आल्या होत्या. पण खरी "अडथळ्याची शर्यंत' आता सुरू होणार होती आणि त्याची सुरुवात व्यंकटेश माडगूळकरांपासूनच झाली. मानेंनी माडगूळकरांची भेट घेऊन त्यांना कादंबरी वाचायला दिली. दोन दिवसांनी माने भेटल्यावर व्यंकटेश माडगूळकर त्यांना म्हणाले, "काय हे माने अण्णा, कसली भिकार कादंबरी मला दिलीत, असल्या फालतू कथेवर मी माझा वेळ घालवणार नाही व तुम्हीही तुमचे पैसे व श्रम घालवू नका!' पण मानेंचा आग्रह पाहून व्यंकटेश पुन्हा म्हणाले, "तुम्ही असं करा ना! तुम्ही त्या पारखींनाच का संवाद लिहायला सांगत नाही?'
"हे पाहा व्यंकटेशजी, मागच्या "धाकटी जाऊ' चित्रपटापासून तुमचा-आमचा सूर जमलाय. तेव्हा काही झालं; तरी तुम्हीच ते लिहायला पाहिजे. तुम्हाला कथा आवडली नसली तरी तुम्ही माझ्यासाठी म्हणून पटकथा-संवाद तयार करा. मग ही कथा व माझे नशीब काय व्हायचे ते होऊ द्या!'- मानेंनी निर्वाणीचं सांगितलं. शेवटी मानेंच्या शब्दांना मान देऊन व्यंकटेश माडगूळकरांनी पटकथा-संवाद लिहायच कबूल केलं.

माडगूळकरांच्या मानेंबरोबर बैठका होऊ लागल्या. पटकथा साकार होऊ लागली; पण याच काळात एक गडबड झाली. निर्माते वामनराव कुलकर्णी व विष्णुपंत चव्हाण यांच्या डोक्‍यात एक वेगळंच विचारचक्र चालू झालं. माडगूळकरांकडली बैठक संपताच दोघे जण "फायनान्सर' एस. एच. केळकर यांना भेटले आणि केळकरांकडं त्यांनी एक वेगळाच प्रस्ताव मांडला. चित्रपट चालू असताना "फायनान्सव्यतिरिक्त आम्हा दोघांना खर्चाला म्हणून दरमहा एकेक हजार रुपये द्यावेत,' असा हा प्रस्ताव. तो ऐकून केळकर चाटच पडले. त्यांच्यासारख्या व्यवहारचतुर माणसाला हा आडनिडा प्रस्ताव मंजूर होणंच शक्‍य नव्हतं. त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि "सांगत्ये ऐका' चित्रपट काढायचं रद्द झालं.

झालं! मानेंच्या हातातोंडाशी आलेला घास नियती काढून घेऊ बघत होती. माने निराश झाले. पण आठ दिवसांनी मानेंचे मित्र वि. गो. नमाडे यांचा निरोप आला. त्यांनी सुचवलं की या चित्रपटासाठी माने यांनी स्वतःच निर्माते व्हावे. यापूर्वी चित्रपट निर्मितीचा (पायदळी पडलेली फुले) त्यांना अनुभव आहेच. तेव्हा माने निर्माता म्हणून"सांगत्ये ऐका' काढायला तयार असतील तर केळकर "फायनान्स' द्यायला तयार आहेत.
हा निरोप ऐकून मान्यांना आनंदाचं उधाण आलं. त्यांच्या जुन्या "चेतना चित्र'च्या बॅनरखाली "सांगत्ये ऐका' आता निघणार होता. या बॅनरचे आणखी एक भागीदार निवास मोरे यांचीही या गोष्टीला संमती होती. 

केळकरांनी मान्यांशी दिग्दर्शनाच्या कराराशिवाय निर्माता म्हणूनही करार केला. पटकथा-संवादाचं काम पूर्ण झाल्यावर माने गाण्यांसाठी ग. दि. माडगूळकर (थोरली पाती) यांच्याकडे गेले. अण्णांच्या (माडगूळकर) कानावर व्यंकटेशला कथा न आवडल्याचं आलंच होतं. आता त्यांनीही आढेवेढे घेतले. पण मान्यांनी काही पिच्छा सोडला नाही. तेव्हा यातून सुटका करून घेण्यासाठी अण्णांनी मानेंना "प्रत्येक गाण्याचे दुप्पट पैसे घेईन!' असं सांगून पाहिलं. पण माने जिद्दीलाच पेटले होते. त्यांनी तेही मान्य केले. मग माडगूळकरांना गाणी लिहून द्यावीच लागली. मान्यांचे लाडके व आवडते संगीतकार वसंत पवार यांनी तर गाणी झाल्यावर पटापट चाली लावून टाकल्या. आठ गाण्यांमध्ये एक वग, एक गवळण, एक द्वंद्वगीत, एक भूपाळी, एक स्त्री-गीत आणि तीन लावण्या होत्या. पवारांनी नेहमीच्या सवईप्रमाणे सर्व गाण्यांना पटापट आणि अप्रतिम चाली लावल्या. या गाण्यांपैकीच एक होते 'बुगडी माझी सांडली गं...' ही लावणी. बुगडीच्या जन्माची कथा या लावणीइतकीच सुरेल आहे...

संगीतकार वसंत पवारांनी सर्व गाण्यांना चाली दिल्या अन एका लावणीला मात्र ते अडले. मनासारखी चाल जमेना. त्यांनी मानेंना सुचवलं की, माडगूळकरांकडून आपण दुसरी लावणी लिहून घेऊ या! पण मानेंना ते मान्य नव्हते; कारण त्यांना त्या लावणीचे शब्द फारच आवडले होते. ती लावणी होती "बुगडी माझी सांडली गं, जाता साताऱ्याला, चुगली नका सांगू गं, कुणी माझ्या म्हाताऱ्याला' वसंत पवारांसारख्या लावणीसम्राटाला एका लावणीला चाल सुचू नये असं पहिल्यांदाच घडत होतं. मग माने यांनी यावर एक तोडगा काढला. त्यावेळी संगीतकार राम कदम वसंत पवारांचे सहायक म्हणून काम करीत. माने पवारांना म्हणाले, "आपण असं करू, या रामला करू देत चाल' आणि ते राम कदमांना म्हणाले, "रामभाऊ, तू या लावणीला चाल लाव. बघू तुझं कसब!' यावर रामभाऊ नम्रपणे म्हणाले, "वसंताची हरकत नसेल तर मी चाल लावीन.'त्यावर माने म्हणाले, "त्याची हरकत नाही हे मी तुला त्याच्या समोरच सांगतोय ना. बस तर मग तू गाण्याला चाल लावून आण.' त्यानंतर दिवसभर रामभाऊंच्या डोक्यात त्या लावणीचाच विचार होता. इतक्यात त्यांचा बासरीवादक मित्र मधू गाडगीळ त्यांच्या कुणा वादकाचे वडील वारले म्हणून सांगायला आला. रामभाऊ मधूबरोबर त्या वादकाच्या घरी गेले. त्याच्या घरची मंडळी रामभाऊंना ओळखत होती. त्यांना पाहताचा एकदम कल्लोळ उठला. एखादं समूहगीत कोरसमध्ये म्हणावं तसं बायकांनी एकदम सूर लावला
"त्यो बाबा रं कसा कुठं गेला रं
राम त्याला आण रं'

हा प्रकार बराच वेळ चालला होता. शेवटी सर्व आटोपून रामभाऊ घरी आले. त्यांच्या कानात मात्र "माझा त्यो बाबा रं'चेच सूर घुमत होते. त्यावेळी त्यांना एकदम आठवण झाली, की आपल्याला त्या लावणीला चाल लावायचीय. कानात घुमणारया त्याच सुरामध्ये त्यांनी लावणीचा मुखडा बांधून टाकला. रामभाऊंनी मुखड्याची चाल बांधली आणि एकदम अडसर दूर होऊन साचलेल्या पाण्याचा झरकन निचरा व्हावा तसं वसंतरावांचं झालं. रामभाऊंच्या मुखड्याच्या चालीला अनुरूप अशा चाली त्यांनी त्या लावणीच्या पाचही अंतऱ्यांना त्यांच्या नेहमीच्या झोकदार शैलीत लावून टाकल्या. आणि... कैक वर्षे मराठी मनाला भुरळ पाडणारी, अवघ्या मराठी जनतेचा कलिजा खलास करणारी अप्रतिम लावणी जन्माला आली. "बुगडी माझी सांडली गं...' या लावणीनं इतिहास घडविला. चित्रपटाची सुरुवात मात्र माडगूळकरांनी लिहिलेला गण न घेता "लवकर यावे सिद्धगणेशा... आतमधी कीर्तन वरून तमाशा' या पठ्ठे बापूरावांच्या गणानं करायचा निर्णय मानेंनी घेतला.

चित्रिकरणाच्या आधीची सर्व तयारी झाली. पडद्याआडच्या काही मंडळींकडून मान्यांची अडवणूक झाली खरी; पण माने त्यातून सुखरूप बाहेर पडले. अन कलाकारांकडून होऊ घातलेल्या अडचणींचा पाढाच त्यांच्या पुढयात आला ...
चित्रपटातील पाटलाच्या बायकोचे काम सुलोचनाबाईंनी करण्याचं मान्य केलं होतं. त्यामुळे हौसाचा व तिच्या मुलीचा (नायिका) असा "डबल रोल' जयश्रीबाईंना द्यायचं मानेंनी कबूल केलं होतं. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी माने स्टुडियोत आले. सुलोचनाबाई आधीच आला होत्या. पण "मेकअप' न करता तशाच बसल्या होत्या. त्यांना विचारताच त्या हसून म्हणाल्या, "मी पाटलिणीचा "रोल' करणार नाही!' "शूटिंग'ची तर सारी तयारी झाली होती. माने हबकूनच गेले. ते म्हणाले, "बाई, तुम्हाला मी रोल समजावून सांगितला. तेव्हा तुम्ही होकार दिला होता आणि आता मध्येच हे काय? "शूटिंग' रद्द झालं तर माझी केवढी नाचक्की होईल. शिवाय केळकरसाहेब माझ्यावर नुकसानभरपाईचा दावा लावतील ते निराळंच!' त्यावर सुलोचनाबाई म्हणाल्या, "तुमचं शूटिंग रद्द होणार नाही. मात्र मी पाटलिणीचा रोल न करता सखारामाच्या (चंद्रकात) बायकोचा- हौसाचा "रोल' करीन!' सुलोचनाबाईंनी मानेंना आणखी एक धक्का दिला. मानेंना तर सुलोचनाबाईंचा प्रस्ताव ऐकून काहीच सुचेना. ते सुलोचनाबाईंना म्हणाले, "अहो तो रोल तुम्हाला देता येणार नाही. तो "डबल रोल'पैकी एक "रोल' आहे. आणि ते दोन्ही "रोल' म्हणजे सखारामाची बायको हौसा आणि तिची बलात्कारातून झालेली; पण तमासगीरबाईकडे वाढलेली मुलगी (नायिका) हे दोन्ही "रोल' मी जयश्रीबाईंना देण्याचं मान्य केलं आहे. त्यांना काय सांगू? शिवाय पाटलिणीच्या कामासाठी आता ऐन वेळी कुणाला आणणार?' यावर सुलोचनाबाई म्हणाल्या, "पाटलिणीच्या कामासाठी रत्नमालाबाईंना आणायची जबाबदारी मी घेते!'

पूर्वीच्या चित्रपटात सुलोचनाबाईंनी मोबदला न घेता काम केल्यामुळे त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या मानेंना काहीच बोलता येईना. त्याचं वारू आता चांगलंच वादळात सापडलं होतं.
शेवटी विचार करता मान्यांना सुलोचनाबाईंची मागणी हा त्यांचा एकप्रकारे (आधी उपकृत केल्यामुळे) हक्कच आहे असं वाटू लागलं. त्यांनी सुलोचनाबाईंची मागणी मान्य केली.

त्यामुळे चित्रपटातल्या "डबल रोल'मुळं होणारा परिणाम म्हणजे पाटील ज्यावेळी हौसासारखी हुबेहूब दिसणारी तमासगीर मुलगी बघून चक्रावून जातो, त्याच्या जिवाची घालमेल होते, हा सारा परिणाम निघून जाणार होता. मग तो परिणाम साधण्यासाठी संवादाचा आधार घ्यावा लागला होता. पाटलासमोरून जेव्हा ती तमासगीर मुलगी (नायिका) जाते तेव्हा तिच्या जन्माचं गुपित माहीत असणारी आणि तिला लहानाची मोठी करणारी ती तमासगीर बाई (हंसा वाडकर) पाटलांना डिवचण्यासाठी म्हणते, "पाटील, वळखलं का या पोरीला. नसंल वळकलं तर सांगत्ये. आभाळातल्या पारध्यानं तुम्हाला येगळाच चाप लावलाय. त्यात तुम्ही पुरतं अडकलाय. सखारामच्या बायकोवर बलात्कार करून जिला तुम्ही जल्म दिलात तेच पाप आता तुमच्या समोर आलंय आणि तुमचाच मुलगा तुम्ही जन्म दिलेल्या मुलीच्या (बहिणीच्या) नादी लागलाय!' हे ऐकून पाटील गलबलून जातो. त्याच्या मनाला हजार इंगळ्या डसतात. चित्रपटातला हा कळसबिंदू जो "डबलरोल'मध्ये नुसत्या दिसण्यानं साधणार होता, त्यासाठी आता संवादाचा आधार नाइलाजानं घ्यावा लागणार होता.

पाटलिणीचं काम रत्नमालाबाईंनी व हौसाचं काम सुलोचनाबाईंनी केलं. त्याचं बरंचसं "शूटिंग' मानेंनी चार दिवसांत आटोपलं. मानेंच्या पुढे आता पुढचं धर्मसंकट उभं राहणार होतं. चित्रीकरण सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी जयश्रीबाईंच्या कामाला सुरुवात होणार होती. जयश्रीबाईंना आता कसं तोंड द्यायचं, या विचारानं मानेंची झोप उडाली होती. चौथ्या दिवशी दुपारी चार वाजता सुलोचनाबाईंच्या कामाचे शेवटचे दृश्‍य चित्रीत होत होतं आणि... आणि एकदम जयश्रीबाई "प्रभात' स्टुडिओत आल्या. दुसऱ्या दिवशी त्यांचं चित्रीकरण होणार होतं. त्याआधी आपला "डबल रोल' समजून घ्यावा, या हेतूनं त्या आदल्या दिवशी मानेंना भेटायला आल्या होत्या. पण त्यांना पाहताच मानेंच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांनी नमस्कार केला. तोंडावर हास्य आणून हात वर करून अभिवादन केलं आणि "शूटिंग'मध्ये गढल्याचं नाटक केलं.

जयश्रीबाईंना कुणी तरी खुर्ची आणून दिली. त्या बसल्या. "शूटिंग' चालूच होतं. पण मानेंचं काही त्यात लक्ष लागत नव्हतं. ते बेचैन होते. खरं तर मानेंनी जयश्रीबाईंच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस करायला हवी होती. (काही झालं तरी जयश्रीबाई चित्रपटाच्या नायिका होत्या) पण त्यांचं मन त्यांना खात होतं. अपराधीपणाची भावना मनाला टोचत होती. मग त्यांनी त्यांचे सहायक दत्ता माने यांना सांगितलं, "जयश्रीबाईंना सांगा, तुमचं "शूटिंग' उद्या आहे. आज लॉजवर जाऊन आराम करा. विश्रांती घ्या!'

या वेळेपर्यंत आपली आईची भूमिका ("डबल रोल'पैकी एक) आपल्या हातून गेली आहे हे चतुर जयश्रीबाईंच्या लक्षात आलं होतं. त्या अतिशय संतापल्या आणि दत्ता मानेंचा निरोप न घेताच, मानेंना न भेटता "प्रभात' स्टुडिओतून निघून गेल्या. आपल्यावर होत असलेला अन्याय जयश्रीबाईंना फार लागला. या क्षेत्रात माणसं किती खोटं बोलतात. आपल्या नकळत आपल्याशी राजकारण खेळतात. असल्या मुखवटा पांघरून वावरणाऱ्या माणसांबरोबर कामच नको करायला. त्यापेक्षा सरळ मुंबईला निघून जावं, असं त्यांच्या मनात होतं. त्यांच्या मनाची घालमेल होत होती. लॉजवर पोचताच मनाचा निश्‍चय करून त्यांनी सामानाची आवराआवर केली व सोबत आलेल्या आईला म्हटलं, "चल आई, मला या चित्रपटात काम करायचं नाही!' थोड्या वेळानंतर त्यांनी मानेंना "भेटायला या' असा फोन केला. एव्हाना "शूटिंग' आटोपलं होतं. जयश्रीबाईंच्या निरोपानं माने थोडे धास्तावले. जयश्रीबाईंना सगळं समजलं असेल. आता आल्या प्रसंगाला सामोरं जाणं भाग होतं. शेवटी मनाचा हिय्या करून मानेंनी ठरवलं, की जयश्रीबाईंना सगळं प्रामाणिकपणे सांगायचं. मग आपले सहकारी दत्ता माने आणि छायाचित्रकार इं. महमद यांना घेऊ माने लॉजवर गेले. तिथे त्यांनी अतिशय चांगल्या व समर्पक शब्दांत जयश्रीबाईंची समजूत काढली. ते म्हणाले, ""जयश्रीबाई, त्रागा करून डोक्‍यात राग घालू नका. "प्रभात'सारख्या इतिहासप्रसिद्ध वास्तूत तुम्ही आला आहात. इथून काम न करता जाऊ नका. फार मोठी परंपरा लाभलेली ही वास्तू आहे. इथे तुमची अभिनयकला निश्चित खुलेल. तेव्हा थोर कलावंताच्या अभिनयानं पवित्र व समृद्ध झालेल्या या वास्तूकडे पाठ फिरवू नका. माझ्याकडून तुम्हाला दिलेला शब्द पाळला गेला नाही, या गोष्टीचं मला निश्चितच दुःख होतंय. पण माझे हात बांधलेले आहेत. साऱ्याच गोष्टी मला सांगता येणार नाहीत. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुमच्या हाती उरलेली भूमिकाही अत्यंत प्रभावी आहे. चित्रपटाच्या नायिका तुम्हीच आहात. अनेक मोठ्या कलावंतांबरोबर तुम्हाला काम करायचंय आणि ते जबरदस्त आहे आणि ते स्वीकारण्याला तुम्ही समर्थ आहात. आता "डबल रोल'बद्दल तुम्हाला सांगतो. आज ना उद्या मी तुम्हाला "डबल रोल' देईन व ती भूमिका "सांगत्ये ऐका'पेक्षाही प्रभावी असेल. हा माझा शब्द आहे. तेव्हा राग गिळून टाका नि उद्या सेटवर या. ही माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे.''

मानेंसारखा एवढा मोठा दिग्दर्शक आपल्याला हे सांगतो आहे, त्यांच्याही मनाला खूप लागलंय, हे जयश्रीबाईंना जाणवलं आणि मनाची तयारी करून मोठ्या जिद्दीने त्या कामाला तयार झाल्या. "सांगत्ये ऐका'त सुलोचनाबाईंनी जयश्रीबाईंच्या आईचा "रोल' (फक्त जन्म देण्यापुरता) केला आहे. त्यामुळे त्या समोरासमोर कधीच येत नाहीत. जयश्रीबाईंच्या कामाआधीच सुलोचनाबाईंचे काम संपले होते. एकदा जयश्रीबाईंचे चित्रण चालू असताना सुलोचनाबाई स्टुडिओत आल्या. दोघी एकमेकांना प्रथमच भेटत होत्या. दिग्दर्शक अनंत मानेंनी त्यांचा जयश्रीबाईंशी प्रथम परिचय करून दिला तो त्यांची मुलगी असाच. जयश्रीबाईंनी खाली वाकून नमस्कार करताच सुलोचनाबाईंनी त्यांना जवळ घेतलं व "मानेसाहेब मला शोभेल अशीच नक्षत्रासारखी स्वरूपसुंदर मुलगी निवडलीत!' त्या हसत म्हणाल्या आणि सेटवर जोरदार हशा पिकला.

आता मानेंच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणं हसतखेळत चित्रीकरण चालू झालं आणि एक दिवस अचानक तमासगीर बाईंचा रोल करणाऱ्या हंसाबाईंनी (वाडकर) मानेंना सांगितलं, "लीला गांधी या नृत्य-दिग्दर्शक म्हणून मला चालणार नाहीत!' मानेंनी तमाशात नाचणाऱ्या लीला गांधींना प्रथमच नृत्य-दिग्दर्शक म्हणून संधी दिली होती. पण ही गोष्ट हंसा वाडकर व जयश्रीबाई यांना फारशी रुचली नव्हती. "आपण चित्रपटाच्या नायिका असताना तमाशात नाचणाऱ्या एका बाईच्या नृत्यकौशल्याची कल्पना नाही म्हणून तुम्ही असं म्हणताय. त्या उत्तम नृत्यांगना आहेत. त्यांचं नृत्य एकदा तुम्ही पाहा आणि नंतर ठरवा काय ते!'

लीलाबाईंनी त्यांना एक अप्रतिम नृत्य करून दाखवलं. त्यातील गिरक्या, मुरक्या व इतर चापल्य बघून जयश्रीबाईं व हंसाबाई भारावूनच गेल्या. त्यांना आपली चूक उमगली. लीलाबाईंना गुरू म्हणून त्यांनी मान्य केलं आणि मग चित्रपटातील गण, गवळण, लावण्या हसतखेळत छान वातावरणात चित्रीत झाल्या. "सांगत्ये ऐका'तील एका लावणीचं "दिलवरा दिल माझे ओळखा'चं चित्रण चालू होतं. जयश्रीबाई मुरळी वेशात डोक्‍याला फेटा, बंद गळ्याची शेरवानी, पायजमा अशा वेशात होत्या. त्याच वेळी "प्रभात'मध्ये "दीदी' या हिंदी चित्रपटाचं "शूटिंग' चालू होतं. त्यात काम करणाऱ्या ललिता पवार यांनी "सांगत्ये ऐका'च्या सेटवरील लावणीचं चित्रण पाहिलं. पण पुरुषी वेशातल्या जयश्रीबाईंना त्यांनी ओळखलं नाही. शॉट पाहताना त्या म्हणाल्या, "कौन है ये चिकना लडका?' जयश्रीबाईंच्या अदाकारीवर तर त्या खूपच खूश झाल्या. थोड्या वेळानं ललिताबाईंच्या "मेकअप रूम'मध्ये जयश्रीबाई गेल्या. त्यांना पाहताच, "अरे तू! मला वाटलं एवढा देखणा मुलगा कोण? छान जमलाय मेकअप. काम पण चांगलं करतेस!' ललिताबाईंनी तोंडभर तारीफ करून प्रशस्तिपत्रही दिलं. जयश्रीबाई खूपच सुखावल्या. "बुगडी माझी सांडली गं' या लावणीचं चित्रण तीन दिवस चाललं होते. लीलाबाईंनी सांगितलेल्या नृत्याचा अस्सल गावरान बाज आणि जयश्रीबाईंनी स्वतः शिकलेल्या शास्त्रीय नृत्याचा ढंग यांच्या मिलाफातून "बुगडी' साकार होत होती.

एका तोड्यावर नाचता नाचता जयश्रीबाईंनी सहज नाक उडवलं. अगदी आपोआप ते घडलं. त्यांनी हेतुपुरस्सर असं नाक उडवलं नव्हतं. सुरुवातीला लीलाबाईंना ते आवडलं नाही. पण दिग्दर्शक अनंत माने यांना ते नाक उडवणं एवढं आवडलं, की त्यांनी त्याचा आग्रह धरला. "छान वाटतंय. मजा येईल लावणीला. जयश्रीबाई तुम्ही उडवाच नाक. अगदी हाय करीत उडवा लोकांना आवडेल ते!' माने म्हणाले.

आणि "पब्लिक'लाही ते नाक उडवणं खूप आवडलं. आशाताईंनीही त्या विशिष्ट जागी "हाय' शब्द अशा ठसक्‍यात म्हटला की त्या लावणीची खुमारी अधिकच वाढली.

"सांगत्ये ऐका'मधली "काल राती मजसी झोप नाही आली' ही लावणी हंसा वाडकरांवर चित्रीत झाली होती. त्यांच्या नृत्याला प्रेक्षक भरभरून दाद द्यायचे. त्यांच्या नृत्याची प्रशंसा करताना ते म्हणत- "नाचताना हंसाबाई काय छान गिरक्या घेतात. दुसऱ्या कुणालाही तशा गिरक्‍या घेता येणार नाहीत.'

हंसाबाईच्या जागी दुसरी कुणी नृत्यांगना असती तर प्रेक्षकांच्या अशा कौतुकावर खूष झाली असती. पण हंसाबाईंच्या मनात थोडी अपराधीपणाची भावना होती. कारण त्या गिरक्या त्यांनी घेतल्याच नव्हत्या. नृत्य-दिग्दर्शिका लीला गांधी यांनी त्यांची "डमी' होऊन गिरक्यांचा "शॉट' दिला होता आणि त्यामुळेच गिरकीवर खूष होऊन प्रेक्षकांनी दिलेली दाद घेऊन आपण लीलाबाईंवर अन्याय करीत आहोत, अशी हंसाबाईंची भावना होती.
हा अन्याय दूर व्हावा या हेतूनं त्यांनी इसाक मुजावरांना विनंती केली, की तुमच्या "रसरंग'मध्ये "सांगत्ये ऐका'मधल्या नृत्याच्या अप्रतिम गिरक्या या हंसाच्या नसून लीला गांधीच्या आहेत, असं छापून टाका.
त्यांच्या विनंतीला मान देऊन मुजावरांनी "रसरंग'मध्ये हा गौप्यस्फोट करून टाकला. त्यांचा कयास असा होता, की प्रेक्षकांना खरी गोष्ट समजल्यामुळे ते लीलाबाईंच्या नृत्यकौशल्याची तारीफ करतील व लीलाबाईही अशी बातमी छापल्यामुळे खूश होतील. पण झालं भलतंच. लीलाबाई प्रत्यक्षात नाराज झाल्या. त्या मुजावरांना म्हणाल्या, "हंसाबाई ज्येष्ठ कलाकार आहेत. अशा गोष्टी उघड करून आपण त्यांचा अपमान करीत आहोत.' नंतर काही वर्षांनी मात्र आकाशवाणीवरील "मायानगरी' या कार्यक्रमात लीलाबाईंनी स्वतःहून हा सगळा प्रकार सांगितला होता.

"सांगत्ये ऐका'चं बरंच "शूटिंग' आटोपलं आणि अचानक एके दिवशी "चेतना चित्र'चे भागीदार श्रीनिवास मोरे यांचं एक नोटीसवजा पत्र मान्यांना आलं. त्यांनी मागं केलेल्या करारातील भागीदारी रद्द करून वर दहा हजार रुपयांची मागणी केली होती. ती वाचून मान्यांची झोप उडाली. पण याही वेळेस त्यांचे मित्र वि. गो. नमाडे मदतीला धावले. त्यांनी ते प्रकरण मिटवलं आणि मानेंची बेचैनी संपून ते जोमानं कामाला लागले.

"सांगत्ये ऐका'त मानेंनी दोन नवीन कलाकारांना वाव दिला होता. एक होती पुष्पा राणे. तिनं छोट्या जयश्रीबाईंची भूमिका केली होता. ती नृत्य-दिग्दर्शक बाळासाहेब गोखलेंची शिष्या होती. नृत्यनिपुण होती. आपल्या छोट्या भूमिकेत तिने चांगली चमक दाखवली होती; तर दुसरा कलाकार होता "बबन काळे. सुप्रसिद्ध तमाशा कलावंत लीलाबाई मांजरेकर यांचा हा मुलगा. त्यानं जयवंतराव मिरजकरांकडं तबल्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं होतं. "सांगत्ये ऐका'मध्ये त्यानं फडातल्या सरदाराची छोटीशीच; पण चांगली भूमिका केली. सोंगाड्याच्या भूमिकेत त्याचा हातखंडा होता. "बुगडी"ची ढोलकी त्यानेच वाजवली होती.

"सांगत्ये ऐका' अवघ्या तीन महिन्यांत पुरा केला, यावर "फायनान्सर' केळकर यांचा विश्वास बसेना. ते म्हणाले, "अहो, असा तीन महिन्यांत का कुठे चित्रपट पूर्ण होतो?' माने म्हणाले, "आज संध्याकाळी चित्रपटाची ट्रायल ठेवली आहे!' चित्रपटातील संबंधित मंडळी व बडे बडे वितरक सारे जण चित्रपट पाहून गेले. पण कुणाचंही मत फारसं अनुकूल नव्हतं. कथालेखक पारखींनाही चित्रपट अजिबात आवडला नाही. ते म्हणाले, "माझ्या कादंबरीचा सगळा विचका झालाय!' व्यंकटेश माडगूळकर, ग. दि. माडगूळकर, वि. गो. नमाडे, संकलक राजा ठाकूर यांच्यापासून ते सेन्सॉर बोर्डाच्या सदस्या शांता शेळके, शांतेश पाटील या सर्वांचं मत होतं, की शेवटचा वग प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटेल, तो काढून टाकावा. पण माने आपल्या मतावर अगदी ठाम होते.

२९ मे १९५९ रोजी पुण्याच्या "विजयानंद' थिएटरमध्ये "सांगत्ये ऐका' झळकला आणि या चित्रपटानं इतिहासच घडवला. "सांगत्ये ऐका'च्या अगदी पहिल्या खेळापासून प्रत्येक गाण्याला इतकंच काय; पण भल्याभल्या मंडळींनी आक्षेप घेतलेल्या शेवटच्या वगाच्या अगदी प्रत्येक कडव्याला प्रेक्षकांनी शिट्ट्या व टाळ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. "बुगडी' तर प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून डोक्यावर घेतली. त्यानंतर कित्येक दशकं प्रेक्षकांच्या हृदयावर या लावणीनं राज्य केलं. अण्णा माडगूळकरांची ही भन्नाट शब्दांची झोकदार लावणी, तिला लावलेली तितक्‍याच तोलामोलाची अक्कडबाज आणि नखरेल चाल आणि त्यावर जयश्रीबाईंनी (कपाळावर रुपया लावून) केलेली दिलखेचक अदा हे सारं "सांगत्ये ऐका'चं मुख्य आकर्षण होतं.

"सांगत्ये ऐका' प्रेक्षकांनी फारच उचलून धरला. रौप्यमहोत्सवानंतर त्यात एक गाणं टाकण्यात आलं. प्रसिद्ध शाहीर वामनराव कर्डक यांनी माहेरी बायकोला आणायला गेलेल्या नवऱ्याचा व तिचा अतिशय खुसखुशीत असा झगडा लिहिला होता. त्याचे शब्द होते-
"सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला
हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला'....

वसंत पवारांनी या झगड्याला झकास चाल लावून विठ्ठल शिंदे व कुमुदिनी पेडणेकर यांच्याकडून ते विनोदी ढंगात गाऊन घेतलं. विनोदमूर्ती वसंत शिंदे व लीला गांधी यांच्यावर ते चित्रीत झाल्यामुळं तर आणखीनच बहार आली. खेड्यापाड्यातच नाही तर शहरातल्या "पब्लिक'लाही ते गाणं आवडलं. दिग्दर्शक अनंत मानेंनी त्यात बाई, तमाशा, शृंगार, बलात्कार असूनही कुठेही अतिरंजितता दाखवली नव्हती. किंबहुना अस्सल मराठमोळ्या वातावरणाचं वास्तव दर्शन त्यात त्यांनी घडवलं होतं. तमाशा, गाव, तिथली माणसं ते वातावरण यांचा चांगला अभ्यास असणाऱ्या मनेंनी चित्रपटात पात्रांच्या बोलण्याच्या लकबी, रीतीरिवाज, तमाशातील, हॉटेलातील, शेतकऱ्याच्या झोपडीतील, पाटलाच्या घरातील मांडणी व वातावरण त्याचप्रमाणे प्रयेकाच्या स्वभावातल्या बारीकसारीक खाचाखोचा अतिशय अचूक व मार्मिकपणे टिपल्या हत्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संगीतकार वसंत पवारांचं कानाला गोड वाटणारं आणि मनाल भिडणारं सुरेल संगीत!

"सांगत्ये ऐका'चा रौप्यमहोत्सव तर झालाच. पण नंतर शतकमहोत्सवही झाला. या दोन्ही महोत्सवप्रसंगी अध्यक्ष वि. द. घाटे होते. आपल्या भाषणात त्यांनी "सांगत्ये ऐका' हा केवळ तमाशापट नसून एक समाजप्रबोधन करणारा चित्रपट आहे. कारण एक तमासगीरबाई यातील जुलमी, दुराचारी, मुजोर पटलाची दुष्कृत्ये वगातून चव्हाट्यावर आणून जनजागृती करते, असा हा समाजप्रबोधन करणारा चित्रपट आहे, असं म्हटलं होतं.

त्यावेळच्या मराठीतील जवळजवळ सर्व महत्त्वाच्या साप्ताहिके व मासिके यामधून "सांगत्ये ऐका'ची परीक्षणे आली होती. त्यात त्यांनी चित्रपटाची मुक्तकंठानं स्तुती केली होती. "सांगत्ये ऐका'साठी इतके सत्कार समारंभ झाले की दुसऱ्या मराठी चित्रपटाचे क्वचितच इतके समारंभ झाले असतील. "सांगत्ये ऐका'च्या रौप्यमहोत्सव प्रसंगी या चित्रपटात काम न केलेल्या चरित्र अभिनेत्री इंदिरा चिटणीस यांनी सर्व कलाकारांचा सत्कार केला होता. सर्व कलावंतांना चांदीची मानचिन्हे देण्यात आली. स्टेजवर वसंत पवारांच्या शेजारी हंसा वाडकर बसल्या होत्या. वसंतरावांनी आपलं मानचिन्ह हंसाबाईंना देऊ केलं व म्हणाले, "बाई, हे घेऊन मी काय करू? आपल्याजवळ एक दमडीसुद्धा नाही. हे घ्या व मला पैसे द्या!' हंसाबाईंना गहिवरून आलं.

आता तशी माणसेही राहिली नाहीत अन तसे दिवसही राहिले नाहीत कारण बॉक्स ऑफिसची गणिते, कोट्यावधीची उड्डाणे, हायपर पब्लिसिटी अन फडतूस प्रमोशन या निव्वळ बाजारु चक्रात आताचा सिनेमा अन इंडस्ट्री रुतून बसली आहे. सालस आनंद देणारे ते सोज्वळ सिनेमे जरी इतिहासजमा झाले असले तरी त्यांचे लोकप्रियतेचे विक्रम अजूनही अबाधित आहेत यातच सारे काही आले. 

सांगत्ये ऐकाच्या निमित्ताने त्या जुन्या दिवसांना सलाम ....

- समीर गायकवाड.

लेख संदर्भ - सांगत्ये ऐकाची चित्रकथा - ले. श्री. वासुदेव कुलकर्णी  

सांगत्ये ऐकाचा इतिहास - ले. श्री. मधु पोतदार
ओळख दिगज्जांची - ले. श्री. मधु पोतदार