शुक्रवार, १३ मे, २०१६

मुघलपूर्व भारत अन हिंदूंचे पतन ....एक वेध इतिहासाचा... -



मुघलपूर्व भारतीय उपखंडाचा इतिहास अभ्यासल्यावर असे दिसून येते की इस ५०० पर्यंत गांधार, हुण -श्वेतहुंण (आताच्या अफगाणीस्तानातील कंदहार), तक्षशीला - सिंध, मुलतान (आताच्या पाकिस्तानातील ताक्सिला ), आताच्या ब्रम्हदेश - बांगलादेश पर्यंत असणारे पाटलीपुत्रचे विशाल साम्राज्य, दक्षिणेकडे पांड्य,चोल आणि थेट आताच्या श्रीलंकेत असणारे ताम्रपर्णी साम्राज्य असे चौफेर विविध राजवटी आणि राज्यांचा विस्तार होता. हिंदुस्तान वा भारत नावाचा सलग भूप्रदेश जरी तेंव्हा अस्तित्वात नव्हता तरी सर्व राज्ये - राजवटी गैरमुस्लीम आणि हिंदूबहुल होती. मात्र जसजशी शतके उलटत गेली तसतसे मुसलमानी आक्रमक सत्ताविस्तार, भूविस्तार, लूटमारी आणि धर्मप्रसार यासाठी आक्रमण करत गेले आणि इथले शासक बनून गेले. हा सर्व इतिहास इस ६१५ ते इस १७००च्या दरम्यानचा आहे. इस्लामी आक्रमकांनी इथल्या राजवटी कशा ताब्यात घेतल्या आणि तेंव्हाचा हिंदूशासित प्रदेश इस्लामी राज्यकर्त्यांचा कसा अंकित होत गेला यावर प्रकाश टाकणे हा या लेखाचा हेतू आहे.



हिंदुस्थानच्या इतिहासातील मुसलमानी अंमलाखालील ७१२ ते १५२६ हा सु. आठशे वर्षांचा काळ मोगलपूर्व काळ किंवा दिल्ली सल्तनतीचा काळ म्हणून ओळखला जातो. आठव्या शतकातील अरबांच्या स्वाऱ्यांपासून सामान्यतः मुसलमानांचे हिंदुस्थानात आगमन झाले. अरब व मुसलमान यांचा हिंदुस्थानशी संबंध या काळात जास्ती आला. या लोकांनी वायव्य दिशेकडून अनेक स्वाऱ्या करून येथे सत्ता प्रस्थापित केली. अरबांनी हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावर स्वाऱ्या केल्या .हजरत मुहंमद पैगंबरांच्या प्रेरणेने अरबांनी पहिली स्वारी ६३६ मध्ये देबल(दायबूल) बंदर (आताच्या कराचीनजीक) व आताच्या मुंबईजवळील ठाणे येथे केली. यानंतर त्यांनी भडोच, चौल इ. ठिकाणी अनेक स्वाऱ्या केल्या. हिंदूंनी त्या परतवून लावल्या. ६४४ मध्ये रसीलचे युद्ध ह्या खलिफाच्या पाडावासाठी झाले. ६५१ मध्ये सिस्तान, झरांज आणि ६५२ मध्ये हेरात ( उर्फ अलेक्झांड्रीया अरींया वा आताचे तिसरे मोठे अफगाण शहर हेरांत ) ही सर्व श्वेतहुणाच्या ताब्यात असणारी शहरे त्यांच्या ताब्यात गेली. या स्वाऱ्या रशीदून खलिफाकडून व उथेमां (ओटोमान) खलिफाकडून केल्या गेल्या होत्या. ६५३मध्ये मकर (मेकरां - पर्शियन आखातालगतची वाळवंटीय भूमीपट्टी जी आताच्या पाकिस्तानातील बलुचीस्तानातून इराण ते ओमानच्या आखातापर्यंत आहे) या भूभागावर हल्ला करून उथेमा ( ओटोमान) खलिफाने ताब्यात घेतली. पुढे याच भूमीवरून भारतात आक्रमणे होत गेली, त्यामुळे भारतावरील इस्लामी आक्रमणाची दारे या भूमीच्या तुकड्याच्या पाडावामुळे झाली असे म्हटले तरी चालेल.

इथे एक महत्वाची बाब नोंद करून ठेवण्यासारखी आहे- सिस्तान. मेकरां आणि खुरासान इथून येणाऱ्या अरब आक्रमकांना थोपविण्याचे काम तत्कालीन काबुल आणि झाबुलच्या राजांनी आपापल्या परीने करून बघितले. या शतकात अफगाण आक्रमक हे अरब आक्रमकांच्या विरोधात लढत होते आणि त्यामुळेच त्यांचा भारताकडील भूमीत शिरकाव अशक्य झाला होता. अधिक खोलात न जाता एक सोपी माहिती देतो त्यामुळे गोंधळ होणार नाही - आताच्या पाकिस्तानातील वजिरीस्तानच्या दक्षिणेस असलेली, पाकच्या दक्षिणपुर्व सीमेलगत व ड्युरंड लाईन ह्या अंतरराष्ट्रीय सीमारेषेवर अफगाण - पाक सरहदीवर असलेली गोमाल खिंड व खैबरखिंड ह्या दोन्ही खिंडी काबुलच्या राजांनी २ शतके ह्या अरब आक्रमकांविरुद्ध लढताना अडवून धरल्या होत्या.

उम्माय्द खलिफाच्या आदेशांनुसार अल हजाज बीन युसुफ या इराकी सुभेदाराने मोठ्या फौजेसह त्याचा पुतण्या मुहंमद कासिमला सिंधच्या दाहर राजाविरूद्ध धाडले. राजा दाहरवर त्याने सर्वशक्तीनिशी हल्ले केले. यावेळी त्याच्या सोबतीला ६०००सिरीयन घोडदळ, ६००० इराकी सांडणीस्वार आणि मावळी (कुराण -हदीतनुसार मावला - mawla एकवचन, mawli अनेकवचनी शब्दार्थ - देवाचा सहायक, हा शब्द आणि आपल्या मराठी इतिहासातील मावळा हा शब्द खूप सारखे व समान अर्थाचे आहेत ; पण आपला मावळ प्रांतातले ते मावळे अशा अर्थाचा आहे ) यांच्या साह्याने ते आक्रमण झाले. ७१२–१३ च्या सुमारास कासिमने दाहरचा पराभव करून सिंध व मुलतान जिंकले, तत्कालीन सिंध वमुलतान ही हिंदू राज्ये होती व पाडाव झालेली ही पहिली राज्ये ठरली. मात्र यापेक्षा जादा प्रदेश त्यांना पादाक्रांत करता आला नाही. सिंध आणि मुलतान येथेच अरबांचे वर्चस्व प्रस्थापित झाले; कारण कच्छ, सौराष्ट्र, काश्मीर, पश्चिम राजपुताना येथील चालुक्य, प्रतीहार, कर्कोटक इ. वंशांतील राजांनी या स्वाऱ्यांना प्रतिकार केला.

अरबांच्या स्वाऱ्यांमुळे हिंदुस्थानात इस्लाम धर्माची बीजे रावली गेली. हिंदुस्थानशी संबंध आल्यामुळे हिंदू आचार-विचार, साहित्य, तत्त्वज्ञान इ. गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम झाला. भारतीयांकडून त्यांनी शासनव्यवहार, संगीत, वैद्यक, गणित, ज्योतिष, वास्तुकला वगैरे आत्मसात केले. भिन्न भिन्न विषयांवरील हजारो संस्कृत ग्रंथ त्यांनी अरबी भाषेत भाषांतर करून घेतले. अरबांनी अप्रत्यक्षपणे भारतीय तत्त्वज्ञान, संख्याशास्त्र, ज्योतिष व अन्य शाखांतील ज्ञानाचा यूरोपात प्रसार केला. अरबांनी सिंधूमधील हजारो हिंदूंना बाटविले. (संदर्भ - अरबांच्या भारतावरील स्वाऱ्या).

यानंतर तुर्कांनी अफगाणिस्तानातील हिंदू राज्यावर आक्रमणे केली. जवळजवळ २२० वर्षे प्रतिकार केल्यानंतर ८७० मध्ये तुर्कांच्या लुटारू टोळीचा पुढारी याकूब बिन लेयात याने हिंदू-अफगाणिस्तानातील हिंदू राज्य नाहीसे केले. काबूल येथे राज्य करणाऱ्या लाल याला काबूल सोडावे लागले. अशा तऱ्हेने अफगाणिस्तानातील हिंदू राज्याचा शेवट झाला. हुण, श्वेतहुण यांची राजवट व गांधार - तक्षशिला ही राज्ये पूर्णतः हिंदुंच्या ताब्यातून कायमची गेली अन आता तिथे हिंदू नावाला देखील नाहीत !

गझनी - यापुढील काही दशकात काही वर्षे हिंदुस्थानात मुसलमानांच्या स्वाऱ्या थांबल्या होत्या; परंतु दहाव्या शतकाच्या अखेरीस मुसलमानांचे हल्ले काबूल-पेशावरच्या दिशेने होऊ लागले. दहाव्या शतकाच्या मध्यास गझनी येथे राज्य करणाऱ्या गझनी घराण्यातील सबक्तगीनने राज्य वाढविण्यास सुरुवात केली. सबक्तगीन प्रबळ होत असल्याचे पाहून पंजाबच्या जयपाल राजाने त्याच्यावर अयशस्वी स्वारी केली. त्यानंतर सबक्तगीनने पंजाबवर स्वारी करून लमधान आणि पेशावर हस्तगत केले. गझनी सुलतानांची राजवट हिंदुस्थानच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानावी लागेल; कारण तेव्हापासून मुसलमानांची भारतावर सतत आक्रमणे सुरू झाली. या घराण्यातील महमूद गझनी हा धर्मवेडा व महत्त्वाकांक्षी होता. त्याने १००१ ते १०२७ पर्यंत हिंदूस्थानवर सतरा वेळा स्वाऱ्या केल्या. पहिल्या स्वारीत त्याने जयपालचा पराभव करून सिंधूच्या पश्चिमेकडील सर्व मुलूख खालसा केला. त्याने मुलतान, अटक, स्थाणेश्वर, मथुरा, कनौज, सोरटी सोमनाथ यांवर स्वाऱ्या करून तेथील इमारती व मंदिरे उद्‌ध्वस्त केली; हिंदुस्थानातील कोट्यवधी रुपयांची संपत्ती लुटून नेली व पंजाब कायमचा जिंकला. महमूद गझनी हा हिंदुस्थानातील तुर्की सत्तेचा संस्थापक असून त्याने भावी इस्लामी सत्तेचा पाया घातला आणि पुढील सुलतानांचा मार्ग सुलभ करून ठेवला. महमूदाच्या वारसदारांची ११८६ पर्यंत पंजाबवर सत्ता होती. लवकरच गझनीचे राज्य कर्त्या पुरुषांच्या अभावामुळे मोडकळीस येऊन, गझनीच्या वायव्येस असलेल्या घोर प्रांतातील घराणे बाराव्या शतकात गझनीच्या मुसलमानांची सत्ता झुगारून स्वतंत्र झाले.

घोर - घोर घराण्यातील शिहाबुद्दीन मुहम्मद घोरी हा शूर होता. महमूद गझनीनंतर हिंदूस्थानावर एकामागून एक अशा लागोपाठ स्वाऱ्या करणारा पुरुष हाच होय. राज्यविस्तार करण्याच्या हेतूनेच त्याने स्वाऱ्या केल्या होत्या. ११७५ मध्ये त्याने हिंदुस्थानवर पहिली स्वारी करून मुलतान पादाक्रांत केला. ११७६ ते १२०५ पर्यंत त्याने व त्याच्या सेनापतींनी गुजरात, पंजाब, ग्वाल्हेर, मीरत, दिल्ली, बुंदेलखंड, बिहार आदींवर अनेक स्वाऱ्या केल्या. तेथील हिंदूंची मंदिरे उद्‌ध्वस्त केली. मुहम्मद घोरीनंतर त्याने नेमलेला हिंदुस्थानातील त्याचा सुभेदार कुत्बुद्दीन ऐबक याने १२०६ मध्ये दिल्ली येथे गुलाम घराणे स्थापन केले. ऐबक हा दिल्लीचा पहिला सुलतान. त्यावेळेपासून दिल्लीच्या तख्तावर मुसलमानांचा अंमल सुरू झाला. त्याने मीरत, बनारस, कालिजंर, काल्पी इ. ठिकाणे काबीज करून दिल्ली हे राजधानीचे ठिकाण केले. ऐबकने स्थापन केलेल्या गुलाम घराण्याने दिल्ली येथे १२०६ ते १२९० पर्यंत राज्य केले. या घराण्यात शम्सुद्दीन अल्तमश, रझिया सुलतान, घियासुद्दीन बल्बन इ. कर्तबगार सुलतान होऊन गेले. या घराण्यातील सुलतान क्रूर व धर्मवेडे होते. त्यांनी हिंदूंचा छळ करून सैन्याच्या जोरावर पंजाब, संयुक्त प्रांत, बिहार, बंगाल व सिंध येथे सत्ता प्रस्थापित केली.

खिलजी - गुलाम घराण्यानंतर खिलजी घराण्यातील सुलतानांनी १२९० ते १३२० पर्यंत दिल्ली येथे राज्य केले. जलालुद्दीन खिलजी हा खिलजी घराण्याचा संस्थापक. सुरुवातीचे खिलजी हे कर्तबगार असले तरी क्रूर व जुलमी होते. अलाउद्दीन खिलजी याने १२९० ते १३०१ दरम्यान गुजरात, रणथंभोर, चितोड, माळवा, मारवाड, जालोर इ. ठिकाणी सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्याने दक्षिण हिंदुस्थानात देवगिरीचा रामचंद्रदेव, तेलंगणचे काकतीय राजे, कर्नाटकचे होयसळ राजे, आणि दक्षिणेकडील पांड्य घराणे यांविरुद्ध स्वाऱ्या केल्या. दक्षिण हिंदुस्थानात स्वारी करून इस्लामी धर्माचा प्रसार करणारा हा पहिला सुलतान. वायव्य सरहद्दीवरून आलेल्या मोगलांच्या स्वाऱ्यांना त्याने प्रतिकार केला. खिलजी घराण्याच्या काळात हिंदुस्थानात जितका मुसलमान सत्तेचा विस्तार झाला, तेवढा पूर्वी झाला नव्हता. खिलजी सुलतानांनी उत्तर हिंदुस्थानात सत्ता स्थापून दक्षिणेत कन्याकुमारीपर्यंत आपल्या सत्तेचा प्रभाव पाडला.

तुघलक- खल्जी घराण्याचा ऱ्हास होत असता तुघलक घराण्याचे प्राबल्य वाढले. या घराण्यातील सुलतानांनी १३२० ते १४१२ पर्यंत राज्य केले. घियासुद्दीन हा तुघलक घराण्याचा संस्थापक. या घराण्यात एकूण नऊ सुलतान होऊन गेले. घियासुद्दीनचा मुलगा जौनखानाने वरंगळवर दोनदा स्वारी करून तेथील हिंदू राजाचा पराभव केला. घियासुद्दीन तुघलकनंतर गादीवर आलेला मुहम्मद तुघलक हा जुलमी व क्रूर होता. त्याने दिल्लीची राजधानी मोडून देवगिरी (दौलताबाद) येथे राजधानी हालविली. मुहम्मद तुघलकच्या कारकीर्दीत सबंध उत्तर व दक्षिण हिंदुस्थानात मुसलमानांचा अंमल असला, तरी त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचे राज्य विस्कळीत झाले होते. शेवटचे तुघलक सुलतान दुर्बळ निघाल्यामुळे दिल्लीच्या दरबारात यादवी होऊन पंजाब, बंगाल, गुजरात, माळवा, खानदेश हे प्रांत स्वतंत्र झाले. १३९८ मध्ये समरकंदचा राजा तैमूरलंगने हिंदूस्थानवर स्वारी केली. मुहम्मद तुघलकाचा पराभव करून त्याने दिल्लीत स्वतः ला बादशाह म्हणून जाहीर केले. अमाप संपत्ती लुटून, जाळपोळ करून तो परत गेला. पुढे खिज्रखान या सय्यद घराण्याच्या संस्थापकाने मुहम्मदास पकडले व त्याची राजधानी हस्तगत केली (१२१०). मुहम्मदाच्या मृत्यूनंतर १४१२ मध्ये हे घराणे नामशेष झाले. याच्या लहरी काराभारामुळे आजही तुघलकी कारभार असा शब्द रूढ आहे.

सय्यद व लोदी - यानंतर पुढील सु. पन्नास वर्षे दिल्ली येथे सय्यद घराण्यातील सुलतानांची नाममात्र सत्ता होती. १४१४ ते १४५१ दरम्यानच्या काळात या घराण्यात चार सुलतान होऊन गेले. खिज्रखान सय्यद हा या घराण्याचा संस्थापक. सय्यद सुलतानांच्या काळात जौनपूर, माळवा इ. ठिकाणी बंडे झाली. या घराण्यातील शेवटचा सुलतान अलाउद्दीन याचा पंजाबचा सुभेदार बहलूल लोदी याने पराभव केला. तो स्वतः दिल्लीचा सुलतान झाला. आणि पुढे लोदी घराण्यातील सुलतानांनी १४५१ ते १५२६ पर्यंत दिल्ली येथे राज्य केले. बहलूल लोदीने मुसलमान सुलतानांची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळविण्याची खटपट केली. सिकंदर शाह हा लोदी घराण्यातील कर्तबगार सुलतान. त्याच्या मृत्यूनंतर लोदी सुलतानांत कलह निर्माण झाले. त्यांना दिल्लीचे राज्य सांभाळता आले नाही. दौलतखान लोदीने काबुलचा सुलतान जलालुद्दीन बाबर याला मदतीसाठी बोलाविले.

मुघल - पहिला मुघल मुस्लीम आक्रमक बाबरने स्वारी करून पहिल्या पानिपतच्या युद्धात (१५२६) इब्राहीम लोदीचा पराभाव करून त्यास ठार केले. अशा तऱ्हेने दिल्ली येथे स्थापन झालेल्या सुलतानशाहीचा १५२६ मध्ये शेवट झाला. बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब, बहादूर शहा आलम व शेवटी बहादूरशहा जफर अशी मुघलांची रांग लागलेली आपल्याला ज्ञात आहेच...

हिंदूंच्या पराभवाची कारणमीमांसा : अरब व तुर्क यांनी हिंदुस्थानवर अनेक वर्षे सारख्या स्वाऱ्या केल्या. अनेक वर्षांच्या प्रतिकारानंतर हिंदूंना पराभव पत्करावा लागला; परंतु हिंदूंच्या पराभवाची कारणमीमांसा स्टॅन्ली लेनपूल व्हिन्सेंट स्मिथ इ. इतिहासकारांनी चुकीच्या सिद्धांतावर केलेली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जात, वंश, हवापाणी, शौर्य आणि धैर्य या सर्व दृष्टींनी हिंदू हे अरब व तुर्क यांच्या तुलनेने दुर्बल असल्यामुळे त्यांचा पराभव झाला.

जगाच्या इतिहासाच्या संदर्भात पाहिले तर हिंदूंनी वर्षानुवर्षे दीर्घकाल केलेल्या प्रतिकाराइतका प्रतिकार इतर कोणत्याही देशांतील लोकांनी केलेला नाही; अरबांना सिंधमध्ये ७५ वर्षे, हिंदु-अफगाणिस्तानात २२० वर्षे व पंजाबमध्ये १५० वर्षे लढल्यानंतरच मुसलमानांना ते प्रदेश जिंकता आले होते. प्रदेश जिंकला तरी त्यांना हिंदू संस्कृती व धर्म नष्ट करण्यात यश आले नाही. त्यांची पीछेहाट मात्र निश्चितच झाली.

हिंदूंच्या पराभवाची कारणे ही बाह्य स्वरूपाची नसून अंतर्गत होती. वायव्य सरहद्द प्रांत, हिंदु-अफगाणिस्तान व सिंध हे सरहद्दीवरील प्रांत हिंदुस्थानपासून अलग समजले जात होते. हे प्रांत मागासलेले प्रांत म्हणून सर्वसाधारण लोक समजत असत. या प्रांतांवर झालेल्या आक्रमणाकडे हिंदुस्थानातील इतर लोकांनी लक्ष दिले नाही. सरहद्दीवर आलेले आक्रमण हे आपणा सर्वांवर आलेले आक्रमण आहे, असे समजून सर्व हिंदू एकवटले नाहीत. मौर्य साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर हिंदूंनी सरहद्दीवरील संरक्षणाकडे लक्ष दिले नाही; कारण त्यावेळी सबंध भारतात छोटी छोटी अनेक राज्ये होती. सबंध भारत देश एका सत्तेखाली नव्हता. जलद दळणवळणाच्या अभावी कितीही कर्तबगार, क्रूर व कडव्या सम्राटाला भारतासारख्या मोठ्या प्रदेशावर एकछत्री अंमल फार वर्षे टिकविता आला नाही, हा इतिहासाचा धडाच आहे.

त्या काळात देशातील बऱ्याच भागात उपाध्याय वर्गाचे वर्चस्व वाढले असल्यामुळे क्षत्रिय व शूद्र लोक त्यांचे दास बनले होते. उपाध्याय वर्गाकडे राजसत्तेचे नेतृत्व होते. हा प्रकार सिंध व काबूल येथे अस्तित्त्वात होता. कर्मकांडांचे स्तोम वाढल्याने राज्यकर्ते व प्रजा यांच्या अंतर पडले, अशी समजूत आहे; पण तीत फारसे तथ्य नाही. पुरोहित वर्गाचे राज्य एखादेच झाले. पुराहित राज्य आपोआप क्षत्रिय बने.

हिंदूंच्या पराभवाचे महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदूंचे युद्धकलेतील ज्ञान परिपूर्ण नसून, त्यांनी नवीन युक्त्या किंवा नवीन पद्धती अंगीकारल्या नाहीत. शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्यात ते मागे पडले. अरब किंवा तुर्क हे उत्तम घोडेस्वार असून त्यांनी युद्धकौशल्यात बरीच प्रगती केलेली होती. प्रचंड संख्येने येऊन ते अचानकपणे हिंदूंवर तुटून पडत. त्यामुळे हिंदूंमध्ये एकप्रकारचे भीतिदायक वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या शहरांवर हल्ले करून, मुसलमान तलवारीच्या जोरावर शहरे उद्ध्वस्त करीत. अशा तऱ्हेने वारंवार हल्ले झाल्यामुळे हिंदू समाज दुर्बळ झाला होता. मुसलमानांनी लढण्याच्या नवीन पद्धती शोधून काढल्या. हिंदूंना स्वतःच्या लढण्याच्या पद्धतीमधील गुणदोष अपवादादाखलच उमजले.

अरब व तुर्क लोक धर्मवेड्या भावनेने लढत असल्यामुळे बेभान होऊन लढाई करीत. इस्लामची उदात्त तत्त्वे जगभर पसरविण्याचे पवित्र कार्य आपण करीत आहोत, या भावनेने ते लढत. हिंदूंनी मात्र नेहमी बचावात्मक धोरण अंगीकारले. लष्करी शिक्षण, प्रभावी शस्त्रे, क्रूरता, भोगलालसा इत्यादी हिंदूंमध्ये मुलमानांएवढी मुळीच नव्हती.

शेवटचा आणि महत्वाचा निष्कर्ष असाही काढता येतो की जोवर मुलतान व सिंधच्या हिंदू राजांनी आपापली राज्ये टिकवून ठेवली आणि ८व्या शतकाअखेरीस अफगाणी टोळ्यांनी खैबरखिंड अडवून धरली तोवर मुसलमानी आक्रमक इथल्या भूमीवर मोठी घुसखोरी वा हल्ले करू शकले नाहीत. मात्र केवळ इस. ८०० ते १६०० या ८०० वर्षाच्या काळात केवळ आणि केवळ आक्रमणे होत राहिली प्रतिकार म्हणावा असा झाला नाही. जो प्रतिकार झाला तो तोकडा पडला आणि आपसातील ऐक्याचा अभाव, धार्मिक ऐक्याचा अभाव, नवीन युद्धतंत्रे व साहित्य यांचा अभाव, अति सहिष्णुता आणि काहीअंशी भेकडपणा, आत्मविश्वासाचा अभाव या आपल्या दोषकारणांमुळे हे हल्ले अत्यंत विनाशक ठरले आणि सर्व हिंदू राज्ये व तत्कालीन सर्व हिंदू राजवटी अक्षरशः नेस्तनाबूत झाल्या. या सर्व प्रलयंकारी पाडावानंतर १६३० पासून शिवाजी राजांनी मुघली सत्तेविरुद्ध अन चारी पातशाह्यांविरुद्ध दिलेली एकाकी टक्कर जर तुलना करायची झाली तर त्यासाठी शब्द कमी पडतील अशी होती. हत्ती आणि मुंगी यांची लढाई मुंगीने जिंकली असं म्ह्टलं तर कोणी विश्वास ठेवेल का ? या ८०० वर्षातला सर्वात क्रूर आणि कपटी मुसलमानी आक्रमक राजा होता औरंगजेब आणि त्याच्या मुघल साम्राज्याची ताकद हत्तीइतकी होती तर स्वराज्याची ताकद त्यापुढे मुंगीइतकी होती असं म्हणणे अतिशयोक्तीचे वाटेल,पण आधीचा ८०० वर्षाचा इतिहास वाचला तर माझे म्हणणे तुम्हाला कदाचित पटेल !

- समीर गायकवाड.

सोबत काही नकाशे दिले आहेत त्यावरून तुम्हाला चित्र अधिक स्पष्टपणे लक्षात येईल - नकाशांवर क्रमांक घातले आहेत त्यानुसार स्पष्टीकरण...
१) इ.स. ५००मध्ये आताच्या भारतीय उपखंडातील तात्कालीन हिंदू राज्ये व राजवटी यांचा नकाशा, यात निळसर रंगातले हुण व श्वेतहुण यांचे पाक - अफगाण इथले तत्कालीन राज्य दिसते.
२) इ.स.९००मध्ये मुलतान- सिंध पडल्यानंतर व अफगाणीस्तानातील हुंण - श्वेतहुण राजवटी , गांधार - तक्षशिला पाडाव झाल्यानंतरचा नकाशा ,
३) इ.स.१४०० मध्ये सबंध उत्तर भारतातील भाग इस्लामी आक्रमकांच्या ताब्यात गेल्यानंतरचा नकाशा,
४) मुघल साम्राज्याचा नकाशा, यात काळ्या बॉर्डरमध्ये बाबराने वाढवलेले साम्राज्य आहे, तर पिवळ्या रंगातला भूभाग अकबराने वाढवला होता आणि केशरी रंगातला प्रदेश औरंगजेब जिंकण्यासाठी उतावीळ झाला होता
५) इ.स.१७०७ च्या अखेरीसचे मराठा साम्राज्य
६) इ.स. १८५७ चा भारताचा नकाशा.
७) मगधचे विशाल साम्राज्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा