![]() |
औदुंबर...
ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.
औदुंबर ही बालकवींची ओळख म्हणून ख्याती पावलेली कविता. ही एक अनुभवदायी प्रचीती देणारी कविता आहे, तिला समजावून घेण्यासाठी दुसऱ्याच्या संदर्भांची, स्पष्टीकरणांची गरज भासत नाही. अत्यंत प्रवाही, कमालीची सोपी, साधी नादमधुर अशी ही कविता आहे. तिच्यात गेयता आहे, तिला ताल आहे. लय आहे. ती यमकांची वा प्रतिमांची चतुरस्त्र जुळवाजुळवी नाहीये. विशाल कॅनव्हासवर चितारलेल्या एखाद्या टुमदार गावकुसाबाहेरच्या मनोहारी निसर्गरम्य दृश्यांच्या पोट्रेटची परिणामकारकता या कवितेतून बालकवींनी साधली आहे. निसर्गाचे इतके देखणे वर्णन एक अभिजात प्रतिभावंत कवीच करू शकतो, बालकवी हे तर प्रतिभेचे अलौकिक देणे लाभलेले सौंदर्यदृष्टीची जादुई पारख असणारे कवी होते.
औदुंबर ही निसर्गाच्या प्रेमात पडलेल्या हळव्या माणसाने चितारलेली शब्दांची एक नक्षीच आहे. अंगावर गर्द हिरवाई ल्यालेल्या बेटातून ऐल तटावरून पैल तटावरून नागमोडी वळणे घेत खळखळत वाहणाऱ्या स्फटिकजलांचे तुषार उडवणाऱ्या अवखळ झऱ्याचे चैतन्य या कवितेत आहे.
कवितेत एका गावाचे गोळीबंद शब्दचित्र आहे. दोन्ही बाजूंनी समृद्ध हिरवाई घेऊन पुढे वाहत जाणाऱ्या झऱ्याच्या तटावर असलेल्या हिरवाई पलीकडच्या टेकडीलगत एक चिमुकले गाव आहे. या वर्णनाशी साम्य असणारी अनेक छोटेखानी गावे कोकणात आहेत. टेकडीच्या एका कुशीत अंग चोरून बसलेल्या कोवळ्या लहानग्यासारखी ही गावे पाहता क्षणी काळजाचा ठाव घेतात. ही गावे पाहता क्षणी इथली मंदिरे आणि घरांच्या धुराडयातून निघणारी धुम्रवलये नजरेत भरतात. निमुळते टोकदार शिखर असणारे गावातले एखादे छोटेसे देऊळ आणि त्यावरचा पिवळट पडलेला कळस मेघांनाही मोहात टाकत असतो. शंभरेक उंबऱ्याच्या गावातून निघणारी धुरांची नक्षीदार वलये त्या आसमंतात वेगळीच नशा भरून टाकतात. तांबूस विटकरी रंगाची उतरती छपरे असणारी तिथली घरे मनात कायमची घर करून राहतात. अशा या रम्य गावाने टेकडीची कूस समृद्ध झाली आहे आणि तिच्या पुढयातल्या शेतमळ्यांची गर्दी नजरेत मावत नाही. ही भातशेतीची हिरवी- शेवाळी- पोपटी रंगाची वाऱ्यावर डुलणारी गच्च कंच कुरणे अधिकच भुरळ घालत राहतात.
गावाच्या पुढे असणारी गच्च शेतमळ्यांची कंच हिरवी गर्दी आणि तिच्या अधूनमधून जाणारी आडवीतिडवी वळणे असणारी लुसलुशीत तांबड्या मातीची पाऊलवाट वेगळेच गारुड मनावर करते. एखाद्या अवखळ मुलाने पाटीवर रेघोट्या ओढाव्यात तशी ही आपल्याच चालीतली पाऊलवाट असते. तिचा एक अनोखा कैफ मात्र जीवनप्रवासाच्या अंती वास्तव भानाचे आरसे दाखवते.
जगाच्या सुखदुःखाच्या भौतिकते पलीकडे अनुभवास येते ती विरक्ती ! औदुंबराचा वृक्ष या विरक्तीचे प्रतिक आहे. भवताली कितीही सुख समृद्धी दिसत असली तरी जगाची खरी पाऊलवाट या विरक्तीकडे घेऊन जाते.
‘झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर’ या ओळींनी कवितेचा बाज पूर्ण बदलून टाकला आहे. हा बदल इतक्या सहजतेने केला आहे की जणू काही प्रसन्न देव्हाऱ्यातल्या उदबत्तीचा दरवळणारा सुगंध आणि धुराची बारीक नक्षी हवेत विरून जावी. पहिल्या सहा पंक्तीत येणाऱ्या विहंगम हिरवाईत हे विरक्तीचे मेघ नकळत मिसळून जातात, वाचकास नकळत अंतर्मुख करून जातात. कवितेच्या अखेरच्या दोन पंक्तीत बालकवी कुठलाही तद्दन बोजड संदेश देत नाहीत मात्र अगदी निखालसपणे ते हृदयाच्या एका कप्प्यात अलवार कल्लोळ नक्कीच उडवून देतात. हे बालकवींचे अभूतपूर्व शब्दसामर्थ्य आहे, ज्याला अजूनही तोड नाही. कदाचित यामुळेच हे एक अजोड शैलीचे, अवीट गोडीचे, उच्च दर्जाचे अमर्त्य असे काव्य ठरते.
अवघ्या आठ ओळीत बालकवींनी एक सुंदर निसर्गचित्र शब्दांच्या कुंचल्याने रेखाटले आहे. हे चित्र रंगविताना त्यांनी विविध रंगांचा मुक्तहस्ते चपखल वापर केला आहे. निळासावळा झरा, शेतमळ्यांची हिरवी गरदी, पांढरी पायवाट व काळा डोह.-मोजक्या रंगांनी शब्दांच्या चौकटीत बसविलेले हे एक साधे व जिवंत रसरशीत चित्र आहे. बालकवींची वेधक रंगदृष्टी वाचकास ‘याची देही याची डोळा’ अशी अनुभूती देते. पहिल्या चार पंक्तीमधील आनंदी व खेळकर वृत्तीच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या चार पंक्तीत काहीशी उदासीनतेची छटा आहे. काळ्या डोहाकडे सरळ चाललेल्या पांढऱ्या पायवाटेचे उदासीनता पसरविणारे चित्र पाहून वाचकांची वृत्तीही बदलते. हा औदुंबर जगातील सुखदुःखांकडे विरक्त वृत्तीने पाहणाऱ्या स्थितप्रज्ञासारखा वाटतो. विरक्त वृत्तीच्या दत्त या देवतेशी औदुंबराचा निकट संबंध असल्यामुळे या वृक्षाची येथे केलेली निवड औचित्यपूर्ण वाटते. `ऐल तटावर पैल तटावर, आडवीतिडवी, झाकळुनी जळ गोड काळिमा, जळात बसला असला औदुंबर' या गोड शब्दांत सुंदर अनुप्रास साधला आहे. चिमुकले गाव, निळासावळा झरा, दाट हिरवी गर्दी, गोड काळिमा, आडवीतिडवी पायवाट अशी अर्थवाही व समर्पक विशेषणे वापरून त्यांनी मूळ निसर्गचित्र अधिक ठसठशीत केले आहे. औदुंबराला मनुष्य कल्पून येथे `चेतनगुणोक्ती' हा अलंकार साधला आहे. शब्दमाधुर्य व पदलालित्य यांनी ओथंबलेली ही एक प्रासादिक कविता आहे. या कवितेला आजही मराठी काव्याच्या नभांगणात अढळस्थान आहे.
एकाच कवितेत निसर्गप्रेम आणि विरक्तता याचे हे श्रेष्ठ वर्णन आहे. या कवितेवर पूर्णतः बालकवींची छाप आहे. नवखा वाचकही सांगेल की ही कविता बालकवीचीच आहे. त्याला कारणही तसेच आहे. मराठी कविता वाचल्यात पण बालकवी माहिती नाहीत असे कोणी म्हणेल काय ? याचे उत्तर निश्चितच नाही असे येईल. बालकवींनी अकाली अन् अपघाताने जगाचा निरोप घेतला. बालकवी हे एकमेव असावेत की ज्यांनी आनंद आणि उदासीनता या दोन्ही भावनांना आपल्या कवितेत जिवंत केलेय. निसर्गकवी म्हणून मराठी साहित्यात त्यांचे अढळ स्थान आहे. बालकवींची कविता निसर्गातील प्रतीकांच्या अवतीभोवतीच फिरली, तथापि त्यांनी आपल्या प्रतिभाशक्ती आणि शब्दरचनेच्या बळावर निसर्गातील प्रफुल्लित निरागसता कवितेत जिवंत केली. आनंद आणि उदासीनता, या दोन्ही भावना त्यांच्या कवितेत अगदी स्वाभाविकतः मुक्त रुपात अवतीर्ण होतात. निसर्गात दिसणारी रूपे, प्रतिमा त्यांनी इतकी सहजपणे आपल्या कवितेत वापरल्या आहेत की, कधीकधी निसर्गापेक्षाही त्यांची कविता अधिक सरस अन् अधिक उजवी वाटते हे बालकवींचे वेगळेपण ठळक लक्षात येते. ‘आनंदी आनंद’ ही त्यांची रसिकप्रिय कविता आनंदाचे विलक्षण वर्णन आपल्यापुढे उभे करते. प्राथमिक इयत्तेत बालभारतीच्या पुस्तकात कधी तरी मन लावून वाचलेली, गायलेली ही कविता प्रत्येकाने स्मरणशक्तीच्या कुपीत वर्षानुवर्षे जतन केली असेल.
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिंकडे
वरती खालीं मोद भरे, वायूसंगें मोद फिरे…
या कवितेतले नादमाधुर्य कवितेचा आनंदाचा गोडवा अजून वाढवते. ही कविता वाचताना वयाचे भान न ठेवता केवळ वाचण्याऐवजी चालीमध्ये गायचा मोह आवरत नाही.
“हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला ?”
फुलराणी या कवितेतल्या पंक्ती त्यांची निसर्गभक्ती दाखवतात. आपल्या मुलाबाळावर जितके सच्चे अन् उत्कट प्रेम असते तितके प्रेम त्यांचे निसर्गावर होते, जे कवितेच्या पावलोपावली आढळते. केवळ कविमनाचा माणूस हे लिहू शकेल का, या प्रश्नाचे उत्तर बालकवींच्या जडणघडणीशी आणि त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीशी निगडीत आहे. त्यांच्यातले कविमन हे निसर्गाचेच एक अंग होते, या कविमनास हिरव्या गालिच्यांच्या मखमली जशा उमजत होत्या तसेच शून्य मनाचे घुमट आकळत.
'श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे ,
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणि भासे…. '
सृष्टीच्या रचेत्याला देखील श्रावणाच्या मोहात पाडेल असे देखणे प्रकटन बालकवी ज्या विलक्षण ताकदीने उभे करतात त्याला तोड नाही.
उदासीनता हा आनंदाच्या विरुद्ध असणारा भाव होय. आनंदावर जितकी उत्कट कविता बालकवी करतात तितकीच उत्कट किंबहुना त्याहून अधिक ह्रदयंगम कविता ते उदासीनतेवरही करतात.
“कोठुनि येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला?
काय बोंचते तें समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला?
येथें नाहीं तेथें नाही काय पाहिजे
मिळवायाला कुणीकडे हा झुकतो वारा?
हांका मारी जीव कुणाला?
मुक्या मनाचे मुके बोल हे; घरें पाडिती पण हृदयाला!
तीव्र वेदना करिती, परि ती ; दिव्य औषधी कसली त्याला ? .....................”
या कवितेतली आर्त दुःखद उदासीनता वाचणाऱ्याला मरगळ आणून जाते इतकी ताकद यात आहे.
“भिंत खचली,कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला;
तिच्या कौलारीं बसुनि पारवा तो खिन्न नीरस एकांतगीत गातो.
सूर्य मध्यान्हीं नभीं उभा राहे, घार मंडळ त्याभवतिं घालिताहे.
पक्षि पानांच्या शांत सावल्यांत सुखे साखरझोपेंत पेंगतात.
तुला नाही परि हौस उडायाची, गोड हिरव्या झुबक्यांत दडायाची,
उष्ण झळया बाहेर तापतात.गीतनिद्रा तव आत अखंडीत.
चित्त किंवा तव कोवळ्या विखारें दुखतखुपतें का सांग, सांग बा रे!
तुला काही जगतात नको मान? गोड गावे मग भान हे कुठून?.......”
'पारवा' या कवितेतले हे वर्णन त्यांच्या निरीक्षणशक्तीचे बारकावे समर्थपणे समोर उभे करते.
बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.
जोपर्यंत बालकवींची तंद्री आनंदी होती तोपर्यंत त्यांची कविता म्हणजे ‘अलवार कोवळे अंग, जशि काय फुलांची मूस’ होती, पण जेव्हा ही तंद्री कोळपल्यासारखी झाली तेव्हा त्यांची कविता ‘उदासीनता’च झाली. ‘शून्य मनाच्या घुमटा’त ‘दिव्यरूपिणी सृष्टी’ भीषण रूप धारण करू लागली. काळाच्या ‘भोवऱ्या’त पडून ‘जीवित केवळ करुणासंकुल’ झाले, मनाचा पारवा ‘खिन्न नीरस एकांतगीत’ गाऊ लागला. ‘अस्मान’ ‘धरणी’ला मिळून ‘रात्रिचा’ ‘अवकाळ प्रहर’ ‘घोर’पणे ‘घुमा’यला लागला. ‘भरले घर ओके’ ‘मायेच्या हलकल्लोळा’त ‘मायेच्या हिरव्या राव्या’ला दुखवून ‘जडता पसरलेला’ जीव ‘देहाचे पंजर’ टाकून उडून गेला. ‘यमाचे दूत’ बोलावू लागले.
त्यांच्या कवितेला विषयांचे बंधन नव्हते. त्यात तन्मयतेने केलेले उदात्त, प्रफुल्लीत निसर्गाचे, भग्न अवशेषांचेही वर्णन आहे. गूढ गुंजनाने त्यांच्या उदासीनतेच्या कविता भारित आहेत. ती भरलेल्या हिरवाईचेही नि ओसाड जागेचे मनाला भिडणारे वर्णन करते. त्यांच्या कविता सुर्योदयाने आनंदी होऊन जातात अन् भग्न रात्रीच्या भयाणपणालाही तितक्याच तन्मयतेने शब्दबद्ध करतात. बालकवींची कविता फुलराणीचे गीत गाते नि अतिमानुष व्यक्तीचेही शब्दांकन करते. बालकवी प्रफुल्ल आनंदी मनोवस्थेत असत तेंव्हा त्यांच्या आनंदाची प्रत्यक्ष अनुभूती त्यांच्या कवितेत उमटे. ते उदास असत तेव्हा त्यांच्या कवितेत विमनस्कतेची, मरणाची उत्कंठा जाणवते. आनंदी असो वा उदासीन भाव त्यांच्या बहुतांशी कवितेत एक स्वप्नाळू – निरागसता आहे. एक दुर्दम्य पण दर्पयुक्त आशावाद आहे. कल्पनावादाचा (आयडिअलिझम) अवलंब करताना त्यांनी उपमांचे जे शब्दांचे भांडार मांडले आहे त्याला तोड नाही. त्यांच्या कवितेत सुंदर तरुण तरुणींचा प्रेमवाद नाहीये, त्यांची कविता उपदेशपर तर मुळीच नाहीये. कोणताही प्रचारकी थाट नसलेली मनाचा अनुभव मांडणारी कवीच्या अवस्थेनुरूप आपले भाव प्रामाणिक मांडणारी ती एक सृजनवेणा आहे !
वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अपघाती निधन झाल्यामुळे बालकवींचं कवितालेखनही भौतिक अर्थांनी मर्यादित राहिलं. त्यांना जेमतेम दहा-बारा वर्षं कवितालेखन करता आलं, आणि त्यांच्या एकूण कवितांची संख्याही आहे केवळ एकशे त्रेसष्ट.
बालकवींचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे झाला. त्यांचे वडील बापूराव देवराव ठोंबरे पोलिसखात्यात नोकरीला असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात अडथळे आले. बालकवींना चार भावंडं होती. जिजी ही थोरली बहीण त्यांच्या विशेष जवळची होती. शिवाय अमृतराव आणि बाबू हे दोन भाऊ आणि कोकिळा ही बहीण होती. स्वदेशी, स्वराज्य अशा देशभक्तीच्या तत्कालीन कल्पनांच्या प्रभावामुळे बालकवींना तसेच त्यांच्या वडिलांना इंग्रजी शिक्षणाबाबत उत्साह नव्हता. त्यामुळे बालकवींचा बराचसा अभ्यास घरीच झाला. बालकवींची थोरली बहीण जिजी ऊर्फ लक्ष्मीबाई भावे यांनी त्यांना संस्कृतचं प्राथमिक शिक्षण दिलं; कवितेकडेही तिनेच वळवलं. बालकवींनी नंतर स्वतःच्या बळावर संस्कृतमध्ये प्रभुत्व मिळवलं. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचाही त्यांचा अभ्यास होता.
वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर इथे असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. ह्या कवितेला त्यांनी शीर्षक दिलेलं नव्हतं. (बालकवींच्या समग्र कवितेचे संपादक प्रा. भा. ल. पाटणकर ह्यांनी तिला ‘वनमुकुंद’ असं नाव दिलं). जळगावमधे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (१९०७) बालकवींनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर ह्यांनी त्यांना ‘बालकवी’ हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. तेव्हा त्यांचं वय १७ वर्षं होतं. त्यानंतर ‘बालकवी’ हे नाव रूढ झालं.
१९०८मधे बालकवींच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबातील उर्वरित दोन भाऊ स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असल्यामुळे संसाराची जबाबदारी बालकवींवर येऊन पडली, तेव्हापासून नोकरीसाठी आणि पैशासाठी बालकवींची खटपट सुरू झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत गडबडीने आणि बालकवींच्या मनाविरुद्ध त्यांची आई गोदूताई यांच्या पुढाकाराने बालकवींचा विवाह नाशिकच्या पार्वतीबाई जोशी यांच्याशी करून देण्यात आला. १९०९च्या दरम्यान शिक्षणासाठी काही काळ बडोद्याला असलेल्या बालकवींची तिथेच रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्याशी गाठ पडली. बालकवींची हालाखीची परिस्थिती पाहून टिळकांनी त्यांना अहमदनगरला आपल्या घरी राहण्यासाठी आणलं. टिळकांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांनी आपल्या ‘स्मृतिचित्रे’ या गाजलेल्या आत्मचरित्रात म्हटलं आहे, ‘ठोंबरे हा बालकवी होता, पण तो कवीपेक्षा बालच अधिक होता.’
यानंतरच्या काळात कधी कुटुंबियांच्या आग्रहामुळे तर कधी बदलीच्या नोकऱ्यांमुळे पुणे व नगर अशा ठिकाणी बालकवींचा आयुष्याचा काळ विभागला गेला. बालकवी १९१० च्या आरंभी टिळकांकडे गेले. त्यापूर्वी त्यांनी ही एकच निसर्गविषयक कविता लिहिली होती. किशोरांसाठीच्या 'आनंद' मासिकाच्या पहिल्या अंकासाठी भा. रा. तांबे यांनी संपादक वासुदेव गोविंद आपटे यांच्या विनंतीवरून 'आनंदी आनंद' ही कविता लिहिली होती. त्यावरून बालकवींना ही कविता स्फुरली. मात्र या निसर्गविषयक कवितेचा शेवट-स्वार्थाच्या बाजारांत...आनंदी-आनंद गडे!....हा त्यांना कदाचित गृहकलहातील दैनिक कोलाहलातून स्फुरला असावा.(-समग्र बालकवी,समालोचन, पान क्र. ४३)
"गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी!
काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं?"
तूं तर चाफेकळी!" ही सुंदर कविता त्यांनी अपूर्ण ठेवलेली आहे, त्याचे कारण ज्ञात नाही. बालकवींनी अपूर्ण सोडलेल्या या कवितेबद्दल ‘फुलराणी - बालकवींच्या निवडक कविता’ या लेखाच्या संपादकीय टीपांमध्ये कुसुमाग्रजांनी ही कविता "अपूर्ण असली तरीही, अपूर्णता तिच्या रसास्वादाला बाधक ठरत नाही. कोठल्यातरी संकल्पित कथाकाव्याचा हा छोटा तुकडा आहे असे वाटते" असे मत नोंदवले आहे. हे एका तरुणीचे वर्णन असावे असा तर्क येत राहतो. स्त्री सौंदर्याची ही देखणी कविता त्यांनी अपूर्ण का ठेवली असावी? अनेक शंका या प्रश्नाने मनात दाटून येतात अन् कवितेचा शेवट पुन्हा त्यांच्या गुंतागुंतीच्या अस्वस्थ कौटुंबिक जीवनाकडे अंगुलीनिर्देश करून जातो.
५ मे १९१८ या दिवशी उन्हाळ्याच्या दिवसात एका विवाहासाठी खानदेशातील भादली इथे आलेले असताना बालकवींना त्यांचे कवीमित्र के. म. सोनाळकर यांचं पत्र आलं व त्यांच्याकडे जाण्यासाठी घाईघाईने रेल्वेस्टेशनकडे निघालेल्या बालकवींचा पाय रूळामध्ये अडकला. याच वेळी येणाऱ्या रेल्वेखाली अडकून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.….
'पिपात मेले ओल्या उंदीर..' अशी थोडीशी क्लिष्ट पण गहन विचाराची कविता लिहिणाऱ्या बा.सी.मर्ढेकरांचा बालकवींच्या कवितेवर प्रभाव जाणवतो तर बालकवींच्या कवितेतली खिन्नता आणि उदासीनतेशी कवी ग्रेस यांची कविता जवळीक सांगते. तर ना.धो.महानोरांसारख्या निसर्गप्रेमी कवीवरही बालकवींचा प्रभाव जाणवतो. मराठी साहित्यविश्वातली ही उत्कट निसर्गप्रियता, खिन्न मनात पिंगा घालणारी उदासीनता तन्मयतेने शब्दबद्ध करण्याची ही समृद्ध परंपरा सध्याच्या नवकवींमध्ये तितक्या प्रभावशाली पद्धतीने प्रकट होताना दिसत नाही असे शेवटी खेदाने नमूद करावेसे वाटते.
'शून्याकारे, शून्याधारें, शून्यवृत्तिनें चाले
परी हासतां मी या विश्वी वस्तुजात हे डोले..'
स्वतःच्या वृत्तीचे असे तरल वर्णन करणाऱ्या या कवीला मृत्यूसमयी अशी काय तल्लीनता लागली असावी की, त्यांना रेल्वेचा आवाज देखील जाणवला नाही! हा प्रश्न मनाला उदास पारव्यासारखी रुखरुख लावून जातो.
आज या प्रतिभासंपन्न कवीचा जन्मदिवस ! बालकवींच्या समृद्ध प्रतिभेस सादर शब्दप्रणाम.
- समीर गायकवाड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा