सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

सवाल...



एका प्रश्नाचे उत्तर शोधित निघालो होतो तेंव्हाची ही कथा.....
उत्तराच्या शोधात हातोडयाने राजकारणी लोकांच्या डोक्यात खिळे ठोकले तेंव्हा सर्वांचेच रक्त लाल निघाले,
भगवे, हिरवे वा निळे अन्य कुठल्या रंगाचे रक्त कुठेच दिसले नाही.
देशाच्या नकाशात कुठे भाषा, प्रांत, जात, धर्माची कुंपणे दिसतात का बघावीत म्हणून दुर्बीण घेऊन बसलो,
पण कोण्या राज्यांच्या सीमांवर कसलीही कुंपणे दिसली नाहीत.
सर्व महापुरुषांची पुस्तके वाचून काढली, त्यांचे विचार अभ्यासले, त्यांना अनुभवले,
पण एकानेही एकमेकाविरुद्ध लिहिल्याचे कुठे वाचनात आले नाही.
वरपासून खालपर्यंत वाहणारया नदयांचे काही बोडके तर काही समृद्ध खोऱ्यांचे का धुंडाळले,
नदयांचा प्रवाह कुठे भेद करत नव्हता, मार्ग मिळेल तिकडे आरामात वळत होता.

तळापाशी ध्यानस्थ झालेल्या समुद्राचे विशालकाय किनारे तुडवले,
सर्व नदयांना त्याच्या प्रवाहात शिरायची मुभा होती, सर्वाना तो कवेत घेत होता
सकाळपासून ते सांजेपर्यंतची सूर्यकिरणेही तपासून पाहिली,
चंद्रमौळी घरापासून ते पंचतारांकित इमारतीवरही त्याची किरणे सारखीच पडत होती.
देशभरातील वेळी अवेळी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची चव चाखून पाहिली,
पाऊसपाणी थोडे असमान होते पण चव सगळीकडे सारखीच होती.
डोंगरदऱ्या पालथ्या घातल्या, घळयांच्या आतडया कातडयात उतरलो, शिखरे पादाक्रांत केली,
पण सर्वांनाच पाय ठेवायची मुभा तिथल्या मातीने सदैव दिली होती.
उनाड वाऱ्यापासून ते कराल वावटळीपर्यंत सर्वांच्या वायूलहरींचा आलेख तपासून पाहिला,
पवनबंदी कुठेच नव्हती, वाऱ्याचा सर्वत्र मुक्त संचार होता.
अनेक ठिकाणच्या गायींचे दुध तपासले तेही शुभ्र धवल चवदार होते,
सर्वच झऱ्यातले पाणी स्फटिकतेजाचे, निर्मळ होते.
काळ्या - तांबडया मातीत उगवणाऱ्या प्रत्येक अंकुराचा कोंबही हिरवापिवळाच निघाला.
रात्रीचा अंधार सर्वत्र काळाच होता आणि दिवसाचे आकाशही निळेच होते.
सूर्योदयाला पूर्वेचे अन सांजेला पश्चिमेचे आभाळ लालच होत होते.
विस्तवाची धग तपासली तर तीही सर्वत्र गरमच निघाली.
सरतेशेवटी विशाल वटवृक्षाच्या थंडगार सावलीत जाऊन उभा राहलो,
तिथे सर्व जातीधर्माचे, पंथांचे, वर्णाचे, लिंगांचे, भाषांचे, प्रांतांचे लोक आरामात उभे होते, सावली सर्वांच्या अंगावर समानच होती....

मोकळ्या हाताने अन जड झालेल्या पावलांनी सुन्न झालेल्या डोक्याने घरी परतलो.
सर्व महापुरुषांच्या हाती सकल धर्मग्रंथ देऊन त्यांना खोलीत कोंडले, वर तंबीही दिली.
"हे सर्व धर्मग्रंथ, तत्वज्ञान एकत्र करून बघा. आपसातही चर्चा करा आणि एकच सवाल करतो त्याचे उत्तर द्या, अन्यथा कायमचे कोंडून टाकीन !"
महापुरूषच ते !
त्यांनी एकमेकाकडे पाहिले स्मितहास्य केले, पृच्छा केली, "काय प्रश्न आहे ?"
"सगळी सृष्टी जशी होती तशीच आहे मग माणसांची वाटणी कोणी केली ?" माझा बालिश प्रश्न.
महापुरुषांनी मिस्कीलपणे आपसात नजरेचे इशारे केले आणि सर्वजण आपणहोऊन खोलीत निघून गेले, आतून दार बंद केले..

काही वेळांतच ते बाहेर आले,
उत्तर सोपं आहे, "तुझे कान आणि डोळे उघडे ठेव, गरजेपुरतेच तोंड उघड !
आपल्या स्वार्थासाठीच माणसांनी माणसं वाटली, माणसांची वजाबाकी झाली बाकी शून्य उरली !
पण ज्यांनी ज्यांनी वाटणी केली त्यांची त्यांची मात्र भरभक्कम बेरीज झाली,
ज्यांना वाटणीचे गणित कळत गेले ते पुन्हा पुन्हा माणसं वाटत राहिले, पेटवत राहिले, स्वतः गडगंज होत गेले !

जात, धर्म,पंथ, भाषा, प्रांत, लिंग, वर्ण, दिशा, देश, खंड अशी सातत्याने वाटणी होत राहिली आणि होते आहे.
आता फार उशीर झाला आहे पण बेरीजवाल्या लोकांपसून दूर राहता येईल...
जो माथी भडकावतो, वाटणीच्या आधारे सावध व्हायला सांगतो, नुसतीच चिखलफेक करतो, द्वेष करतो, आपलं तुपलं करतो
कडवट धर्मवादाच्या गोष्टी करतो, विचारांची उत्तरे विचाराने देत नाही,
अशापासून दूर रहा.. किमान आणखी वजाबाकी तरी होणार नाही !"
शेवटची वाक्ये उच्चारताना महापुरुषांचा स्वर काहीसा कातर झाला होता आणि डोळे पाणावले होते..
त्यांनी एकमेकास पुन्हा इशारे केले आणि घराबाहेर पडण्याच्या दिशेने चालू लागले.
त्यांचा मार्ग अडवताच त्यांनी एक अर्थगर्भित स्मित केले,
"निघतो आता ! दुसऱ्या घरी जातो, तिथं काही प्रश्न पडले आहेत का याचा कानोसा घेतो,
इतरांनाही सांग, प्रश्न न विचारता अर्थ काढू नका म्हणावं, प्रश्नांची उत्तरे स्वतःही शोधा म्हणावं.
कोणतेही प्रश्न विचारा म्हणावं.. सच्च्या उत्तरांची मनापासूनची इच्छा असेल तर त्यासाठी आम्ही घरोघरात हजर आहोत !
पण आता एका जागी थांबून चालणार नाही..."
विविध जातीधर्माचे, पंथांचे, भाषांचे, प्रांतांचे, वर्णांचे ते महापुरुष सहजतेने एकमेकाच्या हातात हात घालून सहजतेने घराबाहेर निघून गेले...

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा