Thursday, November 17, 2016

'चंद्रकांत' - एक अस्सल बहुआयामी प्रतिभावंत कलाकार .....

एके काळी पाटील, सरपंच, तमाशा ही मराठी सिनेमाच्या कथानकाची त्रिसूत्री होती. कौटुंबिक मराठी चित्रपटात ताई, वाहिनी, सासूबाई, मामंजी आणि अक्कासाहेब यांच्या जोडीला बांगडया, तुळस, सौभाग्य हे परवलीचे शब्द होते. अगदी साचेबंद स्वरुपात हे चित्रपट असत, फारसे नाट्य त्यात नसे. एक आत्यंतिक साधेपणा, कथेतील सहजता आणि आपलीशी वाटणारी पार्श्वभूमी ही त्या चित्रपटांची जमेची बाजू होती. सुरेल गाणी, मराठमोळे रांगडे नायक, सोज्वळ नायिकांचा तोलून मापून अभिनय, बेरकी पण संयमित खलनायक, चुरचुरीत विनोदनिर्मिती करणारे हास्यअभिनेते, वयाचा व भूमिकेचा बाज सांभाळून काम करणारे चरित्र अभिनेते, ग्रामीण वा निमशहरी पार्श्वभूमी असा सगळा जामानिमा ठरलेला असे. त्या काळातील एका अस्सल मराठमोळ्या, रांगडया अभिनेत्यावरची ही पोस्ट. कोल्हापुरी लाल मातीतली पहिलवानी देहयष्टी, रुबाबदार व्यक्तिमत्व, बोलका चेहरा, खर्जातला आवाज अन संयत अभिनय याच्या जोरावर चंद्रकांत आणि सुर्यकांत मांडरे हे दोन भाऊ मराठी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवून गेले. चंद्रकांत-सूर्यकांत ही मराठी चित्रपटसृष्टीतील पहाडी-धिप्पाड व्यक्तिमत्त्वं! महाराष्ट्राचे शिवाजी-संभाजी त्यांनी साकार केले, गावोगावचे पाटील त्यांनी रंगविले; पण त्यांच्या या राकट व्यक्तिमत्त्वात एक संवेदनशील मनही दडलेले होते. ज्याने या जोडीला अभिनयाच्याच बरोबरीने कलेचे अंगही दिले. यातली चंद्रकांत ऊर्फ गोपाळ तुकाराम मांडरे ही ‘थोरली पाती’होत. ते खरया अर्थाने बहुआयामी होते - मर्दानी पिळदार अंगाचा पहिलवान गडी, देखणा अभिनेता, प्रतिभावंत चित्रकार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक संवेदनशील माणूस! 


मराठी चित्रपटांना अस्सल ग्रामीण बाज आणि मराठमोळेपण बहाल करणार्‍यांमध्ये व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील यांच्याप्रमाणेच बाबूराव पेंढारकर, दादा साळवी यांच्यासारख्या अभिनेत्यांचाही समावेश होतो. शहरी मध्यमवर्गीयांनी ज्यांची सरसकट तमाशापट म्हणून संभावना केली त्यापैकी बर्‍याच चित्रपटांची बोली आणि बाज मराठी होता. हिंदी चित्रपटांच्या प्रभावाखालील मराठीपटात हायब्रीड शैली दिसते, ती यापैकी अनेक चित्रपटांमध्ये दिसत नसे. 'बॉलीवूड' स्टाईल मराठीपटांमधले कितीतरी नट हिंदी फिल्मी स्टाईल नाचतात, कपडे घालतात आणि बडबडतात. या कलमी संस्कृतीपासून चंद्रकांत मांडरे कित्येक कोस दूर होते. त्यांनी नायक, खलनायक, चरित्र अभिनेता अशा विभिन्न भूमिका आपल्या कार्कीर्दीत साकारल्या होत्या.. 'देवाशपथ खरं लिहीन' हे त्यांचे आत्मकथन प्रसिद्ध आहे.या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत साहित्यप्रेमी राजकारणी शरद पवार यांनी लिहिलंय की, ''वयाच्या दहाव्या वर्षापासून अखेरपर्यंत, म्हणजे १७ फेब्रुवारी २००१ पर्यंत चंद्रकांतांनी नियमितपणे डायरी लिहिली. एका समर्थ अभिनेत्याचे आणि प्रतिभाशाली चित्रकाराचे हे आत्मकथन म्हणजे मराठी संस्कृतीचा दस्तऐवज ठरेल, असा विश्वास वाटतो.''


चंद्रकांत मांडरे मुळचे कोल्हापूरचेच. त्यांच्या वडिलांचे इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचे दुकान होते. वडील नाटक-चित्रपटांचे शौकीन होते. बाबूराव पेंटर यांच्या 'गजगौरी'त त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका केली होती. वडीलच चंद्रकांतना घेऊन बाबूराव पेंटरांकडे गेले. तेव्हा त्यांची चित्रकला बघून कंपनीतले कला विभागातील बाबा गजबर म्हणाले, ''मुलाची  चित्रकला चांगली आहे. त्याला मी शिकवेन; पण एक अट राहील. त्यानं कंपनीतल्या माझ्या खोलीतच बसून चित्रं काढली पाहिजेत. शूटिंग सुरू असताना त्याने तिथं थांबता कामा नये.'' त्या वेळचे चंदेरी सृष्टीतील वातावरण किती घरगुती, चांगल्या वळणाचे होते, याची यावरून कल्पना यावी.


१९३२ मध्ये आनंद फिल्म्स कंपनीच्या 'प्रीतिसंगम' या मूकपटात चंद्रकांत मांडरेंना बेरडाची भूमिका मिळाली. जोर-बैठकांची दणकट व पिळदार प्रकृती असल्याने त्यांना हे काम मिळाले व चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून त्यांचा प्रवेश झाला. 'सावकारी पाश' या मूकपटात शेतकर्‍याच्या मुलाचे जे काम शांतारामबापूंनी केले, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळाले. डोक्यावरचे सगळे केस कापलेले, अंगात धोतर आणि कुडते. 'सावकारी पाश' हा खरया अर्थाने मराठीतील पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली. ‘सावकारी पाश ते बनगरवाडी’ असा त्यांचा चित्रपट प्रवास राहिला. 'सावकारी पाश'मधला हरबा , बैलाबरोबर जू घेतलेला धोंडी (पवनाकाठचा धोंडी) आणि शिवाजीमहाराज (छत्रपती शिवाजी), ‘जयमल्हार’मधील तो रंगेल आणि रगेल पाटील, ‘रामराज्य’मधील त्या प्रभू रामचंद्र, बनगरवाडीतील थकलेला ‘कारभारी’ खास करून ह्या भूमिका जास्ती गाजल्या.


मात्र चित्रपटात अभिनय करताना ते चित्रकलेला विसरले नाहीत. पन्हाळा, रंकाळा इथे जाऊन तिथला निसर्ग ते कागदावर उतरवत. त्यांची चित्रे बघून कलामहर्षी बाबूराव पेंटर मौलिक सूचना करत. ''आकाश, डोंगर, झाडे, पाणी, जमीन यांचे निसर्गातील मिळतेजुळते रंग अजून तुझ्या चित्रात उतरत नाहीत. पेपरच्या आकारमानात निसर्गाचा भव्यपणा वाटत नाही. लहान किंवा मोठया कागदावर आबालाल मास्तरांनी काढलेली चित्रे पाहत जा. त्यात खराखुरा निसर्ग दिसेल,'' असे म्हणत.


त्या काळी चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यात कसे नाते होते आणि त्यांच्या सामाजिक जाणीव कशा होत्या याचा उल्लेख इथे करावासा वाटतो. चंद्रकांतांची भूमिका असलेल्या भालजी पेंढारकर यांच्या 'थोरातांची कमळा'च्या तालमी सुरू असताना भूमिका कशी साकारायची याची बारकाईसह माहिती घेण्यासाठी भालजींनी चंद्रकांत यांना शांतारामबापूंना भेटायला सांगितले. त्याच्या बळावर 'शेजारी'तले जिवबाच्या मुलाचे काम त्यांना मिळाले. याच वेळेस सेटवर 'थोरातांची कमळा'त 'कमळा' (सुमती गुप्ते) मराठमोळी दिसावी म्हणून भडक नव्हे, तर माफक 'मेक-अप'चा आग्रह तेंव्हा भालजींनी धरला होता, आधी सबबी सांगणारया सुमती गुप्ते नंतर राजी झाल्या होत्या. या सिनेमाची ही रंजक आठवण खूप काही सांगून जाते. भालजींची वीणच वेगळी होती याचे आणखी एक उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यलढयासाठी भालजींबरोबर कोल्हापुरात झोळी घेऊन तत्कालीन दिग्गज फिल्मी हस्ती असणारे पृथ्वीराज कपूर गल्लोगल्ली फिरले होते. अशा भालजींचा हात चंद्रकांत मांडरेंच्या पाठीवर होता अन त्याचा त्यांना सार्थ अभिमान होता.


चंद्रकांतना जसा भालजींचा सहवास लाभला तसा गोविंदराव टेंबेंचा सहवास देखील लाभला जो त्यांना अधिकच समृद्ध करून गेला. अभिनयासोबतच हाती कुंचला असल्याने ते निसर्गचित्रात हरवून गेले होते, पण माणसांची अक्षरचित्रेही त्यांनी 'देवाशपथ'मध्ये सुरेख रेखाटली आहेत. शब्दांकनही साधे, अनलंकृत- अगदी थेट चंद्रकांत मांडरे यांच्यासारखे! हा आडदांड माणूस कमालीचा निगर्वी, सज्जन आणि निर्मळ अंत:करणाचा होता. आई, पत्नी, भाऊ सूर्यकांत यांच्यावर अतोनात प्रेम करणारा, गुरुस्थानी असलेल्या भालजी, बाबा गजबर, बाबूराव पेंटर, आबालाल रहेमान यांचा आदर करणारा, पापभीरू, ढोंग न करणारा आणि कुणावरही चिखलफेक करण्याचे टाळणारा हा माणूस खऱ्या अर्थाने परिपूर्ण होता,अगदी 'द कम्प्लीट मॅन' म्हणतात ना तसा !


मिशीला पीळ भरणारा, एक भुवई उडवून बोलणारा, कपाळावर केसाची जुल्फं आणणारा, करड्या नजरेने धाक बसवणारा, एका फटक्यात दातखीळ बसवणारा पण मृदू काळजाचा नायक त्यांनी जास्त रंगवला. रग्गील, आडदांड अन रंगेल खलनायक रंगवताना ते तितकेच समरसून गेले होते. त्यांनी रंगवलेले चरित्रनायक देखील प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे होते. डोईवर तुर्रेबाज फेटा नाहीतर मुंडासं, हातात तंब्याचं भलं मोठं कडं, कपाळावर अष्टगंध, पायात चांदीचा तोडा, कराकरा आवाज करणारया कोल्हापुरी वहाणा, निऱ्या घातलेल्या कासोटयाचे दुटांगी धोतर, वर बाराबंदी नाहीतर बंद गळ्याचा सदरा ह्या अस्सल कोल्हापुरी वेशातले चंद्रकांत डोळ्यासमोर आले तरी प्रेक्षक सुखावला जाई.


चंद्रकांत मांडरेंमध्ये अनेक रूपे होती एक चित्रकार, कोल्हापुरातले कुस्तीचे फड रंगवणारा एका मुसमुसलेला  कुस्तीवीर, एका यशस्वी व आदर्श कुटुंबप्रमुख, एक सार्थ दिग्दर्शक आणि एक प्रयत्नशील निर्माता ! त्यांची चित्रकला पाहिल्यावर खुद्द निसर्गालाही आपण आरशात पाहतोय असं वाटावं अशी होती. पावडर शेडिंग, तैलरंग, जलरंग आदींमध्ये त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या कलेचा हा ठेवा, ही झाकली मूठ महाराष्ट्रातील जनतेपुढे खुली करण्याच्या हेतूनेच शासनाने त्यांचे राहते घर आणि त्यातील कलादालनाचे एका संग्रहालयात रूपांतर केले आणि यातूनच आकारास आले- चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय! कोल्हापुरातील राजारामपुरी, सातवी गल्ली, ‘निसर्ग’ बंगला, हा त्याचा पत्ता ! त्यांनी रेखाटलेली सर्व चित्रे ह्या दालनात आहेत. कोल्हापूरभोवतीच्या शेतमळ्यांची, गुऱ्हाळांची इथे अनेक चित्रं भेटतात. यातलेच एक चित्र मुंबईतील प्रदर्शनात पाहताना बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘या चित्रांतून गुळाचा वास येतो आहे.’ एका कलाकाराची अन्य एका कलाकाराला मिळालेली ही दाद! १९६९ मध्ये अशाच एका चित्रप्रदर्शनात ही चित्रे पाहून तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब देसाई म्हणाले की, ‘आजवर हातात फरशी घेतलेला चंद्रकांत आम्ही पाहिला होता. पण हा हाती कुंचला घेतलेला चंद्रकांत आमच्यासाठी नवा आहे.’ अभिनेता ‘चंद्रकांत’च्या ओझ्याखाली गोपाळराव मांडरे हा कलाकार असाच अनेक वर्षे बुजून गेलेला होता. त्यांच्या अनेक चित्रांवरची जी. टी. मांडरे ही सही पाहिली की, अनेकजण त्यांनाच विचारायचे हे तुमचे कोण ? मांडरेंना रसिकप्रेम जितके अफाट लाभले तितकेच अलौकिक संन्मानही लाभले होते. त्यांचे कर्तृत्व पाहून वयाच्या ८७व्या वर्षी त्यांना शिवाजी विद्यापीठाने डी.लिट ही सर्वोच्च पदवी प्रदान केली होती. 

दिग्गज कलाकारांमुळे कोल्हापूरला कलापूर असेही कौतुकाने म्हटले जाते. या कलापूरचे मांडरे खरेखुरे तपस्वी! कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि बाबा गजबर यांच्या या शिष्याने चित्रकलेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ही असंख्य चित्रे, कलाकृती पाहात अगदी शेवटी मांडरेंच्या काम करण्याच्या खोलीत आपण येतो. त्यांचे टेबल, खुर्ची, वापरातील वस्तू, चित्रकलेचे साहित्य आणि या साऱ्यांच्या मधोमध त्यांचा तो चित्रकलेचा बोर्ड! ज्यावर एक अर्धवट चित्र काढलेले होते. पेन्सिलने कुठल्याशा देखाव्याची प्राथमिक रचना केलेली.. मृत्यूपूर्वी एक-दोन दिवसच अगोदर समोरच्या खिडकीतून दिसणारे दृश्य चित्रित करण्याचे काम सुरू होते. पेन्सिलचे काम झाले, आऊटलाइन्सही झाली; आता फक्त रंग भरायचे बाकी होते.. पण ते भरण्यापूर्वीच मराठीप्रमाणेच हिंदी चित्रसृष्टीदेखील गाजविणारे मांडरेंनी १७ फेब्रुवारी २००१ ला इहलोकाचा निरोप घेतला. 

आता मराठी चित्रपटाने कात टाकली आहे. त्यात जुन्या चित्रपटातील कथांना आणि तशा कथानायकांना जागा नाही, प्रेक्षकांचीही अभिरुची बदलली आहे. असे असूनही चंद्रकांत - सुर्यकांत यांची कसर भरून काढणारे अभिनेते त्यांच्या नंतर रुपेरी पडद्यावर उदयास आले नाहीत हेही खरेच आहे. झी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' ह्या मराठी मालिकेतील कथेच्या पार्श्वभूमीमुळे व त्यातील कथानायकाचे चंद्रकांत मांडरे यांनी पूर्वी साकारलेल्या भूमिकांशी असणारे साम्य पाहून ह्या अस्सल प्रतिभावंत कलावंतावर चार शब्द लिहिण्याचा मोह आवरला नाही म्हणून हा पोस्टप्रपंच सुचला .... 


 - समीर गायकवाड.