Thursday, September 1, 2016

पोळा- मुक्या जीवाचे ऋण

पोळ्याचं आवतण बैलाना कालच दिलंय. कालच खांदमळणी अगदी दमात झालीय. पळसाच्या द्रोणात कढी घेऊन ती बैलाच्या खांदयावर लावलीय आणि हळद तेल-तुपाने त्यांचे दमलेले खांदे मस्त पैकी मळून झालेत. सगळ्यांची शिंगे साळून झाली आहेत. त्याला आता केशरी लाल हुंगुळ लावला की शिंगे चमकदार दिसतील अन बैल उठून दिसतील..आंबाडीचे सुत काढून तयार केलेली नवी वेसण दुरडीत तयार आहे. नवा कोरा पांढरा शुभ्र कासरा लावून लाल लोकरीचे गोंडे, नविन घुंगर माळा, कवड्यांचे हार, नविन रंगीबेरेंगी चित्रांच्या झुली दुपारी यांच्या अंगावर चढतील. पैंजण, पट्टे,झेंडूचे हार अशी सामग्री तयार आहे.


सर्वांगाला गेरूचे लाल पिवळे निळे हिरवे ठिपके देऊन झाले की मस्त पिवळ्या धमक रंगातले बैल आणि त्यावरचे ठिपके अगदी झकास दिसतात. हुंगुळ लावलेल्या शिंगांना चमकीच्या कागदाचे बेगड चिटकवायचे, डोक्याला बाशिंग बाधून माठोटे टांगले की शिंगे कशी उठून दिसतात !! शिंगाळी असतील तर ती आज बदलून टाकायची नाही तर काढून टाकायची. त्यातल्याच एकाच्या पायात पूर्वी तोडे देखील असायचे आता नाहीत.त्याचे जागी कटदोरयाचे मऊ दोरे बांधतोत. पायली भर डाळ गुळ शिजायला टाकला आहे. मस्त घमघमत्या वासाची पुरणपोळी आणि जोडीला गुळवणी !

बैलाला ढूसण्या देणारी तारी आणि अंगावर उठणारा चाबूक दोन तीन दिवस तरी सुट्टीवर जाणार. वर्षभर नव्हे तर आयुष्यभर आपल्या साठी राबणारे बैल हेच आपले खरे पोशिंदे होत. पोळयाच्या दिवशी बैल हा जणू 'नवरदेव' असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो. बैलाने हा मानाचा घास खाल्ल्याशिवाय बळीराजा देखील जेवत नाही.

पूर्वी पाऊसपाणी ठीकठाक वकुबावर अन वक्तशीर असायचं, त्यामुळे पोळा कुठल्या का महिन्यात येईना शेत शिवार सगळं कस हिरवंगार असायचं.सगळ्याकड बैलजोडी ही असायचीच आता चित्र बदललयं, निम्मी अधिक शेतीची कामं यांत्रिक पद्धतीने होतात आणि चारा पाणी वेळेवर मिळत नाही वर त्याचे दामही वाढलेले त्यामुळे लोकं बैल एकमेकाच वापरतात.पावसाळ्यात रान चिखलानं गच्च भरलं अन ट्रेक्टरची चाके रुतून बसू लागली की मग मात्र सगळ्या गावाला बैलांची आठवण जरा जास्त येऊ लागते.

'पोळ' म्हणून एखादा बैल गावावर सोडून देण्याची प्रथा जुन्या काळात होती आता शेतकरयाकडेच बैल नाहीत तर गावावर बैल सोडणार कोठून ? गावातल्या गायींना गाभण करण्यासाठी त्याला सोडीत. या बैलाला काही ठिकाणी पोळ म्हणतात तर काही ठिकाणी 'पोळ्याचा वळू' तर काही गावात या बैलालाच पोळा म्हणतात. या बैलाला गावावर सोडण्यापूर्वी त्याला धुऊन, रंगवून सजवीत आणि त्याच्यापुढे तशाच सजवलेल्या चार गाई आणून उभ्या करीत. मग त्याच्या कानात 'तू वासरांचा पिता` अशा अर्थाचा मंत्र म्हणत. 'हा तुमचा पती आहे.` अशा अर्थाचा मंत्र गायींच्या कानात म्हणत. पोळा म्हणून सोडायच्या बैलाचे वषिंड मोठे, शेपटी मऊ व लांब केसांची, गाल कोवळे, पृष्ठभाग रूंद, डोळे पाणीदार, शिंगे टोकेदार, बांधा डौलदार, आणि मोठ्याने डिरक्या देणारा बैलच निवडला जायचा. असा बैल आढळला नाही तर त्या वर्षी चा पोळ सोडायचा कार्यक्रम रद्द व्हायचा.
जुन्या काळी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असायचा आता तसं नाहीये. शेतकरीच नडला गेला आहे तरीही बैलाचे आपल्यावरचे ऋण व्यक्त करण्यासाठी कसं का होईना तो हा सण साजरा करतोच.

या सणासाठी आपला बैल उठुन दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार आधी शहरातून आणायचे आता तालुक्याचा गावावरून नाहीतर गावात देखील आता या वस्तू कमी अधिक प्रमाणात मिळतात तिथे ते खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या आखरीजवळ (वेस) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून गावकरीच बांधतात.दिवस डोक्यावर आल्यावर त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.काही गावांमध्ये हा कार्यक्रम दिवस उतरतीला लागल्यावर होतो. या वेळेस झडत्या (पोळ्याची गीते) म्हणली जात असत, आता जुनी माणसं कुणी उरली नाहीत त्यामुळे हा साग्रसंगीत होणारा कार्यक्रम बदलला गेला आहे आणि त्याला छोटेखानी स्वरूप आले आहे. गावाचे म्होरके किंवा मानकरी हे तोरण तोडायचे आणि पोळा फुटल्याचे गावात आपसूक जाहीर व्हायचे.त्याला दवंडीची गरज नसे. आता प्रत्येक आळीला पुढारी झाल्याने या तोरणावरुन वाद होऊ लागल्याने ही पद्धतच बंद पडली आहे.एका अर्थाने बरेच आहे, वादविवाद होण्यासाठी काही गोष्टी टाळलेल्या बरया. नंतर तिथे आणलेले बैल मारुतीच्या देवळासमोर आणले जातात. मग त्यांना घरी नेउन ओवाळण्यात येते.बैल नेणार्‍यास पूर्वी बोजारा (खुषीची रक्कम ) देण्यात येत असे. आता सगळा संकटांचा धुरळा उडाला आहे. कोण कुणाला बोजारा देणार ?

फक्त आजच्या दिवशी विश्रांती दिली जाणारया या बैलांनाही मन असते, त्याचे सुद्धा काळीज असते. तो सुद्धा हितगुज करतो, फक्त त्याची बोली आपल्याला कळायला पाहिजे. काल मी बळी अण्णाना भाकड बैलांबाद्द्ल बोलताना शहरात बैल कत्तलखान्याकडे न्यायला आता काटेकोर बंदी घातलीय आणि शहरातले लोक यावर फार तावातावाने बोलतात असं सांगताच त्यांचा पारा एकदम चढला. ते म्हणाले, "ग्यान गेलेले आहेत ते ! आपल्या आई बापांशी नीट बोलत नाहीत, त्यांच्या पायापुढं वाकत नाहीत. ही शाणी गाबडी लगीन लावून झालं म्होतूर झाला की आई बापापासून वायलं राहत्येत आन मंग त्येस्नी आश्रम दाखव्त्येत. एकेकाला चाबकाच्या वादीने अंगभर फोडून काढला न मग कळंल. आमाला शाणपणा शिक्व्त्येत हुकलेले..पहिले आप्ले आईबा सांभाळा म्हणाव मग तोंड इचका म्हणाव .........! "त्यांच्या या फटक्यापुढे बोलण्याची माझी टाप नव्हती...
असा हा सण अन अशी ही माणसं.. पण हा सण केला नाही तर आपण कृतघ्न असल्याची टाचणी जीवाला लागून राहते. पोळा केला की मुक्या जनावराच्या पिळवणूकीची थोडी का होईना जाण राखल्यासारखे वाटते. पोळा झाला की शेत शिवाराला उधाण येते अन चराचर प्रसन्न होऊन जाते. श्रावणाचे गारुड संपून गेलेले असते अन पिकपाणी उफाणून येण्याची सुरुवात झालेली असते, माणसाला आपल्या खरया दौलतीची जाणीव करून देणारा हा सण खरोखरच एक अपूर्वाई आहे..
आजच्या दिवशी सगळं शिवार, वाडे वस्त्या, कुळा कुळातले बापजादे सगळे मिळून या बळीराजाच्या पोशिंद्याच्या पायी नतमस्तक होऊन त्याची पूजा करते. पण हे केल्याने का त्याच्या ऋणाची उतराई थोडीच होणार आहे ? हे एक समर्पण आहे, हा एक ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न आहे ..

- समीर गायकवाड.