शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

रेड लाईट डायरीज - शिल्लक



गिलटाचे वाळे, चांदीचे पाणी दिलेलं काळपट पैंजण
आणि बेन्टेक्सचे खोटे दागिने.
छिद्रे पडलेल्या, झिरून गेलेल्या, फॉल निसटलेल्या
पदरावरची नक्षी उडालेल्या दोन साड्या.
डागांचे ओघळ दाटून घट्ट झालेले, रंग विटून गेलेले
नाडी तुटायच्या बेतात आलेले परकर.
समोरील बाजूची काही बटनं तुटलेले, काजी फाटून गेलेले,
वीण उसवलेले दोन ब्लाऊज.
एका कॅरीबॅगमधली कधी न घातलेली नवी कोरी पण
ठेवून ठेवून घडीवर झिरून गेलेली अनवट साडी.
गंधाचे जुने डाग असलेला, टवके उडालेला,
पिवळट पडलेला यल्लम्माचा फोटो.
कुठली तरी जुन्या जमान्यातली
बहुधा कुण्या मायलेकींची फिक्कट झालेली धुरकट तसबीर.
हातात बांधायचे काही लाल काळे दोरे, एक अंगारयाची पुडी.
स्पंज निघालेली बेरंग झालेली राखी.
ब्लाउजपीसच्या पुरचुंडीत बांधून ठेवलेल्या कचकडयाच्या हिरव्या बांगडया,
मणीमंगळसूत्र आणि न वापरलेली घडीव जोडवी.
काचेला तडा असलेली एक रिकामी फोटो फ्रेम,
बोरमाळीच्या सरीला असणारया लेसचे घट्ट झालेले लाल गोंडे.
कुठल्या तरी देवाची चेमटून गेलेली पितळेची मूर्ती.
वरचे अस्तर खरवडून गेलेली,
पैसे ठेवण्याची जुन्या पद्धतीची एक रिकामी छोटीशी पर्स.
फाटलेल्या जुन्या नोटांचे दुमडून गेलेले घड्या पडलेले तुकडे, काही जुनी नाणी.
मखमली कापडांचे काही वेडेवाकडे कापलेले तुकडे.
इतकं सारं सामावून घेणारी कडी कोयंडा मोडलेली, गंजून गेलेली, फुलांचे चित्र धुरकट झालेली पत्र्याची संदूक.
देशी दारूच्या गुत्त्यातलं देणं, चहा कँटीनची किरकोळ उसनवारी.
करपून गेलेल्या इच्छा, चक्काचूर झालेली स्वप्ने,
मरून गेलेल्या वासना, घुसमटुन गेलेलं मन,
खंगलेलं कलेवर.

बुधवारातली शांताबाई
वार्धक्याने पहिल्या पावसाच्या दमट हवेत
तडफडून मरून पडली तेंव्हा तिची शिल्लक इतकीच होती...

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा