Tuesday, October 25, 2016

जातीयतेविरूध्दचा दाहक संघर्ष विद्रोहात मांडणारी कवयित्री - हिरा बनसोडे


"देशातली ६० वर्षापूर्वीची जातीयता वेगळी होती, शंभर वर्षांपूर्वीची तर त्याहूनही वेगळी होती अन आताची जातीयता वेगळी आहे, ती कधी मुखवट्याआड आहे, तर कधी कळपाआड आहे तर तिला कधीकधी आरक्षणाचा चडफडाटी सूडाचा राग आहे. कुठल्या न कुठल्या पद्धतीने आजही लोक जातीयतावाद करताना आढळतात म्हणूनच हिरा बनसोडे म्हणतात तसे याची पाळेमुळे मनात खोल रुजलेली आहेत, काहीना हे विधान सार्वजनिकरीत्या पटत नाही, पण एकांतात विचार केला तर त्यानाही नक्की यातले मर्म कळते. स्वतः जगलेले दाहक अनुभव हिराताईनी मांडलेले असल्याने अन ते अजूनही कालबाह्य झालेले नसल्याने मला ते अधिक महत्वाचे अन तितकेच क्लेशदायक वाटतात...."


सखी,आज प्रथमच तु माझ्याकडे जेवायला आलीस,
नुसतीच आली नाहीस तर तुझी जात विसरून आलीस.
सहसा बायका परंपरेची विषमता विसरत नाहीत
परंतु तु आभाळाचे मन घेऊन आलीस,
माझ्या वीतभर झोपडीत,
वाटले, जातीयतेचा तु कंठच छेदला आहेस,
माणसाला दुभंगणारया दरया तु जोडत आली आहेस.
खरेच सखे, फार फार आनंदले मी,
शबरीच्या भोळ्या भक्तीनेच मी तुझे ताट सजविलं,
किती धन्य वाटलं मला !
पण ....पण ताट पाहताच तुझा चेहरा वेडावाकडा झाला,
कुत्सित हसून तु म्हणालीस,
" इश्श ! चटण्या, कोशिंबिरी अशा वाढतात का ?
अजून पान वाढायला तुला येत नाही
खरच, तुमची जात कधीच का सुधारणार नाही ?"
माझा जीव शरमून गेला ....
मघाशी आभाळाला टेकलेले माझे हात
खटकन कुणीतरी छाटल्यासारखे वाटले,
मी गप्प झाले ...
जेवण संपता संपता तु मला पुन्हा विचारलेस,
" हे गं काय ? मागच्या भातावर दही, ताक काहीच कसं नाही ?
बाई गं, त्याशिवाय आमचं नाही हो चालत.......?"
माझं उरलंसुरलं अवसानही गळालं
तुटलेल्या उल्केसारख,
मन खिन्न झालं,सुन्न झालं पण ....
पण दुसऱ्याच क्षणी मन पुन्हा उसळून आलं
पाण्यात दगड मारल्यावर जसा तळाचा गाळ वर येतो,
तसं सारं पुर्वायुष्य हिंदकळून समोर आलं,
" सखे, दही- ताकाच विचारतेस मला ! कसं सांगू गं तुला ?
अगं लहानपणी आम्हाला चहाला सुद्धा दुध मिळत नव्हतं,
तिथं कुठलं दही अन कुठलं ताक ?
लाकडाच्या वखारीतून आणलेल्या टोपलीभर भुश्श्यावर
माझी आई डोळ्यातला धूर सारीत स्वैपाक करायची
मक्याच्या भाकरीवर लसणाची चटणी असायची कधीमधी,
नाहीतर भाकरी कालवणाच्या पाण्यात चुरून खायचो आम्ही,
सखी, श्रीखंड हा शब्द आमच्या डिक्शनरीत नव्हता तेंव्हा,
लोणकढी तुपाचा सुगंध घेतला नव्हता कधी माझ्या नाकाने,
हलवा, बासुंदी चाखली नव्हती कधी या जिभेने,
सखी, तुझी परंपरा तु सोडली नाहीस,
तर तिची पाळेमुळे तुझ्या मनात रुजलेली आहेत
हेच त्रिवार सत्य आहे ....
मैत्रिणी, मागच्या भातावर दही नाही
म्हणून रागावू नको गं .....!
तुला वाढलेल्या ताटात आज पदार्थांचा क्रम चुकला
यात माझा काय दोष, हे मला सांगशील का ?
माझा काय दोष मला सांगशील का ?'
'फिर्याद' या काव्यसंग्रहातली कवयित्री हिराताई बनसोडे यांची ही कविता.

जेवायला आलेल्या सवर्ण मैत्रिणीच्या अंतरंगाचे व आपल्याच चालीरीती सर्वोत्कृष्ठ मानण्याच्या अहंकारी प्रवृत्तीवर साध्या तरल शब्दात पण अणकुचीदार असे प्रश्नचिन्ह हिराताईनी उभे केलेय.
खरे तर एक वरवर अगदी सामान्य वाटणारी एक घटना आहे ही, पण त्याला अनेक पदर आहेत. ज्याचे पुनर्विलोकन काही जाती अन विचारधारा अजूनही करायला तयार नाहीत. एकीकडे पराकोटीचे दैन्य व दारिद्र्य भोगून वंचितांच्या समाजगटाचे इतरांच्या खिजगणतीतही नसणारे काही बिंदू आपले सामाजिक, वैयक्तिक अन कौटुंबिक वर्तन जाणीवपुर्वक वेगळे करून, तथाकथित सुधारून वा अनुकरण करून जगण्याचा प्रयत्न करतात तेंव्हादेखील आसपासचे चोच्या मारूनच जातात.
आज देखील मोठ मोठ्या कार्यालयात असो वा सरकारी कचेरयात असो, जातीजातीचे अदृश्य टेबल तयार करून लोक जेवायला बसतात. काही अपवाद असतीलही, पण त्यांची एकुणाशी प्रमाण संख्या नगण्यच! असा अनुभव येतच असतो. देशातली ६० वर्षापूर्वीची जातीयता वेगळी होती, शंभर वर्षांपूर्वीची तर त्याहूनही वेगळी होती अन आताची जातीयता वेगळी आहे, ती कधी मुखवट्याआड आहे, तर कधी कळपाआड आहे तर तिला कधीकधी आरक्षणाचा चडफडाटी सूडाचा राग आहे. कुठल्या न कुठल्या पद्धतीने आजही लोक जातीयतावाद करताना आढळतात म्हणूनच हिरा बनसोडे म्हणतात तसे याची पाळेमुळे मनात खोल रुजलेली आहेत, काहीना हे विधान सार्वजनिकरीत्या पटत नाही, पण एकांतात विचार केला तर त्यानाही नक्की यातले मर्म कळते. स्वतः जगलेले दाहक अनुभव हिराताईनी मांडलेले असल्याने अन ते अजूनही कालबाह्य झालेले नसल्याने मला ते अधिक महत्वाचे अन तितकेच क्लेशदायक वाटतात.
फिर्याद ..
'कुणीच नसलेली मी कोण?
लोक हो! तुमच्या न्यायालयात
मी फिर्याद आणली आहे.
तुम्ही तरी मला न्याय द्याल का?
स्वत:च्याच घरात निर्वासित असलेली मी
उपेक्षेची जन्मठेप भोगतेय जन्मोजन्मी
माझा पिता, भाऊ, पती
या गोंडस, भारदस्त नात्यांच्या भाराखाली
माझं अस्तित्व दबलं जातंय,
दाबलं जातंय पावलापावलांवर
माझं स्वातंत्र्य, हक्क, मत
सारं सारं कसं परतंत्र झालंय
माझ्याच घरात, समाजात नि देशात
कुणीच नसलेली मी कोण?'

माणूस किती जरी पुढे गेला तरी त्याचे सामाजिक भान आणि वर्तन खरया अर्थाने आधुनिक झालेलेच नाही, त्याच्यातील जातीयता तशीच आहे, त्याबद्दलची मन व्यथित करून टाकणारी ही फिर्याद आहे. हिरा बनसोडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे या खेड़ेगावी म्युनिसिपल कामगाराच्या घरात झाला, अशा सामान्य कुटुंबात जन्मलेल्या एका जिद्दी मुलीची एक विद्रोही कवयित्री कशी झाली याचा प्रवास वेदनादायी आणि संघर्षमयही आहे. दलित कुटुंबात जन्माला आल्यामुळे त्यांना जन्मतःच अस्पृश्यतेचे लेबल चिटकले. या शब्दाने त्यांचा आयुष्यभर पाठलाग केला पण त्यांनी हार मानली नाही अन त्याच शब्दाचे अस्त्र करून त्याचे लेखणीत रुपांतर केले, आपल्या मनात साठलेल्या विद्रोही विचारांना त्यांनी कागदावर मोकळे केले. बालवयात त्यांना स्पृश्य –अस्पृश्यतेचे अर्थ खचितच कळले नसतील पण समज आल्यावर त्या शब्दाचे अन्वयार्थ कळले आणि त्याचे व्रण काळजावर (कायमचे) उमटले. या अवहेलनेचे दुःख त्यांना सलत राहिले. आजही हिराताईच्या काव्यातून हा सल तितक्याच टोकदारपणे जाणवतो.

हिरा बनसोडेंचे बालपण सामान्य अवस्थेत गेले असले तरी त्यांच्या आईवडिलांनी मेहनत करून परिस्थितीनुसार त्यांचे जमतील ते लाड केले. पण पुढे आणखी समस्या निर्माण होत गेल्या. वंशाला दिवा नाही म्हणून त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या बालवयावर आणि कोवळ्या मनावर या घटनेचादेखील आघात झाला. त्यामुळे त्यांचे आयुष्य आणखी वेदनादायी अन कष्टी झाले. हे कमी होते की काय म्हणून त्यांचे कमी वयात लग्न झाले. त्या नववीतच असतानाच त्यांचे लग्न झाले. त्यांना वाटले की आता आपले शिक्षण देखील खुंटणार पण तसे झाले नाही, लग्नामुळे त्यांच्या वडिलांकडून अर्धवट सोडले गेलेले त्यांचे शिक्षण त्यांच्या सास-यांनी पूर्ण केले. १९६२ ला त्यांचे एस.एस.सी पर्यंतचे शिक्षण झाले. हिराताईंच्या यजमानांचे नाव गुलाबराव बनसोडे, त्यांनीही आपल्या पत्नीच्या शिक्षणास नेहमी प्रोत्साहन दिले. हा कालखंड आणि तत्कालीन कौटुंबिक - सामाजिक रिती रिवाज पाहता नवविवाहित तरुणीचे म्हणजे हिरा बनसोडे यांचे शिक्षण पूर्ण करून देणारे बनसोडे कुटुंबीय खरया अर्थाने क्रांतिकारीच म्हणायला पाहिजेत. अगदी मायेने त्यांच्या सासरच्या लोकांनी आपल्या घरच्या सुनेच्या विचारांना आस्थेची फुंकर घातली अन हिरा बनसोडे यांच्या वैचारिक पायाभरणीस इथे हत्तीचे बळ मिळाले. आपली सून शिकावी, मोठी विदुषी व्हावी, तिने आपले विचार मांडावेत, तिनं खूप लिहावं म्हणून ते सतत प्रयत्नशील राहिले. त्यामुळेच हिराताईंच्या आयुष्यात सास-यांचे स्थान फार मोलाचे आहे. आपल्या सासऱ्यांनी आपल्यावर केलेल्या ह्या ऋणाची त्यांना सखोल जाणीव आहे, किंबहुना यामुळेच त्यांची कृतज्ञता म्हणून ‘फिर्याद’ कवितासंग्रह त्यांच्या पश्चात त्यांना अर्पण केला आहे,अर्पणपत्रिकेत हिराताई त्यांच्याबद्दल लिहितात की, ‘अवघड वाटेवरील काटेकुटे वेचून ज्यांनी माझ्या प्रगतीचा मार्ग सुलभ केला त्या माझ्या मामंजींना... माझ्या कवितेची विनम्र फुले.’
हिरा बनसोडे यांचे ‘पौर्णिमा’, ‘फिर्याद’, ‘फिनिक्स’ हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. आंबेडकरी चळवळीतील आणि विद्रोही साहित्यातील स्त्री साहित्यिकांमध्ये त्यांचा विशेष उल्लेख होतो.'अस्मितादर्श' या नियतकालिकात कविता लिहिणारयांमध्येही हिरा बनसोडे अग्रस्थानी आहेत. ‘पौर्णिमा’मधील कविता म्हणजे तारुण्यसुलभ हळव्या भावभावनांचा कल्लोळ. कधी प्रेमाची नजाकत, विरहाची अवीट हुरहूर, तर कधी जीव गुदमरून टाकणा-या प्राणांतिक वेदना. भावविभोर अशा या उत्कट भावना मृगजळाचा भाववेल्हाळपणा घेऊन त्यात वाचायला मिळतात; पण केवळ सौंदर्यनिर्मिती आणि रंजकत्व निर्माण करणे हे साहित्याचे उद्दिष्ट नसते; तर समाजाच्या वास्तवाचे भान ठेवून मानवी मनाचे, वृत्ती-प्रवृत्तीचे, न्याय-अन्यायाचे विविधांगी दर्शन घडवणे ही साहित्यनिर्मितीची भूमिका असते. रूढ चौकटीत राहून हे करता येत नाही. तेव्हा त्याची मोडतोड होते, दृढ ठोकताळे बाजूला सरकवावे लागतात. तेव्हाच कुठे ख-या अर्थाने स्वतंत्र शैली निर्माण होते. पुढे समज-उमज वाढल्यावर प्रगल्भ जाणिवांची परिपक्व कविता हिराताईंनी लिहिली आणि त्यांची स्वतंत्र शैली त्यांना निर्माण करता आली.

मराठी कवितेत स्त्री विषयक आणि स्त्रीच्या जाणीवाविषयक विविध कवयित्रींनी विपुल लेखन केलेले आहे. पण या कवितांमध्ये विषय,आशय आणि मांडणी यांचा मोठा फरक पहायला मिळतो. स्त्रियांची दुःखे वरवर जरी समान वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र तसे नाही. सर्वसामान्य स्त्रिया आणि दलित स्त्रिया यांच्या दुःखाची वीण पूर्णतः वेगळी आहे. दलितांमध्येही भटक्या विमुक्तांचे आयुष्य जगणारया आणि पालावरचे जीवन जगणारया स्त्रियांचे जीवन त्याहून दाहक अन दैन्यावस्थेची परिसीमा गाठणारे असे आहे. या स्त्रियांचे जीवन जन्मापासून ते अंतापर्यंत अपरिमित कष्ट आणि दुःख यांचा चढता आलेख आहे. स्त्रीजीवनाची सर्वात जास्त अवहेलना आणि विवंचना या स्त्रियांत जास्त अनुभवास येतो, विशेष म्हणजे या वर्गातील स्त्रिया आपल्या मनाचा आणि देहाचा कोंडमारा कधीच आणि कोणाजवळही मोकळा करू शकल्या नाहीत ही केव्हढी मोठी शोकांतिका म्हणावी लागेल !

अज्ञान, दारिद्र्य, दैन्य, लाचारी, व्यसनाधीनता, सतत आरोपीच्या पिंज-यात उभ्या करणा-या शंकेखोर नजरा आणि हे सगळं झेलताना मेटाकुटीला आलेली, थकून गेलेली स्त्री. स्त्रीच्या दुःखाचे हे बंध आपल्या देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात जसे होते तसेच ते स्वातंत्र्योत्तर काळातही राहिले. हे शल्य हिरा बनसोडेंना सतत रुतत राहिले, याच्या जाणीवा त्यांना अस्वस्थ करत राहिल्या म्हणून त्या त्यांच्या काव्यातून प्रकट होत राहिल्या. आपल्याला ज्या संस्कृतीने हा शाप दिला तिच्याविषयीच्या त्यांच्या आक्रोशाच्या वेदना काटेरी आशयात व्यक्त होतात. त्या लिहितात,-
'या देशाच्या महान संस्कृती
तुला कोपरापासून नमस्कार
अनाथपणाच्या आर्त दु:खात
कधी झाली नाहीस तू आमची मायमावली
ग्रीष्माच्या उन्हात पोळताना
कर्ण स्वरूपात तू आमचे मातृत्वच नाकारीत आलीस....'

साठोत्तरच्या कालखंडात मराठी साहित्यात दलित काव्याची बीजे जोमाने पेरली गेली अन त्याची धगधगीत वज्रफुले सत्तरच्या पुढच्या कालखंडात अगदी बहरात आली. नामदेव ढसाळ, केशव मेश्राम,उर्मिला पवार, यशवंत मनोहर, नारायण सुर्वे, दया पवार अशी कसदार लेखकांची एक फळीच तेंव्हा कार्यरत होती. याच कालखंडात हिरा बनसोडेना दलित काव्याशिवाय स्वतःच्या स्त्रीत्वाचाही बोध घ्यावासा वाटला, ते करताना त्या या चळवळीत आपसूकच सामील झाल्या अन त्यांच्या कवितेत समतेचा, स्वातंत्र्याचा आशय प्रसवू लागला. समतेचा विचार मांडताना त्यांनी चळवळीत आलेली दुही आणि चळवळीला असणारा खंबीर व सर्वमान्य नेतृत्वाचा अभाव या खटकणारया बाबींबरदेखील भाष्य केले. दिशाहीन पद्धतीने काम करून काहीच साध्य होणार नाही याची परखड जाणीव असणारया हिरा बनसोडे त्याविषयी अगदी मार्मिकतेने लिहितात,-
'मित्रांनो, अंगणात शालवृक्ष लावल्याने
सिद्धार्थ जन्म घेत नसतो
त्यासाठी पेरावी लागतात
शांतीची मंगल बीजे
अरे, त्या महात्म्यांनी अन्यायाशी झगडून
नि:स्वार्थतेने लावलेली ही समतेची पवित्र झाडं
कुणी त्याचे एकेक सुवर्णपान
झोळीत दडवून नेल्याने
फुले-आंबेडकर आणि तथागत
होता येत नाही...''

भरकटत चाललेल्या समतेच्या चळवळीबद्दलची त्यांची आपुलकी यातून दिसते अन त्याविषयीचा त्यांचा त्रागाही इथे जाणवतो. पण त्यांच्या जाणीवा इथेच मर्यादित होत नाहीत, त्या अधिक प्रगल्भ होऊन समाजाकडूनही काही अपेक्षा व्यक्त करतात. समाजाकडून असणाऱ्या आपल्या अपेक्षा मात्र त्या अगदी हळुवार शब्दातून मांडताना हलकेच सर्वांच्या मनाला साद घालतात. हिरा बनसोडे मागील चारेक दशकापासून आंबेडकरी चळवळीचे एक मुख्य नाव बनून राहिल्या आहेत अन त्यांचे लेखनही अविरत चालू आहे. ‘जिथे-जिथे सांडलेत तुझ्या रक्ताचे थेंब तिथल्या मंगल भूमीत मी लावीन एकेक कविता,’ असं लिहिता लिहिता त्या आपले विचार समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावेत म्हणून विविध मंचावरून आपले विचार मांडताना समाजाला नेहमी आवाहन करत असतात. अस्मितादर्श मधील त्यांचे लिखाण याचं जितेजागते प्रतिक म्हणावे लागेल. हिराताई कवितांचा एल्गार जितक्या समर्थपणे करतात तितक्याच ताकदीने त्या आपल्या कविता गातातही !  हळव्या मनाच्या आणि गोड गळ्याच्या प्रेमळ हिराताई सर्वांच्या भल्यासाठी अंत:करणातून आपलं म्हणणं मांडतात.   ‘सगळ्यांनाच दु:ख होतं,आहे नि राहणार. त्याला घाबरून कुणी जगणं थोडंच सोडून देतं?याचा बोध घेऊन स्त्रियांनीही त्याला न घाबरता सामोरं जाऊन ते पचवायला शिकलं पाहिजे. नव्या जाणिवा घेऊन समृद्ध जीवनासाठी सज्ज व्हायला हवं,’ अशी कसदार आशा व्यक्त करतानाच त्या आणखी विशाल दृष्टीकोन समोर ठेवतात.
'या मातीच्या निष्प्राण मूर्तीतून
चैतन्याने सळसळणारा
जिवंत माणसाचा जन्म मला हवा आहे.
माझ्या पुनरुज्जीवनासाठी बंधूंनो,
मला शब्द हवा आहे
पण शब्द देताना सौदा करू नका
उजाड वाळवंट झालेल्या या पराधीन जन्माला
फुलबाग बनविणारा जादूचा मंत्र तुम्ही तरी द्याल का?'
नवा मंत्र घेऊन आयुष्याची फुलबाग बहरण्यासाठी समाजाच्या अंधारून आलेल्या हृदयात आशेची दिवेलागण करूया!

१९६५ साली हिराताईना रेल्वेत नोकरी लागली. रेल्वेत असतानाच त्या कविता करू लागल्या. बालवयात त्यांना गायची आवड होती. आणि मग कंठात गाणे आणि लेखनित कविता अशी त्यांची  आणि कवितेची गळाभेट झाली. त्यांच्या श्वासात कविता कायम रुतून राहिली. कविता त्यांच्यात  कधी विरघळली हे त्यांनाच कळले नाही. त्यांच्या 'फिर्याद' या कविता संग्रहाचा मराठवाड़ा विद्यापीठातील बी ऐ च्या अभ्यासक्रमात सहभाग झाला. २०११ पासून तो एम् ए. च्या अभ्यासक्रमातही आहे. त्यांच्या सुरुवातीच्या कवितात प्रेम,निसर्ग यांची वर्णन होती. पोर्णिमेची चांदण पानापानात झिरपायची. काव्यफुलांचा बहार असायचा. ती नजाकत अलगच असायची...त्या  त्यात रमूनदेखील जायच्या असं प्रांजळपणे त्या कबूलही करतात.रेलप्रभा साहित्य मंडळाच्या याच नावाच्या मासिकात त्यांनी सुरुवातीला लेखन केल्याचा त्यांना आजही सार्थ अभिमान आहे आणि हे मासिक अजूनही सुरु असल्याचे त्यांना अप्रूप आहे. सरतेशेवटी एक उल्लेख करावासा वाटतो तो हिराताईंच्याच शब्दात देत आहे, "माझ्या जन्माच्या वेळेस घरी साखर वाटली नाही की नावाच्या घुगरया वाटल्या की नाही हे मला माहीत नाही कारण मी मुलगी झाली हे वडलांना कळवल तेव्हा त्यांनी पत्रच फाडून टाकली.तिथुनच स्त्रीच्या बाईपनाची वेदना वाट्याला आली."

आंबेडकरी चळवळीचा चेहरा बनून राहिलेल्या या ज्येष्ठ कवयित्री रमाई फाऊंडेशन व रमाई मासिक औरंगाबादच्या वतीने झालेल्या दुसऱ्या रमाई चळवळीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. तसेच २०१४ सालाचा दया पवार स्मृती पुरस्कारही हिराताई बनसोडे यांना मिळाला होता. तसेच त्यांच्या 'फिनिक्स' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसूत पुरस्कार प्राप्त झाला होता. डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन कॅनडा संस्थेचा सुलोचनाबाई डोंगरे पुरस्कार, अस्मितादर्शचा अहिल्याबाई पुरस्कार, ललित कला केन्द्रचा पुरस्कार आणि दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचा पुरस्कार,संबोधी प्रतिष्ठानचा पुरस्कार आदि पुरस्कारही हिरा बनसोडे यांना मिळाले आहेत.

अशा संघर्षमय जीवनातून पुढे आलेल्या अन आपल्या धारदार लेखणीने व आपल्या बाणेदार शैलीने आपल्या अस्तित्वाची मराठी साहित्यास व समाजास दखल घ्यायला भाग पाडणारया या लढाऊ कवयित्रीच्या लेखणीस नमन..

- समीर गायकवाड


No comments:

Post a Comment