रविवार, ८ एप्रिल, २०१८

माझा राजकीय दृष्टीकोन



माझा राजकीय दृष्टीकोन जाणून घेणाऱ्यांसाठी...

"माझे म्हणाल तर मी सदसदविवेकबुद्धीला अधिक प्राधान्य देतो न की धर्मजाती द्वेष आधारित राजकीय मूल्यांना ! कॉंग्रेस ही आपल्या विचारांशी सामावून घेणाऱ्या लोकांचे आर्थिक लाभार्थीकरण करणारी राजकीय विचार प्रणाली आहे जिने या करिता भूतकाळात मुस्लीम तुष्टीकरण केले होते.... तर भाजप ही मुसलमान द्वेषी उजवी विचार प्रणाली आहे जी आपल्या समर्थक व्यक्तींना लाभार्थी न बनवता आपल्याला पोषक संघटना आणि व्यक्तीविशेष यांचे सबलीकरण करते आहे ... भारतीय राजकारणात या दोन मुख्य विचारधारा आहेत... कम्युनिस्ट म्हणजे या दोन्हींची खिचडी आहे ... अन्य छोटे छोटे पक्ष याच झाडांची वेगवेगळी कलमे आहेत .... सबब सदसदविवेक बुद्धीने काम करणे मला क्रमप्राप्त वाटते.. "

'विकास' आणि 'प्रगती' हे दाखवायचे दात असतात खायचे प्रत्येकाचे दात वेगवेगळे असतात. तरीही राजकीय पक्षांनी फेकलेल्या बाह्य आवरणाच्या जाळ्यात लोक अलगद अडकत जातात, नंतर त्यात जाम गुरफटून जातात आणि आपली स्वतःची एक स्वतंत्र भूमिका असू शकते याचाही त्यांना विसर पडतो. किंबहुना मतदान केल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल आपल्याला वैरभाव वा मित्रभाव न राहता तटस्थभाव अंगीकारता आला पाहिजे याचा लोकांना विसर पडत चालला आहे, यामुळेच गल्ली ते दिल्ली लोक राजकीय अभिनिवेशात जगत राहतात. आपलं रोजचं सामान्य जीवन आणि आपल्या मर्यादा याचा विसर पडून राजकारण्यांनी दिलेल्या अफूच्या गोळीवर आपली उर्जा खर्चत राहतात. असो ज्याची त्याची मर्जी आणि ज्याचे त्याचे विचार ...

आपल्याला नेमकं काय हवं आहे आणि का हवं आहे या भूमिका जितक्या दृढ होत जातात तितका आपला दृष्टीकोन त्या दिशेने ठाम होत जातो. आपली कौटुंबिक व सामाजिक जडण घडण आणि सभोवतालचे वातावारण यांचा वाटा यात मोलाचा ठरतो...

जगात मूर्ख व्यक्ती आणि मृत व्यक्ती हे दोनच घटक असे असतात की ज्यांचे विचार कायम एकाच गोष्टीला गोचीड चिटकल्यागत चिटकून असतात. माझे पूर्वीचे विचार आताच्या विचारांच्या विरुद्ध टोकाचे होते त्यामुळे त्यातला फोलपणा आणि चांगुलपणा दोन्हीही ठाऊक आहेत. त्या मानाने आताचे विचार अधिक सार्थ वाटताहेत. पण कालानुरूप त्यात अधिक स्पष्टता आणि प्रगल्भता यावी अशी अपेक्षा करतो..

बाकी, माझे मत मी इतरांवर लादत नाही आणि इतरांनीही आपली मते माझ्यावर लादू नयेत...

व्यक्तीचे राजकीय विचार कसे आहेत या पेक्षा त्याचे सामाजिक वर्तन कसे आहे याला आपण अधिक महत्व दिले तर सोशल मिडियावरील अनेक अपप्रवृत्तींना सत्वर आळा बसेल आणि अनेक नाती सुरळीत होतील...

काही लोकांना भारी खोडी असतात. एखाद्या व्यक्तीस न ओळखता, त्याच्याशी कधी प्रत्यक्ष गाठ भेट न घेता एखाद्या अर्ध्या तुटक्या दुव्याच्या आधारे ते सुतावरून स्वर्ग गाठण्याचा दुबळा प्रयत्न करत असतात. जेणेकरून एखादा ठप्पा मारून संबंधितास सहज बदनाम करणं त्यांना शक्य व्हावं. आपण ज्यांच्या बद्दल मत बनवत असतो त्यांना आपण किती ओळखतो, किंवा त्यांची किती माहिती आपल्याकडे आहे याचा विचार देखील आजकाल लोकांना करावासा वाटत नाही हे दुर्दैवी आहे.

काल एका सन्माननीय व्यक्तींनी शेरा मारला की बापू तुमची एका xyz पक्षासोबत बरीच जवळीक आहे. त्याच्या आधारासाठी त्या पक्षाच्या प्रवक्त्यांना मी लिहिलेल्या पत्राचा संदर्भ त्यांनी वापरला होता.(हा संदर्भ मीच खुला केला असल्याने तो त्यांना कळाला ही बाब अलाहीदा) केवळ एका पत्राने कुणाशी कशी काय जवळीक असू शकते हे मला तरी उमगले नाही. त्या xyz पक्षाच्या विचारधारेशी आपलं कधी जुळलेच नाही तरीही यांनी आपला होरा बांधला. तसा तर पत्रव्यवहार तर मी सर्व सक्रीय पक्षांच्या अनेक नेत्या प्रवक्त्यांशी केलेला आहे. मग मी सर्व पक्षांचा समर्थक होऊ शकतो का ?

काल भिडे गुरुजींच्या पोस्टवर हा शेरा मारला होता, त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की सोलापुरात काल ज्यांनी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ मोर्चाचे मुख्य आयोजन केले होते ते श्री.पुरुषोत्तम कारकल माझे जवळचे स्नेही आहेत. अगदी कालपर्यंत त्यांचे माझे व्हॉटसएपवर शेअरिंग आहे. सोलापूरचे बजरंगदलाचे प्रमुख डॉ. उदय वैद्य हे माझे घनिष्ट मित्र आहेत, शेजारी आहेत. सर्वच राजकीय पक्षात माझे मित्र आहेत, अगदी एमआयएमचे श्री.तौफिक शेख हे देखील स्नेही आहेत. राज्य पातळीवरील विविध पक्षांच्या नेत्यांशी संपर्क आहे. मग मी या सर्वांचा समर्थक होतो का ? नाही होत.

'हिंदुत्वातलं तुम्हाला काय कळतं ?' किंवा 'तुम्ही पक्के हिंदूद्वेष्टे आहात' अशी शेरेबाजी माझ्याविरुद्ध सहज करता येते पण माझा पूर्वेतिहास काय सांगतो हे मला चांगले ठाऊक आहे आणि ज्यांना माझा स्वभाव आणि पार्श्वभूमी माहित आहे ते अशी मल्लीनाथी करत नाहीत.

या शेरेबाजीला उत्तर दिले नाही तर आपल्यावरील शिक्का अधिक गडद होऊ शकतो म्हणून हा उपद्व्याप. माझी वैचारिक आणि राजकीय पार्श्वभूमी एके काळी इतकी कट्टर हिंदुत्ववादी होती की त्यातून बाहेर पडायला अनेक वर्षे लागलीत. याचा अर्थ असा नव्हे की आपण एकीकडून बाहेर पडलो की कुठल्या तरी दावणीला बांधून घेतलंच पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाशी वैरही नाही आणि मैत्रीही नाही हा माझा सध्याचा दृष्टीकोन. मात्र जे लोक जात धर्माचे धृवीकरण करून आपली पोळी भाजतात त्यांना आणि त्यांच्या विचारसरणीला माझा विरोध नक्कीच राहिल. धार्मिक सामाजिक विचारसरणीचा लंबक आता या टोकावरून त्या टोकावर गेला आहे आणि त्याचे मला समाधान आहे...

मी जन्माने हिंदू आहे यात माझे काही कर्तृत्व असण्याचा प्रश्नच नाही. ती बाय बर्थ मिळालेली एक गौण बाब आहे, त्याचा वृथा अहं मी का बाळगावा ? ज्यांना बाळगायचा असेल त्यांना बाळगावा, माझा त्यांना विरोध असायचे काही कारण नाही. मी आधी एक भारतीय आहे आणि साऱ्या जात धर्माचे लोक मला प्रिय आहेत. आपले विचार सर्वांना पटावेत असं म्हणणारा व्यक्ती हेकेखोर असतो. माझाही कुणाला आग्रह नाही. विचार पटले, बरे वाटले तर व्यक्त होऊ शकता. नाही पटले तर नाकारू शकता. याकरिता कोणावर जबरदस्ती कधीच नाही. आपल्या लटक्या विचारांचे समर्थन करण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी पुरेशी माहिती न घेता हवेत तीर मारणे हा आत्मचिंतनाचा मुद्दा आहे. सोशल मिडिया नीट वापरावा, माहिती घेऊन बोलावे, उचलली जीभ टाळ्याला असे करू नये. उगाच गायीचे वासरू म्हशीला लावण्याच्या नादात कधी कधी तोंडावर पडावं लागतं.
अभ्यासुनी प्रकटावे हे खरे ...

बहुतांश लोकांना आपल्याला आवडेल असंच वाचायला वा ऐकायला आवडत असावे. आपल्याला न पटणारी पोस्ट समोर आली की त्यांच्या तथाकथित संस्कारांची वस्त्रे गळून पडतात अन समोर येते दुसरेच रूप !

मी कोणत्याही राजकीय पक्षाचा समर्थक वा प्रसारक नाही...पण कॉंग्रेसवाल्यांना वाटते हा भाजपाई आहे तर भाजपावाले कोंग्रेसी समजतात...म्हणजेच माझे संतुलन योग्य आहे ...
कोणाला काय वाटायचे ते वाटो... जे जे चुकीचे वाटते त्यावर योग्य ते मुद्दे देऊन लिहिलेच पाहिजे... अमक्याला काय वाटेल तमका नाराज होईल असे वाटून न लिहिणारा आपलीच मुस्कटदाबी करत असतो ...

राजकारणाबद्दल माझे वैयक्तिक मत असे आहे की, मतदानापुरता आपला राजकीय पक्षाशी संबंध असावा, सामान्य माणूस आणि राजकीय कार्यकर्ता यातील सीमा आपण ओळखली पाहिजे...राजकीय पक्षाशी असणारे लागेबांधे आपली भूमिका तटस्थ व निकोप पारदर्शी होऊ देत नाहीत. त्यामुळे आपण कोणा एकाची कड घेत राहतो. मग मुद्दा चुकीचा असला तरी आपण आपल्या नकळत समर्थन देत राहतो. याकरताच सर्व राजकीय पक्ष लोकांना राजकारणात सक्रीय व्हा असं सुचवत राहतात...असो ..

राजकारणाचा आपल्या देशातील दुसरा तोटा असा आहे की माणसं जातधर्मात जास्त गुंतून पडतात.पूर्वी आम्ही फक्त मतदानाच्या वेळेस उमेदवारांची धर्म-जात पाहायचो. आता आम्ही लेखकांची, खेळाडूंची, अभिनेत्यांची, शेजारयांची, ग्रुपमधल्या माणसांची, सोसायटीतल्या माणसांची, शास्त्रज्ञांचीच नव्हे तर राष्ट्रपती अन उपराष्ट्रपतींची जात-धर्म आता अगदी चिकित्सक पद्धतीने पाहू लागलो आहोत अन त्याबरहुकुम आम्ही त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा अन त्यांच्यावरील आरोपांची तीर कमान तयार ठेऊ लागलो आहोत. एकविसाव्या शतकात ही एव्हढी मोठी वैचारिक गगनभरारी नव्हे तर काय ? आता आम्ही व्होटसएपमधून अजान ऐकतो अन फेसबुकवर आरती करतो ! तंत्रज्ञानाच्या अशा विधायक उपयोगासाठी जी प्रगल्भता लागते ती असल्याशिवाय हे आम्ही करू शकू का ? असे अनेक पुरावे देवूनदेखील तुमच्या मेंदूचे भेजाफ्राय होणार नाही कारण तो देखील आता मॉडीफाईड प्रगल्भ झाला आहे. खरे तर आता शाळांमध्येदेखील हिंदूंसाठी वेगळी अन मुसलमानांसाठी वेगळी प्रतिज्ञा असायला पाहिजे, जसे की ‘हिंदुस्थान माझा देश आहे आणि सारे हिंदू माझे बांधव असतील....’ वगैरे हिंदू मुलांसाठी आणि भारत माझा देश आहे, आणि सारे मुस्लीम माझे बांधव असतील....’ इत्यादी. ही प्रतिज्ञा मुसलमान मुलांसाठी असावी. 'तुमचा दाऊद तर आमचा गवळी' असे सांगून आम्ही गुन्हेगारांचे धर्म तपासून त्याना पावन करायची मोहीम आखली आहे ती अधिक जोमाने पुढे नेण्यास या प्रगल्भतेने हातभार लागेल..

जातधर्म या विषयावर जर माझे वैयक्तिक मत मांडायचे झाले तर सर्वप्रथम मी एक भारतीय आहे त्यानंतर जन्माने प्राप्त धर्माने हिंदू आहे. मला त्यातल्या ज्या संस्कारक्षम,सजग आणि सहृदयी गोष्टी आहेत त्या पटतात न पटणारया गोष्टीवर सडकून टीका करतो. सर्व जाती धर्माचे मला मित्र आहेत, त्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. आपल्याला जन्मजात चिटकलेल्या जातधर्माच्या दोषवैगुण्यावर जर आपण टिका-टिप्पणी करून त्यातील विषमतेवर बोट ठेवत असू तरच आपल्याला इतरांच्या जाती -धर्मा मधील कथित दोष - वैगुण्य यावर बोलण्याचा अधिकार आहे.

ज्या गोष्टी स्वीकारार्ह वाटतात त्याच स्वीकाराव्यात, ज्या पटत नाहीत त्या गोष्टी टाळाव्यात. पण आपले मत कोणावर लादू नये, आपले मत ऐकलेच पाहिजे आणि त्यानुसार इतरांचे मत असावे असा आग्रहही असू नये. पण त्यांचबरोबर आपल्याला वाटणारे विचार आपण मांडलेही पाहिजेत.त्यांचबरोबर सर्वच जातीधर्मात, पक्षात काही तरी वैगुण्य असते पण अमुक एकच जात वा पक्ष वाईट असे काही नसते याचेही भान आपल्याला असले पाहिजे.

व्यक्ती म्हणाल तर कोणताच वाईट नसतो ; त्याचे विचार वाईट असतात पण ते बदलताही येऊ शकतात.पण त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन आणि मनापासून केलेले योग्य प्रयत्न गरजेचे आहेत. आपले ज्या व्यक्तीसोबत वा समूहासोबत पटत नाही, त्याच्या जातधर्मावर बोलण्यापूर्वी आत्मचिंतन आणि परस्पर तुलना करता येणे गरजेचे आहे. आपले विचार मांडताना त्यामागील मुद्दे हे तर्कसुसंगत, परखड, साधार आणि स्पष्ट असले तर मांडावेत पण त्याला जातीय वा धार्मिक विखार असू नये. जसे की ब्राम्हण,मराठा वा कोणतीही जात वाईट नसतात पण ब्राह्मण्यवाद, मराठेशाही लादू इच्छिणारे निश्चितच कावेबाज असतात यांच तर्काने मराठ्यापासून ते बारा बलुत्यांच्या जातीबद्दल बोलता येईल. त्या त्या जातीतले वैगुण्य असणारया बाबी आणि चांगले घटक याची माहिती असल्याशिवाय त्यावर भाष्य करणे अयोग्यच.

पुर्वग्रहदुषित दृष्टीकोन हा आपल्या जातधर्म विषयक, राजकारण विषयक व सामाजिक जाणीवाविषयक भूमिकांचे विचके करून टाकतो, आणि अपुरी माहिती, अज्ञान, वृथा आवेश, सामाजिक समरसतेचा अभाव याने त्याला द्वेषमूलक खतपाणी मिळते. आपल्याला ज्याचा द्वेष, मत्सर, हेवा वाटतो अशा जाती-धर्मावर, पक्षावर,संघटनेवर उलट खोलात जाऊन माहिती घेतली तर आपले मत आणि दृष्टीकोन बदलू शकतो त्यासाठी आपली भूमिका चिकित्सक व अभ्यासक असली पाहिजे. इस्लाममध्ये अमुक एक गोष्ट वाईट आहे असे जर मला म्हणावयाचे असेल तर मी आधी इस्लामचा अभ्यास केला असला पाहिजे आणि त्याहीआधी मी माझ्या धर्मातील ज्या बाबी वाईट आहेत त्याचा खुल्या मनाने निषेध केला पाहिजे.

अमुक एक जातीचे, पक्षाचे, संघटनेचे वर्चस्व हवे असं मत मांडणारा माणूस मी धोकादायक समजतो. जातपात विरहीत विकासाची आणि समतेची कास धरणारा समाज हे अंतिम ध्येय असलेला समाज खरया अर्थाने पुरोगामी आहे असे माझे मत आहे.आपण सर्व धर्मांचा, जातींचा, पक्षांचा योग्य तो आदर करावा जरूर ती चिकित्सा करावी पण आपले मत त्यासाठी इतरांवर लादू नये. न पटणारया गोष्टीवर समान न्यायाने व कोणताही भेदभाव न करता मर्यादा राखून टिका करावी. स्वतःवर कोणाचीही मते लादून घ्यायची नसतील तर आपण ते आधी टाळले पाहिजे.

उठसुठ प्रत्येक बाबींबद्दल प्रत्येकाने बोलले पाहिजे का याचाही विचार करता आला पाहिजे, अमक्याने एक मत नोंदवले आहे आणि त्याचा आपल्यावर प्रभाव आहे तर आपण कोणतीही शहानिशा न करता तसेच वा त्या अर्थाचे मत नोंदवत असू तर आपली विचारनिश्चितीची पद्धत सदोष आहे असे समजण्यास हरकत नाही. आपल्याला घटनेने दिलेले हे स्वातंत्र्य आहे याचा व्यवस्थित वापर केला तरी सरकार आणि प्रशासनापुढील कितीतरी डोकेदुखी कमी होईल.

शेवटी असं सांगेन की, आपले मत असे असावे की आपण एकांतात जो विचार करू तो आपल्याला खाजगीमध्ये आपल्या ज्या चारचौघा घनिष्ट मित्रांच्या कोंडाळ्यात मांडता यावा आणि तेच मत सार्वजनिक जीवनात तितक्याच सच्चेपणाने आणि छातीठोकपणाने सर्वांसमोर मांडता यायला पाहिजे. जर आपण असे आपण करत नसू तर आपला दृष्टीकोने न आपणच तपासला पाहिजे.आपण जर कोणाच्या मागे वाहवत जात असू तर त्यामागचा आपला हेतू आपल्यालाच तपासता आला पाहिजे तो हेतू प्रामाणिकता, सामाजिक ऐक्य, राष्ट्रहित, समानता, बंधुता, दया या कसोट्यांवर खरा उतरला पाहिजे. त्यानंतरच आपण त्या व्यक्ती वा समूहाच्या मागे जाणे हितकारक !

- समीर गायकवाड

(माझी पूर्वीची जवळीक कुणाबरोबर होती आणि कशी होती याचा अंदाज सकल शेरेबाज लोकांना यावा म्हणून सेना पक्षप्रमुख श्री.उद्धवजी आणि माझे राजकीय गुरुवर्य, कौटुंबिक स्नेही, सेनेचे सोलापूरचे सहसंपर्कप्रमुख श्री.पुरुषोत्तमजी बरडे यांच्या सोबतची एक जुनी तसबीर जोडली आहे. पक्का सेना कार्यकर्ता जसा राहायचा तसा मी होतो. ते दिवस आठवले तरी मलाच आश्चर्य वाटते. आता सेनेला 'जय महाराष्ट्र' करून काही वर्षे लोटलीत, नाहीतर या फोटोच्या आधारे पुन्हा कुणी तरी सुरु व्हायचा. )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा