बुधवार, ७ जुलै, २०२१

'सुहाना सफर' दिलीपसाब आणि सायराचा !....




अखेर आज त्याचे श्वास थांबले...
 
ओढ ज्याची त्याची असते, ज्याला त्याला ती कळत असते मात्र त्याच्याशी एकरूप झालेल्या जीवाला ती अधिक कळते .....

तो 'अखेरचा रोमन' आता जवळ जवळ गलितगात्र होऊन गेला होता अन ती 'हिमगौरी' आता थकून गेली होती....
पण त्यांनी अजून हार मानली नव्हती, त्याची स्वप्ने त्याचा पिच्छा सोडत नव्हती
अन ती त्याची सेवाशुश्रूषा थांबवत नव्हती..
त्याचा श्वास हाच जणू तिचा ध्यास झाला होता...
त्याचे श्वास अलीकडे मंद होत होते..
त्याच्या डोक्याखाली तिने आपल्या हाताचीच उशी केली होती.

तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळे आता अधिक गडद होत होती अन त्याच्या देखण्या चेहऱ्यावरचे सुरकुत्यांचे जाळे अधिक दाट होत चालले होते..

त्याच्या देहाची त्वचा आता सैल झाली होती, त्याला ऐकायला जवळपास येत नव्हते अन दृष्टी बरयापैकी धूसर झाली होती.

मात्र त्याची सावली असणारी ती आता त्याचे पंचेंद्रियं झाली होती, ती आता त्याची आईही झाली होती....
कधी काळी ती त्याची मैत्रीण होती, मग ती त्याची पत्नी झाली, पुढे बहिण झाली शेवटी ती त्याची आई झालेली अन अलीकडे तो आता तिचा मुलगा झाला होता....

ती दिवस रात्र त्याच्यापाशी बसून असायची ....
 
तिलाही आता कळून चुकलं होतं की आता आपल्या 'साहिबे आलम'चा आखरी सफर सुरु आहे !

जुन्या आठवणींनी घायाळ होऊन ती कधी कधी एकांतात मूकपणे रडत असायची.
गोपी, छोटी बहु, बैराग अन दुनिया ही या जोडीच्या सिनेमांची नावे तिच्या रिअल लाईफमध्ये जणू खरीच झाली होती.

ज्या बॉलिवूडमध्ये सकाळी केलेलं लग्न संध्याकाळपर्यंत टिकत नाही तिथं यांच्या लग्नाला गेल्या ११ ऑक्टोबरला चोपन्न वर्षे पूर्ण झालेली...
तो आता अठ्ठ्यान्नव वर्षांचा झालेला तर ती शहात्तर वर्षांची आहे,
 
मागच्या कैक वर्षापासून पैलतीरावर त्याची नजर होती.
त्या तीरावरील दूतांना त्याला नेण्याआधी तिची जीर्ण झालेली अभेद्य भिंत पार करावी लागण्यासाठी खूप झगडावं लागलं. मग कुठे आज ते त्याला सोबत नेऊ शकले......

त्याच्या देहातली निरांजने तेवती रहावीत म्हणून ती अल्लाहकडे फरियाद करत असायची तर त्याचे मन 'सुहाना सफर और ये मौसम हंसी'च्या स्मृतीरंजनात दंग असायचे..
 
खरतर आजवर अल्लाह तिची दर्दभरी फरियाद ऐकत आलेला मग ती मुदतवाढ मागावी तशी त्याच्या आयुष्याचा बोनस मागायची. विधात्याने तो ही तिला दिलेला ! पण कुठे तरी थांबावेच लागते. आज या इबादतची समष्टी झाली.
 
कुणाची ओढ कशात असते तर कुणाची आणखी दुसरया तिसऱ्यात असते, पण नेमके कोणीही सांगू शकत नाही की अमुक एका व्यक्तीची जगण्याची ओढ एखाद्या फलाण्या गोष्टीतच आहे...

मात्र अलीकडील दशकात सायराच्या जगण्याची ओढ स्पष्ट दिसत होती, दिलीपसाबने अधिकाधिक जगावे हीच तिच्या जगण्याची ओढ झाली होती..

त्याच्या खंगत चाललेल्या देहाला चकाकी यावी म्हणून आपल्या देहाची रुपेरी झाक तिनं धुरकट केली होती...

बातम्या बघत असताना कुठं दिलीपकुमार हे नाव जरी आलं तरी धस्स व्हायचं अन पतीप्रेमात आकंठ बुडालेली, देहाचे अग्निकुंड करून जगणारी सायराच डोळ्यापुढे यायची अन उगाच मन हळवे होऊन जायचं.

आता इथून पुढे हा छळवाद थांबेल आणि मन तिच्यासाठी दुवा करत राहील..
 
माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांच्या आयुष्यात आनंदघन बनून आलेले मेघ कधी कधी न विरतील याची निश्चिती होती मात्र तो दिवस उगवूच नये असं वाटायचं.

कधी कधी वाटायचे की त्याचे जीवनगाणेही त्याच्या वतीने सायराच गात असेल -
"वो आसमां झुक रहा है ज़मीं पर.
ये मिलन हमने देखा यहीं पर
मेरी दुनिया, मेरे सपने, मिलेंगे शायद यहीं
सुहाना सफ़र..... "

दिलीपसाब आणि सायराचा हा 'सुहाना सफर' वरवर जरी वेदनादायी वाटत असला तरी मनस्वी देखणाही झाला होता ...तो असाच जारी रहावा असं वाटायचं मात्र आज हा सफर संपला...

एक उत्तुंग अभिनेता म्हणून दिलीपसाब लक्षात राहतीलच मात्र एका प्रेमळ आणि लोभस दांपत्यजीवनाची हुरहूर लावणारी अखेर म्हणून हा दिवस लक्षात राहील..
 
सायरा तुला शतशः सलाम.. आता तुझ्या हाती दिलीपसाबचा हात नसेल मात्र आठवणींचे मोहोळ सतत सोबत करेल..
 
अलविदा दिलीपसाब...
.
- समीर गायकवाड
 
विनंती - कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली, RIP इत्यादी न लिहिल्यास बरे.


May be an image of 2 people and people sitting

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा