सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२०

चित्रीचं वासरू



चित्रीचं वासरु पोटातच मेलं.
सात वर्षानंतर ती पहिल्यांदा व्याली होती.
बादलीभर वार संगं घेऊन डोळे मिटलेला तो मुका जीव बाहेर पडला.
मातीत पडलेल्या निष्प्राण जीवाच्या कलेवराला
चित्री खूप वेळ चाटत होती.
लोळागोळा झालेला तो जीव थिजून होता.
चित्रीने त्याला डोक्यानं ढोसून बघितलं, पण काहीच प्रतिसाद नव्हता.
वेतामूळं गर्भगळीत झालेली चित्री आता पुरती दमली.
पुढच्या पायावर बसत तिनं मोठ्यानं त्याला हुंगायला सुरुवात केली.
तिच्या तोंडातून शुभ्र फेसाच्या तारा बाहेर पडत होत्या.
जिभ आत ओढत होती
हुंकार वेगानं होत होते..

बऱ्याच वेळानंतर तिला सत्य उमजलं.
मग तिने आपलं तोंड त्या मासाच्या मखमली गोळ्यावर टेकवलं
आणि एकच आर्त हंबरडा फोडला.
बराच वेळ तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
तिचं रक्त आणि अश्रू एकजीव होत मातीत मिसळत गेले.
दिवस मावळायच्या सुमारास शेताच्या कोपऱ्यात
बांधालगतच्या आंब्याखाली वासराला मूठमाती दिली.

याला आता काही वर्षे लोटून गेलीत.
चित्री पुन्हा कधी माजावर आली नाही की तिचं पोटही तटतटल नाही
तिची कूस कसली ती उजवलीच नाही
चित्री आटून गेली.
आता ती म्हातारी झालीय. 

गेले कित्येक वर्ष ती
बांधालगतच्या आंब्याखाली बसून असते
चित्रीचे डोळे तिथं अखंड पाझरत राहतात.
चित्रीच्या सहवासानं आंब्याचा मोहरही बंद झाला.

आताशा चित्री दिवस उजाडताच तिथं येऊन बसते
खुरांनी माती उकरते,
उकरलेली माती बाजूला सारते.
हुंगते.
हुंकारे भरते.
खड्डा केलेल्या मातीत लगटून बसते

चित्री ज्या मातीत बसते तिला ताज्या दुधाचा दरवळ येतो.
बापू सांगतो की चित्रीला नकळत काही क्षण पान्हा फुटतो आणि मातीत झिरपत जातो.

चित्रीला अल्झायमर झालाय का ?
बांधालगतचं आंब्याचं झाड आज हमसून हमसून रडत मला विचारत होतं.
पाणावल्या डोळ्यांनी मी निरुत्तर होऊन स्तब्ध पाहत होतो 

मी नुसताच पाहत होतो... 

- समीर गायकवाड

(छायाचित्र सौजन्य - श्री. अतुल गव्हाणे) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा