सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

मुक्या लेकीचं दुःख...



कालपरवाच्या पावसात जगूनानाची दोन आठवड्याची रेशमी कालवड वाहून गेली.
त्या कोवळ्या बारक्या जीवाच्या मानेला हिसका बसू नये म्हणून कासरा ढिला बांधला होता.
रात्र जसजशी चढत गेली तसा पाण्याचा जोर वाढत गेला. पाण्याचा लोंढा इतका वाढत गेला की कालवडीच्या गळ्यातला कासरा निघून आला, गळ्याची ढिली गाठ गळून पडली.
पाण्याच्या जोरदार प्रवाहात कालवड वाहून गेली.
नाकातोंडात पाणी गेलं तरी ती अखेरपर्यंत पाय मारत होती, पण तिचा जोर कमी पडला.
तिच्या शेजारीच दावणीच्या खुंटीला बांधलेली यशोदामाय रात्रभर हंबरडा फोडत राहिली.
तिच्या डोळ्यादेखता तिचं वासरू वाहून गेलं तेंव्हा तिला काय वाटलं असेल ?

बेफाम कोसळणाऱ्या पावसाचं अघोरी रूपडं पाहून कासावीस झालेला वयाची साठी पार केलेला नाना घरच्यांना हूल देऊन भर पावसात गावातून वस्तीवर आला तेंव्हा त्याच्या डोळ्यातलं आभाळ मुकं झालं. त्याच्या मनातली आक्रिताची भीती खरी ठरली होती.
सगळं होत्याचं नव्हतं झालं.

कालवड गेल्यानं यशोदेच्या जीवाची घालमेल होत होती, ती नुसती धुमसत होती.
यशोदेला गोठ्यातून ओढून काढून टेकाडावर न्यावं म्हणून त्यानं जीवाचा आटापिटा केला पण जमलं नाही.
कंबरेइतक्या पाण्यात त्याच्या थकलेल्या पायातली ताकद कमी पडली.
यशोदेला त्याच्यासोबत जायचं नव्हतं. तिचा सगळा जीव वासरात गुंतलेला.
जेमतेम वीसेक पावलं चालल्यानंतर तिने जगूच्या हाताला जोराचा हिसडा दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली.
पोहायला येत असूनही पाण्यात वाहत गेली.

ओलाचिंब झालेला जगू तिच्या नावानं आकांत करत राहिला, मधूनच वीजांच्या कडकडाटात तिची टोकदार शिंगं एकदा वर आली नंतर मात्र काहीच दिसलं नाही. नानाला एकमन वाटलं की आपणही वाहत जावं आणि सुटका करून घ्यावी, मात्र घरची ओढ त्याला मागं खेचत होती.
पाऊस सरला.
रानातलं पाणी उतरलं. बोडखी शेतं पिसाटून वर आली. ढासळलेल्या बांधांच्या फासळ्या उठून आल्या.
लोक नुकसानीचा हिशोब घालू लागले.

कालपरवा सगळीकडे नुकसानीचे पंचनामे झाले.
जगूनानाने पिकाची नोंद केली पण यशोदेची नोंद केली नाही, कालवडीविषयी चकार शब्द काढला नाही.
दिवसभर शेतशिवारातील अश्रू कागदावर टिपून महसुली कर्मचारी निघून गेले.

आज जगूनाना पंढरीला जाऊन आला.
चंद्रभागेला भेटून आला.
जाताना त्यानं यशोदेची झूल, घुंगुरमाळा, तोडे, गोंडे सगळं एका हिरव्या साडीत बांधून नेलेलं. नदीपात्रात जितकं शिरता येईल तितकं आत शिरत त्यानं डोईवरचं साडीचं गाठोडं खाली घेतलं आणि पाण्याच्या प्रवाहात सोडून दिलं.

दोन्ही हात जोडून ढसाढसा रडू लागला. माय चंद्रभागे माझी लेक तिच्या वासरासह तुझ्या उदरात आलीय, तिला आसरा दे गं. तिला घट्ट पोटाशी धरून ठेव. पोटच्या गोळ्यापेक्षा जास्त जपलीय मी तिला.
माहेरची साडी मात्र वाहत जाऊ दे.
कुठल्या तरी झाडी झुडपात अडकून ती फाटून जाईल नाहीतर कुणाच्या तरी हाती लागेल, तेव्हढीच माझ्या यशोदेची आठवण कुणीतरी मिरवंल...

रात्रीच्या लालएसटीने जगूनाना गावात आला आणि घरी न जाता थेट वस्तीत जाऊन ऊर फाटेस्तोवर रडला.
आता किती तरी दिवस सुन्या दावणीपाशी त्याला यशोदेचा भास होत राहील.
मुक्या लेकीचं दुःख त्याला डागण्या देत राहील आणि डोळ्यातून त्याच्या चंद्रभागा वाहत राहील.   
वाहत राहील...

- समीर गायकवाड

२ टिप्पण्या:

  1. खूप छान लेखन...
    एकदा माझ्या www.inspireus.in या blog ला भेट दर्या माझ्या लिखाणातील चूका लक्षात आणून द्या. मला नवीन लेखनास प्रेरणा मिळेल

    उत्तर द्याहटवा