शनिवार, १४ नोव्हेंबर, २०२०

केरसुणी...

गावाकडं आजच्या दिवशी केरसुणीचीही साग्रसंगीत पूजा होते.
केरसुणी तयार करण्यासाठी शिंदीची पानं नाहीतर मोळाचं गवत वापरलं जातं.
आमच्या सोलापूर जिल्ह्यात मायबाप पुढाऱ्यांच्या कृपेने काही अधिकृत तर मोकार वावरभरून अनधिकृत शिंदीची झाडं आहेत.
आमच्याकडं मजूर मंडळी आणि विडी कामगारांसाठी शिंदी आणि ताडी अजूनही फर्स्ट प्रेफरन्सवर आहे.
शिंदी चवीला आंबूस लागते, रिकाम्या पोटी ढोसू नये लागते. पोट डरंगळतं. ढंढाळ्या लागतात.
स्वस्तातली नशा म्हणून लोक शिंदी पितात, आजकाल केमिकल वापरून खोटी बनावट शिंदी विकली जाते. खिसे हलके झालेले आणि जिन्दगानी हरलेले लोक त्यातदेखील अमृत शोधतात.
त्याच शिंदीच्या झाडापासून केरसुणी तयार करतात.
आज तिची पूजा होते. मात्र वर्षभर गावाकडे केरसुणी हा शब्द शिवीसारखा वापरला जातो.
"कुठं गेली ती केरसुणी गतकाळी ? " असा उध्दार होत असतो.

अजूनही गावाकडे संध्याकाळी दिवेलागण झाल्यावर झाडून काढत नाहीत, दिवसभराचा केरकचरा संध्याकाळी टाकून दिला जात नाही.
इकडे शहरात आता केरसुणी हद्दपार होऊ घातलीय. ब्रूम आणि साळूते घरोघरी झालेत. त्यांची पूजा होते की नाही ठाऊक नाही.
गावाकडे आजी काकी आई केरसुणीची पूजा करताना डोळे मिटून पुटपुटायच्या, "माय लक्ष्मी बरकत येऊ दे. तुला मस्तकी घेईन पाय पडू देणार नाही !"
केरसुणीला पाय लागला तर ते पोर आजदेखील शिव्या खातं.

धनधान्य पैसाअडका रोकडसोनंनाणं आणि केरसुणीची पूजा एकाच जागी होते हे विशेष.
घर झाडून झाल्यावर आजी केरसुणी अशा ठिकाणी ठेवायची की सहजी कुणाला दिसणार नाही.
"सुनेला केरसुणी का म्हणते का गं ?"असं विचारलं की डाव्या हाताने हनुवटीपाशी पदराचं टोक दातात धरून डोईवरचा पदर कपाळापर्यंत ओढून मस्तपैकी हसून ती उत्तरायची, "केरसुणी म्हंजी लक्षुमीच की ! सून लक्षुमीच्या पावलाने येते मंग तिला केरसुणी म्हंन्ल तर कुटं बिघडतं ?"

आजीला आठ सूना होत्या. काळाच्या टप्प्यानुसार तिचं सुनांशी वागणं बदलत गेलं. नंतर अखेरीस उरली ती मुलायम म्हातारी शेवरी!
आजीच्या गालावर मस्त खळी पडायची. तिच्या तळहातावरची मखमल ती आम्हा नातवंडांच्या गाली पसरवे तेंव्हा तिचे हात अधिकच रेशमी वाटत.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा