सोबतचे चित्र - 1562 मधलं पीटर ब्रुगेल यांचं 'ट्रायंफ ऑफ डेथ'. |
लेखक, कवी हे खऱ्या अर्थाने संवेदनशील असले तर ते कालानुगतिक सुखदुःखांच्या झुल्यावर शब्दांची मैफल सजवत जातात त्यावर कधी अश्रू झोका घेतात तर कधी हसू ! निर्मिकाचं कामच मुळात असं असतं. स्वमग्नतेच्या कोषात दंग होऊन निर्मिलेलं साहित्य तात्कालिक यश मिळवू शकतं मात्र काळाच्या कसोटीवर लिहिलेलं साहित्य दीर्घकालीन ठसा उमटवतं. भवतालच्या विश्वाचा आपल्याला जसा उमगेल तसा धांडोळा घेणं हे सच्च्या साहित्यिकाचं लक्षण मानलं जातं. त्या त्या कालखंडात येऊन गेलेल्या साथी, रोग, नैसर्गिक आपत्ती, मानवी चुकांमुळे घडलेल्या घटना, युद्धे, गृहकलह, मानवी वर्तनातील विरोधाभास आणि मानव विरुद्ध इतर चराचर अशा अनेक बाबींचं प्रतिबिंब खऱ्या साहित्यात जोरकसपणे उमटतं. जगभरातील प्रतिभावंतांनी आपापल्या परीने ते शब्दबद्ध केलंय.
'पोएसी'मधली आजची कविता याच वर्गवारीतली आहे. मानवी इतिहासात अशा अनेक
साथी आणि आजार येऊन गेलेत ज्यांनी त्या त्या काळी हाहाकार माजवला होता. ते आजार आता मामुली झाले आहेत इतकं प्रभावी औषधास्त्र आपल्याकडे आहे. यातीलच एक साथ होती कॉलराच्या आजाराची.
कॉलरा म्हणजे मराठीत पटकी, अर्थातच कॉलरासाठीचा हा मराठीतला शब्द बहुसंख्यांना अपरिचित असेल यात शंका नाही. तर या कॉलराने जगभरातल्या लोकांना जेरीस आणलं होतं. आज जसे रकानेच्या रकाने भरून करोनाबद्दल छापून येताहेत तसं तेंव्हा कॉलराच्या बाबतीत घडत होतं. करोनामुळे आता जितके दगावलेत तितकी माणसं तेंव्हा एका दिवसात कॉलराने दगावली होती. आता हा आजार गंभीर वर्गातून पायउतार झाला आहे.
आजघडीला जगापुढे कोरोना व्हायरसचं अक्राळविक्राळ संकट आ वासून आहे आणि जग मात्र दिग्मूढ होऊन गेलंय. त्या पार्श्वभूमीवर ही कविता आणि तिचं वेगळंपण उठून दिसतं. प्रत्येक गोष्टीला जसा प्रारंभ आहे तसाच अंत आहे. करोना विषाणूही त्याला अपवाद नसणार. विविध प्रसारमाध्यमे आणि वाढती जागरूकता यामुळे आपण अधिक सजग झालो आहोत. आज जग कोरोनाने धास्तावले आहे. ही धास्ती अल्पकालीन असेल हे सांगायला कुण्या ज्योतिषाची वा भाष्यकाराची गरज नाही. कोरोनाची साथ ओसरल्यावर काही काळातच दुनिया आपल्या तालात रमून गेलेली असेल. मागे वळून पाहताना हे एक भीषण स्वप्न होतं जे आपण सगळे एका कालपोकळीत जगलो होतो याची जाणीव होत राहील. काही दशकानंतर करोनाविषयीच्या आजच्या बातम्या वाचताना त्या काळातील पिढी आपल्यावर हसेल ! किती घाबरून गेली होती ही मंडळी असंही म्हणतील ! काळ हे सर्व रोगावरचं प्रभावी औषध आहे मात्र त्याच्यासाठीचा संयम आपल्याकडे नसतो कारण आपण कालगणतीच्या एका टप्प्यात गुरफटून असतो. .
आता किरकोळ वाटणारा कॉलरा कोण्या एकाकाळी जीवघेणा होता. कॉलराच्या साथीने थैमान घातल्यावर खऱ्या साहित्यिकाला त्याच्या फॉर्ममध्ये त्याची दखल घ्यावीशी वाटणं साहजिक होतं. नझिक अल मलाईका या प्रतिभाशाली इराकी कवयित्रीने 1947 मध्ये 'अल कॉलरा' ही अरेबिक भाषेतील कविता लिहिली आणि तिच्यावर टीकेची झोड उठली. अर्थातच कारण तेच होतं, भावना दुखावल्याचं ! काही साहित्यिकांनी तिचं कौतुकही केलं. कॉलराच्या साथीचं चित्र तिने ज्या पद्धतीने उभं केलंय ते निर्विवाद बेजोड आहे. मृत्यूचं भय आणि खचलेली शारीरिक अवस्था माणसाला कशी दुर्बल बनवते हे तिनं अत्यंत नेमक्या शब्दांत टिपलेलं. कवितेला वृत्तांची बंधने न घालता तिला स्वच्छंद स्वरूप देणारी कवयित्री म्हणून ती मध्यपूर्वेत प्रसिद्ध होती.
अल कॉलरा (द कॉलरा) -
ही पहाटवेळा आहे
पहाटेच्या नीरव शांततेत
जवळून जाणाऱ्यांच्या पावलांचा आवाज ऐका.
ऐका, अविरत सुरु असलेल्या दफनविधींची आक्रंदनं पहा
दहा, वीस, नाही.. असंख्यच.
सर्वत्र प्रेते पडली आहेत, त्यांच्या सन्मानार्थ कवने नाहीत की
काही क्षणांचे मौन ही नाही
मृत्यूच्या छळतांडवाविरुद्ध मानवता निषेध करतेय
कॉलरा हा मृत्यूनं उगवलेला सूडच जणू.
कबर खोदणारा देखील मरण पावलाय
मुअज्जिन देखील अचेतन झालाय.
आता मृतांप्रति सद्भावना कोण व्यक्तवणार ?
हे इजिप्त, मृत्यूच्या छळाने माझं हृदय विदीर्ण झालंय..
या कवितेमुळे अरेबिक साहित्यात नझिक अल मलाईकाचं नाव अजरामर झालं. आता करोनाच्या पार्श्वभूमीवर ही कविता चपखल बसते. विख्यात ब्रिटिश कवी थॉमस नॅश यांची 'द लिटनी ईन टाईम ऑफ प्लेग' ही रचना देखील प्रसिद्ध आहे. डेव्हिड कॉली यांनी 'डेथ अँड द पर्ल मेडन' या पुस्तकांत साथीच्या आजारांवर रचल्या गेलेल्या रचनांचा साक्षेपी अभ्यास मांडला आहे. सी.डी.राईट यांनी यावर प्रहार करताना प्लेग ऑफ पोएटची रचना केली होती. प्लेगची बाधा होऊ नये म्हणून शेक्सपिअरला क्वारंटाईन करण्यात आलं होतं त्या काळात त्यानं किंग लिअर हि अद्भुत साहित्यकृती निर्मिलेली. साहित्य आणि विपदा यांचं नातं जुनंच आहे, त्यावर नजर टाकल्यास मानवतेवरचा विश्वास दृढ होतो..
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा