बुधवार, ८ एप्रिल, २०२०

कोरोनाचे संक्रमण - इतिहासाचं अनोखं स्मरण !


सोबतचा फोटो चार एप्रिलला युरोपमधील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे छायाचित्र म्हणजे मानवी इतिहासाला निसर्गाने दिलेली चपराक आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. हे दृश्य ग्रीसमधलं आहे. यात दिसणारा पेरिक्लेसचा पुतळा अथेन्समधला आहे. पेरिक्लेसचा काळ अडीच हजार वर्षापूर्वीचा असला तरी आताच्या कोरोना व्हायरस आऊटब्रेकशी त्याचा एका अर्थाने संबंध आहे. आजघडीला कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर युरोप हादरून गेलंय, त्यात ग्रीस देखील सामील आहे. कोरोनाचा संसर्ग सर्वव्यापी झाल्यावर अथेन्समधल्या सर्व प्रमुख इमारती, गर्दीचे चौक, रस्ते धुण्यास सुरुवात झाली. त्याचाच एक भाग म्हणून पेरिक्लेसचा पुतळा सॅनिटाइझ केला गेला. नेमक्या त्याच क्षणी हा फोटो क्लिक केला गेला आणि अख्ख्या युरोपमध्ये तो व्हायरल झाला ! असं काय होतं या फोटोत ? हे जाणून घेण्यासाठी इतिहासात बरंच मागे जावं लागेल.



पेरिक्लेस हा एक कुशल आणि रसिक अथेनियन राजनेता होता. जागतिक ख्याती असलेल्या ग्रीक ऍक्रोपोलिस पार्थेनॉन या उत्तुंग स्मारकवजा प्रार्थनास्थळाची उभारणी करण्याचा आदेश यानेच दिला होता. ईसवीसन पूर्व ४९५ ते ४२९ हा त्याचा कालखंड होय. त्याचा कालखंड हा रोमन साम्राज्याचा सुवर्णकाळ मानला जातो. अथेन्सच्या राजकीय सामाजिक पटलावर पेरिक्लेसचं नाव ठळक अक्षरांत नोंदीत आहे कारण त्याने प्रतिभा, साहित्य आणि राजकारण यांची सांगड घालत कलेला राजकीय मान्यता मिळवून दिली. त्याच्या काळात मोठी युद्धे (पर्शियन, पेलोपोनेसियन युद्धे) लढली गेली आणि ती जिंकली ही ! साम्राज्य विस्तार हा त्याचा उद्देश नव्हताच. आपलं अस्तित्व मान्य केलं जावं आणि आपल्याला आव्हान देऊ नये या दृष्टीने त्याने अथेन्सची राजकीय मांडणी केली. अथेन्सच्या राजकीय पटलावर त्याचं आरेखन त्याच्या आईमुळे झालं. त्याची आई अल्केमोनिड वंशातली राजस्त्री होती. पेरिक्लेसचा प्रभाव इतका वाढला होता की तत्कालीन विख्यात इतिहासकार थ्युसिडिडस याने त्याला 'द फर्स्ट सिटीझन ऑफ अथेन्स' असं संबोधलं होतं. पेरिक्लेस हा विद्वान होता, द्रष्टा राजकारणी होता, वक्ता दशसहस्रेशू होता आणि रणनीतीकार ही होता. त्यामुळे त्याचा मोठा दबदबा होता. ईसपूर्व ४६१ ते ४३० हा काळ तर पेरिक्लेसचा काळ म्हणूनच अथेन्सच्या इतिहासात नोंद झालाय.

अथेन्सची नोंद शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून घेतली जावी यासाठी पेरिक्लेसने प्रयत्न केले. ग्रीकांची ओळख म्हणून ज्या इमारतींकडे पाहिलं जातं त्या ऍक्रोपोलिसच्या बांधकामाची सुरुवात त्याच्याच काळात झाली. यातीलच एक असणाऱ्या पार्थेनॉनचे अवशेष आजही तग धरून आहेत. जागतिक वारसास्थळांत त्याचं स्थान बरंच वरचं आहे. ग्रीक साम्राज्य म्हटलं की आधी या भग्नअवशेषरूपातल्या इमारती डोळ्यासमोर येतात. ग्रीकांचं तो सर्वोच्च उत्कर्षबिंदू होता. याने लोकांना काम मिळालं तर राजसत्तेला उत्तुंगतेचं समाधान मिळालं आणि ग्रीक वर्चस्ववादाच्या अभिनिवेशाचा पाया या चिन्हांनी दृढ होत गेला. पेरिक्लेसने अथेन्सची धोरणे इतकी आमूलाग्र बदलली की तत्कालीन टीकाकार त्याला लोकानुनयी संबोधू लागले. लोकप्रियतेच्या हव्यासासाठी त्याने हे सगळे उद्योग सुरु केले असल्याची टीकेची झोड त्याच्यावर उठवली गेली. पेरिक्लेसची अखेर अत्यंत दयनीय झाली, त्याचा अंतःकाळ इतका वाईट जाईल याची कल्पना कुणीही केली नसेल अगदी त्याच्या टीकाकारांनी देखील नाही ! स्पार्टासोबत अथेन्सचा संघर्ष टिपेला जाण्याच्या काळात पेरिक्लेस मरण पावला आणि अथेन्सचा लौकिक आस्ते कदम लोप पावत गेला...

पेरिक्लेसच्या वैयक्तिक आयुष्यात मी अधिक गंभीरपणे डोकावतो. कारण सामान्य माणसांच्या जीवनात आढळणारे सगळे रंग त्याच्या आयुष्यातही होते आणि विशेष म्हणजे त्यांना सामोरं जाताना तो एका सामान्य नागरिकासारखा वागला. अखेरच्या काळात त्याने त्याच्याच तत्वांची मोडतोड केली. पेरिक्लेसला पहिली पत्नी मेगाक्लेसपासून पॅरालस आणि क्झांथीपस ही दोन मुलं झाली. कालांतराने त्याने तिच्यापासून घटस्फोट घेतला. त्यानं तिला दुसरं लग्न करण्यास अनुमतीही दिली. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे पेरिक्लेससोबत विवाह होण्याआधी मेगाक्लेस विवाहित होती, ते तिचं दुसरं लग्न होतं. पहिल्या पतीपासून झालेला कॅलियस तिसरा हा एक कुप्रसिद्ध राजकारणी होता. पेरिक्लेसने पत्नीपासून काडीमोड घेतल्यानंतर अस्पॅसियाशी संबंध ठेवले. तिच्यापासून झालेल्या मुलाचं नाव पेरिक्लेस द यंगर होय.

अस्पॅसियाशीसोबतच्या संबंधांमुळे पेरिक्लेस वादाच्या केंद्रस्थानी आला कारण तिचं ओरिजिन अथेनियन नव्हतं. पहिल्या पत्नीपासूनचा त्याचा मुलगा क्झांथीपस याच्या राजकीय महत्वाकांक्षा खूप मोठ्या होत्या. त्यानं ही संधी साधून बापाविरुद्धच शड्डू ठोकले. याहूनही वाईट घटना पेरिक्लेसच्या आयुष्यात घडली, अस्पॅसियावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. तरीदेखील पेरिक्लेसने तिची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. इतकं होऊनही लोकांचं त्याच्यावरचं प्रेम कमी झालं नाही. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे ईसवीसन पूर्व ४३० साली प्लेगच्या साथीत पेरिक्लेसच्या बहीणीसह पॅरालस व क्झांथीपस ही दोन्ही मुलं मृत्युमुखी पडली. दरम्यान पेरिक्लेसला आपल्या बचावलेल्या मुलाला वारस राजमान्यता मिळण्याचा प्रश्न छळू लागला. त्याने कायद्यांत बदल करवून घेतले आणि अस्पॅसियापासून झालेल्या जन्माने हाफअथेनियन असलेल्या आपल्या मुलाला नागरिकत्व मिळवून दिलं. त्याला वारसा हक्कही मिळवून दिला. या घटनेनंतर काही महिन्यातच प्लेगच्या साथीने पेरिक्लेसचा बळी घेतला. त्याच्या मृत्यूनंतर अथेन्सला उतरती कळा लागली. हा सगळा इतिहास आहे.

आता जगभरात कोरोनाची साथ आहे. याने युरोपला विशेष ग्रासले आहे. युरोपियन समृद्धीचं आणि ऐतिहासिक वर्चस्वाचं प्रतिक असणाऱ्या पार्थेनॉनचं जनकत्व असणाऱ्या पेरिक्लेसचा पुतळा धुताना मनात कोणत्या भावना असतील ? पर्यायाने युरोपचा अहंकार गळून पडला असेल का ? नियतीने अडीच हजार वर्षे मागे नेऊन त्याच वळणावर आणून ठेवलं आहे कारण साथीच्या आजारात पेरिक्लेस मरण पावला आणि नंतर समृद्धी लयास गेली. आता तोच इतिहास पुन्हा लिहिला जाईल का ? पेरिक्लेसचा मृत्यू प्लेगच्या विषाणूने झाला आणि आता त्याच्या पुतळ्यावरून करोनाचा विषाणू पसरू नये यासाठी त्याची सफाई करावी लागणं हे काय दर्शवतं ? मानवाने किती जरी कोटीच्या कोटी उड्डाणे केली तरी निसर्गाच्या एका पावलापुढे ती किरकोळ ठरतात. इतिहास पुन्हा पुन्हा तेच बजावून सांगत असतो की स्वतःला सर्वशक्तीमान वा सृष्टीचा रचेता कधी समजू नये नाहीतर त्याचा दुर्दैवी अंत ठरलेला आहे. ग्रीसमधले हे छायाचित्र हेच तर सुचवत नसेल ना !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा