शनिवार, ४ एप्रिल, २०२०

लॉकडाऊनवरच्या विजयाची गाथा...

लॉकडाऊनवरच्या विजयाची गाथा...  
    
चीनमधल्या लॉकडाऊन  स्टोरीज आता एकेक करून समोर येताहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या चीनी दैनिकात एक कथा प्रसिद्ध झालीय. आशियाई देशात ती खूप व्हायरल झाली. पुढे जाऊन जागतिक आरोग्य संघटनेने देखील त्या व्यक्तीची मुलाखत प्रसिद्ध करायचं ठरवलं जेणेकरून लोकांच्या मनातली भीती कमी व्हावी आणि करोनाविरुद्धच्या लढ्याला जिंकण्याची जिद्द निर्माण व्हावी. ही दास्तान आहे फेंग ली या तरुणाची. सहा महिन्यापासून आपल्या आईवडिलांना भेटायला जायचं त्याच्या मनात घाटत होतं. कामाचा ताण काही केल्या कमी होत नव्हता. वुहानला जायची सवड काही केल्या मिळत नव्हती. अखेर योग जुळून आला. डिसेंबरच्या मध्यास त्यानं वुहानला आपल्या आईवडिलांकडे यायचं नियोजन पक्कं केलं. तो घरी येताच त्याच्या मातापित्यांना प्रचंड आनंद झाला. दरम्यान शहरात एकेक करून करोना व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू होण्यास सुरुवात झाली होती. लीच्या घरीही याची दहशत जाणवत होती. मात्र पुढे जाऊन इतकं कठोर लॉकडाऊन होईल आणि आपलं आयुष्य त्यात गोठून जाईल याची त्याच्या कुटुंबातील कुणीच कल्पना केली नव्हती. जानेवारीत वुहानच्या सगळ्या सीमा सील करण्यात आल्या. लॉकडाऊन फारतर दोनेक आठवडे चालेल असा त्यांचा कयास होता. पण तसं झालं नाही. काळ जसजसा पुढं जात होता तसतसं लॉकडाऊनचा फास घट्ट आवळत होता. कसलीही दयामाया नव्हती की कुणाला त्यात सूट सवलतही नव्हती. पहिल्या दोन आठवड्यात भाजीपाला आणि जरुरी अन्नधान्य आणण्यासाठी घराबाहेर पडण्यास अनुमती होती. सुपरमार्केटस त्यासाठी खुले ठेवण्यात आले होते. पुढे जाऊन घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. सर्वांच्या घराच्या दरवाजांवर सील लावण्यात आलं.


फेंग सांगतो की जर तुम्हाला घरात काही आठवडे, काही महिने बंदिस्त राहायचं असेल तर स्वतःला काही चांगल्या सवयी लावून घेणं अनिवार्य आहे. विषाणूचा मुकाबला करण्यासाठी स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. त्याकरिता दिवसभरातून करोनासंबंधीची माहिती मिळवत राहणे, बदलांची माहिती जाणून घेणे हे केलं पाहिजे. करोनाला भिऊन त्याच्यापासून दूर गेलो त्याचे अपडेट्स घेतले नाहीत तर त्याच्याशी लढा कसा लढणार ? त्याची भीती डोक्यातून काढून त्याची सर्वंकष माहिती मिळवण्याचा फेंगला ध्यासच जडला. त्यासाठी दिवसभरातून तो मोबाईल, कॉप्म्युटरमध्ये डोकावू लागला. बाहेर नेमकं काय घडतंय याची अनभिज्ञता टोकदार होत होती. वाईट गोष्ट अशी होती की लॉकडाऊनचा पुढचा टप्पा शटडाऊन होता जिथे सगळीकडे फक्त एकांतच होतासोबत होती आशा, या साथीवर मात करण्याची. सरकारच्या सर्व आदेशांचे अत्यंत कठोर पालन ते करत गेले. फेंगचा आणखी एक प्रॉब्लेम होता, वुहानमध्ये येण्याआधी त्याला डिप्रेशनचा त्रास सुरु झाला होता. लॉकडाऊनमुळे आपण डिप्रेशनच्या खाईत लोटले जाऊ की काय याची भीती त्याला सतावू लागली. हातावर हात ठेवून चालणार नव्हतं. त्यानं घरातच व्यायाम करण्यास सुरुवात केली. सकाळची प्रसन्न वेळ होताच काही वेळासाठी कोवळं ऊन खाण्यासाठी तो गच्चीवर जायचा. पाठोपाठ आईवडील देखील यायचे. या सगळ्यातून आवर्जून वेळ काढत त्यानं स्वतःला पुस्तकांची सवय लावून घेतली. विशेष म्हणजे पुस्तकांशी संबंध तुटून दशक लोटलं होतं. लॉकडाऊनमध्ये त्यानं हाती पुस्तक धरलं तेंव्हा त्याच्या मातापित्याच्या ओठी स्मित फुललं. फेंग सांगतो की लॉकडाऊनच्या प्रत्येक टप्प्यावर त्यानं स्वतःला बदलवत नेलं आणि याकरिता त्याच्या आईवडिलांनी त्याला नित्य उद्युक्त केलं. कुटुंबासॊबत वेळ घालवताना स्वतःलाही काही प्रश्न विचारले पाहिजेत असं त्याचं मत आहे. 

त्याच्या मते लॉकडाऊनचा काळ अंगावर येणारा असला तरी त्याला सडेतोड उत्तर देता येतं. मात्र त्यासाठी फिक्स्ड रुटीनच असलं पाहिजे. काही दिवस त्याचं रुटीन बिघडलं तर त्याला पुन्हा डिप्रेशनचा त्रास झाला. फेंगने पुस्तकांचा मनसोक्त फडशा पाडल्यानंतर म्युझिकल इंस्ट्रुमेन्ट शिकण्याचा ध्यास घेतला. युट्युबवरील व्हिडीओ पाहत त्यानं बऱ्याच दिवसांनंतर गिटारवरील धूळ साफ केली. संगीताची जादू काम करून गेली. घरातील सर्व कामात सगळ्यांनी एकमेकांना मदत केल्याने सहजीवनाचा नेमका अर्थ गवसला. उसवलेली नात्यांची वीण घट्ट झाली. याआधी तो स्काईपवरून वा अन्य साधनातुन कुटुंबाशी संपर्क साधायचा. मात्र आता आईवडिलांना मिठी मारताना त्याला आपल्यातल्या दुरीची इतकी तीव्र जाणीव झाली की त्याच्या मनात अपराधीपण दाटलं. प्रदीर्घ लॉकडाऊनचा मुकाबला करण्यासाठी कलेची साधना करणे, कुटुंबियासॊबत अधिक वेळ घालवणे यावर त्याने भर दिला. एकट्याने खोलीत बसणे, सतत सोशल मीडियावर सक्रिय राहणं त्यानं कटाक्षाने टाळलं. प्रचंड निगेटिव्ह असणाऱ्या पोस्ट्सकडे त्याने पाठ फिरवली. 

लॉकडाऊनमधून बाहेर पडल्यावर आपलं आयुष्य पहिल्यासारखं जगायचं नाही, त्याकडे नव्या सशक्त दृष्टिकोनातून पाहायचं त्याने निश्चित केलं होतं आणि केलंही तसंच. लॉकडाऊनमुळे डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवेतील तमाम घटकांची किंमत कळाली आयुष्यातील खऱ्या आनंदाचा शोध लागला. फेंग करोनामुक्त तर आहेच खेरीज  डिप्रेशनमधूनही मुक्त झालाय. एका अर्थाने लॉकडाऊनने त्याचं आयुष्य बदलवलं. आधी कठीण वाटणारं लॉकडाऊन संपलं तेंव्हा तो प्रचंड भावुक झाला. एरव्ही त्यानं ठरवलं असतं तरीही तो असं वागू शकला नसता. जगण्याची नवी उमेद त्याला निसर्गाशी अधिक निकट घेऊन गेल्याने लॉकडाऊन अनेकार्थाने जीवनगुरु ठरल्याचं त्याचं मत वरवर अतिशयोक्तीचं वाटेल पण बारकाईने पाहिलं तर लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची भावना जवळपास अशीच असेल यात शंका नाही. 

- समीर गायकवाड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा