गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

दाढीपुराण...

दाढीपुराण समीर गायकवाड

गावाकडे एक म्हण आहे की 'दिसभर इन्जी आन रात्री दाढी पिंन्जी' ! टुकार मोकार माणसाचं इतकं सार्थ वर्णन कुणी केलं नसेल. दाढीवरची कथाधारित हिंदी म्हण तर फार प्रसिद्ध आहे. शालेय जीवनात आपण ती अभ्यासली आहे. अकबराची अंगठी चोरीला गेल्यानंतर त्याच्या स्नानगृहाबाहेरील पाच दाढीधारी सैनिकांवर बिरबलाचा संशय असतो. त्यातला चोर शोधण्यासाठी बिरबल क्लृप्ती लढवतो आणि सांगतो की आलमारीने साक्ष दिलीय की ज्याने अंगठी चोरलीय त्याच्या दाढीत गवताची काडी आहे. हे ऐकताच चोरी केलेला सैनिक नकळत आपल्या दाढीवरून हात फिरवतो आणि बिरबल त्याला अटक करण्याचे फर्मान काढतो. दाढीनेही चोरी पकडता येते याचे हे उदाहरण होय. लबाड राजकारण्यांना चपखल बसणारी 'आत्याबाईला मिशा आल्या कुणी पाहिल्या' अशा अर्थाचीही म्हण आपल्याकडे आहे. खेरीज 'केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा' हा सुविचार आपण अनेकदा वाचलेला आहे. मात्र आताचा काळ या सुविचाराचा नसून 'एकाची जळते दाढी दुसरा तीवर पेटवतो काडी' या म्हणीचा आहे ! असो. आता दाढीचं काहींना अप्रूप वाटत असेल मात्र लोकांनी 'दाढीला कांदे बांधले' की यातली मेख त्यांना कळेल. आजच्या काळात 'ओटी पसरोनि धरितो मी दाढी । नरकांतुनि येकदां काढी' अशी लोकांची अवस्था झाली आहे. तर सरकारे मात्र 'वर दाढी धरून खाली टाच रागडण्यात' मग्न आहेत. विश्व मराठी कोशातली दाढीची माहिती तर थक्क करते.


भारतीय इतिहासात मागोवा घेतला तर लक्षात येते की सिंधूसंस्कृतीच्या काळात हडप्पा परिसरातले पुरुष मधून भांग पाडत आणि कोरीव दाढी ठेवत. म्हणजे आपलं दाढी मिशाकडं लक्ष देण्याचं खूळ जुनंच आहे म्हणायचं. प्राचीन ईजिप्शियन समाजात पुरुषवर्ग दाढी राखत नसे. मात्र प्राचीन ज्यू समाजात मात्र लांबलचक दाढी राखण्याची पद्धत होती. मुहंमद पैगंबरांच्या आदेशानुसार मुस्लिम लोक दाढी राखत परंतु ज्यू लोकांपेक्षा वेगळेपण दाखविण्यासाठी ती योग्य प्रकारे कापत असत. तत्त्वज्ञानी पुरुषाचे वा वीरपुरुषाचे लक्षण म्हणून प्राचीन ग्रीक लोकांत दाढीला प्रतिष्ठा होती. जग जिंकण्याची प्रतिज्ञा केलेल्या अलेक्झांडरने मात्र सैनिकांनी दाढी राखू नये, असा आदेश काढला होता. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकानंतर रोमनांची दाढी राखण्याची प्रथा बंद झाली. दक्षिण भारतातील तिरुपती देवस्थानात ज्याप्रमाणे क्षौर करून दाढी मिशा काढून देवाला वाहिल्या जातात त्याप्रमाणे फार्च्युना बार्बेटा या देवतेला रोमन तरुण आपली पहिली दाढी कापून वाहत. अंत्यविधीचा एक भाग म्हणून प्राचीन ईजिप्शियन आणि रोमन लोक दाढी वाढवीत. उलट ग्रीक लोक ती कापत. रोमन समाजातील प्रथेचा परिणाम रोमन कॅथलिक पुरोहित वर्गावरही झाला, त्यामुळे हा वर्ग दाढी राखत नसे सोळाव्या आणि सतराव्या शतकांत मात्र रोमन कॅथलिक धर्मगुरूंत दाढी राखण्याची प्रथा सुरू झाली पण पुन्हा ती बंद पडली. तथापि ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चशी निगडित असलेले धर्मगुरू दाढी राखत. इंग्लंडमध्ये चौदाव्या शतकानंतर राजकुलातील लोकांत आणि समाजातही दाढी ठेवण्याची प्रथा लोकप्रिय होती.

दाढी सर्वांना प्रिय होती अशातला भाग नव्हता, काहींची मते एकदम विरोधी टोकाचीही होती. रशियात पीटर द ग्रेट याने १७०५ मध्ये दाढी राखणाऱ्यांवर करच बसविला होता. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी दाढी राखण्याची पद्धत पुन्हा लोकप्रिय ठरली. दाढी हे क्रांतिकारक किंवा बंडखोर लोकांचे लक्षण समजले जाई. आपल्याकडेही आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्यासह अनेकांनी दाढी ठेवलेली होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास यूरोपात दाढी राखणाऱ्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. लेखक, कलावंत, विद्वान लोक इत्यादींत दाढी राखणे विशेष लोकप्रिय होते. दाढी राखणारा अमेरिकेचा पहिला अध्यक्ष म्हणजे अब्राहम लिंकन. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून यूरोप–अमेरिकेत दाढीची फॅशन मागे पडली. दाढी राखलेले क्रांतिकारक बोल्शेव्हिक व अराजकतावादी हे व्यंगचित्रांतून सातत्याने चित्रित करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिमी देशांत लेखक, कलावंत आणि विशेषत: ‘बीटनिक’ इत्यादिकांत दाढी राखण्याची प्रथा पुन्हा लोकप्रिय ठरली. इंग्लंडमध्ये व्हिक्टोरियन काळात विशेषतः १८४० ते १८७० च्या दरम्यान झुपकेदार कल्ले ‘मटन चॉप्स’ किंवा ‘पिकॅडिली वीपर्स’ म्हणून ओळखले जात. कल्ल्यांना इंग्रजीत असलेले ‘बर्नसाइड्‌स’ किंवा ‘साइडबर्न्‌स’ हे शब्द अमेरिकन यादवी युद्धातील जनरल अँब्रोझ बर्नसाइड याच्या नावावरून रूढ झाले आहे. हनुवटीवरील त्रिकोणी टोकदार दाढी तिसऱ्या नेपोलियनच्या आदरार्थ ‘इंपीरियल’ या नावाने ओळखली जाई. ऑस्ट्रियाचा सम्राट फ्रांट्‌स जोझेफ याच्या आदरार्थ मिशांमध्ये मिसळून जाणारे झुबकेदार कल्ले त्याच्याच नावाने ओळखले जातात. पुढे पुढे सामान्य नोकरवर्गापुरतीच कल्ले राखण्याची पद्धत मर्यादित झाली. विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांपर्यंत पश्चिमी समाजात छोट्या मिशा राखणे लोकप्रिय होते. सध्याच्या काळात दाढीचं खूळ जगभरात जोमाने फोफावल्याचं दिसून येतं.

भारतातील दाढीमिशाच्या ठेवणीस धार्मिक संदर्भ आहेत. ऋषीमुनी दाढी मिशा राखत. बौद्ध, जैन धर्मात दाढी मिशा राखल्या जात नसत तर शीख धर्मात केसांना पवित्र मानलं गेलं असल्याने डोईचे केस कापले जात नाहीत, दाढीही कापली जात नाही. शिवकाळात दाढी मिशा राखल्या जात. शहाजी,शिवाजी आणि संभाजी राजांनी दाढीमिशा राखल्या होत्या. आजच्या काळात तरुणांमध्ये तशी दाढी ठेवण्याची क्रेझ दिसून येते. मुस्लिम राजवटीत अकबर बादशहा वगळता सर्व सुलतानांनी दाढी राखली होती. आताच्या काळात बिअर्ड स्टाईलची मोठी चर्चा होतेय. विविध सेलिब्रिटींची दाढी निशाण्यावर असते. नोव्हेंबर महिना मुव्हेंबर म्हणजे 'नो शेव्हिंग मंथ' म्हणून पाळण्याचे खूळही बळावले आहे. विराट कोहलीच्या कोरीव दाढीचे चाहते आपल्याकडे खूप आहेत. अमिताभ बच्चन यांची काळी पांढरी दाढीदेखील बरेच काळ चर्चेत होती. बाबा रामदेव यांची साधू शैलीची दाढी लक्ष वेधून घेते. या सेलिब्रिटींच्या यादीत ताजे नाव आपल्या पंतप्रधानांचे आहे. पीएम मोदी यांची २०१४ सालची दाढी आणि आताची दाढी ही विविध राजकीय टप्प्यांचे सूचक असावी अशा पद्धतीने बेतली असावी. त्यांची आताची दाढी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याशी साधर्म्य असणारी आहे. नुकतेच त्यांनी मोरांशी असलेली जवळीक दाखवणारा व्हिडीओ पोस्ट केला तेंव्हा देशभरात त्यांचा नवा अवतार चर्चेत आला. काहींनी तर लगेच त्यांची तुलना आचार्यांशीही केली.

आपल्या दाढीतून आपली परिपक्वता वा आपल्या विचारातील ठोसपणा बिंबवता येतो असं तर्कशास्त्र सांगतं. अगदी प्राचीन ग्रीकांपासून ते आताच्या जेरुसलेममधील परंपरागत दाढीपर्यंत हेच अधोरेखित होतं. याबाबतीत ग्रीक तत्ववेत्ता प्लेटोचं मत महत्वाचं आहे. तो म्हणतो, विचारांशी प्रामाणिक असणारी देहबॊली आणि देहचिन्हे व्यक्तीच्या विकासाचं दार्शनिक ठरतात. व्यक्ती जसजशी परिपक्व होत जाते तसतशी ही प्रतीके दृढ होतात. ती हेतुतः अंगी बाणली गेली तर तो कमकुवतपणा वा दिखाऊपणा ठरतो. कारण ज्या विचारांशी त्यांचं व्यक्तिमत्व मेळ खात नाही ती देहचिन्हे अंगी बाणली तरी कालांतराने त्यातला फोलपणा उघड होतो. हे सर्वांना कळत असतं पण कुणालाच वळून घ्यायचं नसतं. कदाचित म्हणूनच दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं ही म्हण रूढ झाली असावी. यामुळेच बर्‍याच दाढी दीक्षितांची सध्या बरीच चलती आहे आणि त्यात लोकांनाही स्वारस्य आहे. दाढीने काहींचे व्यक्तीमत्व खुलते तर काहींचे खुजेपण लक्षात येते. 'जळो तुझी दाढी परी माझा दिवा लागो' ही याची अखेर असते असं गावकथा सांगतात. हे दाढीपुराण खरेच सुरस आहे.

- समीर गायकवाड






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा