शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

मुन्नाभाई एमबीबीएस - प्रकाशाची अदृश्य ओंजळ..




आमच्या सोलापूरमधील मीना चित्रपटगृहात 2003 साली डिसेंबरमध्ये लागला होता ‘मुन्नाभाई एमबीबीएस’. विधू विनोद चोपडा लिखित निर्मित मुन्नाभाईचे दिग्दर्शन केले होते राजकुमार हिरानीने. संजय दत्त, अर्षद वारसी, ग्रेसी सिंह, बोम्मन इराणी, जिमी शेरगिल, सुनील दत्त आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या मुख्य भूमिका त्यात होत्या. खेड्यातील एका सेवाभावी दांपत्याचा शहरात राहणारा तरुण मुलगा मुन्नाभाई हा अपहरण, खंडणी अशा अवैध धंद्याचा बादशहा असतो, त्याच्या साथीला सर्किट हा त्याचा मित्र अख्ख्या टोळीसह काम करतो. आईवडील भेटीस यायचे कळताच ही मंडळी मुन्नाभाईच्या ठिय्याचं रुपांतर इस्पितळात करत असतात, मुन्ना डॉक्टर आणि बाकीची मंडळी रुग्ण असल्याची बतावणी करत असतात. पुढे जाऊन मुन्नाला खरेच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. त्याच्या बालमैत्रिणीवरील प्रेमापोटी तो तिथे रमतो. तिथल्या बऱ्यावाईट गोष्टींवर आपल्या स्टाईलने व्यक्त होतो. अखेरीस त्याचे बिंग उघडे पडते मात्र त्याच्यातला माणूस त्याच्या वाईटपणावर मात करतो जो सर्वांना भावतो अशी रम्य कथा यात होती. ‘मुन्नाभाई’ देशभरात सुपरहिट झाला तसा सोलापुरातही झाला. मात्र इथे त्यावर पब्लिकने अंमळ जास्त जीव लावला कारण त्यातलं वातावरण, त्यातली माणसं, त्यातलं खुलेपण, जिंदादिल तरुणाई या शहराशी मेळ खाणारी होती. सोलापूरची जडणघडणच अशी झालीय की इतिहासाच्या कोणत्याही टप्प्यावर जाऊन पाहिलं तर इथे निवांतपणा अधिक आढळतो, फुरसत असलेली रिकामटेकडी मनमिळाऊ माणसं खंडीभर दिसतात. इथल्या बोलीत एक तऱ्हेचा रफटफ अंदाज आहे आणि इथली तरुणाई काहीशी बेभान नि आव्हानात्मक वाटते, इथे एक प्रकारचा संथपणा आहे जो माणसाला एकमेकाशी व्यक्त व्हायला भाग पाडतो. श्रमिकापासून ते गर्भश्रीमंतापर्यंतचे लोक इथे असले तरी एक सोलापुरी बेपर्वाई आणि कमालीची आपुलकी इथे सर्रास जाणवते. ‘मुन्नाभाई’मध्ये हे घटक ठासून भरलेले असल्याने इथल्या लोकांनी त्यातल्या पात्रात स्वतःला शोधले तर त्यात नवल ते काय ? असो. फिल्मी मुन्नाभाई संजयदत्तच्या असली आयुष्यातला एक योगायोग इथे सांगावा वाटतो.

‘मुन्नाभाई...’मध्ये एक सीन आहे. सहज म्हणून तपासणी करायला आलेल्या झहीरला (जिमी शेरगील) डॉक्टर सुमन अस्थाना सांगते की, “त्याचं आजारपण साधं नाहीये. त्याला लागलीच भरती व्हावं लागेल, वेळ फार कमी आहे. त्याला पोटाचा कॅन्सर झाला आहे.. " यावर तो हतबल होत विचारतो की 'आणखी किती वेळ आहे माझ्यापाशी ?'
सुमन सांगते की फार वेळ शिल्लक नाहीये, त्याच्या आजाराचं निदान थोडंसं उशिराच झालंय. अंतर्बाह्य हादरून गेलेला झहीर पुटपुटतो, 'गावी जायचंय बहिणीचं लग्न करायचंय, आईला हजला घेऊन जायचंय, फ्लॅट खरेदी करून सेटल व्हायचंय."
झहीरनं आयुष्यभर संघर्ष केलाय. कुठली हौस मौज देखील त्यानं केलेली नसते. तिथून निघताना तो पुरता तळमळून जात सुमनला विचारतो, "या जगात माझ्या वयाच्या मुलांनी ज्या गोष्टी केल्या आहेत त्यातलं मी काहीच केलेलं नाही, कुठलंही सुख उपभोगलेलं नाही. कुठलं व्यसन नाही की कशाचा नाद नाही, कुठल्या मुलीला हातदेखील लावला नाही. सर्व इच्छांचा गळा घोटून नुसत्या खस्ता खाल्ल्या आहेत. मी सगळ्यासाठी झटलोय तरीही हे आजारपण माझ्या वाट्याला का आलं ?"
डॉक्टर सुमन अस्थाना (ग्रेसी सिंह) झहीरच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. ती विमनस्कपणे त्याच्याकडे पाहत उभी राहते. डोळे पुसत काहीशा शोकमग्न संतापानेच झहीर सुमनच्या केबिनमधून वेगाने बाहेर पडतो.

नेमकं त्याच वेळी सुमनला भेटायला आलेला मुन्नाभाई उर्फ डॉक्टर हरिप्रसाद शर्मा (संजय दत्त) हे सर्व मूकपणे ऐकत असतो. तो सुमनला विचारतो की त्याच्याकडे किती वेळ बाकी आहे ? ती सांगते की खूपच कमी वेळ उरलाय. हे ऐकताच मुन्नाभाई तिच्या केबिनमधून बाहेर पडून झहीरच्या मागोमाग धावत जातो आणि बळेच त्याला मिठी मारत “टेन्शन नही लेने का..” म्हणत समजावू लागतो. मुन्नाभाई त्याला विचारतच जातो. शोकमग्न झहीरचा संयम संपतो, तो मुन्नाभाईला खाडकन मुस्काटात लावून देतो. मुन्नाभाई गाल चोळत पाहतच राहतो. 
कालांतराने झहीर तिथे ऍडमिट होतो. झहीरने कधीही न अनुभवलेली तारुण्यसुखे मुन्नाभाई तिथे त्याच्या दिमतीस देतो. मुरलीप्रसादचं वागणं पाहून झहीरला वाटत असतं की अन्य कोणत्या डॉक्टरकडे आपल्या आजाराचा उपाय नाही मात्र या मुरलीकडे जादूची छडी आहे. एक ना एक दिवस तो आपल्याला बरं करेल ! मात्र नियती असं होऊ देत नाही ती झहीरला अकाली आपल्या उदरात घेऊन जाते.

काही दिवसापूर्वी अभिनेता संजयदत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कँन्सर असल्याचं निदान झाल्याची बातम्या माध्यमात झळकल्या होत्या. वाचून मन कळवळलं. त्याच्या आजाराची माहिती देताना डॉक्टरांनी त्याला थेट न सांगता आधी त्याबाबत अप्रत्यक्षपणे अवगत केलं नि मग सत्य सांगितलं.
ही माहिती वाचताच मुन्नाभाई एमबीबीएसमधला झहीरचा हा सीन आठवला. आपल्या आजाराची बातमी कळताच त्याची पहिली प्रतिक्रिया काय असेल ? त्यानंही डॉक्टरांना विचारलं असेल का किती वेळ बाकी आहे माझ्याकडे ? नियतीने त्यालाच निवडल्याबद्दल तो शोकमग्न संतापात बुडाला असेल का ? झहीरच्या आयुष्यात जशी काही कामं बाकी होती तशी संजूच्या आयुष्यातही काही कामं बाकी होती का, त्यांचं त्याला तत्क्षणी स्मरण झालं असेल का ? डॉक्टरांच्या केबिनबाहेर आल्यावर त्याला कुणी जादू की झप्पी दिली असेल का ? हॉस्पिटलबाहेर आल्यावर आई नर्गिस आणि वडील सुनीलदत्त यांचा गंध वाऱ्यावर वाहत आला असेल का ? त्यांचा आवाज वा त्यांचा तो हवाहवासा स्पर्श जाणवला असेल का ? की पैलतीरावरच्या त्यांच्या धुरकट प्रतिमा त्याच्या डोळ्यासमोर तरळल्या असतील का ? हेलावून टाकणारे हे सवाल होते. उगाच डोळ्यात पाणी तरळले. साला हे खूप वाईट असतं. आपण अमुक दिवसांनी मरणार हे माहिती असताना हसतमुखानं त्याला सामोरं जाणं ही काळजाची अखेरची आणि सर्वोच्च कसोटी असते. संजूचे पुढे काय होईल याचे तेंव्हा नेमके उत्तर कुणापाशीच नव्हते, त्याच्या प्रकृतीस आराम पडावा इतकं तर सारेच म्हणू शकले. काही महिन्यांनी बातम्या आल्या की विदेशात घेतलेल्या आधुनिक उपचारानंतर त्याला आराम पडला.

माणूस चांगला असो की वाईट, त्याचा पूर्वेतिहास कसाही असला तरी त्याची अखेर सुखकारक व्हावी अशी मनोवृत्ती ठायी असावी. तो कुणाचा तरी पती असतो, बाप असतो, भाऊ असतो आणि नालायक का होईना पण पोरगा असतो, त्यांच्यासाठी त्यानं छानसं जगावं आणि जगणं समृद्ध व्हावं अशी अपेक्षा असण्यात गैर नाही. काही प्रश्न अनुत्तरित असतात त्याची उत्तरे आपण आपल्या अन्वयार्थाने शोधू पाहतो तरीही त्यांचा परीघ भिन्न येतो आणि आपण अंधाराच्या कोनाड्यात तळहातांची ओंजळ करून प्रकाशाला जपत राहतो. आपल्यातल्या ‘मुन्नाभाई’ची मानवता जिवंत असल्याचे ते प्रतीक असते !

- समीर गायकवाड


मुन्नाभाई एमबीबीएस
   



२ टिप्पण्या: