सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

'नारी आत्मसन्मान' खरेच हवाय का ?..


विख्यात मानसशास्त्रज्ज्ञ सिग्मंड फ्रॉईड यांनी एकदा मनोविश्लेषणाच्या अभ्यासासाठी समान वयाच्या, समान सामाजिक श्रेणीच्या पुरुषांचे दोन गट केले होते. त्यांच्या समोरील स्क्रिनवर काही वाक्ये दाखवली जातील आणि त्यांनी ती वेगाने वाचून दाखवायची असा तो प्रयोग होता. फ्रॉईडनी प्रयोगाचा हिस्सा म्हणून पुरुषांच्या एका गटात अग्रणी (मॉनिटर) म्हणून साजशृंगार केलेल्या एका देखण्या तरुण स्त्रीला अत्यंत उत्तान वेषभूषेत पाठवलं. वाचनाचा प्रयोग सुरु झाला. अगदी साधी वाक्ये त्यांनी दिली होती. जसे की एक गोड केक, आम्ही केस धुतो, वेगाने जाणारी कार इत्यादी. मात्र यांचं वाचन करताना बऱ्याच जणांनी चुका केल्या. काहींनी सांगितलं की एक गोड स्तन, एक गोड लिंग, आम्ही नग्न होतो, वेगाने जाणारी तरुणी इत्यादी. पुरुषांच्या ज्या गटात ललना शिरली नव्हती तिथेही काही चुका झाल्या होत्या मात्र त्या सेक्सशी वा स्त्रीजाणिवा विषयक नव्हत्या हे निरीक्षण त्यांनी नोंदवलं. ज्या पुरुषांनी उच्चारात चुका केल्या होत्या त्यांच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास करताना त्यांना आढळलं की काहींच्या स्त्रीविषयक जाणीव सन्मानजनक नाहीत तर काहींच्या स्त्रीविषयक जाणिवा सेक्सपुरत्या मर्यादित आहेत तर काही पुरुष केवळ स्त्रीलंपट होते, तर काही खरेच प्रेमळ होते. यात ज्यांनी हिंस्त्र शब्द वापरले त्यांचं वैयक्तिक मानसिक आरोग्य ठीक नव्हतं आणि सामाजिक परीघ विस्कटलेला होता. फ्रॉईडचा हा प्रयोग आजही बोलका आहे. हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे आजची एक घटना.

आज पंजाबमध्ये काही महिलांनीं एकत्र येऊन आंदोलन केलं. त्यांचा मुद्दा होता की कुठेही काहीही झालं तरी सोशल मीडियावरचे यूजर्स महिलांना मोठ्या प्रमाणात टारगेट करतात आणि अर्वाच्च अश्लिल भाषेत शिव्यांची लाखोली वाहतात. या स्त्रिया कुठल्याही एका पक्षाच्या वा संघटनेच्या नव्हत्या. फेसबुकवर नोटिफिकेशन पाठवून त्या एकत्र आल्या होत्या. त्यांचं मत महत्वाचं वाटलं, त्या म्हणतात - "आम्ही जन्मापासूनच लिंगभेदाचे टोमणे खात जगत असतो. अत्यंत नेटाने शिक्षण पूर्ण करावे लागते, सर्व महिलांना समान संधी मिळत नाही. काहीजण विवाहपश्चात नोकरी करतात तर काही गृहिणी राहतात. मात्र आमचा आत्मसन्मान आम्ही अत्यंत संघर्ष करून मिळवलेला असतो. त्याच्या अशा प्रकारे सार्वजनिक चावडीवर चिंधड्या उडालेल्या आम्हाला सहन होणार नाही. कुठल्याही पोस्टवर महिलांना शिव्यागाळी करणाऱ्या वा त्यांचं खच्चीकरण करणाऱ्या स्त्रियांना आत्मसन्मान मिळालाच पाहिजे."
मला ही घटना महत्वाची वाटते. ही जागृती कणभराची असली तरी हिला विशाल रूप प्राप्त झाल्यास सोशल मीडियाच्या व्यावसायिक आणि अहंकारी मालकांना यावर वेसण घालावीच लागेल.

स्वीडनमध्ये याच अनुषंगाने एक अभ्यास करण्यात आला होता. त्याचा निष्कर्ष असा होता की जे पुरुष युजर्स महिला युजर्सच्या गराड्यात असतात किंवा महिलांच्या भवती रुंजी घालतात, ते अकारण लाळघोटेपणा करत असतात, स्तुतीची एकही संधी ते सोडत नाहीत. त्याच वेळी अनोळखी महिला युजर्सशी यांचा पंगा पडला की सगळं स्त्रीदाक्षिण्य केराच्या टोपलीत टाकून तिचा उद्धार करण्यात ते कसर बाकी ठेवत नाहीत.

आपल्याकडील स्त्रिया हे धारिष्ट्य दाखवतील का ? यासाठी फार काही करावं लागणार नाही. संपर्कांतल्या ग्रुप्समधील काही महिला एकत्र येऊन वा फेसबुकवर आवाहन करून एकत्र जमता येतं. वारंवार आईबहीण काढणाऱ्या आणि अर्वाच्च शब्द वापरणाऱ्या गुणीजणांचे स्क्रीनशॉटस सोबत घेऊन नुसता एकदा दरवाजा तर खटखटायचा आहे.
अनलॉक थ्री मध्ये दक्षिणेकडील काही सेक्सवर्कर महिलांनी एकत्र येऊन चेन्नै पोलिसांत तक्रार देण्याची हिंमत दाखवली आहे. धंदा बंद झाल्यानंतर आपआपल्या घरी परत गेलेल्या काही महिलांना गावोगावी गल्लोगल्ली अपमानजनक टिप्पणी सहन करावी लागत होती. वसुधा कट्टीने या बायका गोळा केल्या आणि मौखिक वीर्यस्खलन करणाऱ्यांना चाप लावला.
आत्मसन्मानाच्या जाणीवा प्रखर असल्या की मार्ग सापडतोच !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा