बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

कृष्णशोध...



रामायणात एक कथा आहे. श्रीराम आणि लक्ष्मण गंगा नदी पार करतात तेंव्हाचा तो प्रसंग आहे. नदी पार करून नावेतून उतरल्यावर नावाड्याच्या लक्षात येतं की रामचंद्रांच्या स्पर्शाने आपली नाव सोन्याची झाली आहे. तत्क्षणीच त्याच्या मनात एक विचार येतो. तो धावतच आपल्या घरी जातो. काही वेळातच आपल्या पत्नीसह घरातल्या सर्व लहान मोठ्या जिनसा तिथे घेऊन येतो आणि प्रभू रामचंद्रांना विनंती करतो की त्यांनी त्या वस्तूंना स्पर्श करावा. श्रीराम त्याच्या इच्छेचा आदर करतात आणि स्पर्श करतात. त्या सर्व वस्तू सोन्याच्या होतात. हे पाहून लक्ष्मणास विस्मय वाटतो. काहीशा विशादानेच तो त्या नाविकास म्हणतो, तुला त्यांच्या स्पर्शाचा खरा अर्थच कळला नाही, नाहीतर तू त्यांना आपल्या घरी नेलं असतंस आणि आपलं घरच त्यांच्या स्पर्शाने पावन करून घेतलं असतंस. तात्पुरत्या भौतिक सुखाचीच तू अपेक्षा केलीस आणि महत्वाचं सुख तू गमावून बसलास !


लोकांचं असंच असतं. देव्हाऱ्यातील वा मंदिरातील देवाला ते आवाहन करत राहतात, त्यांना नानाविध गोष्टी मागत राहतात मात्र त्यांना वा त्यांच्या विचारांना ते अंतःकरणात स्थान देत नाहीत. गीतेच्या चौथ्या अध्यायात अकराव्या श्लोकात भगवान कृष्ण अर्जुनास उपदेश करताना म्हणतात, "ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् । मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः " अर्थात आपण ज्याला कशालाही स्पर्श करू वा जो काही विचार करू, आपली ज्या भावनांना वश होत जे काही मागू ते सर्व काही कृष्णच आहे ! 

लोक धन मागतात, यश किर्ती लौकिक मागतात, कांहीजण आरोग्य आयुष्य संतती संपत्ती ज्ञान ही मागतात मग त्यांच्या साधनेनुसार व कर्मानुसार त्याची प्राप्ती होते मात्र लोक कृष्ण मागत नाहीत. त्याला आपल्या अंतःकरणात जागा देत नाहीत. कृष्णमय झालं की सर्वप्राप्ती होतेच. काहीजण हे ही करतात तरीही त्यांना कृष्णप्राप्त होत नाही, कारण स्वतःच्या आनंदासाठी कृष्ण मागणं वा कृष्णमय होणं याला अर्थ नाही. इतरांच्या आनंदासाठी कृष्णमय व्हायचं असेल अशा साधकांनी कृष्ण मागितला तर त्याला त्याची प्राप्ती जरूर होते. 
अशांनाच गोप म्हटलं जातं. गोपायते य: स: गोप:। ! आपण काय व्हायचं आणि काय मागायचं हेच ज्यांना ठाऊक नसतं त्यांना ना कर्मातून मुक्त होता येतं ना भगवंताची प्राप्ती होते !

दुर्दैवाने आजच्या काळात तर सारंच कठीण होऊन बसलं आहे. बहुतेकांच्या श्रद्धा, आस्था केवळ धार्मिक, दैविक प्रतिकातच चिणल्या जाताहेत त्याला अध्यात्मिक अधिष्ठानाची शून्य बैठक दिसते. अशा काळात खऱ्या कृष्णाची वा खऱ्या देवत्वाची नेमकी जाणीव होणे गरजेचे आहे. अखेर कृष्ण म्हणजे तरी काय ? 

कृष या धातूचे दोन अर्थ होतात एक म्हणजे शेती करणारा आणि दुसरा अर्थ म्हणजे आकर्षून घेणारा ! जो मातीवर प्रेम करतो आणि सकल चराचराला आपल्या भवती आकर्षित करतो तोच तर कृष्ण आहे, जो आपल्या ठायी ही आहे मात्र तो कधी आपल्याला कळलाच नाही. एकट्या राधेला हा कृष्ण कळला म्हणून तर ती कृष्णमय झाली. सत्यभामा आणि रुक्मिणी कृष्णाने लावलेल्या पारिजातकाच्या वृक्षाच्या मालकीवरून भांडत बसल्या आणि कृष्णाने मात्र स्वतःला राधेच्या अंतःकरणात रोवलं ! आजही आपण राधेकृष्ण म्हणतो ते उगाच नाही !


महाभारतात श्रीकृष्णांनी एक इशारा दिला होता त्याचा आधार घेत कवी रामधारी सिंह दिनकर यांनी कृष्ण की चेतावनी ही प्रसिद्ध कविता लिहिली होती त्यातील पंक्ती बोलक्या आहेत. अखेर कृष्ण म्हणजे तरी काय याचा शोध घेण्यासाठी फार दूर जावं लागत नाही. आपल्या मनातच त्याचं उत्तर दडलेलं असतं पण आपण मनाच्या गाभाऱ्यात उतरतच नाही !

‘अम्बर में कुन्तल-जाल देख,
पद के नीचे पाताल देख,
मुट्ठी में तीनों काल देख,
मेरा स्वरूप विकराल देख।
सब जन्म मुझी से पाते हैं,
फिर लौट मुझी में आते हैं।... '

कृष्णाचा शोध घेण्यासाठी दूर कुठं जावं लागत नाही हे किती सुखावह आहे ना ?
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा