आतंकवादी संघटनांची नावे बदलतात, त्यांचे म्होरके बदलतात मात्र वृत्ती तशीच राहते. आयसीसचा म्होरक्या मरण पावल्याने ती संघटना खिळखिळी झाली असली तरी मूळ प्रश्न सुटले का याचे उत्तर नाही असेच येते. मागील वर्षभरातील मध्यपूर्वेच्या आर्थिक संशोधन अहवालानुसार बहुतांश सीरियन अतिरेक्यांचे पैसे लेबॅनॉनची राजधानी बैरुतमध्ये सुरक्षित आहेत. सीरिया हा मध्य-पूर्वेतील महत्वाचा तेलसंपन्न देश आहे. सीरियाच्या पश्चिमेला लेबॅनॉन व भूमध्य समुद्र, उत्तरेला तुर्कस्तान, पूर्वेला इराक, दक्षिणेला जॉर्डन व नैर्ऋत्येला इस्रायल आहे. दमास्कस ही सीरियाची राजधानी असून देशातील ते सर्वात मोठे शहर आहे. तर लेबॅनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबॅनॉनला समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबॅनॉनची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबॅनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व 1550 ते इ.स.पूर्व 543 दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व 64 मध्ये लेबॅनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरूवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरूवात केली. इ.स. 1516 ते इ.स. 1918 ह्या दरम्यानच्या 400 वर्षांच्या काळात लेबॅनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी (देव्लेत-ई-ऍलीये-ई-ओस्मानिये : मराठीतला शब्द - ऑटोमन साम्राज्य) साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबॅनॉनवर 1920 ते 1943 दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. 22 नोव्हेंबर 1943 रोजी लेबॅनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. 1946 साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबॅनॉनमधून बाहेर पडले.
स्वातंत्र्यानंतर लेबॅनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. 1975 ते 1990 दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबॅनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गृहयुद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरींनी लेबॅनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. 2005 मधील हरिरींच्या हत्येनंतर लेबॅनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबॅनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. लेबॅनॉन कमकुवत झाल्याचे पाहून 1982 मध्ये इस्त्राईलने संधी साधत आक्रमक हल्ले चढवले. याची परिणती कडवट आणि मुलतत्ववादी हिझबुल्ला या संघटनेच्या जन्मात झाली. हिझबुल्ला (अरबी: حزب الله) ही पश्चिम आशियाच्या लेबेनॉन देशामधील एक ज्यूविरोधी शिया अतिरेकी संघटना व राजकीय पक्ष आहे. इस्रायलच्या हल्ल्यानंतर काही मुस्लिम धर्मगुरूंनी इराणच्या पाठिंब्यावर याची स्थापना केली. 2006 साली हिझबुल्लाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबॅनॉनची पुन्हा पडझड झाली. हिझबुल्ला समर्थकांची विशेष रणनीती होती. ते लढवय्ये व कडवट राष्ट्रवादी मुलतत्ववादी शिया होते. त्यांच्या रणनीतीवर संशोधन करून जोशुआ ग्लेस यांनी 'विथड्रॉइंग अंडर फायर : लेसन्स लर्न्ड फ्रॉम इस्लामिस्ट इन्सर्जन्सीज' हे पुस्तक लिहिले आहे. डिसेंबर 2011 मध्ये ते प्रकाशित झालेलं आहे. सप्टेंबर 2011 च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील इस्लामिक मुलतत्ववाद्यांचा सिनेरिओ कसा बदलला आणि इस्लामिक विद्रोही फुटीरतावादी यांचा आकृतीबंध कसा बदलत गेला याविषयीचं भाष्य यात आहे. शस्त्रसज्ज इस्लामी विद्रोही (इन्सर्जन्ट) संघटनांशी लढताना जगभरात विविध ठिकाणी कशी आणि का माघार घ्यावी लागली या अनुषंगाने हे भाष्य येते. या संदर्भातल्या जगातील मुख्य सहा मुख्य घटनांचा आढावा त्यांनी पुस्तकात घेतला आहे.1920 मधली ब्रिटीशांची इराकमधली माघार, 1962 मधील फ्रेंचांची अल्जेरियातील माघार, 1989 अफगाणीस्तानातून रशियाची माघार, 1994 मधली अमेरिकन सैन्याची सोमालियातून माघार, 2000 साली इस्राईलची लेबॅनॉनमधून माघार आणि 2005 सालची इस्त्राईलची गाझा पट्टीतली माघार यावर सटीक विवेचन आहे.
आपल्याकडील उजव्या विचाराच्या लोकांना इस्त्राईलच्या कडवट राष्ट्रवादाचे आणि त्याआडून सुरु असलेल्या इस्लामविरोधाचे खूप आकर्षण असते. सर्वाधिक मारक क्षमता आणि खुन्नस असलेल्या इस्त्राईलने देखील लेबॅनॉन आणि गाझा पट्टीतून सैन्य माघारी घेऊन तिथला ताबा सोडून दिला. इस्त्राईलला असं का करावं लागलं याचं विश्लेषण करताना लेखक जगभरातील ज्यूंच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरील इस्त्राईलच्या दृष्टिकोनाचं आणि इस्त्राईलच्या आयसोलेशनच्या भीतीचं लॉजिक मांडतात. या पुस्तकातील सहाव्या प्रकरणाच्या प्रारंभी इस्त्राईल डिफेन्स फोर्सेसच्या (IDF) वतीने लेबॅनॉनमधील सैन्यमाघारीचं कारण देताना एक महत्वाचं वक्तव्य केलं गेलं त्याचा दाखला देण्यात आलाय. त्यात म्हटलंय की, "अतिरेकी वा कर्मठ इस्लामी मुलतत्ववादयांच्या कडून होणाऱ्या हल्ल्यांना दहशतवादी म्हणून ट्रीट करण्याऐवजी परंपरागत सैन्यदले म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. कारण आपली ताकद ही आपल्या पोलीस दलात नसून सैन्यदलात असते, तिथे तोफखाना असतो, हवाई दल असतं, हेलिकॉप्टर्स असतात. त्यांचाच वापर केला पाहिजे. मग पोलीस दले त्यांना असलेलं समाज रक्षणाचं काम करतील." या म्हणण्याचा अर्थ असा होता की लेबॅनॉनवर ताबा ठेवण्यासाठी आपण आपली यंत्रणा तिथं राबवत आहोत आणि हे हल्लेखोर काही केल्या सरळ होत नाहीत. त्यांच्याशी मुकाबला करण्यासाठी स्थायी स्वरुपात सैन्य तैनात न करता घटनेनुसार सैन्यदलाची आयुधे वापरली पाहिजेत आणि पोलिसांना गृहरक्षणाचंच काम दिलं पाहिजे. हेजबोल्लाह या अतिरेकी संघटनेने आखलेली नागरीवस्त्यातून आक्रमण करण्याची नीती मोडून काढण्यासाठी इस्त्राईलला आधी लेबॅनॉनमधून माघार घ्यावी लागली याकडे लेखक लक्ष वेधतात. हिझबुल्ला समर्थकांनी गल्लीबोळातून, टेकड्याआडून आणि समुद्रतटावरूनही इस्त्राइली सैन्यास इतका कडवट प्रतिकार केला की संपूर्ण जगात शस्त्रसज्ज आणि प्रखर आक्रमक म्हणून ख्यातनाम असणाऱ्या इस्त्राईलला आपलं सैन्य माघारी घ्यावं लागलं.
सीरिया सुन्नीबहुल असूनही त्यांचे लेबॅनॉनशी सख्य होते त्याचे श्रेय लेबनीज संविधानातील सर्वधर्मीय समावेशक तरतुदीला जाते. इराण शियाबहुल आहे तर शियाबहुल असूनही सुन्नी शासकांच्या हाती इराकची राज्यसत्ता होती. तेलसमृद्ध बलाढ्य सौदी अरेबियाने केवळ स्वार्थी भूमिका ठेवत छुप्या शियाविरोधास बळकटी दिली. सौदीने कधीही पॅलेस्टाईन, लेबॅनॉन, सीरियास पाठबळ दिले नाही हे आवर्जून नमूद करण्याजोगे होय. लेबॅनॉन होरपळत असताना त्यास उघड मदत फक्त इराण आणि सीरियाने केली मात्र त्याचवेळी आर्थिक शोषणही केलं. इतक्या सर्व नकारात्मक बाबीतून हे राष्ट्र पुन्हा उभं राहिलं मात्र तडफदार पंतप्रधान रफिक हरिरी यांची 2005 साली हत्या झाली आणि राष्ट्रशकट पुन्हा दिशाहीन झाले. काल राजधानी बैरुतमध्ये प्रचंड मोठा स्फोट झाला. पंतप्रधान हसन दियाब यांनी यावर खुलासा केलाय की वेअरहाऊसमध्ये साठवल्या गेलेल्या 2750 टन अमोनियम नायट्रेट या स्फोटक ज्वालाग्राही पदार्थाचा विस्फोट झाल्याने ही घटना घडली आहे. पहिल्या स्फोटाचे कारण शोधले जाऊन दोषींना कठोर शासन केलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. वरवर हा एक अपघात वाटेल वा काहींना हा घातपात ही वाटेल मात्र एका गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ते म्हणजे उद्या ६ ऑगस्ट रोजी लेबॅनॉनमधील सर्वात लक्षवेधी खटल्याचा निकाल आहे. रफिक हरिरी यांच्यावरील हल्ल्याचा निकाल उद्या लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर या घटनेला वेगळी छटा मिळते. आत्मघातकी ट्रकबॉम्बची टक्कर घडवून आणून हरिरी यांची हत्या करण्यात आली होती, विशेष बाब म्हणजे या हल्ल्याचा शोध घेऊन चार हिझबुल्ला समर्थकांना अटक करण्यात आली होती. गेली दीड दशके त्याची सुनावणी सुरु होती आणि उद्या त्याचा निकाल आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या वर्णनानुसार वेअरहाऊसला मालवाहू वाहन धडकावण्यात आले होते. हरिरी यांनाही असेच संपवण्यात आलं होतं. या घटनेमागे जर असं काही असल्याचं सिद्ध झालं तर ते मध्यपूर्वेच्या अशांततेत भर घालणारे ठरेल !
- समीर गायकवाड
आम्ही असे पहिले आहे कि अनेकजण ब्लॉग सुरु करतात. परंतु नियमित लिहिणे शक्य होत नसल्यामुळे काही कालावधीनंतर ब्लॉग लिहिणे बंद होते. त्यामुळेच आम्ही webster developer ने 'आम्ही साहित्यिक, आम्ही कलावंत' हे वेब पोर्टल सुरु केले आहे आहे. पूर्णतः भारतीय बनावटीच्या या तुम्ही तुमचे अकाउंट ओपन करू शकता, तुमचे विचार मांडू शकता. कविता, राजकीय विचार लिहू शकता. इतकेच नव्हे आर्ट मॉलच्या माध्यमातून तुम्ही तुमची प्रकाशित पुस्तके, चित्रे व अन्य कलाकृती विकू शकता.
उत्तर द्याहटवाआपल्या मताचे स्वागत आहे ..
हटवा