गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

तुमच्यात मी दुर्गेला पाहतो... - 'रेड लाईट डायरीज'मधल्या दुर्गा...



धवल भगवा ... २९-३०/०९/२०१९
सोशल मीडियाच्या आभासी जगातल्या नटलेल्या, सजलेल्या आणि कथित तृप्तीच्या रंगात न्हालेल्या स्त्रियांचे नवरात्रीच्या नवरंगातले फोटो दिसून येतात. या फोटोत आणि या स्त्रियांत खऱ्या भारताचे प्रतिबिंब दिसते का ? या प्रश्नावर माझे उत्तर नाही असे आहे. असो...
नवरात्रीच्या कथित रंगशृंखलेत आजचा रंग केशरी आहे आणि उद्याचा रंग शुभ्रधवल आहे,
हे दोन्ही रंग या एकाच फोटोत आहेत.
फोटोतल्या सगळ्याच जणी देवदासी आहेत...
परंपरा, प्रथा हे आपले दाखवायचे दात आहेत, खरे दात तर मनमुराद शोषणाचे आहेत.

टिप - माझे मत अनेकांना अमान्य असू शकते, त्यात वावगं काही नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ! .. असो .. मुळात नवरात्रीच्या नऊ रंगाच्या साड्यांची कल्पना हीच बाजारू दृष्टीकोनातून माथी मारली गेलीय परंतु त्या फोल कल्पनेने आता रूढीचे स्थान मिळवले आहे ही बाब भूषणावह खचितच नाही...

________________________________________




आजचा रंग लाल... ०१/१०/२०१९
फोटोत दिसणाऱ्या माझ्या बहिणीचं नाव आहे बंडव्वा (मराठीतलं बंदव्वा).
सांगलीच्या रेड लाईट एरियात एक अनोखी शाळा भरते, जी वेश्यांसाठी वेश्यांकडून चालवली जाते.
दचकलात ना !
होय इथं शाळा भरते, बंडव्वा ही शाळा घ्यायची !
सकाळचं सगळ्यांचं आवरून सावरून झालं की शाळेची घंटा वाजते,
"इतनी शक्ती हमें देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना.. "ही प्रार्थना एकसुरात गायली जाते.
जमेल त्या पद्धतीने उच्चार होतात पण प्रार्थनेमागची भावना अंतःकरणातून आलेली असते.

बंडव्वाच्या शाळेत खूप वर्ग नाहीत की सिमेंटची भव्य आलिशान इमारत नाही. एका फळकुटाच्या खोलीतल्या वर्गात तिची शाळा भरते.
इथं शाळा सुरु केल्यावर अनेकांनी बंडव्वा यथेच्छ टवाळी केली, या बायकांना शिकून काय करायचंय ? धंदा करणाऱ्या बाईने धंदा शिकून घ्यावा, बाकी ज्ञान घेऊन तिला काय साध्य होणार असे कुत्सित प्रश्नही लोकांनी विचारले. पण माझी बंडव्वा बधली नाही, तिने नेटाने आपला उपक्रम सुरु ठेवला.

लोकांच्या टवाळकीला बंडव्वा उत्तर द्यायची, या बायकांना एसटी स्टॅन्डवर किंवा रेल्वे स्टेशनवर गेल्यावर किमान गावांची नावं वाचता यायला हवीत, कारण यांनी कुणाला माहितीसाठी प्रश्न विचारले की लोक लगेच यांच्या लुगड्यात हात घालायला बघतात. स्थळ, काळ, वेळ याचं लोकांना भान नसतं. पण यांना किमान आपल्या मर्जीप्रमाणे झोपण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्यासाठी थोडं का होईना लिहिता वाचता आलं पाहिजे.

बंडव्वा सांगायची की या बायकांना आपल्या बँक खात्यात किती पैसे आहेत हे जाणता आलं पाहिजे, किमान आकडेमोड आली पाहिजे. मोजकं इंग्रजी आलं पाहिजे. एखाद्या गंभीर प्रसंगी पोलिसात वा न्यायालयात आपला जबाब देता आला पाहिजे, महत्वाचे शब्द माहिती पाहिजेत !

बंडव्वाकडं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी वेश्यांना कशाचीही अट नाही. तिच्या विद्यार्थिनी सर्व वयोगटाच्या आहेत.
१९ वर्षाच्या पूजाला एक मुलगा आहे जो पक्षाघाताच्या आजाराने ग्रस्त आहे. तिच्या घरी आणखीही समस्या आहेत, या सर्वांवर मात करण्यासाठी ती लाईनमध्ये आलीय, तिला बंडव्वाचा मोठा आधार वाटतो.
शारदाला मराठी येत नाही, ती गुलबर्ग्याहुन आलीय तिला बंडव्वाची शाळा आवडते. तोडकं मोडकं मराठी आणि इंग्रजी शिकून ती पुन्हा कर्नाटकात जाणार आहे. व्यवहार करण्यासाठी ती पूर्वी अंगठा वापरायची आता सही करते ! याचं क्रेडिट ती बंडव्वाला देते.
उत्तर पूर्वेच्या राज्यातून आलेली पूजा तिच्या कुटुंबाच्या शोधात आलीय, तिला आणखी शिकून एखादी पार्टटाइम नोकरी करायची आहे.

बंडव्वाकडे काही देवदासीही शिक्षणासाठी येतात हे विशेष होय. इथल्या बायका स्थानिक मदतीशिवाय आणि शासकीय योजनांच्या कुबड्याशिवाय जगतात, त्यांना सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे असुरक्षितता आणि अनारोग्य. बंडव्वा त्यासाठीही काम करतेय.

बंडव्वाने तिच्या शाळेसाठी काही शैक्षणिक साहित्य, प्रशिक्षित शिक्षिका पुरवावी अशी मागणी करून आठेक वर्षे उलटून गेलीत पण अजूनपर्यंत तरी तिचा आवाज कुणाच्याच कानी पोहोचला नाही.

बंडव्वा लाईनमध्ये कशी आली याची कथा हृदयद्रावक आहे, धंदा करताना तिची कशी ससेहोलपट झाली हे ऐकवत नाही. आपला काळाकुट्ट भूतकाळ विसरून आपल्या सहकारी पोरीबाळींच्या जीवनात प्रकाशाचा एक कवडसा तरी यायला हवा यासाठी ती धडपडत राहायची.

सांगलीची अनेक माणसं प्रसिद्ध आहेत, अनेक स्थळं प्रसिद्ध आहेत, काही वस्तूही प्रसिद्ध आहेत पण माझ्या बंडव्वाला प्रसिद्धी दिली नाहीत तरी चालेल पण तिची उपेक्षा तरी होऊ देऊ नये...

बंडव्वा मला तुझा अभिमान वाटतो, आता तू हयात नसलीस तरी मी तुझ्यात दुर्गेला पाहतो !

एडीटेड मजकूर - काहींनी कमेंट करून तर काहींनी इनबॉक्समध्ये विचारणा केल्यानं तर काहींनी फोन करून विचारल्यानं खुलासा करतोय - तिथे पैशांची मदत नकोय, किंबहुना माझ्या अनेक पोस्ट्समधून रोख आर्थिक मदतीस मी विरोध दर्शवला आहे. तिथे बेसिक निकड शिक्षिकेची आहे जी त्या भागात येऊन शिकवू शकेल. मागे ही शाळा या वस्तीबाहेर नेली तर त्या रहिवासी भागातील लोकांनी आमचा एरिया खराब करता का म्हणत तिला तिथून हुसकावून लावलेलं. या भागात इथं येऊन शिकवण्यास फारसं कुणी उत्सुक राहत नाही. पाटी, पेन्सिल, वह्या, फळा आणि खडू यावर तिची शाळा चालते. नवरात्रीनंतर मी तिच्या शाळेकडे जाणार आहे. आता ती हयात नसली तरी तिची शाळा सुरू आहे . तिथे शैक्षणिक वस्तुस्वरुपात काही हवं असल्यास मी तसं कळ्वेन. अगत्यानं विचारल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.
________________________________________


आजचा रंग निळा .... ०२/१०/२०१९
सोबतच्या फोटोत दिसणारी मुलगी कंवरबाई आहे.
तिचं मुळचं नाव अनिता. ती मध्यप्रदेशातील शिवपूरीची आहे. बंचरा या भटक्या जमातीत तिचा जन्म झालेला.
या जातीत एक प्रथा पाळली जाते, घरातील थोरल्या स्त्रीने घर नीट चालावे म्हणून बाहेरख्याली व्हायचं.
त्यासाठी या बायकांचा रीतसर बाजार भरतो.
अगदी स्टॅम्पपेपरवर करारपत्र होऊन यांची विक्री केली जाते. दहा रुपयापासून ते दहा हजार रुपयांपर्यंतची बोली लागते आणि एका वर्षासाठी त्या बाईचा पाट लावून दिला जातो. थॊडक्यात एका वर्षाचा नवरा करून घ्यावा लागतो.

वर्ष पूर्ण होताच तो पुरुष तिला सोडून देतो मग ती पुन्हा बाजारात उभी राहते, पुन्हा तिची बोली लागते. चुकून एखाद्या वर्षी तिची बोली लागलीच नाही तर तिचा सख्खा भाऊ किंवा तिचा जन्मदाता बाप तिचा दलाल बनतो आणि तिला पुरुष सहवास घडवून आणतो.
जोवर तिची मासिक पाळी बंद होत नाही तोवर ती याला नकार देऊ शकत नाही, ती भाकड होऊन बिनकामाची झाल्यावर तिची जागा दुसऱ्या ज्येष्ठ स्त्रीला / मुलीला घ्यावी लागते. मग ती मुलगी असू शकते, सून असू शकते वा रक्ताच्या नात्यातली आणखी कुणीही असू शकते.

मध्यप्रदेशातील मंदसौर, नीमच आणि रतलाम या तिन्ही जिल्ह्यात या मुलींचं रीतसर बोभाटा करून शोषण होतं, ज्याला स्टॅम्पचा आधार घेतला जातो !
आपल्या देशातील हायवे सेक्सचा ट्रेंड आणि हायवे ह्युमन ट्रॅफिकिंगचे जनकत्व रतलाम नीमच हायवेवर चालणाऱ्या सेक्सवर्किंगला द्यावं लागतं, ज्याला कारणीभूत ही किळसवाणी प्रथा आहे. बोली न लागलेल्या मुली सर्रास नीमच रतलाम हायवेवर उभ्या पाहायला मिळतात, तेही अगदी स्वस्तात !

ही प्रथा बंद व्हावी म्हणून आजवर अनेकांनी व्यक्तिगत पातळीवर तर काही एनजीओंनी संस्था स्वरूपात तक्रारी करून पाहिल्या. प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्यात आलं, पण एकही पीडित स्त्री आजवर तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही हे वास्तव आहे.

१९९८ मध्ये 'निर्मल अभियान' या मोहिमेअंतर्गत बंचरांच्या वसाहतींना वेढा घालून काही अल्पवयीन मुली ताब्यात घेण्यात आल्या होत्या ज्यांनी आपल्याला जबरदस्तीने डांबून ठेवल्याची तक्रार देण्यास संमती दर्शवली होती. या मुलींना पुढे वसतीगृहात ठेवलं गेलं, पण नंतर जे व्हायचं होत तेच झालं.
२०१४ मध्ये यांच्यवरची आजवरची सर्वात मोठी पोलीस कारवाई झाली ज्याचा परिणामस्वरूप हायवेवरील सेक्सदेखील तब्बल सहा महिने बंद पडलं, पण पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' सुरु झालं.

मुळात ही प्रथा बंद व्हावी अशी कोणत्याही राजकीय पक्षाची तीव्र इच्छा नाही, कारण बिस्तर गरम करायला स्वस्तात निर्धोक माल मिळत असेल तर कोण सोडेल ? आणि कुठला राजकीय पक्ष यापासून दूर आहे, कुणीच नाही. उलट राजकीय पक्षांचे पाठबळ असलेले सेक्सवर्कींगमधले दलाल आणि या मुलींचे आप्तेष्ठ यांचे नेक्सस इथे दिसून येतं.

नाही म्हणायला पप्पू दायमा नावाच्या तरुणाने 'बंचरा समाज सुधार समिती'ची स्थापना करून काही महिलांचे मतपरिवर्तन केलंय, कारण पुरुषांना त्याचे हे उद्योग पसंत नाहीत. पप्पू नव्या पिढीबाबत आशादायी आहेत, कंवरबाई ही पहिली स्त्री ठरलीय जिने पहिलं लग्न केल्यानंतर बाजारात उभं राहण्यास नकार दिलाय.
दुर्गा आणखी कोण असते ? जी दुर्जनांच्या शोषणाविरुद्ध उभी राहते, जिच्या बाजूने कुणीही नाही अगदी जन्मदाते आईबापही नाहीत तिथं समाज नावाच्या लांडग्यांना तोंड देणं म्हणजे साधी बाब नव्हे !
पप्पू दायमाच्या कार्यात आणखी दुर्गा सामील होतील याची मला खात्री आहे. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः" हे आपले दाखवायचे दात आहेत, खायचे दात काही और आहेत ज्या बद्दल बोलण्यास सक्त मनाई आहे....

दुसऱ्या फोटोतलं जोडपं म्हणजे मुकेश आणि दिव्या आहेत, ज्यांनी पहिल्यांदा विद्रोह केला आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतरही दांपत्य म्हणून राहण्याचा निर्धार केला. या युगुलाला संपवून टाकण्यासाठी समाजाने जंग जंग पछाडलं पण पप्पू दायमांनी त्यांना आश्रय दिला.



आजही नीमच रतलाम हायवेवर अशा मुली दिसतात, लोक गाडीचा स्पीड कमी करतात, सौदा ठरतो, हायवेलगतच्या ढाब्यात यांच्या अंगावरची वस्त्रं उतरत राहतात ; बाजूने रस्ता अखंड वाहत असतो, जिथं तथाकथित सभ्य पांढरपेशी समाज आपल्या लूतभरल्या दुनियेचं गंधं अंडं आपल्या बुडाखाली अलगद उबवत असतो !
________________________________________

आजचा रंग पिवळा ... ०३/१०/२०१९
फोटोत दिसणारी झोपी गेलेली कोवळी मुलगी जास्मीन आहे, स्थळ आहे कालीघाट ऑफ रोड, कोलकता.
आपल्याकडे जशा जगदंबा, भवानीमाता देवीभक्तीसाठी पुज्यनीय मानल्या जातात तसंच देशभरासाठी दुर्गा आणि काली ही रूपं प्रसिद्ध आहेत.
बारोमास ज्या प्रदेशात कालीपूजा चालते, जी तिथली आराध्य दैवता आहे त्या कालीच्या नावाने असणाऱ्या कालीघाटावर रेड लाईट एरिया आहे हे कोलकत्याचं दुर्दैवही आहे आणि षंढत्वदर्शक लक्षण ही आहे..
बंगाल, झारखंड, ओरिसा, बिहार, आसाम आणि बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणावर बायकापोरी आणल्या जातात.

जस्मीनच्या आईचं नाव संगीता डे, ती बंगालमधली. बीरभूम मधल्या एका छोट्याशा गावातला तिचा जन्म. तिची आई ग्रामीण भागातील गणिका. आईला दारूचं व्यसन आणि पैशाचा हव्यास असल्यानं संगीता वयात येताच तिने पैसे घेऊन एका प्रौढाशी तिचं लग्न लावून दिलं.

संगीताचा नवरा आणि सासू तिला मारहाण करायचे. तिच्या दिराने तिचं शोषण केलं याला तिच्या नवऱ्याची फूस होती. संगीताला त्या नरक यातना सोसण्याशिवाय पर्याय नव्हता, तिने माघारी वळून जावं असं हक्काचं घरही तिला नव्हतं. अगदी कोवळ्या वयात तिला दोन मुली झाल्या, जस्मीन आणि जुमा ही त्यांची नावं.

संगीताचा मनसोक्त उपभोग घेऊन झाल्यावर हवा तितका छळ करून मनाची तृप्तता झाल्यावर तिच्या नवऱ्याने तिला विकायचं ठरवलं ! ते ही मुलींसह !

आशियातला सर्वात मोठा रेड लाईट एरिया असणाऱ्या कोलकत्यातल्या सोनागाचीत तिला विकलं तर कधीतरी आपलं बिंग फुटेल या भीतीनं त्यांनं तिला घेऊन दिल्ली गाठली. पण दोन चिमुरड्या मुलींसह संगीताला विकत घ्यायला कुणी तयार नव्हतं. अखेर तो तिला परत घेऊन आला आणि बेवारशासारखं रेल्वे स्टेशनवर सोडून गेला. आपल्या चिमुरड्या मुलींना घेऊन संगीतानं रेल्वे स्टेशन परिसरात दोन रात्री काढल्या.

प्लॅटफॉर्मवरती येणाऱ्या वेश्यांनी तिची अवस्था बरोबर ओळखली, तिला घेऊन त्या बाओबाजारमध्ये गेल्या. तिला लाईनमध्ये येण्याच्या चार गोष्टी शिकवल्या, समजावून सांगितल्या. समोर कुठलाच पर्याय नसल्यानं संगीतानं संमती दिली.

पहिल्या रात्री मिळालेल्या साठ रुपयातून तिने पोरींची भूक भागवली. नंतर धंदा तिच्या अंगवळणी पडला. त्याच परिसरात तिने भाड्याने एक खोली घेतली आणि सलग दशकभर धंदा केला.

तिच्याकडे गिऱ्हाईक आलं की ती थोरल्या जुमाला आपली धाकटी बहीण जस्मीन हिच्याकडे लक्ष देण्यासाठी बजावत असे. 'फुल नाईट किंवा फुल डे' चं गिऱ्हाईक आलं की तिच्या जीवाची अवस्था हरिणीसारखी होई, एकीकडे मुली रस्त्यावर आणि एकीकडे श्वापद तिच्या देहावर स्वार असे.

विष खाऊन मरण्यापेक्षा संगीताने मुली जगवायचं ठरवलं आणि या दलदलीत ती स्वतःला रुतवत गेली. माझ्या मते हा संघर्ष रक्तहीन नसला तरी प्रचंड थकवणारा आणि झुंजवणारा आहे ज्याला संगीताने तोंड दिलं.
रेड लाईट एरियावर अभ्यास करण्यासाठी फोटो जर्नलिस्ट डिना ब्रेनेट कोकलत्यात आली होती तिने रस्त्यावर झोपलेल्या जस्मीनला पाहिलं. ब्रेनेटचे सहकारी असलेले शाहनवाज सिद यांनी जस्मिनचा फोटो घेतला, (जो इथं पोस्टसोबत दिला आहे) डिना ब्रेनेटनं संगीताचा पाठपुरावा केला, तिच्या मदतीसाठी हातपाय मारले.

याच परिसरात उर्मिला बासू यांची 'न्यू लाईट' ही एनजीओ काम करते, उर्मी बासू या नावाने त्या अधिक परिचित आहेत. वेश्यांच्या मुलांचं पालन पोषण करणं हे यांचं ध्येय. त्यासाठी त्या अहोरात्र झटत असतात. सोमा हाऊसमध्ये त्यांचा व्याप चालतो, तिथं या मुली राहतात, त्यांच्या शिक्षणापासून ते जीवनावश्यक बाबींचा पुरवठा करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा खर्च न्यू लाईट कडून होतो.

संगीताची माहिती मिळताच जस्मीन आणि जुमाला त्यांनी सोमा हाऊसमध्ये दाखल करून घेतलं. मग कुठे संगीताला हायसं वाटलं. आता संगीता धंदा करत नाही पण तिने कुठंही नाव पत्ता बदलून राहिलं तरी लोक तिचा पूर्वेतिहास शोधून काढतात आणि तिच्या लुगड्याला हुंगत राहतात.

या मुलींचे पुनर्वसन होईल, यातल्या बायकांचे शोषण ही कमी होईल परंतु यांचा पूर्वेतिहास कळल्यावर यांना फुकटात वा पैसे टाकून उपभोगायच्या प्रवृत्तीत कधीच बदल होणार नाही. त्या साठी समाजाचा यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा आणि त्यात प्रगल्भता यायला हवी.

उर्मिला बासू यांच्या एका उपक्रमाचं नाव आहे 'हाफ द स्काय' ! या बायकांच्या आणि त्यांच्या मुलीबाळींच्या वाट्याला येणारं किमान अर्ध आकाश तरी आपण त्यांना बहाल करायला हवं असं त्यांना सुचवायचं आहे. समाज याला कधी तयार होईल माहिती नाही.

पण या पोस्टच्या निमित्ताने इतकं सांगता येईल की कुठे असहाय, दैन्यानं पिचून गेलेल्या, दुर्मुखलेल्या अवस्थेतली बाई, पोर दिसल्यावर त्यांना काही मदत करता येते का किंवा त्यांची मजबुरी काय आहे हे तरी जाणता येते का याची मानसिकता आपण ठेवायला हवी ! रस्त्यावर झोपलेल्या जस्मीनला पाहून डिना ब्रेनेटच्या काळजात कालवलं नसतं तर कदाचित भविष्यात जुमा आणि जस्मीन या देखील आपल्या आईप्रमाणेच धंद्याला लागल्या असत्या.

दुर्गा सर्वत्र आहे, तिला कुठं आणि कसं शोधायचं हे आपल्या हातात आहे. आणि दुर्दैवाने आपल्याला त्याचाच विसर पडला आहे.

संगीता आणि उर्मिला बासूंना वंदन ! मी त्यांच्यात दुर्गेला पाहतो ! 


________________________________________

उद्याचा रंग हिरवा ... wait for tomorrow ... 

1 टिप्पणी: