शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

सौंदर्यवती दुर्गांची कर्तृत्ववान गाथा...


आजचा रंग हिरवा... 
ही पोस्ट वाचण्याआधी तुमच्याकडून एक प्रॉमिस हवंय, द्याल का प्रॉमिस ? 
खूप काही मागत नाही मी. फक्त तुमची छोटीशी साथ हवीय, मला खात्री आहे पोस्टच्या अखेरीस तुम्ही होकार द्याल. ताजमहाल पाहायला जाल तेंव्हा माझी पोस्ट विसरू नका एव्हढी विनंती लक्षात असू द्यात. 
फोटोत दिसणाऱ्या तरुणीचं नाव आहे शबनम, तिच्यावर ऍसिड हल्ला झाला होता. 

शबनमवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला वाटलं होतं की 
एका प्रसन्न क्षणी शबनम 
इतक्या भयानक ऍसिड हल्ल्यानंतर शबनम मरून जाईल किंवा विद्रुपतेच्या भीतीने घरात बसून राहील, तिच्या आयुष्याची पुरती धूळधाण होईल याची त्याला खात्री होती. हल्ला झाल्याला आता काही वर्षे उलटून गेलीत पण त्या दिवसानंतर शबनमच्या आयुष्यात काहीच भयप्रद वा दुःखद घडलेलं नाही.


शबनमवर हल्ला होताच पोलिसांनी तिला एफआयआर दाखल करण्यासाठी खूप सांगून पाहिलं पण तिने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला नाही. यावर शबनम म्हणते, "मी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तर त्याला शिक्षा होईल आणि तो आरामात तुरुंगात बसून फुकटच्या भाकरी खात बसेल, खेरीज त्याला वाटेल की शबनम संपली असेल. त्याच्या या दिवास्वप्नांत तो रममाण होऊन सुखाचे आयुष्य जगेल. 

म्हणूनच तिने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही, त्याला वाटत होतं तिचं लग्न होणार नाही. प्रत्यक्षात तिचं लग्न झालं देखील. त्याला असंही वाटलं असावं की ती कधी आई होणार नाही, वास्तवात ती एका
गोजिरवाण्या मुलाची आई झाली आहे. हल्ल्यानंतर घरातल्या अंधारात तोंड लपवून ती स्वतःला कोंडून घेईल असं त्याला वाटलेलं, पण तेही घडलं नाही. उलट शबनमनं घराचा उंबरठा ओलांडला आणि नोकरी मिळवली. आता ती कामावर जाते, स्वकमाईवर जगते. तिचं छोटंसंच पण सुखी कुटुंब आहे. तो मात्र अन्नाला मौताज झाला आहे. शबनम आधी जितकी आनंदी होती तितकीच आजही आहे. राहिला तिच्या कथित सौंदर्याचा मुद्दा, तर त्यावर ती म्हणते तिच्या आत्मीय सौंदर्यात पहिल्याहुन अधिक भर पडली आहे. ही काया, हे शरीर कधी न कधी नष्ट होणार आहे त्याचं सौंदर्य कुठं चिरकालीन असणार आहे, असेल तो तिचा लौकिक जो जगाच्या स्मरणात असेल ! 

पोस्टच्या सुरुवातीला ताजमहालचा उल्लेख केला आहे आणि इथं शबनमबद्दल लिहिलंय त्यामुळे कोड्यात पडलात ना ? आणखी कोडी न घालता स्पष्ट करतो. 
कॅफे - शीरोज हँगआऊट 

 शबनम आग्र्यातल्या एका प्रसिद्ध कॅफेमध्ये काम करते जो ताजमहाल पासून काही अंतरावर भक्कम उभा
आहे. त्या कॅफेचं नाव आहे 'शीरोज' (Sheroes) जर हिरोज असू शकतात तर शीरोज का नाही या सवालातून शीरोजची निर्मिती झालीय. शबनम काम करत असलेल्या शीरोजमध्ये सगळ्या स्त्रियाच आहेत आणि त्या सर्वजणी ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या आहेत. अगदी ऑर्डर घेण्यापासून ते फूड कुकिंगपर्यंत आणि टेबल स्वच्छ करण्यापासून ते कॅशियरपर्यंतची सगळी कामं याच स्त्रिया करतात. या सगळ्याच जणी खऱ्या अर्थाने शीरोजच आहेत, त्या नायिका आहेत नव्या युगाच्या, या दुर्गा स्वयंभू आणि सबला आहेत !

शबनम आणि तिच्या सहकाऱ्यांना पीडित हा शब्द पसंत नाही. त्या म्हणतात आम्ही मुळीच पीडित नाहीत, आमचं आयुष्य तर पूर्वी जसं होतं तसंच आहे त्यात काहीच बदल झालेला नाही. मात्र ज्यांनी आमच्यावर हल्ले केले ते मात्र आज सुखात नाहीत. त्यांचं आयुष्य आज आनंदात नाही, मग खरे पीडित तर तेच म्हटले पाहिजेत. 

'शीरोज' कॅफेमध्ये सहा सात टेबल्स आहेत, छान छान पुस्तके आहेत. देखणं इंटिरियर डिझाईन आहे. जलद
रुक्कैया 
सेवा आणि हसतमुख स्वागत यासाठी कॅफे विख्यात आहे. शीरोज कॅफेच्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्याची माहिती असलेले विदेशी पर्यटक तिथे आवर्जून येतात, शीरोजसोबत सेल्फी घेतात. स्थानिक मंडळी देखील इथं येऊन शीतपेये आणि कॉफीची लज्जत घेतात. इथे रुक्कैया ही चीफ आहे, ती चौदा वर्षाची असताना तिच्यावर हल्ला झाला होता. रुक्कैया सांगते की इस्पितळातून घरी आल्यानंतर तिने घरातले आरसे काढू दिले नाहीत. तिला हवे ते कपडे ती घालते आणि चेहरा न झाकता नेहमीप्रमाणे आवडीचे कपडे घालते !! 


'शीरोज'मधल्या गीता ह्या सर्वात ज्येष्ठ आहेत, 
 गीता 
कॅफेमधल्या बाकीच्या मुली त्यांना माँ म्हणतात, गीता नावालाच माँ झाल्या नसून त्यांचं आयुष्य देखील आता मजेत चाललं आहे. कधी काळी त्यांना डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशनने ग्रासलं होतं. घराच्या चार भिंती ओलांडू शकू की नाही या विवंचनेत असलेल्या गीता आज कमावत्या झाल्या आहेत, ही कमाल त्यांच्यातल्या दुर्गेचीच आहे !


इथं काम करणाऱ्या रूपा, खुशबू, बाला आणि नीतू या सगळ्यांची कथा भिन्न आहे, पण त्यातलं आव्हान
बाला - सर्वात अलीकडे बसलेली 
हिमालयासारखंच समान होतं. कधी काळी स्वतःचा चेहरा झाकून फिरणाऱ्या या सर्वांना खऱ्या अर्थाने मायेचा आणि आस्थेचा हात दिला लक्ष्मी अगरवाल या तरुणीने. २००५ साली लक्ष्मी १५ वर्षाची असताना गुड्डा उर्फ नदीम सय्यद या मध्यमवयीन पुरुषाने तिच्यावर ऍसिड हल्ला केला होता. पण लक्ष्मीनं या व्यक्तीच्या मुळावर न उठता समस्येच्या मुळाशी हात घालण्याचं ठरवलं आणि सुरु झाला एक घनघोर संग्राम ! तिच्या लढ्याची दखल सर्वोच्च न्यायालयापासून ते संसदेपर्यंत घेतली गेली. ऍसिडच्या मुक्त वापरावर निर्बंध लादले जावेत त्यावर कठोर बंधने यावीत म्हणून तिने प्रदिर्घ लढाई लढून यश मिळवले. सरकारने ऍसिडच्या वापरावर आणि विक्रीवर नियमावली तयार करून तिची अंमलबजावणीही सुरु केली. या यशाने हुरूप चढलेल्या लक्ष्मीनं आपल्यासारख्या लढाऊ महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळवून द्यायचं ठरवलं, त्यांच्या मनातली भीती काढायचं ठरवलं आणि तिने जाणीवपूर्वक पाहिलं पाऊल आग्र्यात ठेवलं ! या कामी लक्ष्मीला मदत केली आलोक दीक्षित या नव्या विचाराच्या तरुणाने ! अलोक दीक्षित यांनी साथ दिल्याने लक्ष्मीचं स्वप्न साकार होऊ शकलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही.


लक्ष्मी अगरवालनं आग्रा निवडलं कारण,
आलोक दीक्षित 
ताजमहालच्या रूपाने आग्रा आपल्या देशाची जागतिक आयडेंटीटी आहे. सौंदर्य आणि प्रेम याचं जागतिक प्रतिक असलेल्या शहरात आत्मीय सौंदर्याचं आणि स्वकर्तृत्वाववर आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेल्या प्रेमाचं नवं उत्तुंग उत्कट असं प्रतिक उभं केलं गेलं तर त्यातून जगासाठी नवा आदर्श समोर येईल हा हेतू या भूमिकेमागे आहे. शबनम आणि तिच्या सहकाऱ्यांनी लक्ष्मीचा विश्वास सार्थ ठरवलाय आणि कॅफे अगदी जोरात, जोमात चालतो आहे. लोक येतात आणि आणि यांच्यावर फिदा होऊन जातात. 


जिथं आपल्या देशात सौंदर्याच्या बेगडी आणि विद्रुप
रूपा - निखळ रूपडं 
विकृत व्याख्या तयार केल्या गेल्यात तिथं हे घडतंय याचा मला विशेष आनंद आहे. फेअर अँड लव्हली लावलं तर आपण गोरे होऊ मग आपलं कर्तृत्व निखरेल, आपण गोरेगोमटे असू तरच आपलं व्यक्तीमत्व आकर्षक असेल, कमनीय बांधा असेल तरच आपण सेक्सी दिसू, आपण लठ्ठ असलो तर जग आपल्यावर हसेल, आपल्या वर्णाला न शोभणाऱ्या (?) रंगाचे कपडे घातले तर आपण बावळट दिसू, आपण छानछोकीत आवरलेलं नसेल तर आपल्याकडे कुणी पाहणार नाही या आणि अशा लाखो भाकडकल्पनात आपल्याकडील समाजमानस रुतून बसलेलं आहे. बाह्य सौंदर्याच्या बाष्कळ कल्पनांवरच स्त्रीचं कर्तृत्व मोजलं जातं हे आपल्याकडे खोल बिंबवलेलं आहे. या सर्व भुक्कड गृहीतकांना सुरुंग लावणाऱ्या शीरोजचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.



खुशबू आपल्या कन्येसह  
मी यांना नमन करतो कारण या खऱ्याखुऱ्या आणि जित्या जागत्या दुर्गा आहेत... 

आता प्रॉमिसची गोष्ट. पोस्टच्या सुरुवातीला तुमच्याकडून एक प्रॉमिस मागितलंय. लक्षात आहे ना ? आधी हो म्हणा मगच सांगतो...

जेंव्हा कधी तुम्ही आग्र्याला जाल, ताजमहालला भेट द्याल तेंव्हा 'शीरोज' कॅफेला देखील तुम्ही भेट देण्याचं प्रॉमिस मला हवंय ! दुर्गांना भेटायचंय ना मग इतकं तर करायलाच हवं ! 
तुमचा होकार असेल असं गृहीत धरतो, पुन्हा एकदा या दुर्गांना नमन करतो...

- समीर गायकवाड.


ता.क. - लक्ष्मी अगरवालच्या संघर्षावर आणि शीरोज 
'छपाक'साठी दिपिकाचे कौतुक करावे तितके कमी आहे  
कॅफेच्या क्रांतीकारी निर्मितीवर बेतलेला 'छपाक' (जलपरी) हा हिंदी चित्रपट २०२० मध्ये येतोय ज्यात लक्ष्मीची भूमिका दीपिका पदुकोन साकारते आहे. सौंदर्याच्या कृत्रिम व्याख्यात परिवर्तन घडवून आणण्याकरिता स्त्रियांना निर्भीड स्वावलंबी दृष्टीकोन देणाऱ्या या विचारांचा अधिकाधिक प्रसार व्हायला हवा.    

1 टिप्पणी: