शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

रेड लाईट डायरीज - नाळेचं कर्ज ...



सोबतचा जिन्याचा फोटो श्रेया कालराने काढला आहे. फोटोबद्दल जाणून घेण्याआधी हे वाचलं तर संदर्भ लागतील..
श्रेया फोटोस्टोरीमेकर आहे. भारतीच्या केसमुळे तिची माहिती मिळालेली.
तामिळनाडूमधल्या ईरोडे या शहरातील गांधीनगर या स्लममधील भारतीने स्वेच्छेने वेश्याव्यवसाय स्वीकारत मुंबई गाठली होती त्याला दशकं उलटून गेलीत. कामाठीपुऱ्याची एक खासियत आहे, इथे भाषेगणिक वर्गीकरण असलेल्या इमारती आहेत. कानडी, तेलुगू, उडिया, आसामी, मल्याळी, मराठी, हिंदी अशा बहुतेक सर्व भाषेच्या कन्या इथं राहतात. एके रात्री ईरोडेमधून मुंबईत आलेल्या एका व्यक्तीने भारतीला ओळखलं. खातरजमा करून तिची माहिती तिच्या घरी कळवली. काही दिवसात तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरची मंडळी कामाठीपुऱ्यात आली. ती ऐकत नाही हे लक्षात येताच त्यांनी तिला झोडपायला सुरुवात केली. तिला मारहाण होऊ लागल्यावर बाकीच्या बायका मध्ये पडल्या आणि त्यांनी तिच्या नातलगांना पिटाळून लावलं.
भारतीने मुबईमधलं कामाठीपुऱ्यातलं छप्पर सोडून दिल्ली गाठली. तिथं तिला दारूचं व्यसन लागलं. बेवडी झाली ती आणि जोडीनंच कंगाल झाली. काही वर्षांनी ती गंभीर आजारी पडली. तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. भारतीचे उपचार व्हावेत म्हणून एनजीओच्या वतीने प्रयत्न झाले त्यात यश आलं. सरकारी खर्चाने इलाज होत असले तरी सुधारणा होत नव्हती कारण तिला जुळणारा किडनी डोनर मिळत नव्हता. तिच्या विपन्नावस्थेची माहिती कामाठीपुऱ्यातल्या तिच्या सहकारी मैत्रिणीपर्यंत पोहोच झाली. पत्रकार मित्रांच्या माध्यमातून तिच्या कुटुंबापर्यंत ही माहिती पाठवल्यावर त्यांची प्रतिक्रिया धक्कादायक होती. ती मेलेली बरी असं म्हणत त्यांनी दरवाजे बंद केले. असेच काही दिवस गेले आणि कडक हिवाळ्यातल्या एका सकाळी एक तरुण मुलगी भारतीसाठी किडनी डोनेट करायला आली. तिची किडनी मॅच देखील झाली. शस्त्रक्रियेनंतरचे काही दिवस रुग्णालयात काढल्या नंतर ती मुलगी एकाएकी निघून गेली. भारतीला तिला भेटायचं होतं. ते राहूनच गेलं. आपल्याला किडनी डोनेट करणारी मुलगी अचानक निघून गेल्याचं कळताच भारतीला खूप वाईट वाटलं. एनजीओवाल्यांनी अनेक विनवण्या केल्यावर डॉक्टरांनी त्या मुलीच्या फाईल प्रोफाईलमधला तिचा फोटो दाखवल्यावर भारती चाट पडली. कारण तिच्या तारूण्यावस्थेत ती हुबेहूब अशीच दिसत होती. काही क्षणात तिनं काय ते ओळखलं. ती धाय मोकलून रडू लागली. किती तरी दिवस तिच्या डोळ्यातलं पाणी सरलं नव्हतं. नंतर तिने दारू सोडली. कॅनॉट प्लेसनजीकच्या हनुमान मंदिरात तिनं आपला मुक्काम हलवला. गलितगात्र झालेली भारती तिथंच राहू लागली आणि लोकांनी दिलेल्या भिकेवर जगू लागली...

भारतीला किडनी देऊन गेलेली तिचीच अनौरस मुलगी होती, मालिनी तिचं नाव ! अठरा विश्वे दारिद्र्यात राहणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या भारतीचा विवाह एका श्रीमंत वृद्धाबरोबर लावून देण्याचे तिच्या मात्यापित्यानी ठरवलं होतं. त्या बदल्यात त्यांची गरिबी दूर होईल असं त्यांना वाटत होतं. त्यास भारती राजी होत नव्हती तर तब्बल वर्षभर तिचा लैंगिक छळ केला गेला. त्यातून ती गर्भवती राहिली होती. बाळंतपणात मुलगी मृत जन्माला आल्याचं सांगितलं गेलं. यानंतर काही महिन्यात तिनं ईरोडे सोडून मुंबई गाठली होती. तिने स्वतःवर सूड उगवला मात्र नियतीने तिच्या मुलीच्या आयुष्याचा नरक केला. मालिनीला ज्याच्या हवाली केलं होतं त्यांनं तिच्या बालपणीच तिला चमडीबाजार दाखवला होता. भारतीने परत यावं आणि त्या गबरगंड माणसासोबत पाट लावावा यासाठी तिचे कुटुंबीय मुंबईला आल्यावर त्यांचा डाव भारतीने अचूक ओळखला होता. मात्र आपल्या जन्मदात्यांच्या खोटारडेपणावर विश्वास ठेवून तिच्या हातून नकळत चूक झाली होती. त्या चुकीची शिक्षा मालिनीला भोगावी लागली होती. आपल्या आईची अवस्था कळल्यानंतर तिला राहवलं नाही आणि तिने तिच्यासाठी किडनी दिली. मात्र आपली अवस्था कळली तर ती खचून जाईल या हेतूने तिची भेट न घेता ती निघून आली. नाळेचं कर्ज तिनं फेडलं. दुधाचं चुकवण्याचा प्रश्नच नव्हता कारण आई कसली म्हणून तिनं कधीही पाहिली नव्हती. पण आपल्या आईचा इतिहास कळल्यावर तिने तिला उदार अंतःकरणाने माफ केलेलं. दोन जीव एकाच रक्ताच्या नात्यातले असूनही विभक्त राहिले याचं कधी कधी दुःखही वाटतं तर एका अर्थाने समाधानही वाटतं. श्रेयासारख्या नव्या विचारांच्या तरुणींची यातली मोलाची साथ हा नव्या प्रकाशवाटांचा उगम भासतो...

आता जिन्याच्या फोटोबद्दल दोन शब्द...
फोटो दिल्लीतल्या कुख्यात रेड लाईट एरिया जी.बी. रोड मधला आहे. कोठी नंबर २२ ते २७ कडे जाण्याचा हा जिना आहे. यातीलच २३ नंबर कोठीत भारती राहत होती. इथल्या जिन्याच्या पायऱ्यावरही जाहिरातदारांनी काळं केलं आहे. दिवे, लाईट्स, विद्युत उपकरणे आणि वीज निर्माते यांच्या या जाहिराती आहेत. जिथं आयुष्यभराचा अंधार पसरलेला आहे त्या कोठ्यांकडे जाण्याच्या पायऱ्यांवर प्रकाशाच्या जाहिराती आहेत, कसला जीवघेणा विरोधाभास आहे हा !

आपल्या घरात दिव्यांची रेलचेल बारमाही असते, प्रकाशपर्वही अव्याहत असते. यंदाच्या दीपावलीपासून अशा घरातही प्रकाशपर्व नेण्याचा प्रयत्न करूया जिथं उजेडास मनाई आहे, तिथल्या अंधारकळांना हरवण्यासाठी एक दिवा लावूया. दीपोत्सवाचा खरा अर्थ जाणून घेऊ या...

मालिनी अजूनही ईरोडेमध्येच राहते. पुढच्या वर्षी कुवग्गमला गेल्यावर तिला भेटायचं आहे. प्रकाशपर्वाचा खरा अर्थ तिच्या अंतःकरणात दडलेला आहे, तो जाणून घ्यायचा आहे.

- समीर गायकवाड

@रेड लाईट डायरीज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा