आईच्या आयुष्यात डोकावता येतं का ?
आई हयात नसताना तिच्याजागी स्वतःला ठेवून तिचं दुःख आणि तिच्या इच्छा आकांक्षांचा चुराडा मांडता येईल का ? आईने भोगलेली दुःखे तिला सहन करावा लागलेला दुस्वास, तिची आयुष्यभराची परवड काटेकोर तशीच लिहिता येईल का ? आईच्या इच्छा वासना ; तिच्या भावनांची गळचेपी, न गवसलेलं इप्सित हे सगळं मांडता येईल का ? याही पलीकडे जाऊन आईच्या भावविश्वास टोकरत जाऊन तिने आत्महत्या का केली असावी याचे नेमके उत्तर सापडेल का आणि सापडलं तरी ते जगापुढे मांडता येईल का ? निम्मी हयातभर आईने आपलं अस्तित्व जगापासून लपवून ठेवलं असेल तर ती कुटुंबाच्या वाट्याला किती आली असेल आणि तिच्यासाठी जग ते काय असेल ? स्वतःला लपवताना आईच्या स्त्रीमनाची किती ससेहोलपट झाली असेल ?
हे सर्व प्रश्न वाटतात तितके सोपे नाहीत. पण एका आईवेड्या भावनाप्रधान इसमाने हे लिहायचं ठरवलं आणि त्यातून एका उत्तुंग साहित्यकृतीने जन्म घेतला. तसं पाहिलं तर हे आईचं आत्मचरित्र वाटावं इतक्या सफाईदारपणाने लिहिलं आहे. पण रूढ अर्थाने हे चरित्र आहे मात्र संपूर्ण पुस्तकात आईचं पूर्ण नाव कुठेही येत नाही हे विशेष आहे. निवेदन शैलीचा वापर करत पुस्तकाचा निवेदक आपल्या आईला उलगडत जातो, आईच्या जीवनाचा पट मांडताना कोसळतो. पुस्तक वाचून होतं तेंव्हा वाचक दिग्मूढ होऊन जातो.
यंदाचं साहित्याचं नोबलविजेते पीटर हँडके यांचं हे पुस्तक. 'ए सॉरो बियॉन्ड ड्रिम्स' हे त्याचं नाव. पुस्तकाच्या नावातच मतितार्थ सामावला आहे. मेटालिटरेचर वर्गात हे मोडतं. हँडकेच्या आईचे दुसऱ्या महायुध्दाच्या काळात अतिव हाल झाले. ती जन्माने स्लोवेनिज ऑस्ट्रियन होती, संवेदनशील माणसाच्या भावनांचा बांध वेळीच फुटला नाही तर तो आतल्या आत घुसमटत जातो, त्यात आयुष्याच्या जोडीदाराने नेमकी साथ दिली नाही तर जगायचं कुणासाठी हा प्रश्न उरतो. मग ध्येयं आक्रसत जातात आणि जगण्याचे प्राधान्यक्रम बदलतात. हॅंडकेंच्या आईचेही हेच झाले. तिची दोन लग्ने झाली. नवऱ्याच्या व्यसनाने संसार मोडीत निघाला, पीटर हेच तिचे विश्व होतं. पीटर कळता सवरता व्हायला आणि तिच्या भवतालचा प्रदेश युद्धजन्य खाईतून निवायला एकच काळ साक्षीदार होता. तिची घुसमट आणि समर्पण यातून ती आत्महत्येपर्यंत पोहोचते.
कार्टनर फॉक्सझेतुंग या ऑस्ट्रियन दैनिकात स्थानिक वृत्त या मथळयाखाली एक बातमी आलेली, जी टाऊनशिपमधल्या एका एकावन्न वर्षीय गृहिणीने झोपेच्या गोळ्यांची अतिरिक्त मात्रा सेवन करून आत्महत्या केली. हँडकेंनी ही बातमी आपल्या पुस्तकात दिलीय पण याही पुढेजाऊन त्यांनी आपल्या आईच्या आत्महत्येचं वर्णन केलंय जे बेहद्द तटस्थतेचं दार्शनिक ठरावं. ते लिहितात - एके दिवशी तिने सगळ्यांना निरोपाची पत्रे लिहिली, त्यानंतर बराच वेळ तिनं स्वतःच्या विरंगुळ्याला दिला, छानसा केशसंभार केला, नखांची देखभाल केली. जिल्हा केंद्रात जाऊन तिने झोपेच्या गोळ्या आणल्या, त्या दिवशी पाऊस नव्हता तरीही तिने लाल रंगाची छत्री आणली. तिने संध्याकाळी आपल्या कुटुंबीयासमवेत डिनर घेतलं, त्यानंतर ती तिच्या शयनकक्षात गेली. तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या, तिच्या मेन्स्ट्रुअल पॅन्टीज तिने परिधान केल्या, काही नॅपीज आतून घातल्या. याउपरही तिने आणखी दोन पॅंटीज त्यावर चढवल्या. घोट्याइतक्या उंचीचा सैल नाईटगाऊन घातला. गळ्याभोवती स्कार्फ गुंडाळून ती शांतपणे बेडवर झोपली आणि मृत्यूच्या स्वाधीन झाली. हँडके कमालीच्या दृक्श्राव्य शैलीच्या लेखनातून सगळं चित्र आपल्यापुढं साकारतात. अधून मधून स्वतःचं मत व्यक्त करतात. तिनं काय टाळायला हवं होतं आणि काय करायला पाहिजे होतं यावर खुल्या मनाने व्यक्त होतात.
नको असलेलं गर्भारपण, संघर्ष, नशेबाजी, नवऱ्याचा दारूचा नाद, स्त्रीमनाच्या आकांक्षा याची वीण विणताना हँडके आपल्या आईच्या आयुष्याचा पट एकसलग न उलगडता तिच्या जीवनातील रंगांचा कॅनव्हास एकेक करून जोडत जातात. ते कधी तिच्या जन्मगावी घेऊन जातात तर कधी रशियन अधिपत्याखाली असलेल्या बर्लिनजवळच्या पँकमध्ये नेतात. १९४४ ते १९४८ ही वर्षे चार हँडकेंच्या आईसाठी खूप वाईट गेली. नाझी सैन्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिने शक्य ते सर्व काही केलं, यावेळी हँडकेचं वय आठ वर्षे होतं. त्या काळातले आईच्या जगण्याचे संदर्भ गोळा करताना ते पुन्हा पुन्हा तिथं जातात, आपला भूतकाळ खोदतात, आईच्या अनिवार जगण्याचा अर्थ शोधतात. आई स्वतःला लपवत होती म्हणजे काय करत होती याचा शोध घेताना हँडके वाचकांना प्रश्न विचारतात. कुठल्याही आपत्ती आल्या केंव्हा कुठलेही संघर्ष झाले तर स्त्रियांचा बळी का दिला जातो यावर प्रश्नचिन्ह लावतात.
युद्धग्रस्ततेतून बाहेर पडल्यानंतर आईच्या दुसऱ्या लग्नाचा 'स्टोरी प्लॉट' (होय !) त्यांनी मांडला आहे. इथं हँडके आपल्या आईमधली स्त्री शोधतात जिला जगण्याचा आधार हवा असतो आणि इथंच तिची फसगत होते. १९७१ साली वयाच्या ५१ व्या वर्षी आईने आत्महत्या केली तेंव्हा हँडके एकोणतीस वर्षांचे होते. या घटनेने त्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आणि त्यांच्यातला लेखक जन्माला आला. स्वतःचं कॅथार्सिस झालं असं त्यांना वाटतं. आईच्या आयुष्यात डोकवताना आपल्या कमतरतेला व आपल्यातील न्यूनगंडाला कुठंही न झाकता ते सोप्या प्रवाही भाषेत रिते होत जातात.
हँडकेनी नंतरच्या काळात युगोस्लोव्ह युद्धाच्या काळात आपली लेखणी तळपत ठेवली. सर्बियन राष्ट्राध्यक्ष स्लोबोदन मिलोसेविक यांच्या अंत्यविधीच्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणावरून मोठा वाद उदभवला होता, नाटो राष्ट्रांनी केलेली बॉम्बहल्ल्याचा त्यांनी कठोर समाचार घेतला होता. अतिउजव्या जहाल सर्बियन राष्ट्रवादी लोकांचे ते क्षमाप्रार्थी सिम्बॉल बनले होते. कडवा राष्ट्रवाद कशी माती करतो यावर त्यांनी तिखट भाष्ये केली होती. नंतरच्या काळात त्यांनी चित्रपटांसाठीही लेखन केलं.
नोबल साठी त्यांचा विचार झाला तेंव्हा त्यांच्यातल्या मानवतावादी आणि उजव्या विचारधाराविरोधी भावनांची सध्याची गरज लक्षात घेऊनच निवड झाली असावी. राजकीय सामाजिक भूमिका काहींना पटतील वा पटणार नाहीत पण आपल्या आईचं जे शब्दचित्र त्यांनी रेखाटलं आहे त्यासाठी तरी त्यांचं कौतुक होत राहील हे निश्चित...
- समीर गायकवाड
हे पुस्तक ऑनलाईन वेबपोर्टल्सवरती उपलब्ध आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा