रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

सदीचे गुलाब - मार्सेलिनी डेसबोर्डेस : फ्रेंच कविता

सदीचे गुलाब.
आज तुझ्यासाठी मला गुलाब आणायचे होते.
खरं तर त्यांनी माझी पोतडी इतकी ठासून भरली होती की,
तिच्या गाठी आवळून बांधाव्या लागल्या होत्या.

गाठी सुटल्या, गुलाब वाऱ्यावर उधळले गेले.
बेभान झालेल्या वाऱ्याने त्यांना समुद्राकडं उडवलं.
पाण्याने त्यांना पुढे नेलं पुन्हा कधी न परतण्यासाठी.
लाटांना लालिमा चढला, जणू दग्ध लाव्हाच !
अजूनही आजच्या रात्रीस माझे कपडे सुगंधित वाटताहेत,
त्या गंधभारीत स्मृतींत जणू श्वासच जारी आहेत !


मार्सेलिनी डेसबोर्डेस- व्ह्ल्मो या प्रतिभाशाली फ्रेंच कवयित्रीच्या 'लेस रोजेस दे सदी' या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद आहे. फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतरच्या काळात मार्सेलिनीचा जन्म झाला. तिच्या बाल्यावस्थेत असतानाच तिच्या वडीलांचा व्यवसाय मोडीत निघाला. त्यांना परागंदा व्हावं लागलं. दरम्यान तिचा बालविवाह झाला. आर्थिक गरजा भागवण्यासाठी लहानगी मार्सेलिनी आईसोबत तिच्या एका नातलगाकडे निघाली. पण काही दिवसातच प्रवासात असताना तिची आई पिवळ्या तापाच्या साथीत मरण पावली. सोळाव्या वर्षी ती जन्मगावी परतली. दिसायला सुंदर असणाऱ्या अन जन्मतःच गोड गळ्याची देणगी लाभलेल्या मार्सेलिनीने स्वतःला सावरलं आणि रंगमंचाचा आधार शोधला.


तिला त्यात यशही मिळालं. पुढच्याच वर्षी तिचं दुसरं लग्न झालं. पॅरिसमधील प्रसिद्ध ऑपेरात तिला काम मिळालं. १८०२ ते १८२३ अशी दोन दशकं तिनं अभिनेत्री आणि गायिका म्हणून नाव कमावलं. या दरम्यान विख्यात फ्रेंच कादंबरीकार, नाटककार होनर दे बँल्झक यांच्या सान्निध्यात आली. तिच्यातल्या कवयित्रीला त्याने आकार दिला. सदैव कौटुंबिक सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात असलेल्या मार्सेलिनीनं प्रेमाच्या आर्त करुणात्मक रचना लिहिल्या. लोकांनी तिची स्तुती केली. ती मात्र सच्च्या प्रेमाच्या शोधात भटकत राहिली. तिच्या कौटुंबिक जीवनाची घडी कधीच स्थिर होऊ शकली नाही. मार्सेलिनीच्या कवितेत काही तरी हरवल्याची अन सदैव गती हरपल्याची जाणीव होते, तिच्या सर्व कविता कमीत कमी पंक्तींच्या होत्या. तिनं दीर्घकाव्य कधीच लिहिलं नाही अन आपल्या कवितेचा फाफटपसाराही होऊ दिला नाही. एक मनस्वी कवयित्री, रुपगर्विता अभिनेत्री अन ओजस्वी गायिका असूनही तिच्या आयुष्यात सुखं अशी आलीच नाहीत, याच्या शेडस तिच्या कवितात पाहायला मिळतात.

प्रस्तुतच्या कवितेत तिनं गुलाबफुलांचा रूपक म्हणून वापर केलाय. तिच्या वाट्याला अनेक पुरुष आले पण हाती कुणीच लागलं नाही, नियतीनं त्यांना हिरावून घेतलं. प्रत्येक वेळी तिने मन रमवण्याचा प्रयत्न केला पण दैव तिच्यासोबत कधीच नव्हते. असे असूनही तिच्या मनात त्या अव्यक्त प्रेमाची दरवळ सदोदित आहे याचा तिला कदाचित आनंद असावा असे कवितेतून प्रतीत होते.

विख्यात फ्रेंच कवी व्हिक्टर ह्युगो आपल्याकडे बहुश्रुत आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहांची नावे त्यांच्या मनोवस्थेचे दार्शनिक आहेत. 'डायव्हर्स ओड्स अँड पोएम्स' - प्रेम आणि सहजीवनाच्या कविता, 'ऑटम लीव्ह्ज’ - उत्कट आत्मपर कविता, 'साँग्ज ऑफ ट्वीलाइट' - राजकीय विद्रोहाच्या कविता, ‘इनर व्हॉइसिस’ -तत्वचिंतनात्मक कविता , ‘सनलाइट अँड शॅडोज’ - मानवी मनाच्या खोल अंतरंगात दडलेल्या भावनाविष्काराचे प्रतिबिंब असणाऱ्या कविता,  ‘द एंड ऑफ सेटन’ व ‘गॉड’ हे त्यांचे अखेरचे काव्यसंग्रह होत. पैकी 'द एंड .. ' मध्ये ते मनातल्या खलप्रवृत्तीविरुद्ध झगडताना दिसतात तर ‘गॉड’मध्ये दैववादावर प्रश्नचिन्ह लावत अंतर्मनाचा आवाज आणि देव यांच्यातला संघर्ष मांडतात. वयानुसार जाणीवा प्रगल्भ होत जातात, विचारांचा परीघ विस्तारत जातो. जसजशा या कक्षा रुंदावतात तसे कवीचे विषय बदलतात. नव्या आशयाची नव्या पद्धतीने मांडणी करताना तो स्वतःला शोधू लागतो. त्याचा समग्र काव्यप्रवास मानवी जीवनातील व्यक्तिगत जडणघडणीचा व वैचारिक परिवर्तनाचा प्रवास चितारत जातो. व्हिक्टर ह्यूगोंच्या काव्यसफरीवर दृष्टिक्षेप टाकताना ही बाब ठळक अधोरेखित होते. मार्सेलिनी डेसबोर्डेस याला अपवाद होती तरीही तिच्या कवितेत जीवनविषयक भाष्य आढळतं जे काहीसे निराशावादी असलं तरीही खटकत नाही कारण त्यात असलेली अस्सलता मनभावन अशीच होती.

- समीर गायकवाड  

~~~~~~~~~~~~~~~~
The Roses of Saadi
I wanted to bring you roses this morning;
But I had closed so many in my sashThat the knots were too tight to contain them.
The knots split. The roses blew away.All blew off to the sea, borne by the wind,Carried to the water, never to return.
The waves looked red as if inflamed.Tonight, my dress is still perfumed.
Breathe in the fragrant memory.
~~~~~~~~~~~~~~~~
Les Roses de Saadi
J’ai voulu ce matin te rapporter des roses;
Mais j’en avais tant pris dans mes ceintures closesQue les noeuds trop serrés n’ont pu les contenir.
Les noeuds ont éclaté. Les roses envoléesDans le vent, à la mer s’en sont toutes allées.Elles ont suivi l’eau pour ne plus revenir.
La vague en a paru rouge et comme enflammée.Ce soir, ma robe encore en est toute embaumée . . .
Respires-en sur moi l’odorant souvenir.

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा