बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

रेड लाईट डायरीज - तस्नीम आणि चुकलेल्या वाटा

#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा

एक दशक होतं जेंव्हा डान्स बारमुळे अख्ख्या महाराष्ट्राची तरुण पिढी भयंकराच्या वाटेवर उभी होती. प्रारंभीच्या काळात हे खूळ फक्त महानगरात होतं, त्या नंतर मोठया शहरात ते फ़ैलावलं. यातून मिळणारा अमाप पैसा अनेकांना खुणावू लागला आणि राज्यातील जवळपास सर्व मुख्य शहरात याने पाय रोवले. पाहता पाहता तालुक्यांची ठिकाणे देखील व्यापली गेली आणि शहरांच्या बाहेर असणारे हमरस्ते डान्सबारसाठी कुख्यात झाले. 
#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा
खेड्यापाड्यातली तरुण मुले देखील याच्या नादी लागली. पुणे मुंबई सारख्या अक्राळ विक्राळ शहरातील काही गटांचे उत्पन्न ही तसे अफाट तगडे होते की ज्यांना कितीही दौलतजादा केली तरी फरक पडत नव्हता.
मात्र खेड्यापाड्यातली तरणीताठी पोरे किडुक मिडूक विकून वस्तू गहाण टाकून पैसा उडवू लागली, घरे उध्वस्त होऊ लागली तेंव्हा माध्यमे सावध झाली. खेड्यातून सुरु झालेला आक्रोश शहरांच्या कानी पोहोचला आणि तिथून देखील विरोधाचा सूर येऊ लागला. सरकारने मग डान्स बारच्या मोकाट सुटलेल्या वारूला वेसण घातलं. पुढे न्यायालयीन लढाया झाल्या, नव्याने परवानग्या दिल्या गेल्या पण जुन्या डान्सबारची रौनक आणि स्वैर मोकळीकीची त्यात चांगलीच उणीव होती. तरीही आज देखील विविध शहरात छुप्या पद्धतीने वा स्वरूप बदलून डान्सबारची छमछम सुरु असतेच. कधी धाडी पडतात, मुलींना अटक केली जाते तर कधी मुली आणि त्यांची मालक मालकीण फरार होतात, काही वेळा ग्राहकांनाही अटक होते. हे आता अंगवळणी पडले आहे.

पण मागे वळून पाहताना एका दुःखद करूण कथांची
#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा
आर्त हाक कानी येते. यात मदतीसाठीच्या हाकांचे प्रतिध्वनी आहेत, होरपळून निघालेल्या जीवांचे सुस्कारे आहेत, चडफडाट झालेल्या व्यक्तींचे शिव्याशाप आहेत आणि आयुष्याचा बाजार झालेल्या स्त्रियांचे वेदनादंश आहेत, या स्त्रियांच्या कुटुंबियांचे मनस्वी दर्दभरे हुंकार आहेत. हा कोलाहल नाहीये, ही कुजबुजही नाहीये. ही एक चुटपुट आहे जी नियतीच्या पोलादी भिंतीत कैद झालीय. काळाच्या ओघात आपणही तिला विसरून गेलो आहोत. मात्र चुकून कधी या भिंतीला कान लावले तर असंख्य इंगळ्या अंतःकरणाला डसाव्यात इतकी तीव्रता त्यात आहे. या दंशाची ही दास्तान दर आठवड्याला तुमच्या भेटीस येत राहील. यातली सर्व माणसं, स्थळं, घटना, संदर्भ गतकालीन आहेत. त्यांचे वर्णन काहीसे अतिरंजित वाटेल पण ते वास्तवाची वाट सोडणारे नाही. सर्व घटकांना आपलं खाजगी जीवन जपण्याचा अधिकार असतो तो या घटकासही आहे, ज्यांचं शोषण झालं आणि ज्यांनी शोषण केलं त्यांना ही हा अधिकार आहे, ज्यांच्या आयुष्याची धूळधाण उडाली त्यांच्या आयुष्याच्या चिंधड्या सार्वजनिक करून कुणाएकाला दुखावण्याचा वा कमी लेखण्याचा अधिकार कुणासही नाही. त्यामुळे लेखमालेतील काही पात्रांची, स्थळांची नावे बदलली आहेत.

ही लेखमालिका केवळ डान्सबार आणि त्या अनुषंगातल्या घटना, व्यक्ती, स्थळे यांच्यापुरती
#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा
मर्यादित नसून नाचगाण्याची कला जगापुढे मांडून आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या तमाम घटकांशी निगडित आहे, याचा परिघ व्यापक आहे, तो पहिल्या नाचगाण्यापासून तमाशापर्यंत, कोठयावरच्या बारीपासून ते बैठकीच्या लावणीपर्यंत, गर्भश्रीमंतांच्या बागानवाडीतील नर्तिकांच्या दमणकथांपासून ते पाकीटमारी करून सडकछाप ऑर्केस्ट्रावर पैसे उडवणाऱ्या माणसांच्या विविधांगी वर्गापर्यंत आणि राजेशाही महालात सादर झालेल्या शाही नृत्यापासून ते आताच्या डान्सबारपर्यंतच्या सगळ्या बिंदूंशी याचं नातं आहे. काहींना वाटेल की ज्या घटकामुळे 
#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा
समाजाचा ऱ्हास झाला वा सामाजिक मूल्ये ढासळली त्यांचे हे उदात्तीकरण तर नाही ना ! तसं काही नाही, हे अरण्यरुदनही नाही. आपल्याच समाजाचा घटक असलेल्या एका उपेक्षित आणि शोषित घटकाची ही दर्दभरी दास्तान आहे, यांच्यापायी उध्वस्त झालेल्या जीवांची ही विराणी आहे. इतक्या वर्षांपासून आपल्या भवताली हे घडत होते पण याच्या पडद्यामागे काय घडत होते याचा हा शोध आहे. मानवी स्वभावाचा एक पैलू जीवनानंद घेण्याचा आहे, याचे मापदंड इतके आखीव रेखीव आहेत की यात किंचितही बदल झाला तरी त्याचे नाव बदलून अय्याशी, शौक, रसिक, नाद अशी बिरुदे लावली जातात. यात फरक नक्कीच आहे खेरीज वृत्तीही भिन्न आहे. आनंदातून विकृतीकडे होत जाणारा प्रवास मानवी सभ्यतेच्या नव्या व्याख्या शिकवत नसला तरी चुकलेल्या वाटांच्या स्मरणखुणा नक्कीच दाखवतो...

ग्रँटरोडवर असलेल्या टोपाझ बारमधल्या तस्नीमला खऱ्या  नावाने कमी लोक ओळखत. अंधेरीच्या दीपा बारमधली  तरन्नुम आणि तस्नीम या दोघी तिथल्या खऱ्या स्टार होत्या. म्हणजे चांदणीबार टाईप सगळा मामला असल्यानं सोनी, सोनिया, सनम, हिरा, कोमल, महक याच नावाने ती फेमस होती. एके काळी त्या दुनियेत रौनक होती, झगमगाट होता. पैशांच्या राशी होत्या, थिरकत्या पावलांवर जीव ओवाळून टाकणारे आशिक होते.

कातिल कमसीन नशिली मदालसा म्हणजे काय हे तिला पाहताच उमजे. तिचं दुर्भाग्य की एका माणसाने तिच्यावर अफाट जीव लावला, बेशुमार दौलत उधळली.
अर्थात तो पैसा त्याचा नव्हताच मुळी. त्याचं नाव होतं अब्दुल करीम लाडसाब तेलगी ...

स्टँप घोटाळ्यात तेलगी सापडला, जेलमध्ये सडला आणि संशयास्पदरित्या रोगजर्जर होऊन मरून गेला. त्याची कठपुतळी बनवणारे पोलादी पडद्याआडच राहिले.
तेलगी तपासकांडात तस्नीम भरडून निघाली. होत्याची नव्हती झाली. कैकांनी तिच्या आरसपानी देहाला ओरबाडले, आपला कंड शमवून घेतला.

पूरेपूर वापरानंतर चोथा झालेलं तस्नीमचं पार्सल बंगालमध्ये तिच्या मूळ गावी पाठवलं गेलं. दशकापूर्वी आणखी काही चाव्या फिरल्या, तिला देशातून परागंदा होत बांग्लादेशात जावं लागलं.
तिथल्या कुख्यात चमडीबाजारमधील एका दलालानं तिला स्टेपनी ठेवलं. तंगैलमधल्या कंदपाडाच्या नरकात ती खंगून गेली.
कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत असे भोग तिच्या वाट्यास आले. कुणालाच तिची दया आली नाही. ऑक्टोबरमध्ये तिची कायमची सुटका झाल्याचं कळतंय.
तिचा मुलगाही आता मोठा झालाय पण दुर्दैवाने तो सप्लायरच्या चेनमध्ये रूतलाय. आईला बाहेर काढण्याच्या नादात तोच अडकलाय.
नियती इतकी कठोर का होते याची उत्तरे काही केल्या मिळत नाहीत.

मनोजकुमारच्या 'पूरब और पश्चिम'मध्ये एक गाणं होतं,
"कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा दर खुला है खुला ही रहेगा..."....
अशा वेळी वाटतं की आयुष्यात असं कुणी तरी असलं पाहिजे जे जीवनाच्या अंधार वळणावर दिशादर्शनासाठी आपल्या काळजाचे दिवे तेवत ठेवेल..


- समीर गायकवाड.


#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा  
#लोकमत #दुनियादारी #डान्सबार #चुकलेल्या वाटा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा