कवितेचे मर्म - शमसूर रहमान : बांगलादेश, उर्दू कविता - poecy पोएसी |
एके दिवशी मी वृक्षाकडे गेलो आणि त्याला विचारलं,
“प्रिय वृक्षराज, तुम्ही मला कविता करून द्याल का ?”
वृक्ष उत्तरला,
“जर तू चिरफाळ्या उडवल्यास माझ्या सालीच्या
अन् खोडाशी एकरूप होऊन गेलास,
तर तुला नक्की कविता गवसेल. !”
ढासळण्याच्या बेतात आलेल्या भिंतीच्या कानी पुटपुटलो
"मला कविता देशील का ?"
घोगऱ्या स्वरात जुनाट भिंत वदली,
"माझ्या विटांत, आजोऱ्यात कविता दिसेल तुला !"
मग एका थकलेल्या वृद्धापाशी जाऊन गुडघ्यावर बसून तोच प्रश्न विचारला.
नि:शब्दतेची सतार वाजवत तो उत्तरला,
माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तुझ्या वदनी कोरून घे
मग पाहा, तुला कविता गवसेलच !....
फक्त कवितेच्या काही पंक्तींसाठी या
झाडापाशी, भिंतीपाशी आणि वृद्धापाशी बसून राहावं ?
आणखी किती काळ मी गुडघे दुमडून घ्यावेत ?
-------------------------
प्रसिद्ध बांगलादेशी कवी शमसूर रहमान यांच्या 'नज्म' या उर्दू कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. बांगलादेश म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे एक ठराविक हिंस्र आणि विध्वंसक चित्र येते, डोक्यात एक मासलेवाईक धर्मभेदाचे घड्याळ टिकटिक करू लागते. तिथं सर्वत्रच एकसारख्या वृत्तीची माणसं असतील का, याचा सारासार विचारदेखील आपण करत नाही. कारण तिथलं अन्य काही चांगलं आपल्यापर्यंत आलेलं नसतं किंवा येऊ दिलेलं नसतं वा आपणही त्या दिशेने शोधण्याचा प्रयत्न केलेला नसतो.
अक्राळविक्राळ गर्दीच्या समुदायाचा अविचारी भाग होऊन गेलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी तर ही बाब जवळपास अशक्य, अतर्क्य होऊन बसते. मग कल्पना करा की ज्या देशात आर्थिक, सामाजिक स्थैर्य नावालादेखील नसेल व भेदाभेद, विषमता, हेट्रेड हाच तिथल्या सत्ताभावाचा पाया असेल तर परिपक्व वा नवनवोन्मेषशाली विचारांची मांडणी करणाऱ्या लोकांची तिथली अवस्था आणि व्याप्ती किती असेल? अशा लोकांना तिथल्या जनमानसात काय स्थान असेल अन् त्यांच्या मतांना काय किंमत असेल? या सर्वच प्रश्नांची उत्तरे अतिशय निराशाजनक असली तरीही असे काही आशावादी लोक तिथे आहेत. त्यात काही प्रतिभावंत कवी व लेखकही आहेत.
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीचे बांगलादेशचे अर्वाचीन कवी मायकेल मधुसूदन दत्ता यांचा वारसा पुढच्या पिढीतल्या कवींनी समर्थपणे पेलला. त्यापैकी एक होते शमसूर रहमान. आताच्या पिढीत एक नाव उहीन दासचे आहे ज्याच्या शब्दांचं लवलवतं पातं अनेकांना घाम फोडतेय. असो. शमसूर रहमान यांनी कवितेच्या निर्मितीची मनोवस्था नेमकी टिपलीय. संवेदनशील मन असल्याशिवाय प्रभावी काव्यनिर्मिती होत नाही हे अप्रत्यक्षरीत्या सुचवलं आहे. इतकंच नव्हे तर आपल्या रोजच्या जीवनातील सामान्य वाटणाऱ्या घटकातही प्रचंड ताकदीचं काव्यबीज दडलं आहे हेही त्यांनी दाखवून दिलं आहे. काही ओळींची ही कविता म्हटलं तर एक संदेश आहे अन् काव्य प्रयोजनही आहे.
हिंसाचार, दारिद्र्य, वंशभेद, निरक्षरता, अनारोग्य, कर्मठता, परंपरावाद आणि विषमता यांनी ग्रासलेल्या आपल्या शेजारी देशातील बिनचेहऱ्याच्या गर्दीच्या लाखो जथ्थ्यातील लोकांपैकीच एक बिंदू असलेला एक कविमनाचा माणूस चराचराच्या वेदनांवरही काव्य करतो. अस्सल कविमन कुठेही तग धरू शकतं याचे हे धीरोदात्त उदाहरण ठरावे.
बांगलादेशी घुसखोर आणि ब्रम्हपुत्रा, गंगा या नद्यांना येणारा पूर इतकाच आपला बांगलादेशसंबंधीचा वैचारिक दृष्टिकोन उरलाय. इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देताना केलेली शर्थ हा आपला पुढचा टप्पा असतो. याखेरीज तिथलं काहीसं कडवट इस्लामीकरणाकडे झुकत चाललेलं वातावरण हा आपल्याकडील काही लोकांचा चर्चेचा विषय असतो. तिथले बागुलबुवे दाखवत आपल्या पोळ्या भाजण्याचं काम आपले राजकारणी चोख बजावत असतात.
तिकडेही अशीच परिस्थिती आहे. अशा कालखंडात परस्पर देशातील सांस्कृतिक बाबींचा आढावा घ्यायचा म्हणजे काहींचा रोष ओढवून घेण्याचं काम. बांगलादेशातील साहित्य चळवळीत शमसूर रहमान यांचा उल्लेख होणार नाही असं होत नाही. भारतास स्वातंत्र्य मिळण्याआधीच्या १९२९ मध्ये ढाक्याजवळील पहाडतुली परिसरात मेघना नदीच्या तीरावरल्या नितांत सुंदर खेड्यातला त्यांचा जन्म झाला. आजोबांच्या घरी जन्मलेले शमसूर त्यांच्या मात्यापित्याचे चौथे अपत्य होते.
१९४९ च्या सुमारास रवींद्रनाथ टागोर यांचं काव्य त्यांच्या वाचनात आलं आणि ते आमूलाग्र बदलून गेले. त्यांची विचारपद्धती बदलली. साध्या गोष्टीतून महान संदेश देण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. वर्तमानपत्राचा साधा वार्ताहर ते बांगलादेशचा सर्वोत्तम कवी असा त्यांचा प्रवास झाला. उदारमतवादी मानवता, मानवी नात्यांची गुंतागुंत, प्रेमासक्त विद्रोह आणि बांगलादेशमधली राजकीय -सामाजिक आवर्तने त्यांच्या कवितातून सदैव प्रसवली. मूलतत्त्ववादी कट्टरतेस त्यांनी विरोध केला. त्यांचे साठहून अधिक काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. बांगला साहित्याचे ते खऱ्या अर्थाने दीपस्तंभ होते.
- समीर गायकवाड.
पूर्वप्रसिद्धी - पाक्षिक सदर 'पोएसी', रसिक पुरवणी, दैनिक दिव्य मराठी. दि. १/३/२०.
दिव्य मराठीमधील लेखाची लिंक...
________________________________________
I go to a tree and say:
Dear tree, can you give me a poem?
The tree says: If you can pierce
My bark and merge into my marrow,
Perhaps you will get a poem.
I whisper into the ears
Of a decaying wall:
Can you give me a poem?
The old wall whispers back
In its moss-thickened voice:
If you can grind yourself
Into the brick and mortar of my body,
Perhaps you will get a poem.
I beg an old man
Bending on my knees:
Please give me a poem.
Breaking the veil of silence,
The voice of wisdom says:
If you can carve the wrinkles
Of my face onto your own,
Perhaps you will get a poem.
Only for a few lines of poetry,
How long must I wait before this tree,
In front of the crumbling wall,
And the old man?
How long will I be bending on my knees?
- समीर गायकवाड.
#अनुवादित_कविता...
ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवाnice after long time, have read something pointable, do continue your writing.....
उत्तर द्याहटवाTHANKS ..
हटवा