शनिवार, २१ मार्च, २०२०

करोना व्हायरसवर मात करणारं प्रेम - टफर दॅन द रेस्ट


काल रात्री रशिया टुडे (RT) वाहिनी पाहत असताना करोना व्हायरसच्या जागतिक विध्वंसाच्या बातम्यांची मालिका सुरु होती. मात्र त्यात आपल्याकडील 'टॉप फिफ्टी बातम्या सुपरफास्ट' असा भडक मामला नव्हता. एका बातमीपाशी वृत्तनिवेदिकेने आवंढा गिळल्याचे स्पष्ट जाणवले. बातमी इटलीच्या करोनाबाधितांच्या मृत्यूची होती. ब्रिटिश, स्पॅनिश सरकारांनी देखील इटलीप्रमाणेच मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची त्यांच्या नातलगांशी अखेरची भेट स्काईपद्वारेच करून दिली जावी, त्यांना इस्पितळात येण्यास सक्त मनाई करावी असा नियम जारी केल्याची ती बातमी होती.


मिलानमधील एका इस्पितळातील घटनेचे दृश्य होते. आयसीयूमधील डॉक्टर एका अत्यवस्थ असलेल्या वृद्ध रुग्णाच्या तोंडात लावलेली ऑक्सिजनची ट्यूब किंचित बाजूला ओठाच्या कडेला सरकावताना दिसतात. जीवनमृत्यूची लढाई हरलेल्या त्या वृद्धाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागतात. डॉक्टरांच्या शेजारी उभी असलेली परिचारिका गंभीर होते. त्या एकाकी वृद्धाच्या मस्तकावरून हात फिरवावा असं तिला एक क्षण वाटलं असावं. कदाचित तिच्या पित्याची, चुलत्याची, परिचिताची छबी तिला त्यांच्यात दिसली असेल का असं राहून राहून वाटलं. पडलेल्या चेहऱ्याने डॉक्टर त्या वृद्धास धीर देण्याचा प्रयत्न करतात. रडणं थांबवून 'गुड फेअरवेल'साठी विनवतात. स्क्रीनवरची दृश्ये झपाट्याने बदलत होती. वृद्धाच्या समोर असलेल्या टॅबवर कॅमेरा रोखला गेला. पलीकडे एक सुरकुतल्या चेहऱ्याची वृद्धा, हरलेल्या देहबोलीची दोन मध्यमवयीन मुलं, दोन प्रौढा आणि बावरून गेलेला एक चिमुरडा इतके जण दिसतात. त्या सगळ्यांचे डोळे डबडबलेले. त्यांना पाहून मृत्यूशय्येवरच्या असहाय्य वृद्धाने स्वतःला सावरत कसनुसं हसण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला.

हा सगळा वृत्तांत वृत्तनिवेदिका इंग्रजीतून सांगत होती. "सगळं शांत झाल्याशिवाय माझं दफन करू नका, आनंदी राहा, एकमेकांची काळजी घ्या" असं तो अस्पष्ट पुटपुटतो. मुळची एबीसी न्यूजची क्लिप असल्याने तळाशी इंग्रजी सबटायटल्स उमटत राहतात. दीर्घ श्वास घेऊन रुग्ण पुन्हा पुटपुटतो "एक रिक्वेस्ट आहे.." उच्चार अडखळत जातात. आवाजात कंप जाणवतो. पुढचं अस्पष्ट ऐकू येतं. एव्हढयाने त्याला धाप लागलेली. त्याचं बोलणं ऐकून पलीकडे घरातल्या सगळयांनी यंत्रवत माना डोलावल्या. त्या वृद्धाचे त्याच्या जीवन सहचारिणीवर अफाट प्रेम असावं. त्यानं तिला सांगितलेलं, ब्रूस स्पिरिंग्टनचं गीत 'टफर दॅन द रेस्ट'ची धून दफनविधीवेळी वाजवली जावी. टॅबवर दिसणाऱ्या वृद्ध स्त्रीला हुंदका अनावर होताना दिसतो. इकडे त्या वृद्धाच्या थकलेल्या म्लान चेहऱ्यावर मंद स्मित दिसतं. डॉक्टरांच्या शेजारी उभी असलेली परिचारिका पुरती गहिवरून गेल्याचं स्पष्ट दिसलं. बातमी सांगणारी वृत्तनिवेदिका देखील काहीशी कावरीबावरी झाल्याचं जाणवलं.

एकेकाळी मला इंग्रजीचा गंध शून्य होता त्या काळातदेखील हे गाणं मी ऐकलेलं. त्या वृद्धाची फर्माईश ऐकून मलाही गलबलून आलं.
बातमी संपल्यानंतर गुगल सर्च केलं तेंव्हा डोळ्याच्या कडा पाणावल्या.
या गाण्याच्या काही पंक्ती अशा आहेत.
Well it's Saturday night
You're all dressed up in blue
I been watching you awhile
Maybe you been watching me too
So somebody ran out
Left somebody's heart in a mess
Well if you're looking for love
Honey I'm tougher than the rest

कधी तरी हे जोडपं तरुण असेल, त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या असतील. जीवापाड प्रेम केलं असेल. आता अखेरचा निरोप घेताना त्याच भावनांना त्याने निवडलेलं ! ही अखेरची ईच्छा प्रेमविलक्षणाने ओतप्रोत भरलेली असणार हे नक्की... करोनाची साथ ओसरेल तेंव्हा या वृद्धाचं दफन होईल तेंव्हा त्याची ही वृद्ध प्रेमिका नक्कीच म्हणेल की तो सर्वांपेक्षा टफ होता ! टफर दॅन द रेस्ट !!
खरेच तो खूप टफ असणार, अखेरच्या क्षणी देखील त्यानं सर्व काही साधलं होतं, मग भले मृत्यूने त्याला परास्त केलेलं असलं तरी त्याने काही फरक पडला नव्ह्ता....

मानवी जीवनातील सर्वोच्च भावना असलेल्या प्रेमाला सलाम !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा