अंडरवर्ल्डमधली काही मंडळी तिला न्यायला टॅक्सी, टॅक्सी पाठवत. कुणी पाठवलं याची खात्री करूनच मनाला पटलं तर ती जायची. एकदा राजन नायरच्या हाताखालच्या काही सी ग्रेड भडभुंज्यांनी तिला नेलेलं. तिथं गेल्यावर तिने शय्यासोबतीस नकार दिला तेंव्हा तिला कुत्र्यासारखं मारलेलं. तिने ही बातमी तिच्या खास गिऱ्हाईकाला दिली. त्याने त्याच्या बॉसला ही माहिती दिली. ज्याने राजन नायरच्या त्या गुंडांना धडा शिकवला. नंतर कालीला त्या बॉसचं चांगलंच वेड लागलं. बॉससोबत कालीची नस जुळण्यामागं आणखी एक कारण होतं. ते दोघंही केरळी होते. कालीचं खरं नाव मार्था होतं तर त्याचं नाव होतं अब्दूल लतीफ कुंजू. त्याला स्मिता पाटील आवडायची. त्यानं कालीला कधीच काली म्हणलं नाही, तो स्मिता म्हणायचा. तिला मात्र ते आवडत नव्हतं. नंतर त्या कुंजूसोबत एक टॅक्सीवाला तिला दिसू लागला. काली त्याच्यावर जाम लट्टू होती. पण त्याला तिच्याशी काही देणं घेणं नव्हतं.
1988 मध्ये अतिमद्यप्राशन केल्यानं नशेच्या अंमलात काली सज्ज्यातून खाली कोसळली. मेंदूला मार लागून रक्तस्त्राव झाला. काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला. नेहमी मोजून मापून पिणाऱ्या कालीचं शेवटच्या काळात संतुलन ढासळलं होतं. ती बेहिशोब दारू ढोसू लागली होती. वास्तवात ती मोडून पडली होती. तिला जीव लावणाऱ्या कुंजूची राजन निकाळजेच्या गुंडांनी ऑगस्ट 1987 मध्ये हत्या केली. यानंतर काही दिवसातच छोटा राजनच्याच हस्तकांनी काली ज्या टॅक्सीवाल्यावर भाळली होती त्याचीही हत्या केली. कुंजू नामचीन गुंड होता. टॅक्सीवाला मात्र सराईत गुन्हेगार नव्हता. बहिणीच्या लग्नासाठी त्याला काही रक्कम हवी होती. मदतीच्या बदल्यात कुंजूने त्याला गंडवले. त्याच्या हातात रिव्हॉल्वर देऊन एकाला खलास करण्याची टीप दिली. ती टीप कुणा ऐऱ्यागैऱ्याची नव्हती तर थेट राजन नायरची होती. त्याला पंधरा दिवस ट्रेनिंग दिलं. मर्डरच्या आदल्या रात्री त्याच्या हाती लाख रुपये टिकवण्यात आले. बहिणीच्या लग्नापायी दारोदार भटकत असणाऱ्या त्या भणंग माणसानं मागचापुढचा विचार न करता गेम वाजवली. राजन नायर खलास झाला. त्याचा बदला घेण्यासाठी छोटा राजनने कुंजूसह त्या टॅक्सीवाल्यासही खलास केलं. त्या टॅक्सीवाल्याचं नाव होतं चंद्रशेखर सफालिका!
सामान्य सभ्य जगात एखाद्या स्त्रीचं मन दुभंगलं तर तिला सावरायला तिचं कुटुंब, भाऊबंद, आप्तेष्ट, मित्र, समाज सोबत असतो. पण ज्या स्वतःच बेवारस असतात अशा स्त्रिया कोलमडून गेल्यावर त्यांना हात देणारं कुणी नसतं. म्हणूनच या बायका आपली असलियत लपवत असतात, कुणावर जीव लावत नसतात. चुकून लावलाच तर तो त्यांच्या जीवावरच बेततो. कदाचित यामुळेच यांच्या मिठीत ते सुख कधीच जाणवत नाही जे अस्सल प्रेमात जाणवतं. पण कालीसारख्या बायका याला अपवाद असतात. म्हणूनच चमडीबाजारच्या लेखी त्या महान ठरत नाहीत. त्यांचे किस्से मात्र अलवारपणे काळजात जतन केले जातात. ज्या जागी कालीचा प्रवास संपला होता तिथं कित्येक दिवस एक सुगंधी परिमळ जाणवत होता. तिच्या ठायी घुमणाऱ्या मंद वासाच्या खास अत्तराचा तो दरवळ होता. खेरीज तिथे कोनाड्यात तिची विदीर्ण स्वप्नेही पडून होती.
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा