सोमवार, २ मार्च, २०२०

मणिकर्णिकेच्या घाटावरच्या स्मृती...


गंगेच्या काठी असलेल्या मणिकर्णिकेच्या घाटावरती मृतदेहांवर अंतिम संस्कार करताना त्यांच्या कपाळावर आणि डोक्याच्या मागील बाजूस मानेवर ठोकतात. याच्या मागचं कारण असं सांगितलं जातं की मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मस्तिष्कात कोणत्याही आठवणी राहू नयेत. त्याचे माइंड ब्लॅन्क राहिलं की त्याचा अंतिम प्रवास कमी यातनादायी होईल असं त्यांना सुचवायचं असतं. तर काहींना भीती वाटते की मृत्यूपश्चात त्या व्यक्तीचा आत्मा भटकू नये, त्याचा आपल्याला त्रास होऊ नये याकरिता त्याच्या स्मृती पुसलेल्या बऱ्या ! खरं तर देह अचेतन झाला की सगळं संपून जातं.

मृत्यूपश्चातच्या जगाचं विविध धर्मात जे वर्णन आलंय त्याला शास्त्रीय आधार नाही. पण लोकांच्या त्याप्रती श्रद्धा आहेत, अंधश्रद्धांचा मोठा बाजार त्यावर तगून आहे. या मुद्दयावर व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे विचार दिसून येतात. मृताच्या स्मृती कशा काय असू शकतात असा विज्ञानवादी प्रश्न पडू शकतो. पण श्रद्धा आणि धर्म यांची जादू काही और असते. असो... 

खरं तर आठवणीशिवाय जगणं अशक्य असतं, स्मृतीशिवाय जीवन सहज सुंदर होत नाही. गेलेला माणूस

कायमचा जातो पण जे जिवंत असतात त्यांच्या स्मृतीपटलावर त्याचं अस्तित्व कायम असतं. ते कुणाला असं कपाळावर वा मानेवर मारून पुसता येत नाही. मानवाला मिळालेल्या सर्वोच्च वरदानापैकी आठवणी एक होत !

युपीच्या आजमगढमधील धरमपूर गावातील डॉक्टर तुलसीराम या जन्माने डोंब असलेल्या लेखकाने आपल्या जातीतलं मागासपण अधोरेखित करताना समाजात मृत्यूला धरून असलेल्या विविध धारणांचा मुखभंग केला आहे. हिंदीत असणाऱ्या त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे 'मुर्दहिया' ! त्यात हे उल्लेख आलेत. तुलसीराम आणि त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी अनुभवलेल्या जाणिवांचा पट इथे रेखाटला आहे. हा 'मुर्दहिया' आपल्यातल्या भाकड जिवंतपणाला अखंड कुरतडत जातो.

यात एक हृदयद्रावक घटना आहे. एका अत्यंत कोवळ्या दुधपित्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिचं शव 

मणिकर्णिकेच्या घाटावर आणलं जातं, आस्ते कदम सगळे विधी होतात. सरणावर ठेवण्याआधी त्या मुलीच्या कपाळावर आणि मानेवर मारण्याची वेळ येते तेंव्हा त्या चिमुकल्या मुलीची भेदरलेली आई धाय मोकलून त्या डोंबाच्या गळ्यात पडून रडते आणि तिच्या स्मृती असू द्यात, त्या योगे ती पुन्हा माझ्या कुशीतून जन्म घेईल असं म्हणत आक्रंदन करू लागते. तिचे दुःख त्याला पाहवत नाही, तिचं तडफडणं त्याला सहन होत नाही. चिमुकलीच्या कपाळावर, मानेवर ठोकायचं टाळतो. मुलीच्या नातलगांना तो खोटंच सांगतो की तिच्या कपाळावर ठोकून झालंय. तीन दशकानंतर त्या मातेचा मृतदेह त्याच घाटावर आणला जातो. तिच्या कपाळावर ठोकायला एक वृद्ध इसम पुढे येतो कदाचित तो तिचा पती असावा असं त्या जर्जर झालेल्या डोंबास वाटतं. तिच्या कपाळास त्याच्या हाताचा स्पर्श होताच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटल्याचा भास त्या डोंबाला होतो !

नंतर त्याला कळतं की पहिली मुलगी अकाली गेल्यानंतर पुढच्याच वर्षी झालेल्या बाळंतपणात तिला पुन्हा मुलगीच होते. त्या बाळंतपणात डोक्यावर परिणाम होऊन ती भ्रमिष्ट झालेली असते. तिच्या पोटी जन्मलेली मुलगी तिची लेकही होते आणि आईही होते. अखेरच्या घटिकेपर्यंत ती तिची सेवा करते ! ही मुलगी तिच असेल का जिच्या स्मृती पुसल्या नाहीत असा प्रश्न तेंव्हा डोंबास पडतो. आयुष्यभर निर्विकारपणे निसंग भावनेने मढी जाळणाऱ्या वृद्ध डोंबाच्या डोळ्यात पाणी तरळतं. हे असं कसं काय घडलं असेल आणि का घडलं असेल हे प्रश्न त्याचा खूप दिवस पिच्छा पुरवतात ! नास्तिक असलेला कठोर मनाचा डोंब त्या घटनेनं थोडासा हळवा होऊन जातो. पण नंतरच्या काळात इतक्या काही घटना त्याला पाहायला मिळतात की त्याचा सर्वांवरचा विश्वास उडून जातो !

जगातली सगळी सुखं एकीकडं आणि आई होण्यातलं सुख एकीकडं. पण हे सुख कधी कधी जीवाला चटका लावून जातं ते असं !

'वाचेल' तो समृद्ध जगेल आणि वाचेल !

- समीर गायकवाड

नोंद - खरे तर अजूनही मणिकर्णिकेच्या घाटावर लिंगभेद होताना दिसतो. सरण रचून झाले की स्त्रियांना चितेजवळ जाता येत नाही. मुळात स्त्रियांची कलेवरे तिथे शक्यतो आणू दिली जात नाहीत. यमुनादेवी या एकमेव महिला डोंब आहेत ज्या अंतिम अग्नीदाहाचे काम करतात. किशोरीचा मृतदेह असला तर फारशी अडचण येत नाही पण सज्ञान मुलगी / स्त्री यांचे शव तिथे आणलं की त्याला अंतिम विधीसाठी खूप तिष्ठत ठेवावं लागतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा