एक आर्त हाक मदतीची...
एफबीवर कमी होतो कारण एका जिव्हाळ्याच्या प्रश्नात गुंतून पडलो होतो.
अर्थातच देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. हा त्यांच्यासाठीचा सार्वधिक भयंकर काळ आहे तेंव्हा त्यांच्यासाठी शक्य ते करणं हे सर्वाधिक प्राधान्यतेचं काम झालं.
सध्या आपण सगळेजण रोज सकाळी बाहेर पडून आवश्यक ती खरेदी करू शकतो आणि वेळेत घरी परत येऊ शकतोय.
मात्र या बायकांकडे ना पैसे ना घर !
करोना व्हायरसची तीव्रता वाढली तसा यांना सर्वात अधिक फटका बसला, फेब्रुवारीएन्ड पासून यांची ओढाताण सुरु झाली आणि आता त्या कंगाल अवस्थेत आहेत.
रोजच्या कमाईवर जगणाऱ्या इतर अनेक घटकांप्रती समाजात सहानुभूती आहे मात्र यांचं असं नाही. बाकीच्या सर्व घटकांना समाजात थोडंफार स्थान आहे, मान आहे, आदर आहे यांच्या वाट्याला मात्र तिरस्कार आणि हेळसांड आहे.
या बायका देखील हाडामासाच्या माणूसच आहेत हा दृष्टिकोन काही केल्या आपण स्वीकारायला तयार नाही. त्याचा अत्यंत भयावह फटका आजघडीला यांना बसतो आहे.
अनेक नोकरदार लोक, चाकर वर्ग आपआपल्या गावी निघून गेलेत मात्र ज्यांना आपल्याच घरादाराने सडण्यासाठी सोडलं त्यांनी कुठे जायचं ?
मागच्या आठवड्यात एकाने मेसेंजरमध्ये विचारलेलं,"काय गायकवाड या बायकांवर करोनाचं संक्रमण झालं तर काय करणार ? त्यांच्यासाठी काही लिहिणार की नाही ?" प्रश्न कुत्सित होता. विचारणा ऱ्या सन्माननीय व्यक्तीचा हेतू मला खिजवण्याचा होता. असेना का ! या निमित्ताने त्यानेही हे मान्य केले की या बायकांसाठी हा माणूस काम करतो ! असा मी एकटाच नाही कित्येक जण आहेत. जे यांच्यासाठी जमेल ते करायला तयार आहेत. असो..
तर, जेंव्हां करोनाची साथ आली तेंव्हा या आपल्या तोंडाला मास्क बांधू शकल्या नाहीत कारण तुम्हाला ठाऊक आहेच !
आता सोशल डिस्टन्सिंगविषयी बोललं जातंय मात्र आता यांच्याकडे कुणी येतच नाही तेंव्हा यांनी कुणापासून अंतर राखायचं ? आणि कुणी आलंच तरी या त्याला नकार तरी कसा देणार ? कारण पोटाची आग फार वाईट असते.
नवीन नवीन एचआयव्हीची लागण वेगात पसरू लागली होती तेंव्हा अवघ्या काही रुपड्यासाठी जीवाची रिस्क घेण्याशिवाय यांच्यापैकी अनेकींकडे तरणोपाय नव्हता. आताही स्थिती तशीच होती. लॉकडाऊनने ती अधिक बिकट झाली, अर्थात हे त्यांच्या भल्यासाठीच आहे मात्र त्यांच्या पोटाची सोय कशी लागणार ? जे कुणाच्याच खिजगणतीत नाहीत त्यांच्यासाठी कोण विचार करणार ? अनेकांना तर ही घाण गेलेली बरी असे नेहमी वाटत असते. असो..
सरकारने गरीब वर्गातील लोकांसाठी नुकतीच योजना जाहीर केलीय. मदतीचे हे पैसे बहुत करून संबंधित खातेधारकाच्या थेट बँकखात्यात जाणार आहेत. मात्र या बायकांपैकी तब्बल निम्म्याहून अधिक बायकांची बँक खाताच नाहीत. कारण खातं उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे यांच्याकडे नाहीत. निम्म्याहून अधिक बायकांकडे ओळख सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत. अशांची नावे कोणत्याही मतदार यादीत नसल्याने कदाचित यांचे राजकीय मूल्य शून्य असावे.
ज्यांची कोणत्याही यादीत नावे नाहीत, ज्यांच्याकडे बँक खाती नाहीत, सरकारी कागदपत्रे नाहीत आणि समाज व सरकार यांच्या लेखी ज्यांना कसलेही स्थान नाही त्यांच्याकडे मदत कशी पोहोचणार हा प्रश्न कासावीस करणारा आहे.
या बायकांचे व्यवहार रोखीने होतात. पैसे यांच्याकडेच असतात. निम्म्याहून अधिक बायकांकडे महिनाभर पुरेल इतकी रोकड असते. मात्र आत महिना उलटून गेल्याने त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार ठरलेले आहेत.
एरव्ही पैशाची निकड भागवायची असेल तर या बायका उसनवारी करतात, सावकारी कर्जे घेतात.
ही मदत वा कर्जे कोण देतं ? तर यांच्या मालकिणी वा दलाल लोक यांच्याकडून मदत मिळते. अर्थात त्याची फार मोठी किंमत त्यांना चुकवावी लागते. आता तर ते ही रस्ते बंद झालेत. कारण अशा वेळी ही माणसं अंडरग्राउंड होणं पसंत करतात.
या बायकांचे मोठे दुर्दैव हे असतं की एरव्ही यांच्या पैशावर घरे चालतात. आपल्या गावी, घराकडे या ठराविक रक्कम नेहमी पोहोच करत असतात, मात्र आता कठीण काळी यांचे आप्तेष्ट देखील यांच्यापासून तोंड फिरवतात. मग या कुठे जाणार ? जरी एखादी बाई गावी गेलीच तर ती आधीच आयसोलेट झालेली असते आता तर ती बहिष्कृत केली जाऊ शकते. कारण आधीच वेश्या आणि त्यातही शहरातून आलेली म्हटल्यावर तिच्यासाठी कोण आपल्या गावाची पाणंद खुली ठेवेल ?
हे चित्र फारच विदारक आहे आणि मुख्य म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारे आहे.
लेख लिहीपर्यंत सांगली, मिरज, सोलापूर, गुलबर्गा येथील पंचवीस टक्के बायका कुणाच्या ना कुणाच्या घरी निघून गेल्या आहेत. तर मुंबई (कामाठीपूरा), पुणे (बुधवार पेठ), नागपूर (गंगा जमुना) या मेट्रो शहरातील अवस्था वाईट आहे. या बायकांना वेळीच सावध होता आलं नाही. या अक्षरशः भेदरून गेल्या आहेत.
नोटबंदीच्या काळात यांचे खाण्याचे वांदे झाले होते आता तर जगण्याचे वांदे झालेत.
यांच्याहून महाभयंकर अवस्था हायवेवर सेक्स ट्रॅफिकिंग करणाऱ्या बायकांची झाली आहे.
राज्यातील मुंबई पुणे हायवे वगळता सर्व मुख्य हायवेवर या बायका आहेत. यांची ठिकाणे टोलनाक्यालगतच्या गावांवरचे ढाबे होत. आता हायवे बंद झालेत, ढाबे बंद झालेत. हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या कमी बायकांशी संपर्क होऊ शकलेला आहे. बाकीच्यांची काय हालत झाली आहे कळायला मार्ग नाही.
यांना कुणी घरी नेऊ शकत नाही की कुठे आणून ठेवू शकत नाही.
या बायकांचे पत्ते स्थानिक पोलीस यंत्रणांना नक्कीच ठाऊक असतात. या भीषण काळी पोलीस यंत्रणेवर आलेला महाभयानक ताण पाहू जाता त्यांच्याकडून काय काय अपेक्षा कराव्यात यास मर्यादा येतात.
काही एनजीओंनी मदतीचा हात पुढे केला आहे मात्र एकुणात त्यांची हाक खूप कमी स्त्रियांच्या कानी जाईल इतकी कमकुवत आहे.
काही ठिकाणी, स्पेसिफिकली मिरज आणि पुण्यात काही लोक यांना व्यक्तिशः मदत करत आहेत मात्र गरजू स्त्रियांचे प्रमाण पाहता ती मदत अत्यंत तोकडी आहे.
इथे येणारी सर्वात मोठी अडचण ही आहे की या बायकांची खरी नावे, खरे पत्ते केवळ यांचे नातलग, अड्डेवाल्या मालकिणी,दलाल यांनाच ठाऊक असतात. ज्या स्त्रिया पोलीस रेडमध्ये पकडल्या जातात त्यांची नावे रेकॉर्डवर येतात त्यामुळे तितक्याच स्त्रियांची खरी नावे यंत्रणेकडे असतात. मात्र यातून नवी समस्या उद्भवते ती अशी की रेड पडून पकडली गेलेली बाई जेंव्हा बाहेर येते तेंव्हा ती मूळ जागी धंदा करायला न जाता अन्यत्र जाते. ती गेली नाही तर बळजोरीने तिची रवानगी केलीच जाते. त्यामुळे कोणती स्त्री कुठे धंदा करते आहे हे शोधणे धान्याच्या राशीत सुई शोधण्यासारखे आहे. यामुळे यांची यादी बनवणे, कागदपत्रे देणे सहज शक्य होत नाही. अनेक बायका पुढे येत नाहीत कारण आपलं नाव पत्ता कळला तर सरकारी यंत्रणा त्याचा आधार घेऊन भविष्यात पिळवणूक करेल ही भीती त्यांना रोखते. इकडे आड तिकडे विहीर आणि जिथे आहे तिथे उपेक्षेचा आगडोंब अशा संकटात या बायका सापडल्या आहेत.
शोषणाचं मुर्तिमंत प्रतिक असलेला हा घटक तुमच्या सहानुभूतीची वाट पाहतो आहे.
आज घडीला यांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे.
तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की हा लेख अधिकाधिक शेअर करावा. प्रत्येक जिल्ह्यातील, शहरातील यंत्रणेपर्यंत हा लेख पोहोचला तर त्यांचे देखील हृदय द्रवेल. सरकारी यंत्रणा यांना अपवाद मानून मदत करतील. कागदाचा आग्रह न धरता जमेल ती मदत करतील.
या बायकांसाठी आम्ही काही करू शकतो का असं तुमच्यापैकी अनेक जण मला विचारत असता हे मी वेळोवेळी मांडले आहे. आज साश्रूपूर्ण नयनांनी हात जोडून मी आपणास विनंती करत आहे की आज तुम्ही हा लेख शेअर करा. यांची आर्त हाक सरकारपर्यंत पोहोचवा.
सरकार जमेल ती सर्व मदत करते आहे, मला खात्री आहे की आपला आवाज बुलंद झाला तर या बायकांच्या जगण्याचा प्रश्न निकालात निघेल.
या कठीण काळी तुमच्या या मदतीची खूप गरज आहे.
मला खात्री आहे, की माझ्या आवाहनाला तुम्ही नक्की प्रतिसाद द्याल. या शोषित घटकास मदतीचा हात द्यावा अशी सर्व शासकीय यंत्रणेस तळमळीची विनंती आहे. आशा करतो की हा तिढा नक्की सुटेल.
माझ्या या वंचित माताभगिनींचा दुवा तुम्हाला नक्कीच लाभेल...
- समीर गायकवाड.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
करोना प्रतिबंधासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे रेड लाईट एरियातील महिलांच्या उपासमारी आणि भुकेकंगाल अवस्थेविषयीच्या आर्त कैफियतीची सरकारदरबारी दखल घेतली गेलीय.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत ही हाक पोहोचलीय.
महिला व बालकल्याण मंत्री ना. ऍड यशोमतीजी ठाकूर यांनी येथील एकही महिला मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे स्पष्ट केलंय.
तर समाजकल्याण मंत्री श्री. धनंजयजी मुंडे यांच्या वतीनेही सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिलं गेलंय.
तुम्ही सर्वांनी जो अभूतपूर्व सपोर्ट दिलाय त्याचीच ही परिणती आहे...
सर्वांचा ऋणी आहे..
नोंद - काहींनी मला न विचारता माझ्या खात्यावर परस्पर पैसे पाठवले होते ते संबंधितांना त्वरित परत पाठवले आहेत. आपणा सर्वांचा विश्वास व भक्कम पाठबळ शब्दातीत आहे. माणूसकीचं हे दर्शन गलबलून टाकणारं आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा