सोमवार, २ मार्च, २०२०

मुजरानर्तिका ते तवायफ...



लखनौ आणि बनारस ही मुजरा कलावंतांची दोन प्रमुख केंद्रे होती. पैकी बनारसमधल्या अदाकारा गंगेकाठची एकेक नगरे पार करत कोलकत्यात जाऊन वसल्या. या बायकांकडे जाणं म्हणजे खूप मोठं लांच्छन समजले जाई. त्यामुळे मोठमोठे आमीरजादे इच्छा असूनही त्यांच्या दारी जात नसत पण छुप्या पद्धतीने त्यांच्या मैफली आपल्या इलाख्यात भरवत, त्याचा आनंद घेत. बऱ्याचदा एखाद्या धनिकास पसंत पडलेल्या कोठेवालीस तो अंगवस्त्र समजून ठेवून घेई, तिची उमर ढळेपर्यंत तिची देखभाल करे. पण सर्वच ठिकाणी असे होत नसे, अनेकदा त्यांना वापरून टाकून दिले जाई. मात्र गायकीवर, नृत्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या स्त्रीसौंदर्याच्या रसिकांनी यांना भरभरून प्रेम दिले. अनेक दशके हीच परिस्थिती होती. लखनौच्या नवाबपदी आलेल्या शुजाउद्दौलाने हे चित्र पालटले. हा शुजाउद्दौला मराठ्यांच्या इतिहासातही आढळतो. अहमदशहा अब्दालीच्या खांद्याला खांदा लावून त्याने पानिपतमध्ये मराठ्यांचा दुर्दैवी पराभव केला होता. याच शुजाचा इंग्रजांनी बक्सरच्या लढाईत १७६४ मध्ये दारूण पराभव केला होता. या लढाईने इंग्रजांचा पाया बळकट झाला होता. हा शुजाउद्दौला एका वेगळ्या कारणाने लखनवी इतिहासात प्रसिद्ध झाला, तो इतिहास म्हणजे त्याचा बायकांचा शौक ! हा माणूस कमालीचा शौकीन होता, त्याचा हा शौक कित्येकदा पिसाटासारखा असे. हा पहिला नवाब होता ज्याने महालात मजा घेण्याऐवजी कोठेवाल्या बायकांच्या कोठ्यावर जाऊन बसून मैफली लुटल्या आणि शीलही लुटले, पण बदल्यात अफाट दौलतजादा केली !

शुजाउद्दौलाच्या या नव्या पायंडयाने तवायफकडे जाणं हा अमीरांचा रंगीन शौक झाला. धनवानांच्या या शौकाचा उल्लेख 'साहिब बिवी और गुलाम'मध्ये रेहमानच्या तोंडी आहे. रात्रीच्या अंधारात येणारे हौशी लोक किंवा स्त्रीसुखाचा हेतू मनात ठेवून आलेले लोक वा निखळ गीत-संगीत रसिक यांच्या व्यतिरिक्त कोठ्यांवर कोणच येत नसे. शुजाउद्दौलाने या संकेताच्या चिंधडया उडवल्या. ही गोष्ट कर्णोपकर्णी झाली आणि अनेक श्रीमंत लोकांनी या गल्ल्यातील देखण्या व उच्च वर्गाच्या तवायफ स्त्रियांशी लागेबांधे ठेवले. यामुळे इतरत्रही लोक मोठ्या प्रमाणात याकडे आकृष्ट होऊ लागले. परिणामी बहादूरशहा जफरच्या काळात यांना सोन्याचे दिवस आले.

हीच टूम कोलकत्यातल्या गल्ल्यात आली तेंव्हा
तिथल्या श्रीमंतांनी आपले मोर्चे तिकडे वळवले. याच लोकात एक होता अनंग बाबू, जो बंगाली लेखक विभूतीभूषण बंदोपाध्यायांच्या एकांत सफरीत भेटला असावा. मुंबईचा कामाठीपुरा अत्यंत भरात होता तेंव्हा तिथल्या चौदा लेनपैकी एक लेन खास मुजरावाल्या बायकांची होती. मुजरागली असं तिचं नाव होतं. अनेक हिंदी सिनेमात तवायफ आणि कोठ्यांचे विषय मांडले गेले. 'मुकद्दर का सिकंदर'मधील जोहराबाई ही मुंबईच्या बदनाम गल्ल्यांची देण होती. जी स्थिती कोलकता, दिल्ली, मुंबई, लखनौत होती तीच देशातील अनेक छोट्यामोठ्या शहरात होती. आताच्या बिहार राज्यात अडतीस जिल्हे आहेत त्यात पन्नासेक रेडलाईट एरिया आढळतात. या पैकीच एक म्हणजे 'चतुर्भुज स्थान' आहे. ह्या अनोख्या नावाचा रेड लाईट एरिया बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातला आहे. मुघलपूर्व काळात इथे भगवान चतुर्भुज यांचे विख्यात मंदिर होते. परिसरात त्याचा खासा लौकिक होता. इथल्या लोकसाहित्यात त्याचे उल्लेख आढळतात. मुघल काळात या भागाचे हिमालयन पर्वतरांगांशी असलेलं भौगोलिक स्थान या नात्याने लष्करी तळाच्या सोयीच्या भूमिकेतून पाहिले गेले. याच काळात येथे घुंगरू, तबला आणि हार्मोनियमचे स्वर ऐकू येऊ लागले. कालांतराने ती या भागाची ओळख बनून गेली. प्रसिद्ध साहित्यिक शरतचंद्र चट्टोपाध्याय यांना त्यांची ‘पारो’ येथे गवसली. तिचे मूळ नाव होते सरस्वती. त्यांनी तिला आपल्या प्रतिभेचे पंख लावले आणि भारतीय साहित्य-कला दालनात देवदास नावाचं पर्व अजरामर केले.


मुजफ्फरपूरचे हे ठिकाण हा जणू मुजरा आणि तवायफ यांचा बाजार झाला. पन्नाबाई,
गौहरजान, चंदाबाई यांच्यासारख्या नामवंत कलाकार इथे आपली गायकी पेश करून गेल्या. हा बाजार इतका रुजला की इथे प्रथाच पडली की सर्व प्रकारच्या शारीरिक संबंधातून इथे जन्माला आलेल्या मुलींना त्याच धंद्यात परंपरेने आणले जाऊ लागले. वास्तवात हा कलंक होता पण लोकांनी त्याला रूढीचे गोजिरवाणे नाव देत स्त्रियांचे शोषण सुरु ठेवले. स्वातंत्र्योत्तर भारतात इथला मुजरा काळाच्या पडद्याआड गेला तरी स्त्रियांचे भोग संपले नाहीत, इथल्या स्त्रिया वेश्याव्यवसायात ओढल्या गेल्या. मुळातच मुजरानर्तिका आणि तवायफ यांच्यातल्या सीमा खूपच धूसर होत्या. भरीस अनेक लोकोपवाद किस्से जनमानसात प्रचलित होते त्यांनी वेश्यावृत्तीला बळकटी दिली.

- समीर गायकवाड.

1 टिप्पणी: