शनिवार, २५ जानेवारी, २०२०

वासनेच्या काजळडोहात डोकावताना....



रामन राघववर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी त्याला त्याच्या कामवासनेविषयी विचारलं तेंव्हा त्याने निर्विकारपणे उत्तर दिलेलं की, "सेक्स हे रेशनसारखं असतं. गाडीला जसं पेट्रोल लागतं तसं परिपक्व शरीराला सेक्स लागतं."
रामनचं त्याच्या आईवर प्रेम नव्हतं, त्यानं सांगितलेलं की आईचंच त्याच्यावर प्रेम नव्हतं.
रामनला त्याचे वडील आवडायचे, वडीलांनी चोऱ्यामाऱ्या शिकवल्या हे उपकारच होय असं त्यांचं म्हणणं.
रामनच्या मात्यापित्यांचा लवकर मृत्यू झाला.
रामनच्या बहिणी आणि आवडत्या भावाचा देखील लवकर मृत्यू झाला.
त्याच्या नात्यात पार्वती नावाची एक बहीणच काय ती जिवंत राहिलेली.
या पार्वतीची मुलगी गुरुअम्मा हिच्याशी त्याचा विवाह ठरला. विवाह सोहळा संपन्न होणार तोच चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला आत टाकलं.
दरम्यान तिकडे गुरुअम्माचा विवाह दुसऱ्या व्यक्तीशी झाला, त्याच्यापासून अपत्य ही जन्मास आलं. मात्र त्या बाळास जन्म दिल्यानंतर गुरुअम्माचा मृत्यू झाला.
रामनवर याचा आघात झाला पण तो व्यक्त होऊ शकला नाही.
गावातल्या लोकांनी त्याचं मन वळवलं आणि दुसऱ्या एका स्त्रीशी त्याचं लग्न निश्चित केलं.
रामनच्या मनात संशयाचा भुंगा पोखरत होताच, त्याने चौकशी केली, त्या बाईचं आधीच एक लग्न झालं होतं, तिला नवऱ्याने टाकून दिलं होतं. त्या व्यक्तीपासून तिला एक मुलगा देखील होता.

या घटनेने रामनचा लोकांवरचा विश्वास उडाला. बायकांवरचा तर आधीच उडाला होता. रामनने सगळ्या बंधनांतून मोकळं करून घेतलं आणि पाय फुटतील तिकडं तो निघाला.
काही दिवसांनी रामन कपडा मिलमध्ये कामास लागला. दरम्यान एका मिलकामगाराशी त्याची मैत्री झाली. रामन दिवसपाळीवर आणि तो रात्र पाळीवर असताना एक घटना घडली. मित्राच्या बायकोने त्याला शय्यासोबतीची ऑफर केली. सहारा दिलेल्या मित्राची पत्नी असल्याने रामनला तिची किळस आली, त्याने नकार दिला.
सकाळ होताच त्या बाईने आपला विनयभंग झाल्याची बोम्ब ठोकली. रामनला घर गमवावं लागलं.

या घटनेनंतर रामनचं रूपांतर अशा एका हिंस्त्र श्वापदात झालं की ज्याला आपली सेक्सची भूक तर शमवयाची होती परंतू बाईची सावलीही नको होती.
त्याने दोन्ही इच्छांचे शमन केलं. रानटी पद्धतीने वेश्यांना भोगलं आणि मोकाट होत बायका माणसांचे मुडदे पाडले.

रामनने खुनांची साखळीच सुरू केली. त्याने चाळीसेक मुडदे पाडले. यातलं एक हत्याकांड सर्वात भयावह असं अंगावर काटे आणणारं होतं. रक्त गोठवून टाकणारं हे तिहेरी हत्याकांड अत्यंत पाशवी आणि निष्ठुर होतं. झोपडपट्टीत देह विक्रय करणारी एक स्त्री, तिचं तान्हं बाळ आणि तिचा दल्ला. रामन सहा दिवसांपासून तिच्या झोपडीवर पाळत ठेवून होता. ते तिघे दोन खाटांवर झोपायचे. बऱ्याचदा त्या पुरुषाचा पलंग झोपडीबाहेर असायचा, त्याला दोऱ्याने बांधलेलं असायचं. त्याच दोऱ्याने झोपडीचे दार करकचून आवळलेलं असायचं. पहिल्या दिवशी ते तिघेही बाहेर झोपले होते असं रामनने त्याच्या कबूलीजबाबात म्हटलंय. नंतरच्या दिवशी ते आत झोपलेले. तेंव्हा त्याच्या झोपडीत काय चाललं आहे हे त्याने झोपडीमागील भिंतीवर चढून पाहिलेलं. त्यांच्या हालचाली, उघडे देह त्याने आपल्या डोळ्यात साठवून मेंदूत गोठवून ठेवलेले. चौथ्या रात्री त्यानं पाहिलं की ती बाई त्या बाळाला छातीशी धरून दूध पाजत होती. मागचे तिन्ही दिवस ती बाई त्या बाळामुळे झोपली नव्हती. रामनने तिची छाती, स्तनाग्रे फ्रेम बाय फ्रेम डोक्यात फिक्स केलं. त्या बाईच्या गळ्यात टीचभर सोन्याच्या मण्यांची एक छोटीशी माळ होती. तिचा देह आणि ती माळ दोन्ही रामनला खुणावत होत्या. अखेरच्या दिवशी रामन पहाटे तीनच्या सुमारास दारावरचा दोर कापून तिच्या झोपडीत घुसला. काही कळण्याआधी त्याने त्या पुरुषाच्या डोक्यात रॉड घातला आणि त्याची कवटी नेमकी फोडली. त्या आवाजाने स्त्रीची पाचावर धारण बसली. वेळ वाया न घालवता रामनने तिच्या पुढयात असलेल्या केवळ दोन महिने वयाच्या तान्हुल्या बाळाची हत्या केली. त्या स्त्रीच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. ती थरथरत होती. रामनने तिच्यावरही दया दाखवली नाही. तिच्या रक्ताचं थारोळं तयार झालं. अचेतन पडलेल्या तिच्या देहाला भोगायची त्याने तयारी सुरु केली पण तेव्हढ्यात हालचालीमुळे जाग आलेल्या एका वृद्ध स्त्रीने दारातून डोकावून रक्तपात पाहिला आणि ती धावत सुटली. आपला इरादा बदलून रामनने तिथून पलायन केलं....

हे सर्व रामनने आपल्या कबुलीजबाबात संगितलेलं...

हे सर्व आजच का लिहिलं आहे ?
१९९० मध्ये ग्रॅण्टरोड स्थानकाबाहेर मध्यरात्रीनंतर एका वृद्ध महिलेवर काही गर्दुल्ल्यांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यात तिची शुद्ध हरपली. काही महिन्यांनी ती मरण पावली. त्या वृद्धेसोबत असणारी तिची नात तिथल्या स्थानिक लोकांच्या 'पुण्याई'ने धंद्याला लागली. कितीएक सभ्य रमणनी तिला भोगलं. काही वर्षांनी तिचं मानसिक संतुलन ढासळलं. काही दिवसांपूर्वीच खंगून खंगून ती मरण पावली. आज तिच्या मृत्यूची बातमी कळताच मला रामन आठवला.
रामनने मारलेलं तान्हे मूल आणि समाजाने मारलेली ही चाळीशीतली स्त्री यांच्यात मी फरक करत नाही. रामन आणि समाज एकाच स्तरावर आहेत असं मी मानतो...

कुणाच्या तरी वासना अधुऱ्या राहतात आणि कोण तरी दुसरीच त्यात भरडली जाते. इतकं होऊनही या बायकांना जग रांड म्हणतं आणि यांच्या लुगड्यात आपला वासनेचा अंधार हुंगायला आलेल्या मंडळींना समाज काहीच म्हणत नाही, किंबहुना त्यांना दूषणे देखील देत नाही...

- समीर गायकवाड

नोंद - रामन राघवबद्दलची माहिती खुशवंतसिंह लिखित 'पोर्ट्रेट ऑफ ए सिरीयल किलर'मधून घेतलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा