लॉकडाऊनमध्ये कुणाच्या जीवाचे काय हाल होताहेत यावर किती लिहावे तितके कमी पडेल अशी आताची एकंदर स्थिती होतेय. हे वर्तमानच असे आहे की आगामी काळात मागे वळून पाहताना आपली मान शरमेने खाली जावी, भयंकराच्या दारात उभ्या असणाऱ्या अनेक जीवांना आपण अंधाऱ्या खोल दरी लोटून दिलेलं असावं आणि त्यांच्या आर्त किंकाळ्यांनी आपलं काळीज विदीर्ण व्हावं. यातल्याच काही निवडक घटनांना थोडासा मुलामा चढवून इथे पेश करतोय. आजची लॉकडाऊन स्टोरी आहे दत्तूमामा केंजळयांची.
अख्खी चाळ त्यांना मामा म्हणायची कारण त्यांची खंडीभर भाची मंडळी होती जी वारंवार बीडीडी चाळीत आली की मामा मामा करून हाका मारायची. दत्तू केंजळयाला सहा बहिणी आणि दोन भाऊ होते. दत्तू सगळ्यात थोरला, त्याच्या पाठीवर सहा बहिणी आणि सर्वात शेवटी जन्मलेली जुळी भावंडे असा सगळा मामला होता. भाऊ सगळ्यात धाकटे असल्याने बहिणींच्या लग्नाची निम्मीअर्धी जबाबदारी त्याच्याच अंगावर पडलेली. ती त्याने विनातक्रार पार पाडली होती. बहिणींचे संसार उभे राहिल्यावरच लग्न करेन असा निर्धार केल्यामुळे दत्तूचं लग्न व्हायला त्याची तिशी उलटून गेली होती. त्याची धाकटी भावंडं देखील लग्नाच्या वयाची झाली होती. दत्तूचं लग्न झालं आणि त्याचे वडील निर्वतले. वडिलांच्या पेन्शनवरून वाद उदभवला तिथेही त्याने माघार घेतली. पेन्शनमधला एक छदाम देखील त्याच्या नाही परंतू गात्रे शिथिल झालेली आई मात्र त्याच्या हिश्शात आली. त्याला त्याचा आधारच वाटला. त्याचे भाऊ मात्र वेगळे झाले, त्यांनी पेन्शन विकली आणि त्या बदल्यात नवं घर घेऊन ते दोघे तिकडे स्वतंत्र राहू लागले. दत्तूने मोठ्या नेटाने संसार केला. कारकुनाची नोकरी इमाने इतबारे केली. एक पै इकडचा तिकडं केला नाही. दोन मुली आणि एक मुलगा त्याच्या पत्नीच्या पोटी जन्मले. त्याचा संसार मेटाकुटीचाच होता मात्र पत्नी कालिंदीने कधी एका शब्दाने तक्रार केली नाही. खऱ्या अर्थाने अशिलाची पोर होती ती. निवृत्त व्हायच्या बेतात असताना त्याने दोन्ही मुलींची लग्ने एकाच मांडवात केली. साधाच सोहळा केला मात्र त्यात गोडवा अपार लाभला होता. त्यानंतर मुलगा मिलिंदचं लग्न झालं आणि दत्तूसह कालिंदीचे दिवस फिरले. मिलिंदची बायको अनिता अत्यंत खाष्ट स्त्री होती. सासऱ्याने आपल्या बहिणींची आणि मुलींचीच कर्तव्ये निभावली मुलासाठी काहीच केलं नाही हे तिने नवऱ्याच्या मनावर बिंबवलं. त्याचा परिणाम व्हायचा तॊच झाला. मिलिंद बायकोच्या कह्यात राहिला.
ऐंशीपार केलेल्या दत्तूमामाच्या बायकोला कालिंदीबाईला देवाघरी जाऊन आता कैक वर्षे लोटलीत. तिच्या दवाखान्याला कर्ज झालं म्हणून अनिताने दत्तूमामालाच घराबाहेर काढलेलं. माझ्या मध्यस्थीने त्यांची रवानगी थेट वृद्धाश्रमात झाली. बायकोच्या मुठीत गेलेला मिलिंद एक शब्द बोलू शकला नव्हता. दत्तूने ग्रॅच्युईटी आणि पेन्शनची सगळी रक्कम खर्चून टूबीएचकेचं घर घेतलं होतं. याच घरातून आपल्याला निष्कासित व्हावं लागेल असं त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नसावं.
काल वृद्धाश्रमातून आलेल्या फोनवरचा आवाज धास्तावून टाकणारा होता, "दत्तूमामा एकसारखे आपल्या दिवंगत पत्नीच्या फोटोवरून हात फिरवत बसून असतात. करोनाने आपला खेळ खल्लास करावा अशी दत्तूमामाची दाट इच्छा आहे. म्हतारा पार खचून गेलाय हो ! त्याच्या खंगलेल्या देहाकडे बघवत नाही.मरून जायचं म्हणतो. त्याच्या पोराला एकदा कळवता का .. ?" मिल्याला त्वरित निरोप दिला.
"अनिता त्यांना घरात घ्यायची नाही. लॉकडाऊनमध्ये तमाशा होईल. ती किती हट्टी हेकड आहे तुला ठाऊक आहे ना ? मात्र निरोप आल्यापासून माझं आतडं तुटायला लागलंय. मीच त्यांच्यापाशी जाऊन राहिलं तर चालणार नाही का ?" हे उत्तर ऐकून मिल्याला अर्वाच्च शिव्या दिल्या. अनितावहिनीला फोन द्यायला सांगितलं तर अजूनच घाबराघुबरा झाला. वहिनीच्या नंबरवर फोन केला. "लॉकडाऊनमध्ये तुमचा बाप हाल हाल होऊन सडून कुजून मेला तर त्याचं पाप तुमच्या माथी असेल वहिनी..." मनातली सगळी भडास काढून बोललो. बऱ्याच दिवसापासूनची इच्छा फळली होती. तरीही ती माऊली नमली नाही. अखेर अनितावहिनीच्या भावाला फोन केला. त्याला परिस्थितीचं गांभीर्य होतं.
त्यानं त्याच्या खाष्ट बहिणीच्या नेमक्या जागी खिळा ठोकला. "ताई तू दत्तूमामांना घरात आणलं नाही तर मी आपल्या आबांना वृद्धाश्रमात सोडून येतो बघ ! तुझ्या कावेरीवहिनीनं तर त्यासाठी केंव्हापासून टुमणं लावलंय. बघ तुझा काय इरादा असेल ते लवकर सांग..." शेजारीच बसलेल्या त्याच्या वडिलांनी म्हणजे नारायण आबांनी त्याच्या हातावर टाळी दिली. अनिता वहिनीचा नाईलाज झाला. आज सकाळीच मिल्याने आपला म्हातारा बाप घरी आणलाय. दत्तूमामा घरी आलेत. मिल्याला करोना पावलाय ! मघाशीच मिल्याचा फोन आला होता, बापू आय लव्ह यू म्हणून हसत हसत रडत होता. खूप खुश होता...
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा