गुरुवार, २८ मे, २०२०

रेड लाईट डायरीज - लॉकडाऊनच्या वेदना : पुणे ते मेलबर्न



ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे करोना संक्रमणाची जी नवी घटना उजेडात आली आहे त्याचं प्रेरणास्थान दिल्लीत आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. करोना रुग्ण आणि संशयित व्यक्ती यांच्यासाठी सुरु असलेल्या मेलबर्नमधील आलिशान हॉटेल्समधील क्वारंटाईन सेंटर्समध्ये सेक्स रॅकेट चालवले जात होते आणि त्यातून शेकडोंना बाधा झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आपल्याकडे काय घडलं होतं याची माहिती घेतल्यास ही घटना अधिक धक्कादायक वाटेल.


उत्तरेकडील राज्यातून मुंबईत पोटापाण्यासाठी आलेली मंडळी लॉकडाऊन लागू होताच वेगाने आपआपल्या गावी परतू लागली मात्र त्यातील काही तरुण मुलींना चाणाक्ष दलालांनी गळाला लावले. जेमतेम काही हजारावर या मुली विकत घेतल्या गेल्या. विकत घेतलेल्या मुलींना दिल्लीच्या कुख्यात जेबी रोडवरील वेश्यालयात न पाठवता एस्कॉर्ट एजन्सीजच्या हवाली करण्यात आले. सेव्हन टेम्पल्स आणि प्राईड ऑफ प्ले ही यातली तरबेज मंडळी ! या मुलींना लॉकडाऊन जोमात असताना त्यांच्या ग्राहकाकडे पाठवलं जायचं.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीच्या महिला आयोगास याची कल्पना दिल्यावर त्यांनी तातडीने पावलं टाकली होती.
दिल्ली पोलीसांनी छापेमारी करत काही मुली सोडवल्या देखील मात्र बाकी सगळ्या मुली कुठं गेल्या याचा आजतागायत पत्ता लागलेला नाही.

मेलबर्नमधल्या मुली स्वखुशीने हा उद्योग करत होत्या की नाही हे अजून उमगले नाही, मात्र आपल्याकडे माहिती पुरवून देखील आपल्या यंत्रणा अशा गुन्ह्यांच्या तपासात कमालीची शिथिलता दाखवतात. अर्थात ही काही नवी गोष्ट नाही आणि याचा कुणाला संताप ही येत नाही !
कारण 'आपलं कुठं काय बिघडतंय' या वृत्तीनं आपल्याला ग्रासलं जे आहे !

देशभरात क्वारंटाईन काळात देखील दलाल सक्रिय होते, आता तर पैशांची गरज इतक्या मोठ्या प्रमाणात उफाळून आलीय की सावज आता सहजच त्यांच्या हाताला लागतील.
येणारा काळ मोठा कठीण असणार आहे.
रेड लाईट एरियातल्या स्किन करन्सीच्या धंद्याला मंदी आली असली तरी बायकापोरींचा अख्खा नवा लॉट हे लोक बाजारात उभा करतील अशी चिन्हे आहेत. ही पोस्ट कुणीही सेव्ह करून ठेवावी यातलं काहीच बदलणार नाही.

ही झाली एक बाजू तर एक दुसरी बाजू या स्त्रियांच्या बाईपणाची आहे जी अन्य कुणा स्त्रीलाही चुकली नाही. घटना पुण्यातली आहे..     
सामान्य स्त्रियांचे बाळंतपण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातली माणसं असतात. काळजी घेण्यासाठी रक्ताची नाती असतात, शेजारीपाजारी असतात, मित्रमंडळी असतात. जवळ सरकारी कागदपत्रे असली तर शासकीय निमशासकीय इस्पितळात उपचार देण्यासाठी यंत्रणाही राबत असते. गाठीला पैसा अडका असला तर ऐपतीप्रमाणे खाजगी रुग्णालयात ही प्रसूती होते. मात्र काहींच्या नशिबी यातलं काहीच नसतं.
मे महिन्यात कानपूरमध्ये अशीच घटना घडली होती त्याची दखल अमर उजालाने घेतली होती. तुलनेने आपल्या पुण्यात घडलेल्या घटनेची दखल घेण्यास आपल्या माध्यमांना काहीसा उशीर झालाय.




पुण्यातील बुधवार पेठेच्या रेड लाईट एरियातील एका सेक्सवर्कर महिलेची प्रसूती जवळ आली होती आणि करोनाच्या भीतीपोटी तिला इस्पितळात जाण्याची इच्छा होत नव्हती. सरकारी यंत्रणांनी हा संपूर्ण इलाखा पत्रे मारून बंदिस्त करून आपली जबाबदारी पार पाडली असल्याने पत्र्याआडच्या कळकटलेल्या जगात काय घडतं आहे याची बाह्य जगाला फारशी तसदी असण्याचा काही सवालच नव्हता. तसे तरी हा घटक आपल्या खिजगणतीतही नसतो. असो.

तर या महिलेस प्रसूतीवेदना सुरु झाल्यानंतर तिच्याच व्यवसायभगिनी पुढे सरसावल्या आणि तिची प्रसूती त्यांच्या घरी (यांना घर असतं का हा प्रश्न आपल्याला कधी पडतच नाही, हो ना !) पार पाडली. एरव्ही कुणाच्या तरी खाली झोपून बिस्तर गरम करणाऱ्या बायका सुईणी झाल्या आणि एका जीवाचं त्यांनी स्वागत केलं.

आपण यांना त्यांच्या जगात कोंडलं असलं तरी आपल्यातले काही जीव तिथं जात असतात. आपला कंड शमवत असतात. त्याचं आपण काही देणं लागत नाही कारण हा एक व्यवहार असतो जो पैसे देऊन केलेला असतो. कुणाच्या तरी भूलथापांना बळी पडून, स्वप्नांना भुलून यांच्यातली एखादी फुलराणी गर्भवती होते. सुरुवातीला आनंद वाटतो मात्र नंतर आयुष्यभर पस्तावत राहतात. शंभरात एखादीच समाधानी राहू शकते. बिनबाप की नाजायज औलाद, गंदी नाली का किडा, गटर का किडा अशी मुक्ताफळे उधळण्याचं काम समाज म्हणून आपण चोख बजावत राहतो. पुनश्च असो..

बाळंतीण सुखरूप आहे, तिला एका गोष्टीचं समाधान आहे की पोटी आलेलं अपत्य मुलगी नसून मुलगा आहे. हे समाधान अन्य पांढरपेशी महिलांहून भिन्न आहे. ही तृप्तता दुःखद आहे, कारण मुलगी जन्माला आली असती तर दुनियेने तिलाही धंद्याला लावलं असतं. आता तर पाळण्यातली पोर ही चालते नाही का ?

जन्माला आलेल्या पोराचं भवितव्य काय हा प्रश्न इथे विचारायचा नसतो कारण त्यातही एक स्वार्थ दडलेला असतो.
इथले उंबरठे सातत्याने झिजवले की आपण माणूस असल्याचं भाकडसमाधान धुळीस मिळतं.
पुढाऱ्याचं पोर राजकारणी होतं, डॉक्टरांचे पोर डॉक्टर, वकीलांचे पोर वकील, इंजिनिअरचं पोर इंजिनिअर होतं असं बहुत करून होत असतं.
मग वेश्येच्या पोराने काय व्हायचं ?
त्यानं दलाल व्हायचं असतं, भडवा व्हायचं असतं, क्रिमिनल व्हायचं असतं, भेन्चो व्हायचं असतं, जगाची आयमाय एक करायची असते आणि आपल्या जन्मदात्रीचं कर्ज फेडायचं असतं.
असा एक पायंडाच इथे रुळलेला आहे.

आता जन्मलेलं हे मूल भविष्यात काय करणार आहे हे काळच सांगेल. भेट झालीच पुन्हा त्याची तर त्याला मी त्याच्या जन्माची गोष्ट ऐकवेन आणि त्याच्या काळजातल्या ठिणग्यातला जाळ शिलगावेन !

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा