आता लॉकडाऊनमुळे भ्यालेला महादू कामाचे खाडे करून बसलाय आणि इथं सगळ्या गुरांच्या जीवाचा पालापाचोळा झालाय. दिवस उजाडताच महादू यायच्या वक्ताला एकसाथ सगळी उभी
राहतात, अंगावरचं रेशमी कातडं थरथरवतात. शिंगं हलवतात, शेपटीला झटके देतात. वशिंडी कलतील की काय असं वाटण्याइतकं पाठपोट हलवतात. अर्ध्या एक तासाने पुन्हा सगळी आपआपल्या जागी बसून राहतात. महादूच्या जागी येणाऱ्या सहदेव बरोबर त्यांचं सूत काही केल्या जमलेलं नाही. उगं आपलं जायचं म्हणून हाळावर जाऊन येतात आणि गवताच्या काडीलाही तोंड लावत नाहीत. दिवस मावळायच्या बेतात आल्यावर सावल्या तिरप्या होऊ लागल्या की की शेताकडे परत फिरतात. त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज जो एरव्ही मंजुळ वाटतो तो आता उदासीनतेची खूण घेऊन वावरात विरत जातो. चरायला गेलेली गुरं परतली की गोठयाला काही काळापुरती लकाकी येई. मात्र ते सगळे मुके जीव अंगातलं त्राण हरपल्यागत दावणीत आपल्या जागी बसून राहतात. त्यांच्या पुढ्यात ठेवलेली आमुण्याची पाटी तशीच राहते, कडबा कुट्टीही तशीच राहते. त्यांना पेंड जरी दिली तरी ते तिला देखील तोंड लावत नाहीत. गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर या मंडळींनी महादूचा धोसरा काढलाय.
गावातली सगळी मोकाट कुत्री पूर्वी वेगवेगळ्या जागी असत. त्यांच्या अघोषित सरहद्दी असत. कुणी पांदीच्या सांदीत पडून असत. तर आमराईच्या गारेगार सावलीत बसून असणारी एक टोळी होती. काही मोकार भुकणारी कुत्री पारावर बसून असत तर काही बेणी ग्रामपंचायतीच्या ऑफिससमोर अंगाचं वेटोळं करून पडून असत, वेशीपाशी असलेल्या जालिंदर नानाच्या कँटीनपाशी घुटमळणारी एक खास गॅंग होती. खेरीज ओढ्यापाशी दुसऱ्याच टोळीचं राज्य होतं. विठुरायाच्या देवळाच्या पायऱ्यांवर बसून असणाऱ्या काही मवाळ कुत्र्यांचंही एक जग होतं. याशिवाय गल्लोगल्ली आपआपल्या सीमा आखून त्यातलं साम्राज्य जपणारे भिडूही होते. यांना सोडून काही पोराबाळांच्या हागणदारीपाशी फिरणारी आणि गावाच्या तळ्यालगत असणाऱ्या वडपिंपळाच्या एकरेषीय झाडांच्या घनगर्द दाटीत मस्त ताणून देणारी श्वानमंडळीही होती. सगळ्या गावात अशी नाना तऱ्हेची फिरस्ती कुत्री होती. आता लॉकडाऊन लागल्यापासून शहरातली मंडळी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन घरात बसून आहेत. गावाकडेही लॉकडाऊन आहे मात्र ते भीतीतून जन्मलेलं आहे. तिथं कुणी गस्त घालायला वा चेक करायला येत नाही. एकेकाळी कुणीही न पाहिलेल्या हाकमाऱ्या बाईची जशी अगम्य भीती होती तशीच एक गूढ अनामिक भयंकर दहशत गावात आहे. काही टवाळ पोरं वगळता जो तो घरात बंद आहे. परिणामी गावकुसाच्या पटावर एरव्ही खंडीभर माणसं आणि त्यांच्या कोट्यवधी तऱ्हा पाहायच्या सवयी जडलेल्या मुक्या जीवांना गोंधळून गेल्यासारखं होतंय. चोवीस तासाच्या कोणत्याही प्रहरात ते एकत्र येतात आणि मुकाट बसून राहतात. जणू काही बैठक बोलवलीय ! मधूनच त्यांच्यात टोळीयुद्ध रंगतं, अख्खी वेस हादरून जाते. मात्र ते तितक्याच त्वरेने शांत होतं. कदाचित त्यांना कशाची तरी चाहूल लागलीय जी जीवघेणी असावी. त्यांची शांतता आणि त्यांचे उतरलेले चेहरे पाहवत नाहीत. गावाकडचं हे लॉकडाऊन जीवघेणं आहे, ज्याला कोणती भाषा नाही की कोणती लिपी नाही ! यात कैद झालीय ती मुक्या जीवांच्या आत्म्याची तगमग आहे !
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा