ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नुकताच राजीनामा दिला असला तरी त्यांना पायउतार व्हावे लागेल अशी चिन्हे गतवर्षापासून दिसू लागली होती, किंबहुना मागील महिन्यातच त्यांचे पद गेले असते मात्र त्यावेळी ते कसेबसे तरले होते. ब्रेक्झिटप्रश्नी त्यांनी ठाम भूमिका घेतली होती तेंव्हा ब्रिटिश माध्यमांत त्यांच्या प्रेमाचे जे भरते आले होते त्याला गतवर्षांपासून ओहोटी लागली होती. कोविडकाळात त्यांच्यावर चौतर्फा टीका झाली, कोविडची दुसरी लाट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्यानंतर ब्रिटिश मीडियाचे समर्थन त्यांनी गमावले होते, लोकांचे समर्थन गमावू नये म्हणून त्यांनी कठोर निर्बंध अनेक दिवस टाळले होते मात्र एक वेळ अशी आली की त्यांना नावडते निर्णय घ्यावे लागले आणि तिथूनच ब्रिटिश जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल नाराजी निर्माण झाली. त्यानंतर अशा काही घटनांचा आलेख घडत गेला कि बोरिस जॉन्सन यांच्याविषयीच्या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले. हे सर्व घडत असताना ब्रिटिश राजघराण्याने धारण केलेलं मौन बोलकं होतं, याच मौनाने बंडखोरांना बळ मिळत गेले आणि एकेक मोहरा गळत गेला. जॉन्सन कुठे चुकत गेले याचा धांडोळा घेतला तर लक्षात येते की याच कारणांपायी पश्चिमेकडील अनेक सत्ताधीशांना आपली सत्ता गमवावी लागलीय, तिकडील देशांत या मुद्द्यांना असलेले महत्व आणि त्यानुषंगाने होणारी अत्यंत बेबाक चर्चा अशा नेत्यांचे अगदी निष्ठुरपणे वस्त्रहरण करते. ब्रिटन तर खुल्या लोकशाही मूल्यांचा आणि मुक्त अभिव्यक्तीचा उघड पुरस्कर्ता असल्याने तिथे हे घडणं साहजिक होतं. वास्तवात पाहू जाता आपल्या देशात अशा प्रश्नांवर काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा अंदाज बोरिस जॉन्सन यांना नक्कीच असणार कारण ते मुत्सद्दी राजकारणी होते, असे असले तरी त्यांच्या बेफिकीर वृत्तीने आणि अतिआत्मविश्वासाने त्यांच्यासाठी संकटे निर्माण केली जी बरीचशी अ-राजकीय होती. ही संकटे राजकीय असती तर कदाचित जॉन्सन यांनी त्यावर एखादा तोडगा तरी काढला असता मात्र इथे त्यांचे सर्वच दोर कापले गेले होते. याची परिणती अखेर त्यांच्या राजीनाम्यात झाली, त्याशिवाय त्यांना पर्यायही नव्हता.