मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

समृद्धी याहून काय वेगळी असते ?



आप्तेष्ट, गणगोत, घरदार, जगरहाटी याही पलीकडे एक जग आहे.
ज्यात झाडं आहेत, शेतं आहेत, पानं फुलं आहेत,
मधुर स्वरांची रुंजी घालणारा वारा आहे, मन चिंब करून जाणारा पाऊस आहे,
अंगांग जाळून काढणारं रखरखीत ऊन आहे, डेरेदार सावल्या आहेत,
गहिवरल्या डोळ्यात पाणी आणून मायेनं बघणाऱ्या गायी आहेत,
रात्री निशब्द होणारे गोठे आहेत,
बांधाबांधावरच्या अबोल बोरी बाभळी आहेत,
खोल खोल विहिरीत घुमणारे निळेकरडे पारवे आहेत,
पायाशी मस्ती करणारी काळी माती आहे.
पोराठोरांचे खेळ आहेत, 
पारावरच्या शिळोप्याच्या गप्पा आहेत,
वेशीवरचा मंतरलेला आधारवड आहे,
मातकटलेले रस्ते आहेत,
बैलांच्या गळ्यातल्या घंटांचा सुश्राव्य नाद आहे,
घनगंभीर पाऊलवाटा आहेत,
चुलीवरच्या पातेल्यातल्या रसभरीत पदार्थाचे मुग्धगंध आहेत,
देवघरातली बासरी आहे, गाभाऱ्यातल्या समईच्या मंद ज्योती आहेत,
दूरवरून येणारी अगम्य तरीही मनाला भुलवणारी अजान आहे,
पहाटेच्या अद्भुतरम्य अंधारलेल्या उजेडात ऐकू येणारे भूपाळीचे स्वर आहेत, काकडयाचे अभंग आहेत,
लालबुंद पूर्वाई आहे,
सांजेला आत्ममग्न होणारा तळ्याकाठचा शांत जलप्रवाह आहे,
चिवचिवाट करत जाणारे विविध पक्षांचे त्रिकोणी थवे आहेत.
पिसाळलेले ढग आहेत,
मेघात शिरणारे आक्रमक पर्वत शिखर आहेत,
नागमोडी वळणे घेत वाहणाऱ्या आरसपानी नद्या आहेत,
शिशिरागमन होताच हसतमुखाने अंगाला वळसे घेत मातीवर जीव टाकणारी पानगळीतली सुकलेली पाने आहेत,
चैत्रात तरारून येणारी हिरवी पिवळी पालवी आहे,
तुलसी वृंदावनावर मायेची पाखर घालणारा पारिजातक आहे,
परसदारातल्या दाराशी झिम्मा खेळणाऱ्या जाई जुई आहेत,
खळखळत वाहणारे झरे आहेत,
शुष्क दगडगोटयांच्या खालची जुनाट ओल आहे,
गरजणारे कृष्णमेघ आहेत, 
चकाकणाऱ्या वीजा आहेत,
माथ्यावर येणारा सूर्य आहे, 
अंगणात डोकावणारा चंद्र आहे,
फुलांनी डवरलेली शिवारे आहेत, 
माळराने आहेत, मैदाने आहेत,
सोनपिवळ्या पिकांनी, मोत्याच्या दाण्यांनी लगडलेली शेते आहेत !
गावकुसांच्या वेशी आहेत, वेशीवरचे भव्योदात्त पिंपळ आहेत
पिंपळपानांचे जीवनगीत आहे !
एका लयीतला चराचराचा श्वास आहे, श्वासामधले संगीत आहे ! ​
दाही दिशांनी येणारे पूर्वजांचे पाठबळ आहे,
सुरकुतलेल्या ओठावरचे चिरतरुण स्मित आहे,
झिजलेल्या हातांचे निशब्द आशीर्वाद आहेत !
अशा अनंत गोष्टींतून काही ना काही तरी धुंडाळत गेलं की आयुष्यांचं इप्सित अलगद गवसतं.
अंती समृद्धी हवी असते म्हणजे तरी काय हवे असते ?
समाधान, तृप्तता यांची व्याख्या नीट उमगली की जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतानाच
स्वतःकडे पाहण्याचा दृष्टीकोनही आपसूक बदलून जातो !
समृद्धी याहून काय वेगळी असते ?
 
- समीर गायकवाड



1 टिप्पणी:

  1. सर खूप छान वाटले ललित लेख वाचून. एकदम पॉसिटीव्ह ... वहिनींच्या चेहेर्या वरचे हास्य एकदम निर्मळ .. २०२२ सुरुवात छान झाली

    उत्तर द्याहटवा