गेल्या वर्षी पौषात वाऱ्यावावदानाने पाण्याच्या दंडावरची चिंचेची झाडे मोडून पडली होती. त्यातली घरटी उध्वस्त झाली.दंडाच्या कडेला दोन सालाधी चतुरेला पुरलेलं होतं. चतुरा जिवंत होती तेंव्हा तिच्यासह तिच्या वासरांच्या पाठीवर पक्षांची सगळी फलटण स्थिरावलेली असे. चतुरेला जाऊन दोन साल झाले, गेल्या साली पक्षांची घरटीही मोडली. साल भर येड्यावाणी पाऊस पडला. दंडाखाली तण उगवलं. काही झाडं तगली, काही मुळातून उपसलेली जळून गेली. दंडाजवळचं कंबरेइतके वाढलेलं तण उपसून काढलं, तेंव्हा चिंचेचं नवं झाड रुजलेलं दिसलं. दंडावरच्या झाडांत आता लवकरच पक्षीही परततील. दोनेक सालात चिंचेला गाभूळलेलं फळ येईल तेंव्हा चतुरेच्या दुधाचा गोडवा त्यात उतरलेला असेल. मी असाच चिंचेखाली सावलीत बसलेला असेन आणि भवताली दरवळ असेल पौषातल्या उन्हांचा ! उन्हे जी माझ्या वाडवडलांचा सांगावा घेऊन येतात, झाडांच्या पानात सांगतात, झाडांखाली उभी असलेली गुरे तो ऐकतात, सांजेला गुरं गोठ्यात परततात, माझ्या गालांना हातांना चाटतात तेंव्हा उन्हांचे सांगावे माझ्या देहात विरघळलेले असतात. मी तृप्त झालेला असतो...
खरे तर हरेक महिन्यातल्या उन्हांचं रूपडं वेगळंच असतं, जे कधी तरी काळजाला भिडत राहतं तर कधी अंगअंगाला सोलून काढत असतं.
माघ महिन्यातील उन्हे रुक्ष असतात, ती एका तालात वाढत जातात आणि त्याच तालात उतरत जातात. सुगीचे दिवस संपत आलेले असतात आणि थंडीनेही हात आखडता घ्यायला सुरुवात केलेली असते.
तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या गोंधळून गेलेल्या पौगंडावस्थेतल्या किशोरासारखं ऊन फाल्गुन मासात असतं. त्याचं थंडीवरही प्रेम असतं आणि उन्हाच्या तापत्या किरणांवरही जीव असतो. यातल्या कुणा एकाचाही विरह त्याला सोसवत नाही त्यामुळे दिवसा उन्हे आणि रात्री थंडी असा करार मदार करून तोडगा काढला जातो.
चैत्रातलं ऊन सकाळी सह्य असतं, दुपारी थोडंसं त्रास देतं.
वैशाखातलं ऊन मात्र पोळतं. अंगाची लाही लाही होते.
ज्येष्ठात याचं शिखर गाठलं जातं. घामाच्या धारा लागतात, मधून मधून पडणारा वळवाचा पाऊस मातीची धग वाढवतो.
आषाढातलं ऊन मलूल असतं, थकलेल्या वृद्धाच्या तळहातासारखं ! त्यात ताकद नसते मात्र मध्येच आठवणींचा वणवा पेटला तर वृद्धाच्या डोळ्यात देखील अंगार फुलतो तसं या आषाढाच्या उन्हाचं असतं. ही उन्हे मधूनच कळस गाठतात.
श्रावणातलं ऊन मात्र भा. रा. तांबेंच्या काव्यपंक्तीसारखं पिवळे तांबूस कोवळे असते. ते हवेहवेसे असते.
भाद्रपदामधलं ऊन गव्हाळ पारदर्शी असतं, विशेषतः सांजेस हे ऊन खूप शोभिवंत होतं.
अश्विन मासातलं ऊन त्यातल्या सणावारांना साजेसं असतं. सकाळी शीतल वाटणारं ऊन मधल्या प्रहरानंतर टोचू लागतं.
कार्तिकातल्या उन्हाची गंमत न्यारी असते, दुपार ओसरली की उन्हे लवकर तिरपी होऊ लागतात आणि उष्म्याची सुट्टी घेऊन थंडीची काकड आरती करू लागतात.
मार्गशीर्षातला पारा फारसा वर चढत नाही तरीदेखील ते ऊन नको नकोसे असते, मुलाची जडणघडण होण्यासाठी आईने कठोर व्हावे तसं याचं झालेलं असतं. थंडीने कोरड्या पडलेल्या त्वचेला हे ऊन सोसत नाही. मनाच्या एका भागास ऊन हवेसे असते तर दुसऱ्याला नकोसे असते.
पौषातलं उन्ह नितळ निळ्या आभाळातून थेट अंगणात उतरतं. पानगळीच्या मौसमात पौषाची सांज थोडीशी उदास होते मात्र सकाळ अगदी प्रसन्न असते कारण सकाळची अतिव कोवळी उन्हे जणू तान्ह्या बाळाची लुसलुशित मखमली कायच !
आता पौष सुरु आहे, आज मकर संक्रांत आहे.
यंदा उन्हांचे गणित पुरते विस्कटून गेलेय आणि मी ते सोडवण्याच्या प्रयत्नात गुंतून पडलोय.
उन्हांचे गणित नक्की सुटेल आणि त्यातून येणारे सांगावेही मला कळतील, थोडंसं सोसलं पाहिजे, मातलं उतलं न्हाय पाहिजे, उन्हांनाही कवेत घेतलं पाहिजे मग कुठे सावल्यांचे कवडसे अंगावर खेळतील अन् त्यातनं येणारे सांगावेही कळतील.
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा