रविवार, १६ जानेवारी, २०२२

समानतेच्या वाटेवरचा पाकिस्तान...

समतेच्या वाटेवरचा पाकिस्तान #sameergaikwad #sameerbapu #समीरगायकवाड
न्यायमूर्ती आयेशा मलिक   

पाकिस्तानबद्दल आपल्या समाजमनात तिथल्या सर्वंकष जाणीवांप्रती एक विशिष्ट द्वेषमूलक प्रतिमा आहे ; तिला बळकटी देण्याचे काम आपली प्रसारमाध्यमे आणि आपला सोशल मीडिया इमानेइतबारे करत असतो. पाकला शत्रूराष्ट्र समजण्यास कुणीच हरकत घेणार नाही मात्र तिथे सारंच प्रतिगामी आणि बुरसटलेलं आहे, तो देश मध्ययुगाहून मागे जातोय, तिथे कमालीची धर्मांधता सर्वच क्षेत्रात नांदते असं चित्र आपल्या मनावर बिंबवलेलं आहे. हे खरं वाटण्याजोग्या काही घटना तिथे अधूनमधून घडतही असतात हे नाकारून चालणार नाही मात्र हेच बारोमास असणारे एकमेव सत्य नाहीये हे देखील मांडायला हवे. तिकडे काही सकारात्मक घटना घडली तर आपल्या माध्यमांचा कल ती बातमी लपवण्याकडे असतो. या गृहितकाला बळ देणारी एक विलक्षण मोठी घटना पाकिस्तानमध्ये नुकतीच घडलीय. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायमूर्तींना मंजुरी लाभलीय हीच ती सकारात्मक घटना होय. या अभूतपूर्व घटनेनंतर पाकिस्तानी सोशल मीडिया त्या न्यायमूर्तींच्या कौतुकाने ओसंडून वाहत होता हे विशेष होय !

लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आयेशा मलिक यांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नतीसाठी मंजुरी मिळाल्याने तिथे नवा इतिहास घडतोय. पाकी सर्वोच्च न्यायालयाच्या रोस्टरचा त्या प्रमुख भाग असतील. त्यांना पाकिस्तानच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होण्याची संधीही मिळू शकते. सोशल मीडियामध्ये सक्रीय असणाऱ्या हरेक सामान्य व्यक्तींनी आणि युवा नेटीझन्सनी या घटनेचे जोरदार स्वागत केलेय. “पाकिस्तानमध्ये महिलांसाठी हा एक उत्कृष्ट दिवस असेल" इथंपासून ते "अनेकांसाठी हा अनमोल क्षण पथदर्शी ठरेल" अशा शब्दात स्त्रीशक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी सोशल मीडियावर युजर्सनी गौरवलेय. आयेशा यांची वाटचाल दिसतेय तितकी सुलभ सरळ नव्हती. पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने (जेसीपी) न्यायमूर्ती मलिक यांच्या पदोन्नतीला चार विरुद्ध पाच मतांनी मंजुरी दिली हे नजरेआड करता येणार नाही. आयेशा यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेणारी ही दुसरी जेसीपी बैठक होती. यापूर्वी सप्टेंबरमध्ये विस्तारित बैठकीत एकमत न झाल्याने आयोगाला त्यांची पदोन्नती नाकारण्यास भाग पाडले होते हे नमूद करण्याजोगे तथ्य होय. ऑगस्टमध्ये न्यायमूर्ती मलिक यांची नियुक्ती झाली होती तेंव्हाही नेटिझन्सनी त्यांच्या नामांकनावर आनंद व्यक्तवला होता, महिला न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची रास्त वेळ आलीय यावर भर दिला होता.

आयेशा मलिक यांच्या जीवनपटावर एक नजर टाकली तर त्यांचे शिक्षण, त्यांची जडणघडण हे सर्व पाकिस्तानमध्ये झालेय यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की पाकमध्ये महिलांना शिक्षणास अनुमतीच नाही. त्याला छेद देण्याचे काम आयेशांनी केलेय. एकोणीसशे सहासष्ठ साली जन्मलेल्या आयेशा सत्तावीस मार्च 2012 पासून लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. आयेशांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पॅरिस आणि न्यूयॉर्कमधील शाळांमधून केलेय. लंडनमधील फ्रान्सिस हॉलंड स्कूल फॉर गर्ल्समधून ए लेव्हल पूर्ण केलीय. पाकिस्तानमधले त्यांचे शिक्षण कराची ग्रामर स्कूलमधून तर वरिष्ठ पदवीशिक्षण केंब्रिज आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, कराची येथून वाणिज्य शाखेतील बॅचलर असे झालेय. त्यांनी पाकिस्तान कॉलेज ऑफ लॉ, लाहोर येथे सुरुवातीचे कायदेशीर शिक्षण घेतलेय. त्यानंतर त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूल, केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स, यू.एस.ए.मधून एलएलएम केलेय. मुख्य शैक्षणिक कामगिरीसाठी, उत्कृष्ट गुणवत्तेसाठी आयेशांना लंडन एच. गॅमन फेलोशिपने गौरवले होते. आयेशा विवाहित असून त्यांना तीन मुले आहेत. सामाजिक भान राखत त्यांनी गरीबी निर्मूलन कार्यक्रमासह मायक्रो फायनान्स प्रोग्राम्समध्ये आणि कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी असलेल्या एनजीओसाठी सल्लागार, तसेच हितचिंतक म्हणून काम केलेय. त्यांनी स्वेच्छेने लाहोरमधील सामाजिक उपक्रम असणाऱ्या हर्मनमेनर स्कूलमध्ये संप्रेषण कौशल्यांमध्ये इंग्रजी भाषा आणि भाषाविकास अनेक वर्षे शिकवलेय. आयेशांनी 1997 ते 2001 पर्यंत फखरुद्दीन जी. इब्राहिम अँड कंपनी, कराची येथे सहायक म्हणून कायदेशीर कारकीर्द सुरू केली. 2001 ते 2004 पर्यंत, त्यांनी रिझवी, ईसा, आफ्रिदी आणि एंजेल यांच्यासोबत सुरुवातीला वरिष्ठ सहयोगी म्हणून काम केले. 2004 ते मार्च 2012 पर्यंत याच अस्थापनांत त्या भागीदार होत्या. न्यायविभागाच्या कॉर्पोरेट आणि लिटिगेशन विभागाचे नेतृत्व पेलतानाच लाहोर विभागाच्या प्रभारी देखील होत्या. 27 मार्च 2012 रोजी आयशा लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बनल्या. जानेवारी 2019 मध्ये पाकिस्तानमध्ये महिला न्यायाधीशांच्या संरक्षणासाठी नव्याने स्थापन केलेल्या समितीच्या त्या अध्यक्षा झाल्या. ही समिती लाहोर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जिल्हा न्यायालयातील वकिलांकडून महिला न्यायाधीशांवरील गुंडगिरीविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्थापन केली होती. या समितीच्या कामामुळे देशभरात त्यांचे नाव पोहोचले.

प्रत्येक स्त्रीसाठी समानता आणि न्यायाद्वारे महिला सक्षमीकरणाचा उपक्रम असणाऱ्या द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वुमन जज या संस्थेच्या त्या सदस्या आहेत. पाकिस्तानमध्ये कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी लिंगभेद विरोधी दृष्टीकोनातून त्या महत्त्वाच्या वकिल आहेत. आयेशांच्या कामकाजात उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये, बँकिंग न्यायालय, विशेष न्यायाधिकरण आणि लवाद न्यायाधिकरणांचा समावेश आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्ये त्या कौटुंबिक कायद्याच्या प्रकरणांमध्ये तज्ञ साक्षीदार म्हणून काम करताहेत ज्यात मुलांचा ताबा, घटस्फोट, महिला हक्क आणि पाकिस्तानमधील महिलांसाठी घटनात्मक संरक्षण या मुद्द्यांचा समावेश आहे. महिला हक्क आणि लैंगिक समानतेच्या संदर्भात अनेक उल्लेखनीय निर्णय त्यांनी दिले आहेत. पर्यावरणविषयक आणि हरित पाकिस्तान लवादाविषयकचे त्यांचे निर्णय गाजले आहेत. नव्या डिजिटल पद्धतीचा न्यायदानात अवलंब करण्यासाठी ऑटोमेशन आणि केस मॅनेजमेंटद्वारे खटला चालवण्याची प्रक्रिया प्रभावीपणे जलद करण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी भर दिला आहे. मार्च 2031 मध्ये त्या सेवानिवृत्त होतील तत्पूर्वी पाकिस्तानसाठी त्यांनी समतेचा आणि न्यायहक्काचा नवा अध्याय लिहिलेला असेल.

अशा या बहुपेडी नि संतुलित दृष्टीकोनाच्या महिलेची पाकिस्तानी सोशल मीडियाने मुक्तकंठाने स्तुती केली. एरव्ही महिलांची गळचेपी करणारा देश म्हणून कुख्यात असणाऱ्या पाकिस्तानची ही प्रतिमा अचंबित करणारी होती.
नोबेल पारितोषिक विजेत्या मलाला युसूफझाईचे वडील झियाउद्दीन युसुफझाई यांनी या बातमीवर आपला आनंद व्यक्त केला. "न्यायमूर्ती आयशा मलिक यांचे खूप खूप अभिनंदन," त्यांनी लिहिले. "तुम्ही इतिहास घडवला आहे. सर्वोच्च न्यायालयात बसण्यासाठी देशातील पहिल्या-वहिल्या महिला न्यायाधीशाची नियुक्ती केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन." 
तर गायिका मीशा शफीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलेय, "उत्तम बातमी ! एलएचसीच्या न्यायमूर्ती आयशा मलिक या पाकिस्तानमधील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बनणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत."

मानवी हक्क कार्यकर्ते, वकील निघत दाद यांच्या ट्विटमध्ये म्हटलेय की, "फक्त न्यायमूर्ती आयेशा मलिक यांचेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश झाल्याबद्दल पाकिस्तानचे अभिनंदन. सुप्रीम कोर्टात महिला न्यायाधीश नसल्या तरी ही एक चांगली सुरुवात आहे!".

सामाजिक हक्क पुरस्कर्त्या जेहान आरा यांनी लिहिलेय की, "आजचा दिवस खूप खास आहे. शेवटी आमच्याकडे आमच्या पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत - न्यायमूर्ती आयेशा मलिक. मला आशा आहे की त्या अनेकांमध्ये पहिल्या असतील. आम्हाला त्यांच्या क्षमता आणि योग्यतेच्या आधारावर जीवनाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्वाच्या पदांवर महिलांची गरज आहे. चला नवे पाकिस्तान घडवून या !"
 
हफसा अहमद लिहितात की, " आयेशा मलिक ह्या केवळ पहिल्या महिला न्यायाधीश नाहीत तर त्यांची गणना एका खऱ्या शक्तीत केली जाईल. हा केवळ महिलांसाठीचा महान दिवस नाही. गुणवत्तेवर आणि कायद्याच्या नियमावर आधारित न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक महान दिवस आहे.,”
 
मिर्झा शाहबाज यांनी म्हटलंय की,"पाकिस्तानच्या महिलांसाठी निःसंशयपणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि पुढे जाण्याचा मार्गही आहे"

एकीकडे म्यानमारमध्ये लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रिय नेत्या आंगसान स्यूकी यांना अटक करून तुरुंगवासात डांबलेले असताना मागासलेले, बुरसटलेले राष्ट्र म्हणून बदनाम असलेल्या पाकिस्तानमध्ये अशी उदात्त उत्कट घटना घडून यावी हे कालविशेष होय. पाकिस्तानी सोशल मीडियाचा कानोसा घेतला तर बदलाचा परिवर्तनाचा हा सूर आशादायी वाटतो.

- समीर गायकवाड.


समतेच्या वाटेवरचा पाकिस्तान #sameergaikwad #sameerbapu #समीरगायकवाड
समतेच्या वाटेवरचा पाकिस्तान - दैनिक सामना 
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा