सोमवार, १० जानेवारी, २०२२

देहगंध - मधू नारंग... @रेड लाईट डायरीज



नोंदी - कोठ्यांमध्ये नर्तिका नाचत असते तेंव्हा हिंदी सिनेमात दाखवतात तसं मद्य पिता येत नाही, तेंव्हा पान खाण्यास अनुमती असते. दोन कडव्यांच्या मध्ये पिकदाणीत थुंकणे हा तेहजीबचा भाग समजला जातो, जो केंव्हाही अधेमधे थुंकतो तो बदतमीज नालायक समजला जातो.
गाणं संपल्यानंतर केवळ वाद्यांचा साज जेंव्हा रंगू लागतो तेंव्हा मद्याचे प्याले ओठास लावता येतात, तेंव्हा नर्तिका ठुमके देखील लावत नाही.

'हमरी अटरियां पे..' हे बेगम अख्तर यांनी गायलेलं गाणं गाण्याचा आग्रह अनेक ठिकाणी होताना मी पाहिलाय. मात्र यातला अटरी म्हणजेच कोठा हे अनेकांना ठाऊक नसते, एक छोटेखानी घर आणि त्याच्या वरच्या भागातील सज्जावजा छोटीशी खोली म्हणजे अटरी, जिथे दुमजली घर नसते तिथे पहिल्या मजल्यावरील व्हरांडावजा भागास अटरी संबोधण्यावाचून पर्याय नसतो. या अटरीमध्ये खाजगी मैफिली रंगत. म्हणून तिचं लडिवाळ आमंत्रण असे की, "हमरी अटरियां पे आ जाओं सजनवा..."
या आवतणातली मिठास कातिल असे..

तवायफ मोस्टली चुडीदार घालूनच नृत्य सादर करतात. पायाकडील भागास त्याच्या इतक्या घड्या पडलेल्या असतात की जणू कापडी बांगड्याच (चुडी) तिने परिधान केलेल्या असाव्यात या अर्थाने चुडीदार हे नाव.
तवायफ आपल्या समोर नाचत असताना हुक्का पिताना लोड तक्क्यांना रेलून बसूनच प्यायचा असतो असे इथले शास्त्र.

कोठेवाली मालकीण मुख्य पाहुण्यास गजरा बांधते हे दृश्य अजूनही जारी आहे, अत्तराचा फाया पूर्वी मुख्य मेहमानसाठीच असायचा आता तो सर्वांना लावला जातो मात्र आता ते काम नर्तिका न करता पेटीमास्तर करतो ! (कारण तुम्ही ओळखले असेलच ! )

दौलत अदा करण्याचेही काही संकेत आहेत, काही उसूल आहेत. दौलत अदा न करताही मैफल सजते रंगते, फक्त आलेला कदरदान तितका अकलमंद असायला पाहिजे.

मैफल अर्ध्यात आल्यावर नर्तिकेने आपल्या हाताने अत्तर मेहमान कदरदान लोकांपैकी कुणा एकाच्या हातावर अत्तर लावले तर तो त्याच्यासाठीचा खास बुलावा असतो, हाताला लावलेले अत्तर तो कसे हुंगतो यावरून ती त्याची कदर करते !
स्त्रीला गंध, परिमळ यांची तीक्ष्ण पारख असते, याबाबतीत ती फार चाणाक्ष असते !

आता काही मोजक्या ठिकाणी तवायफांचे कोठे अस्तित्वात आहेत जिथे इमानदारी टिकून आहे. कोठा, कोठेवाली मालकीण आणि अदाकारा तवायफ हे सारं खरं की खोटं हे तिथला दरवळ आणि अत्तर लावण्याची पद्धत पाहून ओळखता येतं !
इत्यादी .. इत्यादी..
नोंदी आवरत्या घेतो..

****** ******* *****

नुकतेच युपीमध्ये काही अत्तर व्यापाऱ्यांवर छापे पडले.
देशभर चर्चा झाली, मात्र याने अत्तर महाग झाले नाही की त्याचे भावही कोसळले नाहीत.
ते होते तसेच राहिले.
उत्तरेकडे अत्तरांचे स्तोम अजूनही अफाट आहे. त्याच्या वापराचे विविधांगी आयाम आहेत त्यातले काही इथे लिहिण्याजोगेही नाहीत.

तर मागे अशाच एका गंधवेड्या तवायफ बद्दल लिहिलं होतं ती म्हणजे मधूबाई ! (तिची माहिती रिपोस्ट आहे)
मधूबाईचं पूर्ण नाव माहित नाही. मधू नारंग सांगितल्याचं स्मरतं.
लोक तिला नेपाळी समजायचे. मात्र ती हल्दवानीची होती.
तिच्या पोरींकडे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरकडून बिदागी घेताना ती त्याच्या हाताला एक विशिष्ट अत्तर चोळत असे.
त्या अत्तराचा वास बराच काळ टिकून राही. तिला कुणी त्याचा फाया बनवून मागितला तर ती देत नसे. मग कुपी देण्याची गोष्ट दूरची झाली.

वर्षाकाठी ती अजमेरला जायची तेंव्हा 'ते' अत्तर घेऊन यायची इतकीच अंदर की बात होती. तिच्या अत्तराचा ब्रँड कधी कळलाच नाही.
तिच्या अड्ड्यावर येऊन गेलेलं गिऱ्हाईक त्या सुगंधापायी खेचल्यागत परत यायचं, आत जातानाच हात पुढे करायचं ! मग ती अशी काही जालीम हसायची तिच्या गोबऱ्या गालावर ठसठशीत खळी पडे.
पाहणाऱ्याच्या काळजाचं पाणीपाणी होई !

आत जाणाऱ्यास अत्तर द्यायचं की नाही हे तिच्या लहरीवर ठरे.
आतून बाहेर येणाऱ्यास मात्र बक्षिसी दिल्याच्या अविर्भावात ती अत्तर लावे.

धष्टपुष्ट अंगाची, सैलसर देहाची, बदामी रंगाची, काळयाभोर डोळ्याची, अपऱ्या नाकाची मधूबाई स्वतःच एक कयामत होती आणि तिच्या हाताने अत्तर लावून घेताना त्या मंडळींना स्वर्गसुख वाटे.

तिच्या पावलावर पाऊल टाकून फोरास रोडवरील आणखीही काही बायकांनी हा उदयोग करून पाहिला मात्र त्यांना मधूची सर आली नाही. उलट मधूबाईची कॉपी केल्याची बदनामी लवकर वाट्याला आली.
ईत्रवाली मधूबाई म्हणून ती फेमस झालेली.

खरे तर तिच्या अत्तरात विशेष गुणधर्म नव्हताच मुळी.
तिच्या देहाला एक बेफाम असा रक्तचंदनी गंध होता.

अत्तर लावण्याआधी ती ब्लाऊजच्या काठाला तर्जनी पुसून कोरडी करुन घेई आणि अत्तराच्या कुपीच्या तोंडापाशी घोळसून घेई.
पानाचा देठ खुडावा त्या अंदाजाने बेताने आपल्या दात्याच्या हातावर ते अत्तर मुरवत असे.
तिचा देहगंध तिच्या तर्जनीतूतुन अत्तरात एकजीव होऊन हातावर दरवळू लागे.

आजवर जाणवलेल्या / अनुभवलेल्या गंधापेक्षा सर्वाधिक धुंद आणि मादक असा दरवळ होता तो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपल्या बहिणींच्या घरी हल्दवानीला गेलेली मधुबाई परत आली नव्हती. तेंव्हा तिच्या अड्ड्यावरची वर्दळ पुरती कमी झाली होती आणि संगतीला तिचा दरवळही ओसरला होता.
तर गत नोव्हेंबरमध्ये दिवाळी सरताच मधुबाई रायपुरमध्ये नव्या डेऱ्यात दाखल झाली.

अत्तरवाल्या व्यापाऱ्यांवर धाड टाकून आपल्या सरकारी कार्यालयात परतलेले काही अधिकारी कर्मचारी तिच्या परिमळाने शहरात पुन्हा एक फेरी मारून गेलेत अशी तिथल्या वर्तुळात चर्चा आहे.
"ये गलियां ये चौबारा यहां आना ना दोबारा..." असं इथं कुणी म्हणत नाही, माणसं चुंबकाने खेचल्यागत येतच राहतात.

ही दुनिया जितकी दर्दनाक, कातिल, वहशी आहे तितकीच रसिली आहे, बस्स तो नजरिया आणि ती जान पहचान हवी !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा