मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

साडी मनामनातली आणि अंधाराच्या सांदीतली...



हरेकाच्या घरात एखादी तरी जुनी साडी असतेच जी गतपिढीतील कुणीतरी नव्या पिढीच्या वारसदारांसाठी जपून ठेवलेली असते.
साडी नेसणारी स्त्री अनंताच्या प्रवासाला गेल्यावर तिच्या साड्यांचे काय करायचे हे त्या त्या घरातले लोक ठरवतात. कुणी आठवण म्हणून नातलगांत वाटून टाकतात तर कुणी कुलूपबंद अलमारीत घड्या घालून ठेवतात.
अलमारी खोलली की त्या साड्या समोर दिसतात, त्यांच्यावर त्या स्त्रीने किती प्रेमाने हात फिरवलेला असेल नाही का ! किती आनंदाने तिने त्या साड्या नेसलेल्या असतात, किती मिरवलेले असते त्यात !
त्यांच्यावरून हात फिरवला की तिच्या स्पर्शाची अनुभूती मिळते.

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास जेंव्हा कधी खूप अस्वस्थ वाटतं तेंव्हा कपाटात घडी घालून ठेवलेली आईची साडी पांघरून झोपी जातो ; 
सारी दुःखे हलकी होतात, सल मिटतात आणि आईच्या कुशीत झोपल्याचे समाधान मिळते !

या साड्या ठेवून ठेवून विरू लागतात मग त्यांची गोधडी शिवली जाते, मायेची ऊब अधिकच वाढते. आई, काकी, आज्जी, थोरल्या बायका सगळ्यांचे स्पर्श एक होतात, एक नवी वीण जन्माला येते आणि मायेचा नवा स्पर्श त्या गोधडीतून जन्माला येतो !
साडी वगळता इतर कुठल्या कपड्यांची गोधडी मी तरी पाहिली नाही.

साडी देशभरात सगळीकडे नेसली जाते तिचे नेसण्याचे प्रकार मात्र भिन्न आहेत.
देवतांना देखील साडी नेसवली जाते, त्याचे विविध प्रकार आणि रूपे आहेत.
'काय बाई सांगू अंबाच्या माझं नटणं जरीच्या चोळीला लावलंय सोन्याचं बटन !' असं लाघवी वर्णन जोगतिणीच्या गीतांत आहे.
कोण कशी साडी नेसते आणि साडीत कशी वावरते यावरून देखील आपला समाज आजही स्त्रीविषयी मतं बनवतो.

नेसूची साडी फाटली आणि नवी साडी आणण्याजोगी परिस्थिती नसली की दोन जुन्या साड्यांचे फाटके भाग कापून काढले जात आणि त्या दोन्ही साड्यांना टिप लावून शिवले जाई. साडीला दंड घातला जाई ! 
त्यातूनच दारिद्र्य बाईच्या अंगावर रुळते.

पाश्चात्य वेशभूषेपेक्षा साडी परिधान करणं अवघड आहे, साडी नेसणं जितकं कठीण आहे तितकंच धुतलेली साडी वाळत घालणं देखील !
साडीला इस्त्री करणं आणि तिची घडी घालणं हे ही एक दिव्यच असतं.
नव्या साडीची घडी मोडल्यानंतर डिट्टो पहिल्यासारखी घडी जमतच नाही.
गावखेड्यांनी आजही नवी साडी अंगाला लावण्याआधी ओळखीतल्या स्त्रीला घडी मोडण्यासाठी दिली जाते.

साडीला पदर असतो, बाईने पदर डोक्यावर घ्यावा असं सनातनी विचारांच्या लोकांना वाटतं.
काही स्त्रियांना डोक्यावरून घेतलेला पदर शोभून दिसतो, काहींना स्वतःलाच ते आवडतं तर काहींना ते बिलकुल खपत नाही.
जिची साडी तिची मर्जी असे सूत्र असायला हवे.
तरीदेखील काही दुटप्पी लोक एक टोमणा मरतातच तो म्हणजे 'डोक्यावर पदर आणि दिल्लीवर नजर' !

साडीचा पदर कधी जरतारी भरजरी असतो, तर कधी निव्वळ वेलबुट्टी असते.
'पदरावरती जरतारी मोर नाचरा हवा..' हे अजूनही लोकांच्या डोक्यात ठासून बसलेले आहे.
रेशमाच्या रेघांनी, लाल काळया धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला हात नगा लावू माझ्या साडीला आजही फेमस आहे.

माहेरची साडी नावाच्या सिनेमानंतर सासरी देहावसान झालेल्या स्त्रीच्या चितेवर साड्या वाहण्याचा नवा प्रवाह रूढ झाला, नेसुनी माहेरची गं साडी असं काही अत्यंत रडकं गाणं देखील लावतात.
लोक गरीब स्त्रीला साडी देत नाहीत मात्र चितेत खंडीभर साड्या जाळू लागलेत !
  
नऊवार साडी आता कमी दिसत्ये, सहा वार साडी मोठ्या प्रमाणात नेसली जाते.
व्यक्तिशः मला इरकली साड्या खूप आवडतात.
आजीपासून भाचीपर्यंत गावातल्या अनेक स्त्रियांच्या अंगावर तिची लोभस रूपे पाहिलीत.
साडी आणि त्याच्या जोडीला घालावं लागणारं झंपर आधी पोलकं म्हणून आणि नंतर ब्लाऊज म्हणून कधी ओळखलं जाऊ लागलं कुणालाच कळलं नाही.
साडीला शोभेल असं ब्लाऊज घालावं असं कित्येकींना वाटत असतं.

साड्यांचे शेकडो हजारो प्रकार आहेत.
काळ्या निळ्या चंद्रकळेपासून ते केरळी कासावू साडीपर्यंत तिचे अनेक पोत आहेत. तिचे लक्षावधी टेक्श्चर्स आहेत. डिझाईन्स तर अगणित असतील.

अजूनही काही घरांत पती मरण पावलेल्या स्त्रियांना रंगीत साडी परिधान करू दिली जात नाही ! का बरं ? तिच्या आयुष्याचा बेरंग व्हावा म्हणून की तिचं कथित वैधव्य सगळ्यांच्या नजरेत भरावे म्हणून ?
किती वाईट आहे हे !
खरे तर स्त्रीने काय परिधान करावे कसे परिधान करावे हा सर्वस्वी तिचा चॉईस आहे, त्याविषयी कुणी तिला उपदेश करू नये.

दुःशासनाने द्रौपदीची साडी पुरती फेडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्याला यश लाभले नाही असं महाभारत सांगतं,
कृष्णाच्या बोटाला जखम झाली होती तेंव्हा तिने आपल्या भरजरी साडीचा पदर फाडून त्याचा तुकडा त्याच्या जखमेवर बांधला होता, मग जखम भरून आली असाही एक प्रसंग त्यात आहे.
द्रौपदीच्या उपकाराची ती परत फेड होती की भाऊबहिणीच्या नात्यातलं ते समर्पण होतं हा इतिहासाचा मुद्दा आहे. इथे साडीपुरता त्याचा उल्लेख केलाय.
वास्तव जीवनात अलीकडील काळात कुठेही कुणीही कधीही कुणाचीही साडी फेडतो, लोक मेणबत्ती मोर्चे काढण्यासाठी या घटनांचा वापर करतात !

एक सिक्रेट शेअर करावे वाटते. सर्वसामान्य स्त्रियांची साडी नेसण्याची पद्धत आणि सेक्सवर्कर्स स्त्रियांची साडी नेसण्याची पद्धत यात कमालीचा फरक असतो. त्यांच्या साडीच्या एकपेडी निऱ्या, पदराच्या लांबीचे गणित, साडी नेसताना पहिले टोक कंबरेपाशी आवळून बांधण्याची शैली, साडीचे काठ एकरेषीय एकगोलीय असण्याची ढब हे सगळं आखीव रेखीव असतं !
त्या जरी वेश्या असल्या तरी त्यांनाही विवस्त्र व्हावंसं वाटत नाही. 
लोक त्यांच्या साड्या फेडतात, 
काही वेडी माणसं त्यांना कधी साड्या देतात तर कधी साडीसह सगळ्याच बंधनातून मोकळं करतात !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा