रविवार, १९ डिसेंबर, २०२१

ऑनर किलिंग- खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी..

ऑनर किलिंग-  खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी.. #समीरगायकवाड #समीरबापू #sameergaikwad
ऑनर किलिंग-  खोट्या प्रतिष्ठेचे हकनाक बळी - पूर्वप्रसिद्धी दैनिक सामना 

ऑनर किलिंगच्या घटना आपल्या देशात मागील दोन दशकांपासून घडताहेत. सुरुवातीला त्याविरोधात देशभरात आक्रोश दिसायचा. आता केवळ हतबलता दिसते आणि धक्का बसलेला जाणवतो. समाज पुन्हा आपल्या दिनचर्येत गढून जातो. मागील दशकांत घडलेल्या बहुतांश घटनांत घरच्या मंडळींचा विरोध पत्करून परधर्मीय वा परजातीय जोडीदाराशी विवाह केलेल्या युगुलासच याला सामोरे जावे लागले होते. मात्र अलीकडील दोन वर्षांत सजातीय विवाह करून देखील केवळ आर्थिक विषमतेपायी जीवे मारण्याचा अमानुष नीचपणा दिसून येतोय. समाजात विषमतेचा, जातीयतेचा, अस्मितेचा नि अभिनिवेशाचा अभिमान अहंकार आता किळसवाण्या विखारात बदलत चाललाय ज्यामुळे सामाजिक समतेची मुळे अधिकाधिक कमकुवत होताहेत. इथे वानगीदाखल मागच्या पंधरवाड्यात घडलेल्या दोन गोष्टींचा ओघवता परामर्श घेतलाय.

देशात हरियाणा हे राज्य ऑनर किलिंगसाठी सर्वाधिक बदनाम आहे. तिथे कठोर कायदे लागू होऊनही सन्मानाच्या नावाखाली प्रेम आणि सन्मानाच्या शत्रूची हत्या करण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. सोनीपतच्या गोहानामध्ये १० नोव्हेंबर रोजी ऑनर किलिंगची घटना घडली. प्रेमप्रकरणातून तरुणीच्या घरच्यांनी तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या केली आहे. भावड गावच्या बिजेंद्रला अमानवी मारहाण करताना क्रूरतेची सीमा ओलांडली. त्याच्या अंगावर काठ्या व जखमेच्या खुणा होत्या. त्याच्या गुप्तांगावर खोल जखमा होत्या, पोटातले आतडेही बाहेर पडले होते. जखमी बिजेंद्रचा काही मिनिटांतच मृत्यू झाला. घरातून पळून त्याला प्रेयसीसोबत लग्न करायचे होते. ही तरुणी शामरी गावची रहिवासी आहे. बिजेंद्रच्या हत्येनंतर कुटुंबीयांना धक्का बसला की त्यांनी पोलिसांत लवकर तक्रार देखील दिली नव्हती. बिजेंद्र गुरुग्राममध्ये एका खासगी कंपनीत कामाला होता. वर्षभरापूर्वी दोघांचा संपर्क फेसबुकच्या माध्यमातून आला होता. वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू होते. दोघेही एकाच जातीचे होते. मात्र त्यांची गावे वेगळी होती. त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे मुलीच्या कुटुंबीयांना राग आला. त्यांनी नियोजनपूर्वक त्याची पाशवी हत्या केली.

महाराष्ट्रातलं हत्याकांड याहून भीषण होतं. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे सख्ख्या लहान भावाने आणि आईने कीर्ती मोटे-थोरे हीचा शिरच्छेद केला कारण तिने घरच्यांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह केला होता. भावाने कोयत्याने वार करून भावाने तिचं शीर धडावेगळं केलं आणि ते शीर तसंच पकडून भावाने बाहेर ओट्यावर आणून ठेवलं. या घटनेनंतर तिचा भाऊ आणि आई आपल्या घरी गेले, त्यांनी रक्ताचे कपडे बदलले आणि वैजापूर पोलीस स्टेशनात स्वतःहून खुनाची कबुली द्यायला हजर झाले. हे हत्याकांड इतके निर्घृण होते की राज्य हादरले ! तरीदेखील लोकांच्या बधीरतेची कमाल म्हणावी असा घटनाक्रम तिथे नंतर घडला, तो म्हणजे खुनी युवकास अल्पवयीन दाखवण्यासाठी सुरु असलेली खटपट ! हे सर्व पाहू जाता माणूस म्हणून आपलं किती अधःपतन झालेय हे लक्षात यावे.

खरे तर ऑनर किलिंगच्याबाबतीत न्यायालयीन आदेश स्पष्ट आहेत. ऑनर किलिंगला संघटित गुन्हा ठरवण्याच्या मागणीसाठी 'शक्ती वाहिनी' या एनजीओने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय की, जर दोन प्रौढांनी लग्न केले तर तिसरा कोणीही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. यासोबतच हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 5 मध्ये एकाच गोत्रात लग्न न करणे योग्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. इथे हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की ऑनर किलिंगची केवळ 3 टक्के प्रकरणे गोत्राशी संबंधित आहेत, तर 97 टक्के प्रकरणे धर्म आणि इतर कारणांशी संबंधित आहेत. ऑनर किलिंग म्हणजे कुटुंबातील सदस्याची, विशेषत: महिला सदस्याची त्याच्या नातेवाईकांकडून हत्या. कुटुंब आणि समाजाच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली या हत्या अनेकदा केल्या जातात.

ऑनर किलिंग हा शब्द जेव्हा पहिल्यांदा कानी आला तेव्हा सारेच थक्क झाले, आश्चर्यचकित झाले. पाकिस्तानमध्ये खून किंवा फाशीच्या शिक्षेच्या संदर्भात हा शब्द आपल्या माध्यमात प्रथमतः ऐकला गेला. त्या वेळी असे वाटत होते की, कायद्यानुसार खून किंवा खून यांसारखे शब्द नेहमी एखाद्याचा जीव बेकायदेशीरपणे घेण्याकडे सूचित करतात. ऑनर किलिंगची मुख्य कारणापैकी एक म्हणजे सतत घट्ट होणारी जातव्यवस्था होय. देशात जातीय समज दृढ होत आहेत. ऑनर किलिंगच्या बहुतांश घटना तथाकथित उच्चवर्णीय आणि खालच्या जातीतील लोकांच्या प्रेमसंबंधांच्या बाबतीत घडल्या आहेत. आंतरधर्मीय संबंध हे देखील ऑनर किलिंगचे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर औपचारिक प्रशासनाचा अभाव हे देखील एक कारण आहे.

ऑनर किलिंगचे मूळ कारण ग्रामीण भागापर्यंत औपचारिकरित्या सरकार पोहोचू न शकणे हे आहे. पंचायत समितीसारख्या औपचारिक संस्थांच्या अनुपस्थितीत, ग्रामीण भागात निर्णय घेण्याची शक्ती खाप पंचायतीसारख्या बेकायदेशीर आणि घटनाबाह्य संस्थांकडे जाते. तिथे सारेच मूढ होतात. याला खतपाणी घालणारे घटक म्हणजे निरक्षरता आणि नागरी हक्कांविषयीचे अज्ञान होत. शिक्षणाअभावी समाजातील एक मोठा घटक आपल्या घटनात्मक अधिकारांबाबत अनभिज्ञ आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ऑनर किलिंगचा भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 15 (1), 19, 21 आणि 39 (f) वर नकारात्मक परिणाम होतो. यातील कलम 14, 15(1), 19, आणि 21 मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत, तर कलम 39 राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांशी संबंधित आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे हे संविधानाचा आत्मा आणि तत्त्वज्ञान म्हणून ओळखले जातात. ऑनर किलिंग हे मानवी हक्कांचे तसेच कलम २१ नुसार सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. देशात सहानुभूती, प्रेम, करुणा, सहिष्णुता या गुणांची कमतरता आणखी वाढवण्याचे काम करते. विविध समुदायांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सहकार्य इत्यादीच्या कल्पनेला चालना देण्यासाठी ते अडथळा म्हणून कार्य करते.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या नुकत्याच दिलेल्या निकालात असेही म्हटले की पालकांनी किंवा खाप पंचायतींनी प्रौढ व्यक्तींकडून लग्नाबाबत घेतलेल्या निर्णयाला विरोध करणे बेकायदेशीर आहे. याआधीही सर्वोच्च न्यायालयाने ऑनर किलिंगबाबत कठोर पावले उचलण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. मात्र याविषयीची कायदेशीर जागृती अत्यंत तोकडी आहे. सन्मानाच्या नावावर गुन्हे प्रतिबंधक विधेयक, 2010 ('ऑनर' आणि परंपरा विधेयक, 2010 च्या नावावर गुन्हे प्रतिबंधक) पारित झाले. या विधेयकानुसार जोडप्याच्या लग्नाला नकार देण्याच्या उद्देशाने खाप पंचायत सारख्या कोणत्याही समुदायास, संघटनेस, व्यक्तीविशेषास किंवा तदनुषंगिक ग्रामसभा आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यात नवविवाहित जोडप्यांवर बहिष्कार टाकण्यावर आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा देखील समावेश आहे. स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि निर्दोषत्व सिद्ध करणे ही आरोपीची जबाबदारी असेल, अशी तरतूदही त्यात आहे.

कलम 19 आणि 21 ने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैयक्तिक निवडीचे स्वातंत्र्य मजबूत केले आहे. देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात महिलांचा समान सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे निश्चितच महत्त्वाचे ठरले आहे. यानुसार आपल्या जीवनाचा जोडीदार ठरवण्याचा हक्क हरेक सज्ञान भारतीयास आहे तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे करणे हा दंडनीय अपराध आहे. ऑनर किलिंगबाबत समाज जागृती करण्यासाठी प्रसारमाध्यमांना अधिक महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, तसेच लोकांना अधिकाधिक साक्षर करण्यावर भर द्यावा लागेल. वास्तवात देशातील ऑनर किलिंगला आळा घालण्यासाठी न्यायालयांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे, जिथे गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेसह बेकायदेशीर घोषित केले गेले आहे. मात्र, असे गुन्हे पूर्णपणे रोखण्यासाठी सर्व देशवासियांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याकरिता प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की "सन्मानासाठी कोणाचाही जीव घेण्यात सन्मान नाही ! ते पशुतेहून वाईट आहे !”

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा