मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

जगण्याचे पसायदान



शास्त्र इतकं पुढे चाललंय की गांडुळालाही फणा लावता येईल. पण त्याने काय साध्य होईल ? डंख मारण्याची प्रवृत्ती उपजतच असावी लागते. ती कुठून पैदा करणार ?
प्रत्येक जीवाला, प्रत्येक वस्तूला एक प्रवृत्ती असते. ती कळायला हवी त्यातून जग कळण्यास मदत होते.

मोगऱ्याच्या कळ्यांनी बिछाना सजवता येईल, सखीच्या केसात गजरे माळता येतील, मनगटावर लफ्फे बांधता येतील, शृंगाराच्या प्रत्येक पायरीवर मोगरा चुरगळता येईल. तिथं तुळशीच्या मंजुळा कधीच कामी येणार नाहीत !
मात्र ईश्वरासाठी हार विणताना मोगऱ्याचा विचार कमी होईल आणि मंजुळा जास्ती कामी येतील !

जास्वंदीच्या पाकळ्यातला तलम कोमलपणा चाफ्यात नाही आणि
चाफ्याची शान जास्वंदीत नाही,
पारिजातकाची प्रसन्नता गुलाबात नाही आणि
गुलाबाचे सौंदर्य पारिजातकात नाही.

सिंह भुकेने तडफडला तरी गवत खाणार नाही आणि
अन्नान्न दशा झाली तरी गाय मांसभक्षण करणार नाही.

सापाला पाय लावले तर तो दौडेल काय ?
त्याच्यातल्या सरपटण्याच्या वृत्तीचं परिवर्तन कसं करता येईल ?

पूजेचे वा अभिषेकाचे जल बाभळीला वाहिल्याने काटयांचा टोचण्याचा गुणधर्म ती त्यागू शकत नाही. ती अपेक्षा बालिश अतर्क्य ठरते. कारण तो बाभूळकाट्याचा मुलभूत गुण असतो.
तोडण्यासाठी हात लावला तरी आणि कुरवाळण्यासाठी हात लावला तरीही लाजाळूची पानं मिटून जातात कारण तो त्यांचा अंगभूत गुण असतो.
तिची पानं स्पर्शात भेद करत नाही कारण तितक्या संवेदना त्यात नसतातच.

विंचू दंशच करतो, झाडे सावलीच देतात नि नद्या पाणीच देतात.
सूर्यचंद्र ग्रहतारे देखील त्यांच्या ठरलेल्या गतीतच प्रवास करतात.
चराचराच्या प्रारंभापासून हरेक सजीव त्याच्या अंगभूत गुणांनुरुपच वागतो.

जे ते जिथल्या तिथं आहेत. कुणी आपली मूळ प्रवृत्ती बदलली नाही.
अपवाद फक्त मनुष्य प्राण्याचा !
त्याचं काहीच खरं नाही, त्याचा कोणताच रंग सच्चा नाही !
अर्थात यालाही काही अपवाद आहेत.
त्या अपवादात आपण असावं यासाठी आपलं जगणं उदात्त, उत्तुंग नि विवेकी व्हावं !
__ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

एका सुहृद मित्राने विचारलं, कशाला उद्देशून आहे हे..??

मी म्हणालो...

गतकालात माझ्याकडून अनेक चुका झाल्यात, अनेक भल्या बुऱ्या गोष्टी आयुष्यात घडल्या आहेत. अलीकडील काळात त्या चुकांचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्यातल्या वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीची धडपड करत असताना जाणवतं की मूळचा माझा जन्मतः पिंड चांगलाच असणार मात्र कालौघात मी वाहवत गेलो, भला बुरा झालो. आता जेंव्हा चांगल्या पापभीरु लोकांना पाहतो त्यांच्या सहवासात येतो तेंव्हा वाटतं की त्यांच्यासारखं आपण होऊ शकत नसलो तरी निदान त्यांचं जगणं नि त्यांचे विचार आत्मसात करू शकतो. माझी ही धडपड कदाचित अनेकांची असू शकते तेंव्हा हे जगण्याचे पसायदान मागतो आहे !

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा