प्रेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात बऱ्याचदा प्रेमाचे काही आदर्श असतातच. जे की त्याने वाचलेले, ऐकलेले वा पाहिलेले असतात. लैलामजनू, हिर रांझा, रोमिओ ज्युलियेट ही यातली जुनी नावे. फिल्मी जोड्या आणि त्यांच्या भूमिकांची नावे जसे की वासू सपना, वीर झारा यांचाही प्रभाव असतो. याहून भिन्न प्रकृतीचाही एक महत्वाचा घटक असतो ज्याचा प्रेमी युगुलांवर प्रभाव जाणवतो तो म्हणजे साहित्य. त्यातही प्रेमकवितांचा ठसा अधिक. यात पुन्हा व्यक्तीसापेक्ष कवितांची नि कवीची नामावली वेगळीच समोर येते. त्यातही रवींद्रनाथ ठाकूर यांचे नाव बहुश्रुत असेच आहे. त्याचे कारण त्यांच्या काव्यरचनेच्या वैशिष्ट्यांत आणि त्यामागच्या पार्श्वभूमीमध्ये आहे.
रवींद्रनाथांच्या कविता नि संगीत पाहता, या बंगाली आयकॉनला 'रोमान्सचा कवी' म्हटले गेले यात आश्चर्य नाही. तथापि मुंबईत फुललेल्या रवींद्र आणि अन्नपूर्णा तर्खड यांच्या प्रेमकहाणीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. सतरा वर्षांचा कोवळा तरुण रवींद्र एका मराठी मुलीच्या प्रेमात पडला आणि आजही ती त्याच्या कवितांमध्ये जिवंत आहे. कुटुंबात, सण, उत्सवात अनेकदा गायल्या जाणाऱ्या रवींद्र संगीतात प्रेमाचा अप्रतिम संगम आहे. जसे या गाण्यात आहे, 'भलोभेसे शोखी, निभ्रते जोतोने,' म्हणजे, 'माझ्या प्रिये, तुझ्या आत्म्याच्या मंदिरात प्रेम आणि प्रेमाने माझे नाव लिही..'
रवींद्रनाथांच्या प्रेमाबद्दल जाणून घेण्याआधी अन्नपूर्णेबद्दल जाणून घेतले पाहिजे.
अन्नपूर्णा ही डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांची कन्या. ते मुंबईस्थित विख्यात डॉक्टर होते. उच्चशिक्षित कुटुंबातील असण्यासोबतच आत्माराम हे प्रार्थना समाजाची स्थापना करणारे समर्पित समाजसुधारक देखील होते. त्यांच्या मित्रांमध्ये देशभरातील सुधारक आणि प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता. या ओळखींपैकी एक रवींद्रनाथ टागोरांचे थोरले बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे देखील होते. भारतीय नागरी सेवेत रुजू होणारे ते पहिले भारतीय होते.
सत्येंद्रनाथ यांनीच रवींद्र यांना तर्खडकर कुटुंबासोबत राहण्यासाठी मुंबईला पाठवले. कारण 1878 साली रवींद्र पहिल्यांदा इंग्लंडला जाणार होते. त्यामुळे तिथे जाण्यापूर्वी रवींद्रचे इंग्रजी चांगले असावे असे त्याला वाटत होते. आणि यासाठी आंग्लभाषाप्रवण तर्खडकर कुटुंबापेक्षा चांगला पर्याय नव्हता. 1878 च्या मध्यात जवळजवळ दोन महिने किशोरवयीन रवींद्र हा आत्माराम यांच्या घरी राहिला. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली अन्नपूर्णा त्याला इंग्रजी शिकवायची. रवींद्रपेक्षा तीन वर्षांनी मोठी असलेली अन्नपूर्णा नुकतीच इंग्लंडहून परतली होती. त्यामुळे तिचे इंग्रजी फर्डे होते.
असे मानले जाते की याच काळात ते दोघे प्रेमात पडले. कृष्णा कृपलानी यांनी त्यांच्या 'टागोर-ए लाइफ' या पुस्तकात त्यांच्या नात्याबद्दल लिहिले आहे. या पुस्तकानुसार दोघांमध्ये हे स्नेहाचे नाते निर्माण झाल्यानंतर रवींद्रांनी अन्नपूर्णेला 'नलिनी' हे नाव दिले. इतकेच नाही तर रवींद्रच्या अनेक कविताही नलिनी यांच्याकडून प्रेरित आहेत. रवींद्रांनी ठरवले होते की विदेशातून परतताच वडिलांशी अन्नपूर्णेसोबत विवाहाविषयी बोलायचे नि नाते पक्के करायचे. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कदाचित त्यामुळेच पौगंडावस्थेतील हे प्रेम भविष्याचा साथीदार होऊ शकले नाही.
मुंबईत दोन महिने राहिल्यानंतर तर्खडकरांचा निरोप घेऊन रवींद्रनाथ इंग्लंडला गेले. नियतीच्या मनात वेगळेच होते. रवींद्रनाथ तिकडे इंग्लंडमध्ये असताना आत्माराम तर्खडकर अन्नपूर्णाला सोबत घेऊन आपल्या धाकट्या मुलीसह कोलकत्यात आले. अन्नपूर्णा आणि रवींद्र यांच्यातील संबंध आत्माराम तर्खडकर यांनी स्वीकारले होते. त्या नात्याला नाव द्यायचे त्यांच्या मनात होते. त्यांनी रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. ठाकूर कुटुंबाचे पिढीजात निवासस्थान असलेल्या जोरसंको ठाकूरबारी (ठाकूरवाडी) येथे जाऊन देवेंद्रनाथांना भेटले. तिथे काय चर्चा झाली हे काळाच्या उदरात गुपितच राहिले. मात्र काहींचे मत असे आहे की रवींद्रनाथांपेक्षा अन्नपूर्णा तीन वर्षांनी मोठी असल्याने देवेंद्रनाथांनी हा प्रस्ताव नाकारला. त्याच्या पुढल्याच वर्षी अन्नपूर्णाचा विवाह झाला. बडोदा हायस्कूल आणि कॉलेजचे स्कॉटिश उपाध्यक्ष हॅरोल्ड लिटलडेलशी तिचे लग्न झाले. या लग्नास तिची संमती होती किंवा कसे हे कधीही कुणालाही कळले नाही किंबहुना हे गूढ राहिले. त्यानंतर ती आपल्या पतीसह इंग्लंडला गेली आणि एडिनबर्गमध्ये स्थायिक झाली. पण 1891 मध्ये वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी अन्नपूर्णेचे निधन झाले.
अन्नपूर्णा इंग्लंडमध्ये गेली मात्र रवींद्रनाथांना विसरू शकली नाही. तिने तिचे साहित्यिक नाव 'नलिनी' ठेवलं आणि आपली निर्मिती सुरु ठेवली. तिने तिच्या मुलीचे नाव ऍना नेलिनी ठेवले आणि एका पुतण्याचे नावही रवींद्रनाथ ठेवले. रवींद्रनाथ ठाकूरांनीही आपल्या लेखनात 'नलिनी' हे नाव अतिशय आर्त प्रेमाने हळुवारपणे वापरले आहे. या सर्व गोष्टींवरून असे दिसून येते की त्यांचे नाते केवळ आकर्षणाचा क्षण नव्हते.
खरं तर, रवींद्रनाथ अन्नपूर्णाला कधीच विसरले नव्हते. ते उतारवयातही अनेकदा तिच्याबद्दल बोलायचे. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही त्यांना नलिनी आठवायची. एकदा तर त्यांनी एक सिक्रेट शेअर केलेलं ! नलिनीने त्यांना कधीही दाढी करू नका हे कशा पद्धतीने सांगितले होते तेही कथन केला ! यावर रवींद्रनाथ म्हणाले की “प्रत्येकाला माहित आहे की सुरुवातीला मी तो सल्ला पाळला नाही. पण माझ्या चेहऱ्यावरची ती अवहेलना पाहण्यासाठी ती स्वतः जगली नाही." त्या दोघांचे नाते उत्कट होते, त्यांच्यात कोणतंही संभाषण होत नव्हतं की कुठली देवाणघेवाण होत नव्हती तरीही ते एकमेकांच्या अंतःकरणात सामावून होते !
याचा अर्थ असा कुणीही लावू नये की रवींद्रनाथांचे त्यांच्या पत्नीवर मृणालिनीवर प्रेम नव्हते वा त्यांच्या नात्यात प्रेमाचा स्नेहाचा ओलावा नव्हता, उलटपक्षी रवींद्रनाथांनी मृणालिनीवर असीम प्रेम केले. नलिनी हा त्यांचा पारलौकिक जीवनबिंदू होता तर मृणालिनी ही त्यांची अर्धांगिनी होती, त्यांची जगण्याची ओढ होती, त्यांची ऊर्मी होती !
रवींद्रनाथांच्या साहित्यात डोकवणाऱ्या नलिनीकडे विषयासक्त वा देहिक भूमिकेतून कधीही पाहता येणार नाही वा दोन जीवांचे मिलन असंही त्याला म्हणता येणार नाही मात्र एका आत्म्याचे दोन प्रकटन असं मी त्याला नक्की म्हणेन ! असंही प्रेम असतं, ज्याला कुठल्याही नात्याची वा स्पष्टीकरणाची गरजही पडत नाही. अर्थात यात कमालीचे नितळ मन हवे नि पारदर्शी अंतःकरण हवे, पाहणाऱ्याला तेच दिसावे जे अनादी सत्य आहे !
मृणालिनीच्या समजूतदारपणावर, उदार अंतःकरणावर मी प्रेम करतो !
रवींद्रनाथ आणि नलिनी यांच्यातल्या नात्याचा मला हेवा वाटतो.
नाव नसलेल्या या अनामिक नात्यावर मी मनापासून प्रेम करतो !
या प्रेमकथेला मी अधुरी प्रेमकहाणी म्हणत नाही कारण अशा प्रेमाला अंत नसतो, ते अविरत अनंत असते.
अगदी मरणोपरांतही !
प्रेमाच्या सच्च्या भावनेवर मी प्रेम करतो !
- समीर गायकवाड
काही नोंदी -
** रवींद्रनाथांच्या आयुष्यात आणखी एक स्त्री होती असं बंगाली साहित्यिक, अभ्यासक सांगतात. तिचे नाव कादंबरी देवी. रवींद्रांचे मोठे बंधू ज्योतिन्द्रनाथ हे तिचे पती. लग्नाच्या वेळी ती नऊ वर्षांची होती आणि तिचे पती होते एकोणीस वर्षांचे ! मित्र सखा म्हणून सात वर्षाच्या रवींद्रवर तिचे मन जडले. आपल्या मनातलं सारं काही त्याच्याशी शेअर करायची. वयाच्या बाविसाव्या वर्षी रवींद्रचे लग्न ठरले तेंव्हा कादंबरीने त्यास विरोध केलेला ! आपला साथीदार हिरावला जाईल ही भीती त्यात होती. मात्र तिच्या विरोधास न जुमानता रवींद्रचे मृणालिनीसोबत लग्न झाले आणि त्या नंतर अवघ्या चार महिन्यात कादंबरीने आत्महत्या केली. रवींद्रनाथांच्या साहित्यात बालपणीची राजकुमारी म्हणून ती तरळते ! खऱ्या प्रेमाशिवाय टोकदार लिहिता येत नाही हे खरेच आहे !
रवींद्रनाथ ठाकूर आणि अमृता प्रितम यांच्या रचनांत एक साम्य जाणवते. त्यात दुरावलेल्या नात्याची अत्यंत हळुवार शब्दचित्रे दिसतात, जी प्रत्येक रचनेनंतर दृढ होत जातात आणि वाचणाऱ्याला श्रेष्ठ काव्यानुभावाखेरीज नितांतसुंदर जीवनविचार देतात !
** निदा फाजली यांच्या आयुष्यात घडलेल्या अशाच घटनांचा परामर्श त्यांनी त्यांच्या कवितांत, गीतांत अविरत घेतला. जिच्यावर जीव होता ती अकाली गेल्यावर त्यांनी तिला आपल्या कवितेत शोधले आणि त्यात तिला चैतन्यदायी स्वरूप दिले ! तिचं नसणं हाच त्यांच्या कवितांचा स्थायीभाव होऊन गेला, प्रेमाचा सुखांत न होणं म्हणजे काय असा प्रतिप्रश्न निदा नेहमी करत !
इंदिरा संत यांच्या कवितांतदेखील अशीच तरल प्रेमभावना नित्य जाणवते, किंबहुना ती एका लयीत समोर येते आणि वाचकाला खिळवून ठेवते. आनंद देते.
** रवींद्रनाथांच्या कथांमध्ये थोराड नायिका आणि कोवळा तरुण प्रियकर, नायक परगावी गेल्यानंतर विवाहबद्ध होणारी प्रेयसी, बाल राजकुमारी आणि तिचा सखा, पतीसुखाला वंचित असणारी पत्नी आणि अचानक जीवनात परतलेला प्रियकर, गावी परतलेला प्रियकर आणि त्याची विधवा प्रेयसी अशी पात्रे भेटतात. ही पात्रे त्यांच्या व्यक्तिगत जीवनानुभावाशी निगडीत होती असा प्रवाद बंगाली साहित्यात अजूनही आहे.
** नलिनी आणि रवींद्रनाथ यांच्या नात्यावर सिनेमा बनवण्याचा घाट मध्यंतरी घातला गेला होता मात्र त्यातली आव्हाने पाहू जाता तो प्रोजेक्ट थंड्या बस्त्यात गेला. कारण पडद्यावर ही कथा चितारली जाईल तेंव्हा त्यात गल्लाभरू दृश्यांचा भडीमार होण्याची शक्यता अधिक ! आणि बंगाली अस्मितेचा मानबिंदू म्हणून रवींद्रनाथांकडे पाहिले जात असल्याने हात मागे घेणं हाच उपाय उरतो ! तरीही असं वाटतं की यावर एखादा नितांतसुंदर तरल सिनेमा बनला पाहिजे जो केवळ त्यांच्या अनाम नात्याच्या कवितेसारखा असावा !
** रवींद्रनाथ आणि मृणालिनी यांचं वैवाहिक आयुष्य 19 वर्षांचं होतं. मृणालिनीदेवींच्या मृत्यूनंतर त्यांनी दुसरं लग्न केलं नाही. वैवाहिक जीवनात रवींद्रनाथ खूप सुखी होते का याचं नेमकं उत्तर मिळत नाही. त्यांनी आपल्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, आपण दोघंही विचारानं काॅम्रेड असतो, तर आयुष्यात एकत्रितपणे ती उंची गाठू शकलो असतो. मग खूप सुंदर घडलं असतं. पण तसं काहीही झालं नाही. म्हणजे त्यांना जे अपेक्षित होतं ते त्यांच्या वैवाहिक जीवनात घडलं नव्हतं का ? काय अपेक्षित होतं त्यांना ? याची नेमकी उत्तरे मिळत नाहीत.
** व्हिक्टोरिया ओकॅम्पोसोबत त्यांचं वेगळं बौद्धिक नातं होतं. रवींद्रनाथांचं बरंचसं साहित्य प्रेमाच्या संकल्पनेवर आधारलेलं आहे. प्रेमाबद्दलची त्यांची कल्पना अनोखी होती. ते म्हणायचे, प्रेम हे रहस्य आहे कारण त्याच्या मागे काहीच तर्क नसतो. प्रेमावर स्वामित्वाची भावना नसावी, प्रेमाला मोकळं सोडावं. त्यांच्या जीवनात आलेल्या विविधांगी अनुभवावरूनच त्यांचे असे मत बनले असावे यात शंका नाही.

** रवींद्रनाथांचे आडनाव ठाकूर. मात्र हिंदीभाषक अभ्यासकांनी इंग्रजाळलेला टागोर हा उच्चार इतका रूढ केला की आता कुणी रवींद्रनाथ ठाकूर असं लिहिलं बोललं तर माहिती नसलेली व्यक्ती सांगते की बाबा रे ते ठाकूर नव्हे ते टागोर म्हण !
मध्यंतरी एका वृत्त वाहिनीवर ठाकूर की टागोर यावरून जो विवाद झाला त्याने वाहिनीवरील वृत्तनिवेदकाच्या अकलेचे पितळ उघडे पडलेले. दस्तूरखुद्द बंगाली माणूस त्यांना गुरुदेब इतकंच संबोधतो, पूर्ण नाव घ्यायचं झालं तर रबीन्द्रनाथ ठाकूरजी म्हणतो !
अन्यभाषिकांनी रवींद्रनाथ ठाकूर असा उच्चार केला की बंगाली माणसाला आनंद होतो हे वेगळं सांगायला नको.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा