मीनाच्या मध्यस्थीतून सुलोचनाने भेटीसाठी निरोप दिलेला असल्याने तिला भेटायचे होते मात्र लॉकडाऊनच्या काळात तिला भेटता आलं नाही.
२००६ मध्ये तिच्यावर बलात्कार झालेला. आरोपी पकडले गेले. खटला भरला गेला आणि त्यांना चौदा वर्षांची सक्तमजूरीची सजा लागली.
बलात्कार झाल्यानंतर पती अरुणचं तिच्यासोबतच वर्तन हळूहळू बदलत गेलं.
सुरुवातीला लढा, संघर्ष इत्यादी शब्दांनी तिला खूप भारी वाटायचं, मात्र नंतर आपल्या अरुणचं बदलतं स्वरूप पाहून ती घाबरून गेली.
त्याचं म्हणणं असं होतं की पीडित म्हणून तिचं नाव किती जरी गुपित राखलं गेलं असलं तरी अवघ्या काही आठवड्यात अख्ख्या शहराला त्या घटनेची माहिती तिच्या नावासह कळाली होती, त्याचे मित्र बाहेर त्याची चेष्टा करू लागले होते.
तर क्वचित कुणी त्याची मस्करी करताना टोमणे मारू लागले होते.
त्याने आधी दुर्लक्ष केलं. नंतर त्याच्या मनातच द्विधा अवस्था निर्माण झाली. दरम्यान त्याने सुलोचनासोबत शारीरिक संबंध ठेवणं बंद केलं. झोपडपट्टी बदलून ते नांदगाव वेस भागात राहायला आले मात्र प्रश्न सुटण्याऐवजी त्यातला गुंता वाढला.
सुलोचनाला आधी काही वेडंवाकडं वाटलं नाही नंतर मात्र तिची प्रचंड घुसमट होऊ लागली.
सासू, सासरा, थोरला दीर, नणंद, नातलग आणि शेजारी पाजारी सगळेच तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले.
तिला ते चांगलेच खटकले मात्र ती काही करू शकत नव्हती.
या सर्व घटनाक्रमात तीन वर्ष गेली आणि दरम्यान खटल्याचा निकाल लागल्यावर अरुणने तिच्याशी बोलणं देखील कमी केलं.
यानंतर काही दिवसांनी सुलोचनेला कुठून तरी भणक लागली की आपल्या नवऱ्याने मीना नावाची बाई ठेवली आहे !
पस्तीशी पार केलेल्या सुलोचनेपेक्षा मीना वयाने खूपच लहान होती. अरुणचं वय तेंव्हा चाळीशीचं असावं.
अरुण बांधकामांच्या साईटवर मुकदमाचे काम करायचा आणि सुलोचना स्वतः घरगुती कामे करायची. तेंव्हा पैशावरून तो तिला खूप सुनवायचा. आता सुलोचनेला एक छदामही न देता त्याने बाईवर दौलतज्यादा केलेली ! या माहितीने सुलोचना पुरती कोसळून गेली. माहेरची अतिव गरिबी आणि स्वतःची अगतिक असहाय अवस्था पाहू जाता सारं काही सहन करण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता.
पुढे जाऊन तिने घर सोडावं यासाठी दबाव येऊ लागला, मारहाण होऊ लागली. घर सोडून जावं नाहीतर तिच्या दोन्ही मुलांना खलास केलं जाईल अशी दमदाटी सुरु झाली. तरीही ती घाबरली नाही. मग तिला जबरी मारहाण सुरु झाली. लातूरच्या एका एनजीओने तिला मदत केली. तिला न्याय आणि सन्मान मिळवून दिला. तिच्या पायावर उभं केलं.
मागच्या वर्षी कोविडमधून बरा झालेला अरुण अंथरुणाला खिळून होता. धुम्रपानाने आणि टीबीने त्याची फुफ्फुसे पुरती मोकळी केली होती. त्याची एकच इच्छा बाकी होती ती म्हणजे अखेरच्या काळात सुलोचनाची आणि आपल्या मुलांची भेट घ्यायचीय !
मधल्या काळात त्याने मीनाला पत्नीचा दर्जा देत घरी आणलं होतं. त्याची सगळी कमाई तिच्यावर उधळली होती. दीड दशकांत तिच्यापासून त्याला संतती लाभली नाही. त्याचा होता नव्हता तो सारा पैसा संपायला आणि त्याला पक्षाघाताचा झटका यायला एकच गाठ पडली.
त्याला विकलांग अवस्थेत सोडून मीना निघून गेली. तिची अवस्था तर अशी झाली की आता लातुरात देहविक्रीचा व्यवसाय करते.
अरुणला भेटायची सुलोचनाची अजिबात इच्छा नव्हती मात्र तिच्या अंतर्मनाने मानवतेच्या धर्माची आठवण करून दिल्यावर त्याची भेट घेण्यास ती राजी झाली. मनातले द्वंद्व संपल्यानंतर त्याला भेटायला ती गेली खरी मात्र तोवर उशीर झालेला. ती घरी पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.
मुलाला हक्क मिळो न मिळो आणि बापाचे नाव लागो न लागो तरीही बापाच्या चितेला त्याच्या हाताने अग्नी दिला जावा यास ती अनिच्छेनेच राजी झाली.
सगळे विधी झाल्यानंतर तिची सासू,सासरे तिला घरी परतण्याविषयी विनवत होते. माणुसकीच्या भावनेने ती तयारही झाली मात्र तिची तरुण मुले याला तयार नव्हती.
या घटनेला सहा महिने उलटून गेलेत.
ते आता मध्यम लोकवस्तीच्या भागात थोड्याफार सुखात राहतात.
किती जरी नाही म्हटलं तरी तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यांपुढे सतत तरळत राहतो.
तिच्यासोबत जे झालं त्यात तिची चूक काय हे तिला अद्यापही उमगले नाही. तिला समजावून सांगताना कमी पडल्यासारखं वाटलं. तिचे सवाल बेसिक होते नि वर्मावर बोट ठेवणारे होते, ज्याची उत्तरे तिच्या साध्या सरळ स्वभावाला झेपणारी नव्हती.
सुलोचना एक भली स्त्री आहे. आजकाल मीनाच्या दवादारूसाठी ती लपून छपून मदत करते. निग्रहपूर्वक तिला सांगितलं की, 'तुझी मुलं मोठी झालीत त्यांनाही मीनाच्या मदतीबद्दल माहित असूदेत म्हणजे तुझ्याबद्दल गैरसमज होणार नाही. ती राजी झाली. तिने ते सांगितले देखील असेल याबाबत मी आश्वस्त आहे. असो.
पुरुषाने बलात्कार केला वा त्याच्यावर बलात्काराचे आरोप झाले तर त्याच्या बायकोला त्याच्याशी असं हटकून वागता येईल का ? घरातले लोक त्याच्याकडे असं संशयाने पाहतील का ? समाज देखील त्याला नकळत जवळ करतो आणि तो मोठा झाला तर त्याला मानाचे पान देखील देतो, मात्र ज्या बाईवर बलात्कार होतो तिला असं सहजी ऍक्सेप्ट केलं जातं का ? तिची ओळख जगजाहीर झाल्यावर नात्यातले ओळखीतले लोक तिच्याशी पहिल्यासारखं वागतील का ?
अपवाद वगळता स्त्रिया बहुत करून मोठ्या मनाच्या असतात, चटकन माफ करतात आणि झालं गेलं विसरून जाऊ म्हणत नव्याने रुजतात. सहज रुजणं हा तिचा गुण आहे आणि कमजोरीही आहे.
सुलोचनेविषयीची सगळी माहिती मीनामुळेच मिळाली, तिची भेट घेता आली. आता त्या दोघींच्या मनात एकमेकींविषयी किल्मिष उरलेलं नाही हे विशेष !
मीनाला सुलोचनाविषयी अपार आस्था आहे नि सुलोचनाला तिच्याविषयी कणव !
आपण ज्या विश्वात जगत असतो त्याच्या परिघातच अनेक अशी वर्तुळे आहेत की ज्यातला अंधारगंधदेखील आपल्याला नकोसा असतो ! मात्र तिथेही काही सुगंधी प्रकाशाचे कवडसे असतात.
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा