रविवार, २० मार्च, २०२२

गाणी इंडिया आणि भारतामधली !



हेअरकटींग सलूनमध्ये नेहमी गाणी सुरु असतात त्यांचा क्लास वेगळाच असतो.
ऑटोरिक्षा, वडाप - टमटम, टॅक्सीमध्ये एफएमवर किंवा पेनड्राईव्हवर गाणी वाजत असतात ती बहुत करून करंट हिट्स असतात किंवा रेट्रो ओल्ड गोल्ड कलेक्शनपैकी असतात. त्याचवेळी टेम्पो ट्रॅवलरसारख्या वाहनातील गाणी वेगळीच असतात, बहुधा गझल्स किंवा सुफी वाजतं.

ऊस वा मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सवर स्थानिक भाषांमधली 'चालू' गाणी कानठळ्या बसेल अशा आवाजात सुरु असतात.

ट्रक्स किंवा हेवी व्हेइकल्समध्ये रिमिक्स, रेट्रो, मल्टीलँग्वेज गाणी कानी पडतात.

वेश्यांच्या कुंटणखान्यांवर लता कुमारशानू अलका याज्ञिक नदीम श्रवण टाईप कॉम्बिनेशनची नाईंटीपासूनची गाणी प्ले होत असतात, तिथे येणाऱ्या पब्लिकवर त्याचा खासा असर होत असतो.

पान टपरी, दारुचे गुत्ते इथं वाजणारी गाणी एका विशिष्ट कालखंडात अडकलेली असतात, या लोकांची काही खास गाणी असतात जी वर्षानुवर्षे रोज ऐकली जातात !

पब्ज आणि डिस्कोथेकमध्ये उडत्या चालींवरची इंग्लिश हिंदी पंजाबी आणि अलीकडे काही प्रमाणात तमिळ मल्याळी गाणीही ऑन ट्रॅक असतात.

लोकनाट्य कला केंद्रांवरची दुनियाच न्यारी असते, अलीकडे तिथे हिंदी गाणीही जोरात सादर होतात !

सरतेशेवटी ग्रामीण भारतात होत असलेल्या यात्रा जत्रा आणि उत्सवांत सादर होणाऱ्या ऑर्केस्ट्रा नाईट्समध्ये स्थानिक भाषेतील गाण्यांपासून हॉट बॉलिवूड गीतांपर्यंतची गाणी गायली जातात.

शास्त्रीय वा क्लासिकल गाणी ऐकणारा श्रोतावर्ग आणि वर उल्लेखलेला वर्ग यांच्यात मी भेद करत नाही.

लताबाई गेल्यानंतर एकाही वृत्तवाहिनीने वा एफएम रेडिओ वाहिनीने या घटकांचे मनोगत जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही.
किंबहुना तीच ती माहिती देण्यात ते धन्यता मानत राहिले.
अगदी वर्तमानपत्रांनीदेखील बहुतांश पूर्वप्रकाशित मजकूरच छापला.
मुळात आपल्यापैकी कित्येकांना हा मुद्दा ध्यानी आलेला नसतो.

कल्पनादारिद्र्य असं म्हणत याकडे दुर्लक्ष करणे अपराध होईल कारण पब्ज डिस्कोथेक वगळता 'भारता'तील हे घटक आम्हा 'इंडिया'वासीयांच्या परिघाबाहेरचे असतात.
असो...

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा