बुधवार, ३० मार्च, २०२२

एक देश ..आनंदाच्या शोधात !


‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे...’ जगतगुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग ठाऊक नसेल असा रसिक, भाविक मराठी माणूस नसेल. आनंदाचं इतकं श्रेष्ठ वर्णन, इतकी सुंदर व्याख्या खचितच कुणी केली असेल. तुकोबांना जो आनंद अभिप्रेत आहे तो अंतर्मनाचा आहे. या अनुभूतीसाठी आपण आनंदाचा ब्रह्मानंदाचा डोह व्हायचं म्हणजे त्यात आनंदाच्याच लाटा येतात. कारण आनंदाचे अंग आनंदच आहे. यातून जे काही सुख लाभतेय ते काहीच्या बाही अफाट आहे. त्याचे कसे वर्णन करता येईल ? कारण ब्रम्हानंदाच्या ओढीने इतर लोभ लोप पावतात. पोटातील गर्भाची जशी आवड असते तेच डोहाळे आईला होतात. आनंदानुभवाचा ठसा अंत:करणात उमटायला पाहिजे मग तो वाणीद्वारे प्रकट होतोच ! आनंदाचे हे सूत्र त्रिकालाबाधित आहे.

"आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो चोहिकडे" बालकवींच्या या कवितेविषयी अखिल मराठी जनमानसात अपार प्रेम आहे. आपल्या शालेय जीवनात शिक्षकांनी अगदी ताल लावून ही कविता कधीतरी म्हणवून घेतलेली असतेच. किशोरवयात गायलेले बडबडगीत 'चला चला, गाऊ चला आनंदाचे गाणे !' हे आपल्या सर्वांच्या आनंदी बाल्यावस्थेचे साक्षीदार आहे. म्हणजेच आनंदी असण्याचे वा राहण्याचे संस्कार शिशुअवस्थेतील बडबडगीतापासून ते थेट पोक्तपणी येणाऱ्या विरक्तिअवस्थेपर्यंत संतांच्या अभंगांपर्यंतच्या रचनांमधून झाले आहेत. इतकेच नव्हे तर फिल्मी गांधीगिरी करणारा मुन्नाभाई देखील आपल्याला सांगतो की, "टेन्शन नही लेने का, बिंधास रहने का !" तरीदेखील आपण आनंदी राहण्यात जगाच्या तुलनेत खूपच मागे पडत आहोत. काय झालेय आपल्याला ? नेमकं कुठं बिनसलंय ? खरे तर स्वातंत्र्योत्तर काळखंडातला हा असा डिजिटल काळ आहे जो सर्वाधिक भौतिक साधनांनी, सुख सुविधांनी लगडलाय. कुठली इच्छा करायचा अवकाश वा कुठले नवे साधन संशोधित करण्याची मनीषा जरी व्यक्त केली तरी ती लगेच पुरी होते इतका हा अधिभौतिक समृद्ध काळ आहे. सुखसाधने वारेमाप झालीत, फुरसतीच्या काळापासून ते रुक्ष दैनंदिन जीवनापर्यंतच्या गरजेच्या, चैनीच्या वस्तूंनी अवघा भवताल सजला आहे. रोजच मानवी सर्जकतेचे नवनवे परिमाण दिसताहेत. सातही खंडांत हे परिवर्तन वेगाने होतेय त्यानुरूप तिथे सुख समाधानही नांदतेय. तुलनेने आपल्याकडेही खूप सारे बदल झालेत, बरंच भलंवाईट घडून गेलंय त्याला आपणही टक्कर दिलीय, तुलनेने अन्य राष्ट्रांपेक्षा आपण अनेक पातळ्यांवर पुढारलेले असूनही आनंदी वृत्तीविषयी मात्र खूप पिछाडलेले आहोत.

2021 सालाकरिताची जगभरातल्या आनंदी देशांची यादी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालीय. संयुक्त राष्ट्राच्या वतीने जाहीर झालेल्या या यादीत सलग पाचव्या वर्षी फिनलंड या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेले कित्येक वर्षे अंतर्गत यादवीने आणि आता तालिबानी राजवटीच्या क्रूर पंजाखाली असणारा अफगाणिस्तान सर्वात दुःखी देश ठरलाय. अफगाणिस्तानचं सर्वात खाली असणं हे साहजिक आणि लाजमी आहे. डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड हे देश पहिल्या पाचमध्ये सर्वात आनंदी देश आहेत. या यादीत अमेरिका 16 व्या आणि ब्रिटन 17 व्या क्रमांकावर आहे तर भारत 136 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वेळी भारताचा क्रमांक 139 वा होता. 2020 सालच्या यादीत 156 आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 143वा होता, तर 2019 मध्ये 140वा क्रमांक आणि सन 2015 मध्ये 117 वा क्रमांक होता, म्हणजे आनंदाच्या बाबतीत भारत दरवर्षी तळाकडे जातोय. सगळ्यांची गंगा उलटी वाहतेय असे नाहीये, काही देशांनी लक्षणीय झेप घेतली आहे. यंदाच्या यादीनुसार बांग्लादेश पाकिस्तान हे देखील आपल्या पुढे निघून गेलेत. काही वर्षांपूर्वी यादवी युद्धाने ग्रासलेल्या सर्बियाने सातत्याने वरच्या स्थानाकडे कूच केलेय. बल्गेरिया आणि रोमानिया या देशांत आनंदी जीवन जगण्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये सर्वात मोठी घसरण ज्या देशांत झाली आहे त्यांची ढासळती आर्थिक स्थिती, घसरत गेलेलं सामाजिक जीवन पाहू जाता त्याचे नवल वाटत नाही. लेबनॉन, व्हेनेझुएला आणि अफगाणिस्तान या तीन देशांत ही गतिमान अवनती झाली आहे. सातत्याने होत असणारे सत्ताबदल, बंडखोरी नि पेट्रोडॉलर्सची चणचण यामुळे लेबनॉन मागे पडत चाललाय तो 144व्या स्थानी पोहोचलाय. आर्थिक नियोजनातील साठमारी नि वंशभेदाने ग्रासलेला झिम्बाब्वे देखील मागे पडतोय. अफगाणी जनतेने आनंदात राहावं असं काहीच तिकडे घडत नाहीये. ज्या ज्या देशांत अनागोंदी आहे, आर्थिक घडी विस्कटते आहे, सामाजिक जीवनात घुसमट वाढत्येय त्या देशांचा आनंदाचा स्तर घसरत जाणं आपण समजू शकतो. मात्र आपलीही घसरण का होत्येय याचे उत्तर आपल्यापाशीच आहे ज्याकडे कटाक्ष टाकण्यास आपण कदापिही राजी नसतो.

मागील दशकापासून आनंदी देशांची यादी संयुक्त राष्ट्राकडून जारी केली जात्येय. आनंदाचा निर्देशांक मोजण्यासाठी संबंधित देशातील नागरिकांचे वैयक्तिक स्तरावरचे समाधान, दरडोई आर्थिक उत्पन्न, लैंगिक समानता, परस्पर सामंजस्य, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, उदारता, स्वच्छंद भाव, जनतेच्या राहणीमानाचा दर्जा, देशाचा एकूण जीडीपी आणि त्या त्या देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान इत्यादी घटकांचा विचार केला होतो. या सर्व घटकांचे एकत्रित मुल्यांकन करून तो देश किती आनंदी आहे हे ठरवले जाते. जगातील अदमासे दीडशे देशांचे या सर्व गोष्टींच्या आधारे मुल्यमापन केले जाते, त्याद्वारे क्रमवारी जाहीर केली जाते. यंदाच्या वर्षी 146 देशांचा या मोहिमेत अंतर्भाव होता. हजारच्या पटीमध्ये नागरिकांचे गट करून हे कोष्टक आरेखन अंमलात आणले जाते. या लोकांना संबंधित मुद्द्यांविषयी काय वाटते हे विचारात घेतले जाते हे महत्वाचे आहे कारण संयुक्त राष्ट्रांच्या मानवी जीवन मुल्यांविषयीच्या अन्य अहवालांत तज्ज्ञ लोकांचे मत प्राधान्याने विचारात घेतले जाते, इथे तसे होत नाही. इथला निष्कर्ष लोकमतांवरच आधारित असतो. वास्तविक पाहता मागची दोन्ही वर्षे कोविडच्या लाटेची होती, त्यातही गतसाली त्याचा प्रभाव तीव्रतेने जाणवला होता. मग असे असूनही अनेक देशांनी या काळातही वरचे स्थान एकतर शाबित ठेवलंय आणि बऱ्याच जणांनी प्रगतीही केलीय. भारताला कोविड लाटेचा फटका व्यापक आणि मोठ्या प्रमाणात बसल्याने आपण मागे पडलो आहोत असा युक्तिवाद करूनही चालणार नाही कारण गत पाच वर्षे आपली घसरण जारी आहे ! कोविड काळात लोकांनी एकमेकांना किती सहारा दिला आणि शासन व्यवस्थेविषयी त्यांना किती जीवन सुरक्षिततेची किती हमी वाटली हे दोन मुद्देही इथे महत्वाचे ठरलेत.

हे अहवाल सरकारच्या मनाजोगते आले नाहीत तर त्या त्या देशातील सरकारधार्जिण्या संघटना, यंत्रणा यांविषयी नकारात्मक सूर लावतात. आनंदाच्या व्याख्या वा अनुभूती व्यक्तीसापेक्ष भिन्न असल्याचा आधार घेतला जातो. मात्र यात अर्थ नाही कारण जे देश आनंदविषयक निर्देशांकात पिछाडीवर पडताना दिसतात तेच देश संयुक्त राष्ट्रांच्या अन्य काही अहवालात देखील घसरणीला लागल्याचे स्पष्ट दिसते. जसे की आर्थिक स्तर, गुन्हेगारीचे प्रमाण, पर्यावरण जागरूकता आणि प्रदूषण विषयक अहवाल ! यंदाच्या प्रदूषणविषयक अहवालाने यावर शिक्कामोर्तब केलंय. यातून भारताची अत्यंत दयनीय स्थिती समोर आलीय. भारत हा जगातला सर्वाधिक तिसरा प्रदूषित देश आहे आणि सर्वाधिक प्रदूषित शंभर शहरांपैकी 63 शहरे भारतामधली आहेत, जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी आपल्या देशाची राजधानी दिल्ली आहे ! अन्य अहवालही हेच अंगुलीनिर्देश करतात. विकासाचा संबंध सामाजिक स्तर उंचावण्याशी आणि पर्यायाने आनंदाशी आहे. सन 2020 सालच्या मानव विकास निर्देशांकविषयक अहवालातही आपण निराशाजनक कामगिरी केलीय. 2019 साली आपण 129व्या स्थानी होतो तिथून घसरून 131व्या स्थानी आलो. या यादीत श्रीलंका आणि भूतानदेखील आपल्यापेक्षा सुस्थितीत आहेत. यावरून स्पष्ट होते की आपण आनंदी नसल्याचा निष्कर्ष योग्यच आहे. जिथली आबोहवा दुषित असेल त्याने तिथले समाजमन कलुषित होण्यास मदतच होणार !

वास्तवात आपण आनंदी नसण्याचे मूळ आपल्या वर्तणूकीत आणि अलीकडील काळात ढासळत चाललेल्या सामाजिक जीवनात आहे. आपल्याला आनंदी राहण्यापेक्षा आपण आनंदी आहोत हे दाखवण्यात अधिक स्वारस्य असते. आपला आनंद अंतःकरणातून येण्यापेक्षा तो दिखाऊ अधिक असतो. दुसऱ्याचा आनंद पाहून आपणही आनंदी होण्याची प्रवृत्ती लोप पावतेय, आपल्या आनंदाने कुणी दुःखी होतेय की काय अशाही दुविधेत आपण पडलेलो असतो. असूयेने ग्रासलेले आपलं मन दुःखात असलं तरी खोट्या आनंदाचा दिखावा करण्यात समाधान मानतं, आणि प्रत्यक्षात जेंव्हा आनंदी क्षणांची वेळ येते तेंव्हा आपण गतकाळातील दुःखांचे वेदनांचे कढ काढत बसतो. भारतीय माणूस अलीकडे दिवसेंदिवस गतकाळातील दुःख वेदनांना प्रमाण मानून जगण्याकडे कल ठेवताना दिसतो. याच मानसिकतेपायी भूतकाळात काही दशकांपूर्वी घडून गेलेला सर्वश्रुत असलेला नरसंहार हा एकाएकी आपला जिव्हाळ्याचा, दुःख उमाळयांचा राष्ट्रीय विषय ठरतो ! आपल्याला गतकाळातील दुःखे चघळण्याचे व्यसन लागलेय त्यामुळे वर्तमानात घडत असणाऱ्या मानवी जीवन मूल्यविषयक अनेक गोष्टींकडे आपण सहजी कानाडोळा करत आहोत. नकळत आपण भयग्रस्त, विकारग्रस्त आणि जातीधर्म वा अन्य वर्गवारीच्या नसलेल्या संघर्षाने भरलेले जीवन जगण्याकडे आपला कल ठेवतोय. वाढती बेरोजगारी, महागाई, सांप्रदायिक तेढ, झुंडबळी यांच्याखेरीज विकासाची ओढ नसणे अशा अनेक मुद्द्यांना आपण सपशेल फाट्यावर मारतो आहोत, किंबहुना शासकांना हेच हवे असते ! असो. लेखाच्या शेवटी एक जळजळीत वास्तव नमूद करावेसे वाटते ते म्हणजे या यादीमधील आपल्या वरच्या आणि खालच्या देशांची नावे ! यादीत 135 व्या स्थानी सिएरा लिओन आणि 137 व्या स्थानी बुरुंडी हे देश आहेत ! अत्यंत दारिद्रयावस्थेत असणारे हे दोन्ही देश आफ्रिकन आहेत. बुरुंडी आणि रवांडा या छोट्याशा देशांच्या वांशिक नरसंहारात, यादवीत जितकी माणसं मारली गेलीत तितकी तर दोन्ही महायुद्धात देखील मारली गेली नाहीत. तर सिएरा लिओन हा अत्यंत गरीब आणि मागासलेला देश आहे, इबोलाचे सर्वाधिक भीषण संक्रमण इथेच घडलेलं, 2019 साली या देशात सेक्स आणि बलात्कारविषयक पब्लिक इमर्जन्सीची स्थिती जाहीर झाली होती, स्त्रियांचं कमाल शोषण आणि अत्यल्प उत्पन्न यामुळे या देशाचे जीवनमान ढासळलेले आहे. बुरुंडी आणि सिएरा लिओनच्या मध्ये आपण आहोत, आपल्याला कसे वागायचेय याचा चॉईस आपल्यालाच करावा लागणार आहे. आनंदी राहण्याचे तेच ओपन सिक्रेट असेल. 'एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे..' हे जुने झाले, आपले सुखाचे धागे कसे नि का उसवले याचा शोध आपल्यालाच घ्यायचा आहे त्याला उपाय नाही.

- समीर गायकवाड

1 टिप्पणी:

  1. सर आपन वस्तूस्थीतीला हात घात्ला आहे
    आपन शेवटी एक मुदा मान्डला एक धागा सूकाचा आणी शंभर धागे दुखाचे
    यात बदल होने गरजेचे आहे

    उत्तर द्याहटवा